![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2020/10/14/20200902_132559.jpg)
एकेकाळी शेतकऱ्याच्या गरजा त्याच्या परिसरातच भागायच्या. बियाणं , अवजारं , खत आणि बाजारपेठही. आलेल्या पिकातील सर्वोत्तम भाग पुढच्या मोसमाच्या बियाण्यासाठी राखून ठेवला जायचा. शेताच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था मोट, बैल ह्यांच्या साहाय्याने होत असे. बैलाचं खाणं म्हणजे इंधन शेतावर तयार होत असे आणि बैलांचं शेण खत म्हणून वापरलं जायचं. मोटेची दुरुस्ती गावातला कारागीर करू शकत होता. एकूण काय की पंचक्रोशीच्या बाहेर जावं लागेल, असं काही नसायचं. पर्यावरणपूरक म्हणता येईल अशी व्यवस्था होती.
बाकी सगळ्या गोष्टींसारखं हेही चित्र बदललं. उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणं आलं. कारखान्यात तयार होणारी खताची पोती ‘’उज्ज्वल, सुफल’’ पिकांची स्वप्ने दाखवू लागली. पाणीपुरवठ्यासाठी पंप आले. भरपूर आलेल्या पिकाने आपल्यासारख्या खूप लोकसंख्या असलेल्या देशाची भूक भागली. एकेकाळी दुष्काळात बाहेरच्या देशातून धान्य आणावं लागत होतं, तिथे आता कोठारं भरून वाहू लागली. ह्या खतं, कीटकनाशकांनी काही प्रश्न संपवले आणि काही निर्माणही केले. धान्याची चव बदलली, जमिनीचा कस कमी झाला. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे रोगराईला निमंत्रण मिळते, असं मत काही तज्ज्ञांनी मांडलं.
पूर्ण वेळ शेती करणं हा विचार पक्का झाल्यावर शेती म्हणजे नक्की काय करायचं ह्या दृष्टीने विचार सुरु केला. काय करायचं नाही, हे ठरवणं जरी सोपं असलं तरी काय करायचं हे ठरवणं सोपं नव्हतं. कारण ‘शेती’ हा सर्वसमावेशक शब्द आहे. तांदूळ-गहू-डाळी-भाज्या-परदेशी भाज्या-औषधी वनस्पती-फळं ह्यातलं काहीही किंवा हे सगळं ‘शेती’ ह्या शब्दाखाली येऊ शकतं.
आम्ही पिढीजात शेतकरी नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे पारंपरिक ज्ञान मिळतं, तसं काही मिळालं नव्हतं. आमच्या आधीच्या पिढ्यांनी शेतीत हात पोळून घेऊन नोकरीचा ठराविक उत्पन्न देणारा सुरक्षित रस्ता धरला होता. आमचा हा प्रवास त्या अर्थाने उलट दिशेचा होता. शेतजमीन घेऊन तशी बरीच वर्षं झाली होती. तेव्हा फळझाडं लावली होती. भाजी किंवा अन्य पिकं घेत नव्हतो. ती सुरवात करायची तर नवीन माहिती मिळवणं गरजेचं झालं. फळांचं उत्पन्न चांगलं मिळतं पण वर्षभर हंगाम असणारी फळं कमी असतात. आंब्यासारख्या फळाचं उत्पन्न (जर मिळालं तर) वर्षात एकदाच मिळतं. भाजी वर्षभर आणि सगळ्यांनाच लागते, म्हणून भाजीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं.
यू-ट्यूबवर शेतीविषयक देशी-परदेशी असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते बघायला लागलो. ‘लाखोंका पॅकेज ठुकराकर इंजिनियर कर रहा है ऑरगॅनिक खेती’ अशा प्रकारच्या सक्सेस स्टोरी असायच्या. ते बघताना सगळं फार सहजसोपं वाटायचं. परदेशातले व्हिडिओ बघताना यंत्राधारित शेती बघताना, इतक्या प्रचंड मोठ्या शेतीचं व्यवस्थापन एक-दोन माणसं कसं सांभाळतात, असा अचंबा वाटायचा. हे सगळं छान होतं. पण हे सगळे यशस्वी झालेल्यांच्या गोष्टी सांगत होते. त्या मुक्कामापर्यंत पोचताना कोणते काटेकुटे पार करावे लागले, किती नुकसान झालं, सुरवात केल्यापासून नफ्याचा जमाखर्च जुळेपर्यंत किती वर्ष लागली, हे कोणी सांगत नव्हतं.
ते शोधतानाच मध्य प्रदेशातील आकाश चौरसिया ह्या प्रगतिशील शेतकऱ्याच्या बहुस्तरीय शेतीचे काही व्हिडिओ बघितले. एका वेळी जास्तीतजास्त पिके कशी घेता येतील, कुठली पिके लावायची ह्याचं नियोजन कसं करायचं, हे सोप्या पद्धतीने सांगितलं होतं. वर्षभर पाठोपाठ उत्पादन मिळत राहील आणि भांडवली खर्च कमी होईल, अशी माहिती मिळाली.
त्यांच्या तंत्रात ते फेब्रुवारीच्या सुरवातीला वर्षाचं नियोजन करतात. जागेवर एकाआड एक असे पिकाचे आणि चालायच्या जागेचे पट्टे करतात. पिकाच्या जागेत विशिष्ट अंतरावर बांबू उभे करून त्याचा मांडव तयार करतात. त्या बांबूंच्या मांडवावर नारळाच्या झावळ्या किंवा आधीच्या पिकाचे शिल्लक दांडे ह्यांचं छप्पर तयार करतात. उभ्या बांबूंना तारा बांधून जाळी करतात. मांडवाच्या बाहेरच्या बाजूने सात फूट उंचीपर्यंत साड्या किंवा ग्रीन नेट बांधतात. हे सगळं करण्याचे बरेच फायदे आहेत. बाजूने साड्या आणि वरून छप्पर असल्यामुळे आत उन्हाळ्यातही थोडा गारवा राहतो. हवेबरोबर उडून येणारं गवताचं बी अडवलं जातं. पिकांचं नुकसान करणारे कीटक सहा फूट उंचीच्या खालीच उडत असतात. ते कीटक किंवा लहान प्राणीही आत शिरू शकत नाहीत. वरच्या आणि बाजूच्या आच्छादनामुळे हवेतील आर्द्रता टिकून राहते.
आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. परदेशात अक्षरशः हजारो एकर जमिनी असलेले शेतकरी असतात. आपल्याकडे सरासरी दोन ते अडीच एकर जमीन शेतकऱ्याकडे असते. ह्या तंत्राने कमी जागेत जास्त पीक घेता येतं. गवताचं बी अडवलं गेल्यामुळे तणाचं प्रमाण कमी होतं. तण काढण्यासाठी उचलून पैसे द्यावे लागत नाहीत. कमी क्षेत्रात बरीच पिकं असल्याने पाण्याची, खताची बचत होते. बांबू तसंच मांडवावर टाकायचं आच्छादन शेतातूनच येतं. बाजूला बांधायच्या साड्या जुन्या चालतात. भांडवली खर्च बेतात राहतो.
पिकांची लागवड करताना जमिनीच्या खाली आलं किंवा हळद लावतात. जमिनीवर भरपूर प्रमाणात पालेभाजीचं बी पसरवतात. मांडवाच्या आधाराने वेलभाज्या लावतात. त्यातही लहान पानं असलेल्या वेळी मांडवाच्या वर जातात आणि मोठी पानं असलेल्या वेली बाजूने लावतात. कडेला पपईची झाडं लावतात. दोन ते तीन आठवड्यात पालेभाज्या येऊ लागतात. त्याचं उत्पन्न दोन-अडीच महिने चालू राहतं. पालेभाज्या संपल्या की तिथे हळद-आलं उगवायला लागतं. शिवाय वेलभाज्यांचं उत्पन्नही सुरू होतं. ते पुढे तीन-चार महिने चालू असतं. सहा महिन्यात पपईला फळं येऊ लागतात. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान हळद-आलं तयार होतं. बाजारात चांगला भाव मिळेल तसं विकता येतं. त्याजागी फळभाज्या लावता येतात. असं ते चक्र सुरू राहतं.
आम्हीही ही पद्धत वापरायची ठरवली. पण सुरुवात असल्यामुळे काही चुका झाल्या. बांबू जरा जास्त अंतरावर लावले. ते बांबू तेवढे मजबूतही नव्हते. त्यामुळे मांडव जरा डळमळीत झाला. बाजूने लावायला पुरेशा साड्या जमल्या नाहीत. काही भागात बांधल्या. पण त्या वाऱ्याने फाटून गेल्या. पालेभाजी उगवायला लागली आणि लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमधले पहिले दोन-अडीच महिने जाऊच शकलो नाही. तोवर पालेभाजी जून होऊन वाया गेली. पास मिळून पुन्हा जायला लागलो आणि थोड्याच दिवसात निसर्ग वादळाचा फटका बसला. बराचसा मांडव चांगले वाढलेले वेल बरोबर घेऊन आडवा झाला.
आता सध्या तिथे हळद, आलं आहे आणि थोडे वेल आहे . काय काय अडचणी येऊ शकतात, ह्याचं ज्ञान सुरवातीलाच मिळालं. जगात काहीच फुकट शिकायला मिळत नाही. कधी पैसे, कधी कष्ट, कधी शिव्या खाणे, कधी निराशा अशा कुठल्याना कुठल्या स्वरूपात ट्यूशन फी प्रत्येकाला भरावीच लागते.
आम्ही ही सगळी फी बिगरी यत्तेची प्रवेश फी म्हणून भरली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुरवातीचं चित्र
लॉकडाउनच्या आधीचा फोटो आहे. पालक उगवायला सुरवात झाली होती.
निसर्ग वादळ येऊन गेल्यानंतर. मांडवाचं नुकसान झालं. बांधलेल्या तारा कोसळलेल्या दिसत आहेत.
नुकतीच उगवलेली हळद
सद्यस्थितीतील हळद
जीवनज्योती कृषी उद्योग डायरीचे आधीचे भाग वाचण्यासाठी खालील नावांवर टिचकी मारा. धन्यवाद.
जीवनज्योती कृषी उद्योग डायरी- १
जीवनज्योती कृषी उद्योग डायरी- २
चांगली दिसतेय शेती.
चांगली दिसतेय शेती.
कोणता तालुका? ( हवामान गट कोणता?)
मावळ तालुका, जिल्हा पुणे.
मावळ तालुका, जिल्हा पुणे.
भारी अनुभव
भारी अनुभव
छान!! मला पण शेती करायची आहे.
छान!! मला पण शेती करायची आहे. तुमचे लेख मार्गदर्शक ठरतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पालक सुरेख दिसतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हळदीत तण बरेच आहे.
चूका होतातच, नवीन काहीतरी शिकलो म्हणून पुढे चला
शुभेच्छा!
शेतात काम करायला तयार
शेतात काम करायला तयार असलेल्या मायबोलीकरांचे एक गटग करुया ह्या शेतावर
मस्त अनुभव. चुकांतूनच शिकतो
मस्त अनुभव. चुकांतूनच शिकतो हो आपण.
हर्पेन, वर विनितांनी लिहीलं
हर्पेन, वर विनितांनी लिहीलं आहे बघ, की तण वाढलं आहे. तेच काम करावं लागेल.
सर्व प्रतिक्रिया देणाऱ्या मंडळींचे मनःपूर्वक आभार
चुकांमधून शिकलो आहेच. शिवाय लॉकडाऊन, निसर्ग वाटळ हे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न होते! पुढच्या फेब्रुवारीत पुन्हा हाच प्रयत्न करणार. हे मी हताश होऊन लिहीलं नाहीये. एक अनुभव म्हणून लिहीलं आहे. आपण बघतो/वाचतो तेवढं सोपं नसतं, इतकंच सांगायचं आहे.
हताश होऊ पण नका. शेती वाटते
हताश होऊ पण नका.
शेती वाटते तितकी सोपी नसते. एक दिवस शेतावर फिरणे व वर्षभर काम करणे ह्यात खूप फरक आहे.
तण काढायला नक्कीच मदत करेन मी! आवडेल मला ते काम करायला.... मला शेतातल्या कामाची सवय आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विनिता, https://www.maayboli
विनिता, https://www.maayboli.com/node/76998 हे वाचा प्लीज.
पूर्ण वेळ शेती.... कौतुक आहे
पूर्ण वेळ शेती.... कौतुक आहे अनया!!
आपण बघतो/वाचतो तेवढं सोपं नसतं >>>>
हो, पण किती कठीण ते कंबर वाकवून मातीत हात घतल्याशिवाय नाही कळायचं. परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान, शेतकरी हवालदिल --- हे पेपरात वाचणे आणि स्वतःची मेहनत जमीनदोस्त झालेली बघणे निराळे. धीराच्या आहात.
येऊन काम करायला आवडेल. शहरी खुंट्यांना शेतीतल्या शारीरिक श्रमांनी काय काय त्रास होतो सुरूवातीला तेही लिहा. म्हणजे मनाची तयारी आणि सामानात मूव, बाम, आयोडेक्स, बँडेड काय काय लागेल तेही कळेल.
आत्मविश्वास आणि मनाची तयारी
आत्मविश्वास आणि मनाची तयारी आवडली.
कारवी अनया, नक्कीच वाचेन
कारवी
अनया, नक्कीच वाचेन![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भारीच!
भारीच!
भारी अगदी.... आवडले.
भारी अगदी.... आवडले.
छान लिहीले आहे!
छान लिहीले आहे!