कुरवंडा उंबरखिंड

Submitted by योगेश आहिरराव on 21 September, 2020 - 03:23

कुरवंडा उंबरखिंड

सकाळी आठच्या सुमारास कर्जत पाली एस्टीने शेंबडी गावात उतरलो, इथेच उंबरखिंडीचा फलक लावलेला आहे. अंतर साधारण चार किमी त्यापुढे एखाद दीड किमी वर चावणी / छावणी. एक जण सोबत येणार होता त्याची वाट पाहत अर्धा तास उभा. किमान वीस वेळा फोन ट्राय केला पण फोन स्विच ऑफ. आता काय एकला चलो रे. फोन बंद म्हणजे आता काही गडी येत नाही, शेवटी अर्ध्या तासाने चालू पडलो. उंबरखिंड स्मारकात साडेनऊच्या सुमारास पोहचलो.
IMG-20200218-WA0009.jpg
२ फेब्रुवारी १६६१ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल सरदार कारतलब खान, स्त्री सरदार रायबागन आणि काही हजारो फौजेचा या उंबरखिंडीत पराभव केला. लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र मंडळ आणि चावणीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे स्मारक उभारले आहे. आजूबाजूला बरीच मंडळी होती, स्मारक हार फुले लावत सजावटीचे काम चालू होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ फेब्रवारी उंबरखिंड स्मृतिदिन याचीच ही तयारी सुरू होती. इथून मुख्य रस्त्याला लागतो तोच एकाने बाईकवर पुढच्या दहा मिनिटांत चावणी गावात सोडलं. लहान असे चावणी तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले. समोर सह्याद्रीची मुख्य रांग डावीकडे उत्तरेला नागफणी सहज लक्षात आला.
IMG_20200217_225622.jpg
गावात पाणी भरून घेत कुरवंडा घाटाच्या वाटेची चौकशी करून चालू पडलो. याच वाटेला येथील गावकरी भवानीकणा असेही म्हणतात. नदी पात्र ओलांडून शेतं पार करत समोर आली सरळसोट रुंद धारेवरील अगदी मळलेली पायवाट. काही वर्षांपूर्वी याच वाटेला धरून गॅसची पॉईप लाईन टाकलेली आहे.
IMG_20200217_225949.jpg
त्यात अधून मधून सिमेंट काँक्रिट वाटेला आहेच. जसा वर जाऊ लागलो तसे खाली चावणी त्या पलीकडे खंडाळा दस्तुरीपासून जोडलेले गारमाळ पठार, आजूबाजूला फार्महाऊस आणि बंगल्याचा विळखा पडला तरी अद्यापही सुखावणारं जंगल. फोटो व लहान थांबे घेत, घाई न करता आरामात दीड तासात वर पोहचलो.
एके ठिकाणी बसलो असताना आजोबा भेटले ते कुरवंडा गावात जात होते, विचार केला त्यांच्या सोबत जाऊ वाटेत नागफणी पाहून गावात उतरुन लोणावळा जाऊ. पण मनात आल यात उतराई होत नाही हा अर्धवट ट्रेक होतो. मग त्यांना टाटा बाय बाय करून आंबेनळी पाड्याकडे निघालो.
IMG_20200201_111529.jpg
थोड अंतर जाताच डावीकडे झाडी भरली पुरातन आंबेनळीच्या वाटेची खिंड. पूर्वी हा कुरवंडा गावात जाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांचा नेहमीचा त्यात सोयीचा आणि जवळचा मार्ग पण आता 'आई एन एस शिवाजी' नौसेनाने सुरक्षेच्या दृष्टीने वरच्या भागात उंच कुंपण घातलेले आहे. त्यामुळे आता या वाटेने जाता येत नाही.
वीस एक मिनिटांत आंबेनळी पाड्यात, सध्या फक्त दोन झाप अॅक्टिव नेहमी प्रमाणे घरात एकटी म्हातारी. म्हातारा दही विकायला कुरवंड्याला.
IMG_20200217_230410.jpg
इथून खरंतर सावरदांड ने चावणीत उतरणार होतो. पण मनात विचार इतक्या लवकर खाली जाणार, ट्रेक संपणार. पुन्हा चावणी ते शेंबडी चाल जीवावर येतं होती. विषय काढल्यावर म्हातारीनं डोलकणा व पाच टाक्याचा बद्दल सांगितलं. हाताशी वेळ होता, तसाही एकटाच होतो त्यामुळे मना प्रमाणे स्वतःच्या सोयीने. काय ते म्हणतात, कोई रोखणे टोकणे वाला नहीं. वाटेतल्या खुणा लक्षात घेत एकटाच सुटलो. दिशेनुसार सावरदांड ची वाट इलेक्ट्रिकल लाईन जवळून खाली गेली, तिथे न जाता सरळ पठारावर थोड खालच्या बाजूला उतरून ढोरवाटा मध्ये गफलत टाळत एका झापा जवळ आलो. तिथलं चित्र एकदम अस्वस्थ करणारं जख्खं म्हातारी बाजूच्या कातकरी फॅमिलीची पोरं सांभाळत, कातकरी झाडांच्या फाट्या मोळ्या विकायला दूर कुरवंड्यात. पोरांची अवस्था तर सांगायला नको. तिला पुढच्या वाटेबद्दल विचारलं तर मी काय बोलतोय तिला कळेना. शेवटी पाणी इशारा केला तिनं मागे हात केला, जाऊन पाहिलं तर पुरातन बांधीव कुंड जे पेठ आणि कळकराय यामध्ये आहे अगदी तसेच कुंड/बारव.
IMG_20200201_115542.jpg
फोटो काढून मागच्याच खुणा लक्षात घेत मळलेली वाट पकडून निघालो. इथे एक गोष्ट मात्र लक्षात आली की मी ज्या मार्गावर होतो तो भाग मुख्य रांगे पासून टप्पा टप्प्याने पश्चिमेकडे उतरणारा तर डाव्या हाताला लायन्स पॉईंटकडील भाग, मोराडीचा सुळका. मुख्य रांग थेट सव घोडेजिन घाटापर्यंत गेलेली व दूरवर कोरीगड उठावलेला.
IMG_20200217_231120.jpg
सारा नजारा डोळ्यात साठवत, पिवळ्या धमक पठारावरून गार वारा खात स्वतः शी संवाद साधत चालणं भारीच. काही अंतरावर वाटेतला पिण्यालायक पाण्याचा ओढा लागला तिथेच जेवणाचा अर्धा डबा संपवला.
IMG_20200217_231432.jpg
या पुढे थोडा गंडायला झालं बऱ्याच ढोरवाटा टेपाडाखालच्या बाजूला काही गुर चरताना दिसली, तिथे गेल्यावर कुणीतरी आसपास असावं या हेतूनं आवाज दिला तर काही प्रतिसाद नाही. उलट मला पाहून दोघं तिघ गायी इकडे तिकडे सैरभैर. दिशा लक्षात घेत वाट धरली आणि डोलकणा धनगरपाडा एकदाचा सापडला. इथल्या मामांनी व्यवस्थित माहिती दिली या भागातून फल्याण घोटवडेत उतरणाऱ्या वाटा. मुख्य म्हणजे पाचटाकी इथून फार दूर नाही. मामांना त्या बांधीव कुंडा बद्दल विचारलं असता त्यांनी त्याला बहिरागा म्हणतात असं सांगितले. तिथून निघतो तोच मागून गाववाले येताना दिसले, बोलणं झाल्यावर कळलं दोघं नवरा बायको खंडाळाला रोजंदारी वर काम करतात, गेटवाडीत घर आहे. आठवडा बाजार खरेदी आणि मुलांना भेटायला घरी जात होते. त्यांचा सोबत पुढच्या वीस मिनिटांत पाच टाकी. तिथून कोथळदराने फल्याण असं मी ठरवलं होतं पण त्यांच्याशी चर्चा होत असताना मला ते उतरत होते तो घोटवडे गेटवाडीचा पर्याय स्वस्त वाटला. कारण फल्याणहून माणगाव जांभूळपाडा हे अंतर जास्तच, यात कुठे कशी गाडी मिळेल याची शाश्र्वती नाही त्या उलट गेटवाडीत वेळ (कारण सोबत) आणि अंतर वाचून नवीन वाट पाहायला मिळणार. पाचटाकी वर आलो.
IMG_20200217_231920.jpg
आडव्या कातळात कोरलेल्या पाच टाक्या बाजूला जनावरांना पाणी पिण्यासाठी खोदून केलेली सोय.
IMG_20200201_125108.jpg
जवळच झाडाखाली भैरी देव, होळी पौर्णिमेला आजूबाजूच्या वाडीतील बरीच आदिवासी कातकरी ठाकरं मंडळी इथे येतात.
पाचटाकीहून डावीकडे वाट कोथळदारा, सरळ उतरत जाणारी गेटवाडीची वाट तिलाच समांतर उजवीकडे वाघमराची वाट. एक लक्षात आले ते या भागात फारशी झाडी नाहीच, अगदीच नावाला साग ऐन वगैरे सारखी झाडे. मुख्य रांगेच्या तुलनेत इथे काहीसं रुक्ष वाटतं.
IMG_20200201_125429.jpg
वाघमरा व गेटवाडीची वाट या दोन्ही वाटा गेटवाडीत उतरतात. याच वाटेने त्यांच्या सोबत उतरलो. पुढे गेटवाडी ते घोटवडे धरणाला वळसा घालून उन्हात तासभर कंटाळवाणी चाल, दुर्लक्ष करावं म्हणून धरणापलीकडे पुन्हा सारखी नजर मुख्य रांगेवर त्यात दक्षिणेला घोडजीन निसणी पासून कळंब खोऱ्यातील अनघाई ते माथ्यावरील कोरीगड दूरचा तैलबैला धूसर वातावरणात दर्शन देत होतेच. घोटवडे गावजवळ आल्यावर एका भल्या टेम्पोवाल्याने लिफ्ट दिली वीस मिनिटांत परळी. तिथून पाली ठाणे एस्टी ने खोपोलीत. खोपोलीत साडेचार वाजताची ट्रेन मिळाली. आरामात ट्रेन मध्ये बसल्यावर सरत्या पावसात सोनकीचे गालिचे पाहत खंडाळा नागफणी आंबेनळी ते याच पठारावरून फल्याण पर्यंत ट्रेक करायचाच असच मनात ठरवत कधी डोळा लागला ते कळलच
नाही.

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2020/02/kurwanada-umbarkhind.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला ट्रेक आहे. लोकल ट्रेनने कर्जत / खोपोलीला जाऊन पुढे निरनिराळे ट्रेक करता येतात आणि ते स्वस्तात होतात. शिवाय परतीच्या ट्रेनमुळे पायांना आराम मिळतो.

फक्त एक वेळ सांभाळावी लागते ती म्हणजे कर्जतच्या पाचच्या सुमाराच्या दोन ट्रेन चुकवायच्या नाहीत. त्या गेल्या की गर्दीची गाडी सवासहाला.
खोपोली - पाली रस्त्यावर एक गाव आहे ( भूषण स्टीलजवळ) तिथून तैलबैलाला जाता येते. वाटेत ठाणाळे लेणी लागते. हा ट्रेक एकदा उतरण्यासाठी वापरायचा विचार आहे.

धन्यवाद पशुपत, हर्पेन आणि Srd...

चांगला ट्रेक आहे. लोकल ट्रेनने कर्जत / खोपोलीला जाऊन पुढे निरनिराळे ट्रेक करता येतात आणि ते स्वस्तात होतात. शिवाय परतीच्या ट्रेनमुळे पायांना आराम मिळतो. >>> अगदी बरोबर..

खोपोली - पाली रस्त्यावर एक गाव आहे ( भूषण स्टीलजवळ) तिथून तैलबैलाला जाता येते. वाटेत ठाणाळे लेणी लागते. हा ट्रेक एकदा उतरण्यासाठी वापरायचा विचार आहे. >> ठाणाळे लेणी म्हणत असाल तर तो वाघजाइ घाट. जो नाडसुर पुढे ठाणाळे गावातून वर तैलबैलाला जातो. सुन्दर वाट आहे घाटाची नक्की कराच..