मुगडाळीची इडली

Submitted by मेधावि on 13 October, 2020 - 04:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1. मुगाची डाळ दोन वाट्या + मसूर, तूर, ह. डाळ प्रत्येकी एक मूठ + दोन चमचे मेथीचे दाणे
2. इडलीचं तयार पिठ - वाटलेलं + फूग आणलेलं - 1 वाटी
3. मीठ, ओल्या नारळाचे छोटे छोटे तुकडे अर्धी वाटी
4. फोडणीसाठी - तेल + मोहोरी+जिरं + हिंग+ कढीपत्ता + मूठभर- दोन मुठी काजू + आलं + हि. मिरची वाटून

क्रमवार पाककृती: 

ही डायबेटीक रेसिपी आहे. अत्यल्प तांदुळाचा वापर करून व सोडाही न वापरता हलकी व जाळीदार इडली करण्याचा हा प्रयत्न आहे.

क्र. 1. मधील सर्व घटक आज दुपारी भिजवणे. सहा तासांनी रवाळ वाटणे व वाटून झाल्यानंतर त्यात ( शक्यतो घरचं) इडलीचं ( ऑलरेडी फूग आलेलं) पिठ एकत्र करून, मिठ घालून भरपूर घोटून आंबवण्यास ठेवणे.

दुस-या दिवशी सकाळी पिठ फुगून वर आलं असेल. ते डावानं भरपूर घोटणे. मग क्र. 4 मधील घटक. वापरून एक खमंग फोडणी बनवणे व ती जरा गार झाली की पिठात मिसळणे. घोटणे

इडलीपात्रात पाणी घालून ते उकळलं की मग इडल्या उकडायला ठेवणे.

तळ टीप - हा प्रयोग होता. मला सोड्याचा वापर न करता इडली बनवायची होती. नुसत्या डाळींची इडली जरा दडस होते. ( डाळींच्या बरोबरीनं तांदूळ घातले तर इडली हलकी होते पण तांदूळ तर घालायचे नव्हते ) म्हणून मग त्यात फूग आलेलं इडलीचं पिठ थोड्या प्रमाणात मिक्स केलं तर त्यानं ती छान हलकी झाली. इतर डाळी घातल्या/ नाही घातल्या तरी चालतील.

इडली हलकी होण्यासाठी इतरही काही गोष्टींची काळजी घेतली.
-पिठाला चांगली फूग आणली.
-पीठ सरसरीत नको. वरून डावातून पिठ खाली ताटलीत सोडल्यास स्लो मोशनमधे बद्दकन पडायला हवं
-एका दिशेनं भरपूर घोटलं
-मेथ्या घातल्या
-वाफ आल्यावरच इडल्या स्टीमरमधे ठेवल्या

पिठात फोडणी घातल्यामुळे मस्त चव आली होती. काजुचे व नारळाचे दाताखाली येणारे लहान तुकडे पण छान लागतात.

चटणी - चारपाच हि. मिरच्या, बचकाभर कोथिंबीर, कढीपत्ता एक टाळं, चमचाभर जिरं, पंढरपुरी डाळं मूठभर, वाटीभर दही, साखर, मिठ

सर्व साहित्य मिक्सरवर वाटलं.

वाढणी/प्रमाण: 
माहीत नाही
माहितीचा स्रोत: 
असंच इकडून तिकडून आणि थोडे प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतीए इडली आणि चटणी पण..
मी डोश्याचे असे वेगवेगळे प्रकार करत असते..कधी पिवळे मुग,कधी हिरवे मुग, कधी चणा डाळ,कधी नाचणी/गव्हाचे पीठ प्लस डोश्याचे पीठ..
अशी इडली करून बघेन एकदा.

छानच.. मी मिक्स डाळी आणि तांदूळ एकत्र भिजवते, उडीद डाळ वेगळी भिजवते. नेहमीच्या इडलीप्रमाणेचं करते, 3:1 तांदूळ उडीद डाळ ऐवजी, 2 वाट्या सगळ्या डाळी, 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ.

छानच. मसूर डाळ नसेल तर चालेल ना?
आणि यात परत तांदळाचे इडली पीठ हवे. शितलकृष्णानी सांगितले तसे डाळी तांदूळ एकत्र करता आले तर सोपे होईल.

छान

मी असेच मूग डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, चना डाळ आणि मेथीचे दाणे घालून डोसे बनवते डायबेटिक साठी आणि इडली करायची म्हटले तर.. थोडे उरलेले इडलीचे पीठ लागेल किंवा इनो. मी इनो फक्त ढोकळ्यासाठी वापरते..