व्हेन देअर आर नाईन!

Submitted by अमितव on 21 September, 2020 - 11:03

रुथ बेडर गिन्सबर्गना 'नक्की कधी पुरेशा (स्त्रिया सुप्रिम कोर्टावर) होतील' विचारल्यावर 'व्हेन देअर आर नाईन' हे त्यांचं सुप्रसिद्ध उत्तर होतं. याने लोकांना बसलेला धक्का बघुन 'नऊ पुरुष असताना कधीच हा प्रश्न कोणाला न पडल्याची' खंतही त्या बोलुन दाखवत. वयाच्या ८७ वर्षी RBG चे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले. क्लिंटन प्रशासनाच्या काळात १९९३ मध्ये त्यांची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयावर नेमेणूक झालेली. त्यांना श्रद्धांजली!

त्यांच्या कार्यकाळातील हे काही महत्त्वाचे टप्पे आणि कायद्याचे विश्लेशण करुन दिलेली मते (ओपिनिअन्स).

  • ब्रुकलिन, न्यू यॉर्कच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात १९३३ मध्ये RBG चा जन्म झाला. त्यांची आई फार शिकलेली न्हवती, पण स्वावलंबन आणि चांगल्या शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवण्यात त्यांच्या आईचा वाटा होता हे RBG च्या बोलण्यात नंतर वारंवार दिसतं. त्यांच्या आईने त्यांना 'एक स्त्री' बनायला शिकवलं, एक स्वावलंबी आणि स्वतंत्र स्त्री!
  • त्यांनी कॉर्नेल मधुन बी.ए. इन गवर्नमेंट केलं तेथेच त्यांची मार्टिन गिन्सबर्गशी मैत्री आणि पुढे लग्न झालं. नंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल मधुन कायद्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या ५०० मुलांच्या वर्गात फक्त ९ मुली होत्या. लॉ स्कूलच्या डीनने या मुलींना बोलावून तुम्ही मुलांच्या जागा का अडवुन ठेवत आहात असंही विचारलं होतं. Happy त्यांच्या नवर्‍याने न्यूयॉर्कला नोकरी स्विकारल्यानंतर त्यांनीही तिकडे जाण्याचा आणि कोलंबिया लॉ स्कूल मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 'हार्वर्ड लॉ रिव्हू' आणि 'कोलंबिया लॉ रिव्हू' या दोन्ही प्रथितयश मासिकांत एडिटर बनण्याचा त्यांना बहुदा पहिलाच मान मिळाला. १९५९ मध्ये वर्गात पहिल्या येत त्यांनी कोलंबिया मधुन शिक्षण पूर्ण केले.
  • नंतर १९८० पर्यंत त्या रटगर्स, कोलंबिआ, स्टॅनफर्ड इ. विद्यापिठांशी निगडित होत्या, ज्या काळात ACLU (American Civil Liberties Union) मधुन त्यांनी स्त्री हक्क (वुमन्स राईट्स प्रोजेक्ट) सुरू केला. एसीएलयु, वुमन्स राईट्स प्रोजेक्टच्या डायरेक्टर असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर ६ लैंगिक भेदभावाच्या खटल्यांत बाजू मांडली आणि ५ मध्ये विजय मिळवला. यात स्त्री आणि पुरुष दोन्ही अशिलांच्या खटल्यांचा समावेश होता, जेणेकरुन भेदभाव हा सर्वलिंगी व्यक्तींना (जेंडर) होतो आणि संपवला पाहिजे हे अधोरेखित होत राहिल.
  • सु.को. च्या कनर्फमेशन हिअरिंगच्या वेळी त्या मॉडरेट समजल्या जात.

त्यांच्या बद्दल आणखी माहिती लिहिण्यापेक्षा त्यांनी दिलेले काही महत्त्वाचे निकालांबद्द्ल लिहितो.

  • यु.एस वि. वर्जिनिआ १९९६:
    व्हर्जिनिआ मिलिटरी स्कूल हे देशातील शेवटचं फक्त मुलग्यांसाठी असलेलं कनिष्ठ महाविद्यालय होतं ज्यावर युएसने १४व्या घटना दुरुस्तीच्या (इक्वल प्रोटेक्शन क्लॉज) विरोधी आहे म्हणून खटला भरला. ज्यावर स्त्रिया या अभ्यासक्रमाकरिता योग्य नाहीत, त्यांना मेहेनतीची कामं जमणार नाहीत असं तर व्हर्जिनिआने सांगितलंच पण त्याच बरोबर लिबरल आर्टचं फक्त स्त्रियांसाठीचं कॉलेज चालू करुन आम्ही याची भरपाईही केलेली आहे अशी मखलाशी केली. कोर्टाने अर्थात त्या आर्ग्युमेंटला केराची टोपली दाखवत फक्त मुलग्यांचा नियम रद्द करायला लावला. मेजॉरिटी ओपिनिअन RBG नी लिहिला होता त्या लिहितात, “Neither the goal of producing citizen soldiers nor VMI’s implementing methodology is inherently unsuitable to women,” she wrote, later adding, “generalizations about ‘the way women are,’ estimates of what is appropriate for most women, no longer justify denying opportunity to women whose talent and capacity place them outside the average description.”
  • Safford Unified School District v. Redding
    यात १३ वर्षाच्या मुलीला निर्वस्त्र करुन केलेला तपास हा ४ थ्या घटना दुरुस्तीचे उल्लंघन करतो असा निकाल दिला होता. त्यात आरबीजींनी सांगितले होते की त्या मुलीला इतर न्यायाधिशांनी दिलेली वागणूक अयोग्य होती. त्या म्हणालेल्या "They have never been a 13-year-old girl. It's a very sensitive age for a girl. I didn't think that my colleagues, some of them, quite understood."
  • Ledbetter v. Goodyear Tire & Rubber Company, 2007
    हे आणखी एक आरबीजी चं बहुमताच्या विरोधी मत होतं. लिली लिडबेटरनी गुडइअरला गेली १९ वर्षे पगारावरुन लैंगिक भेद केल्या प्रकरणी कोर्टात खेचलं होतं. सिव्हिल राईट्स अ‍ॅक्टच्या ७व्या नियमा प्रमाणे तुमचे लिंग बघुन (रादर जेंडर) मिळणारा पगार ठरवणे हे बेकायदेशिर आहे, त्यावरन गुडइअरचं आर्ग्युमेंट होतं की हो पण तक्रार १८० दिवसात केली पाहिजे. त्यामुळे आम्ही दोन दशकांचा फरक देणं लागत नाही. जे कोर्टाने ५ -४ च्या मताधिक्क्याने ग्राह्य मानले. त्यावर गिन्सबर्गनी विरोधी मत तर दिलेच पण ते फक्त कारकुनाला देण्याच्या पद्धतीला विरोध करुन सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहुन ते वाचुन दाखवले. त्या म्हणतात “The Court’s insistence on immediate contest overlooks common characteristics of pay discrimination. Pay disparities often occur, as they did in Ledbetter’s case, in small increments; cause to suspect that discrimination is at work develops over time. Comparative pay information, moreover, is often hidden from the employee’s view.” पुढे असंही सांगितले की “each and every pay decision Ledbetter did not properly challenge wiped the slate clean. Never mind the cumulative effect of a series of decisions that together set her pay well below that of every male area manager.”
    त्यांनी कॉंग्रेसला ही चुक सुधारण्यासाठी कायदा करण्यास सांगितले जो ओबामांनी सत्ता ग्रहण केल्यावर सही केलेला पहिला कायदा. 'लिली लेडबेटर फेअर पे अ‍ॅक्ट'
  • Whole Woman’s Health v. Hellerstedt, 2016
    ज्याने टेक्ससमध्ये गर्भपात करणार्‍या क्लिनिक्सवर जाचक निर्बंध लादले होते जसे गर्भपात करणार डॉ. जवळच्या हॉस्पिटलशी संबंधितत हवा, तिकडे अद्ययावर रुग्णालयाच्या आउट पेशंट शस्त्रक्रिया खोली इतक्या सुविधा हव्यात इ. जेणे करुन गर्भपात करणे स्त्रीला कर्मकठिण बनावे. ते न्यायालयाने ५ -३ मतैक्याने हाणुन पाडले. त्या लिहितात
    “It is beyond rational belief that H.B. 2 could genuinely protect the health of women, and certain that the law would simply make it more difficult for them to obtain abortions. When a State severely limits access to safe and legal procedures, women in desperate circumstances may resort to unlicensed rogue practitioners...at great risk to their health and safety. So long as this Court adheres to Roe v. Wade and Planned Parenthood of Southeastern Pa. v. Casey, Targeted Regulation of Abortion Providers laws like H.B. 2 that do little or nothing for health, but rather strew impediments to abortion, cannot survive judicial inspection.”
  • Stenberg v. Carhart
    नेब्रास्काने डायलेशन न झालेल्या आणि एक्सट्रॅक्शन द्वारे गर्भपात करायला लागणार्‍या केसेस मध्ये गर्भपात करणे बंद करवले होते. जे सु.को. ने घटनाविरोधी आहे हे मान्य केले. ज्याच्या मतप्रदर्शनात गिन्सबर्ग यांनी रो. वि. वेड आणि प्लॅन्ड पेंरेंटहुड वि. केसी केसेसना उर्ध्रुत करुन हा नियम गर्भार स्त्री च्या जिवाची आणि आरोग्याची काळजी घेण्यास असमर्थ ठरतो असे सांगितले होते.
  • शेल्बी काऊंटी वि. होल्डर २०१३
    हाच तो व्होटिंग राईट्सचा गळा दाबणारा निर्णय. देशातील काही भागांच्या पूर्वेतिहासामुळे (अलबामा, टेक्सस, अ‍ॅरिझोना) त्यांना मतदानाच्या नियमांत काही बदल करायचा असल्यास देशाचे अ‍ॅटर्नि जनरल किंवा डि.सी मधील तीन न्यायाधिशांच्या पॅनलची परवानगी घ्यायला लागे. हा नियम जुनाट आणि घटनाविरिधी आहे असा सु.को. ने ५-४ च्या मताधिक्क्याने निर्वाळा दिला. त्याच्या विरोधात मत देताना आरबीजींनी खालील प्रसिद्ध वाक्य म्हटलेलं,
    “Throwing out preclearance when it has worked and is continuing to work to stop discriminatory changes, is like throwing away your umbrella in a rainstorm because you are not getting wet.”
    या निर्णयानंतर या राज्यांत गरिब, कृष्णवर्णिय आणि लॅटिनो लोकांसाठी मतदान अधिकाधिक कठिण होत गेले.
  • बुश वि. गोर २०००
    हा प्रसिद्ध गोंधळ सगळ्यांना आठवत असेलच. फ्लोरिडा मध्ये यंत्रांचावापर न करता फेरमोजणी करावी का? का थांबवावी? हे ठरवण्यासाठी बुश चे कँपेन सु.को. गेले आणि सु. को. ने फेरमोजणी करू नये सांगितले. तेव्हा आरबीजी नी “I dissent.” म्हटलेले. नेहेमीच्या शिरस्त्या प्रमाणे त्यात “respectfully.” ची भर न घालता म्हटलेलं.
  • Obergefell v. Hodges, 2015
    याने समलैंगिक विवाहास सर्व ५० राज्यांत अनुमती मिळाली.
  • सेशंन्सं वि. Dimaya 2018
    स्थलांतरितांना गंभिर गुन्ह्यांसाठी त्वरित देशाबाहेर हाकलून देण्याचा कायदा हा पुरेसा स्पष्ट नाही कारणाने रद्दबातल ठरविला. त्यांच्यावर ड्यु प्रोसेस शिवाय अशी कारवाई करता येणार नाही असं न्यायालयाने नमूद केलेलं.
  • Olmstead v. LC, 1999
    अमेरिकन्स विथ डीसेबिलिटीस कायद्याच्या इंटिग्रेशन मँडेट वर प्रकाशझोत टाकणारा हा निर्णय होता. कर्टिस आणि विल्सन या दोन स्त्रीया स्वसंम्म्तीने जॉर्जियाच्या मानसिक विकलांग विभागात दाखल झाल्या होत्या. पण नंतर त्या बर्‍या झाल्यावरही त्यांना विजनवासातच ठेवण्यात आले, जे कोर्टाने चूक ठरविले आणि त्यांना सामाजिक जीवनाच्या प्रवाहात समाविष्ट करण्याची गरज दाखवून दिली.

आणखी अनेक केसेस वुमन्स राईट्स बद्द्लची त्यांची मते याबद्दल गेली दोन दिवस वाचले. त्यांना ऑपेरा आवडे, फिट रहायला आवडे, लोकांच्या नजरेत राहायला आवडे आणि ते का महत्त्वाचे आहे त्याबद्दलची मते ही सुस्पष्ट होती आणि ती सांगायला त्या मागे पुढे बघत नसत. बाकी अनेक पैलू होतेच, पण फक्त आणि फक्त कायद्याची आस याचा विचार केला तरी अमेरिकेचे भविष्य घडवण्यात या दुसर्‍या स्त्री न्यायाधिशाची भूमिका स्तंभित करते.

दुर्दैवाने सध्याचे प्रशासन ही बातमी येऊन काही तास होताहेत तोवर रिकामी खुर्ची भरण्यामागे लागलेत. कारण अर्थात उघड आहे. तर त्यावर दुसरीकडे चर्चा करु. सध्या त्यांचं रसरशीत जीवन आणि अमेरिकेला ठेवलेल्या वारशाबद्द्ल नतमस्तक होऊया! रेस्ट इन पीस आरबीजी!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर बी जी ला भावपूर्ण श्रद्धांजली.... स्त्री सामर्थ्याचा आणि त्यासबंधित चळवळ, भुमिकेसाठी लागणार्‍या कर्तव्यदक्ष आणि कणखरपणाचा मुर्तीमंत अविष्कार होत्या आर बी जी.
फार छान आढावा घेतला आहेस आमित. तू म्हंटले तसे लक्षद्वीप ऊजळून निघतील असा धगधगीत वारसा मागे ठेवला आहे त्यांनी.
त्यांच्या जीवनातल्या काही घटनांवर बेतलेला ऑन द बेसिस ऑफ सेक्स हा सिनेमा बघण्यासारखा आहे. शिवाय यू ट्यूब वर Notorious RBG मथळ्याखाली त्यांच्याबद्दलच्या अनेक डॉक्यूमेंट्रीज सुद्धा बघण्यासारख्या आहेत.

रेस्ट इन पीस आरबीजी!

छान आढावा घेतला आहेस. सरळ सोप्या भाषेत लिहिल्याने अधिकच भावला लेख. RBG ना श्रद्धांजली.

रिकाम्या खुर्चीबद्दल तू लिहिलेस शेवटच्या पॅरात तरी पण राहवत नाही म्हणून विचारते. अमेरिकेत न्यायाधीशांच्या नेमणुका त्यांच्या विचारसरणी बघून होतात का ? की प्रेसिडेंट फेव्हरिटझम ? कारण RBG च निधन झाल्यावर आता ट्रम्पतात्यांना मोकळं रान मिळालं असा बहुतांश बातम्यांच्या सूर होता.

छान लेख आहे. आर बी जी ना श्रद्धांजली.

रिकाम्या खुर्चीबद्दल तू लिहिलेस शेवटच्या पॅरात तरी पण राहवत नाही म्हणून विचारते. अमेरिकेत न्यायाधीशांच्या नेमणुका त्यांच्या विचारसरणी बघून होतात का ? की प्रेसिडेंट फेव्हरिटझम ? कारण RBG च निधन झाल्यावर आता ट्रम्पतात्यांना मोकळं रान मिळालं असा बहुतांश बातम्यांच्या सूर होता.>>
न्यायाधीशाला तत्कालीन प्रेसिडेंट नॉमिनेट करतो आणि सेनेट मधे मतदान होऊन निर्णय होतो. सध्या प्रेसिडेंट आणि सेनेट दोन्ही रिपब्लिकन पक्षाकडे आहे. सेनेट मधे त्यांची मेजॉरिटी आहे.

छान लेख!
>>त्यांचं रसरशीत जीवन आणि अमेरिकेला ठेवलेल्या वारशाबद्द्ल नतमस्तक होऊया! रेस्ट इन पीस आरबीजी!
>> +१

अतिशय सुरेख आढावा! आर बी जींना श्रद्धांजली __/\__ त्यांचे कार्य पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल यात शंकाच नाही!

यापुढे राजकीय भविष्याचा अंदाज घेऊन काही आजार वगैरेची सुरुवात झालेले न्यायाधीश अनुकूल परिस्थितीत राजीनामा देतील का?

टवणे सर, यावरुन आरबीजींना ओबामाच्या काळात निवृत्त होण्याचे सल्ले डेम्सनी अनेकदा दिलेले आणि त्यावर तुम्हाला माझ्या इतकं (चांगलं/ लिबरल) कोण मिळेल? असं काहीसं उत्तर त्यांनी दिलेल.
https://www.nytimes.com/2020/09/18/opinion/ruth-bader-ginsburg-dead-time... हे वाचलं त्यावरुन ओकॉनर (पहिल्या फीमेल जज) नी वयाच्या ७५ वर्षी निवृत्ती स्वीकारली जेणे करुन त्यांना त्यांच्या नवर्‍याबरोबर (ज्याला अल्झायमर्स होता) वेळ घालवता येईल. पण दुर्दैवाने त्यांना घरी ठेवणे शक्य होत नाहीसे झाले आणि ज्या कारणाने निवृत्ती स्वीकारली ते काही झालं नाही. कितीही उत्तम (नोबेल) कारण असेल तरी ते पुरेसं ठरत नाही हे कदाचित त्यांच्या मनावर बिंबलं असेल.
जर हिलरी किंवा मॉडरेट रिप. आले असते तरी त्यांनी राजिनामा दिलाच असता का? कोण जाणे! Happy

अतिशय सुरेख आढावा! आर बी जींना श्रद्धांजली __/\__ त्यांचे कार्य पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल यात शंकाच नाही!...+१
काही काही व्यक्तींंमध्ये कसे काय एवढे self motivation, drive, काळाच्या पुढे विचार करण्याची क्षमता , नेतृत्व असते खरंच कळत नाही. खरंच आवडले.

न्यायाधीशांची नेमणूक ही lifelong असते. त्यावर आता काही term limit असावे का असा विचार सुरू आहे. पण हे करायला घटनादुरूस्ती करायला लागेल आणि ते करणं जवळजवळ अशक्यप्राय आहे.

आर बी जींवर दोन वर्षापूर्वी आलेला सिनेमा जमल्यास पहा. त्यात त्यानी male establishment विरुद्ध केलेला लढा दाखवला आहे.

लेख पूर्ण वाचवला नाही. फार जास्त इंग्रजी शब्द वापरले आहेत.
बाईँच्या कार्याला सलाम !!!!!!
आपण साधे मराठी पर्यायी शब्द वापरावेत ही विनंती.

छान ओळख!
ह्यांच्या बद्दल अजीबात माहित नव्हते. धन्यवाद

जेंडर करता मराठीत लिंग असा शब्द आहे.
'सगळ्या जेंडरना' करता उभयलिंगी व्यक्तींना असे सुचवणार होतो पण 'सर्वलिंगी व्यक्तींना ' असा शब्दप्रयोग जास्त समर्पक आणि समावेशक राहील असे वाटते.

वाह खूप माहीती कळली.
रुथ बेडर गिन्स्बर्ग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Safford Unified School District v. Redding - https://en.wikipedia.org/wiki/Safford_Unified_School_District_v._Redding ही केस फार दाहक वाटल्याने वाचून काढली यात एक करेक्शन - ४ थ्या अमेंडमेन्ट चा अवमान झाला आहे असे दिसते -
https://en.wikipedia.org/wiki/Fourth_Amendment_to_the_United_States_Cons... - The Fourth Amendment (Amendment IV) to the United States Constitution is part of the Bill of Rights. It prohibits unreasonable searches and seizures. In addition, it sets requirements for issuing warrants: warrants must be issued by a judge or magistrate, justified by probable cause, supported by oath or affirmation, and must particularly describe the place to be searched and the persons or things to be seized.

RBG ना श्रद्धांजली. चांगला आढावा. त्या जाईपर्यंत मला त्यांच्याबद्दल काही माहित नव्हतं. त्या गेल्यावर वाचलं. दैदिप्यमान कारकिर्द खरंच.

सर्वांना धन्यवाद. Happy
हर्पेन, लिंग शब्द एकदोन ठिकाणी वापरला पण लिंग म्हणजे सेक्स ना? जो शारीरिक आणि फिजिओलॉजिकल फरकासाठी (जो गुणसूत्रांमुळे, हार्मोन्स इ. मुळे झालेला आहे) वापरतात.

Gender refers to the socially constructed roles, behaviours, expressions and identities of girls, women, boys, men, and gender diverse people. It influences how people perceive themselves and each other, how they act and interact, and the distribution of power and resources in society. Gender identity is not confined to a binary (girl/woman, boy/man) nor is it static; it exists along a continuum and can change over time. There is considerable diversity in how individuals and groups understand, experience and express gender through the roles they take on, the expectations placed on them, relations with others and the complex ways that gender is institutionalized in society.
अशा अर्थछटेचा शब्द माहीत नाही मला. शिवाय RBG सेक्स हा शब्द न वापरता जेंडर हा शब्दप्रयोग जाणूनबुजून करायच्या असही वाचलं. सर्वलिंगी व्यक्तींना समावेशक वाटतोय ते बदलतो.

रैना, इंग्रजी शब्द जास्त आहेत हे खरं आहे. लिहिताना सोपे मराठी शब्द कुठले वापरावे यावर विचार करत बसलो की लिंक तुटते आणि लेखन अर्धवट रहातं. बोजड मराठी शब्दांपेक्षा मी इंग्रजी शब्द चालवून घेतो. जिथे ठीक वाटतील तिकडे मराठी शब्द वापरायचा प्रयत्न केला आहे. आणखी आठवतील ते बदलतो.
सामो, धन्यवाद. ते ४ थी दुरुस्ती हवं. चुकून १४ वी झालंय. दुरुस्ती करतो Happy

न्यायाधिशाला वयोमर्यादा नसणे विचित्र वाटते.
आरबिजी यांची एक सणसणीत मुलाखत पाहण्यात आली. त्यांचे सडेतोड पण तळमळीचे बोलणे ऐकून आदर दुणावला.
आदरांजली.

काल RBG वरील documentary पाहिली . छान आहे. मला फार कल्पना नव्हती त्यांच्याबद्दल. डोकमेंटरी मध्ये चांगला आढावा घेतलाय त्यांच्याबद्दल. अमेरिकेत कायद्याची प्रोसेस कशी चालते हे ही मस्त दाखवलं आहे. जरूर बघा

छान माहिती.

त्या गेल्या तोपर्यंत त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यांच्या निधनानंतर टाइम्समध्ये २-४ चांगले लेख आले होते. ते वाचले.

Pages