कपारींनो मनाच्या का अशा भेगाळता तुम्ही?
मनाजोगेच व्हावे, का अपेक्षा ठेवता तुम्ही?
दवांनो छान आहे की तृणावर जन्मता तुम्ही
कधी जमले न आम्हाला, मजेने डोलता तुम्ही
सुशिक्षित माणसांनो का अशिक्षित एवढे व्हावे!
इलेक्षनच्या दिनी बाहेर सहली काढता तुम्ही
दिल्यावर मत पुन्हा परतून येता पाच वर्षांनी
पुढार्यांनो किती अश्वासनांना पाळता तुम्ही
विचारावेत थोडे प्रश्न खडसावून अपुल्यांना
असोनी आप्त का शत्रूप्रमाणे गांजता तुम्ही
पुरे ना वायफळ गप्पा, असे पूर्वज, तसे पूर्वज
नवा इतिहास लिहिण्यासारखे का वागता तुम्ही?
समेवर दाद देणे फारसे अवघड कुठे असते?
कधी तल्लीन का होऊन गाणे ऐकता तुम्ही?
जिथे "सा" वर्ज्य आहे, दावता का राग एखादा
म्हणोनी साधकांनो "सा" पहाटे लावता तुम्ही
किती "निशिकांत" ब्रह्मानंद मिळतो रंगता मैफिल!
सलामी देत रसिकाना कधी का वाकता तुम्ही?
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
कपारींनो मनाच्या का अशा
कपारींनो मनाच्या का अशा भेगाळता तुम्ही?
मनाजोगेच व्हावे, का अपेक्षा ठेवता तुम्ही?
हे आवडले.
अप्रतिम.... सुंदर
अप्रतिम.... सुंदर