मोझार्ट, द ज्वेल थीफ - Beethoven & Mozart- Part (6)

Submitted by बिथोवन on 12 September, 2020 - 02:00

व्हिएन्नामध्ये शोनबर्नला मोझार्टने जो कार्यक्रम सादर केला होता त्यानंतर सम्राट फ्रांझ जोसेफ याने मोझार्टला दिलेल्या हिऱ्याच्या अंगठ्या, भेटवस्तू आणि वस्त्र प्रावरणे घेऊन मोझार्ट, लिओपोल्ड आणि नॅनल,फ्रँकफुर्टच्या दिशेने निघून तिघेजण पुढील दोन वर्षे संगीताचा कार्यक्रम करत युरोप भर हिंडले.

त्यानंतर इंग्लंडमध्ये किंग जॉर्ज तिसरा सम्राट असताना मोझार्ट आणि त्याची बहीण आणि लिओपोल्ड त्याच्या दरबारात संगीताचा कार्यक्रम करायला पोचले. राजा आणि राणी यांनी मोझार्टला जॉर्ज हँडेल याने रचलेला वॉटर म्युझिक आणि योहान सेबॅस्टियन बाख यानं रचलेल्या ब्रांडेन बर्ग कन्सर्टोज वाजवायला सांगितल्या. मोझार्टने त्या जशाच्या तशा वाजवल्याच पण त्यात स्वतःच्या वेरीएशन टाकून आणखी आकर्षक बनवल्या. राजाने मग ४ जूनला स्वतःच्या वाढदिवशी मोझार्टला कन्सर्ट तयार करण्यास सांगितले. तोच कोन्सर्ट ५ जूनला रॉयल हॉलमध्ये सादर करण्यास सांगितले. मोझार्टची कीर्ती युरोपभर पसरली असल्याने रॉयल हॉल तुडुंब भरला होता. संगीतातील १०० जाणकार मंडळीना खास निमंत्रण दिलेले होते की जेणेकरून मोझार्ट कुठे चुकतो का ते शोधण्यासाठी. पण आठ वर्षाच्या मोझार्ट ने साठ वर्षांच्या जाणकारांना त्यांच्या तोंडात बोटे घालायला लावली.

"बिथोवन, तू कंटाळला तर नाहीस ना? जलपान झालंय का तुझं?" मोझार्ट परत आत मध्ये आला आणि त्याने विचारलं.

" अरे जलपान ही झालंय आणि आराम पण केलाय. काय करायचं आता ते सांग." मी उत्तरलो.

"अरे मी सलिअरी यांची वाट बघतोय. ते आले की आपल्याला काही रचना वरती काम करायचं आहे. तासाभरात ते यायलाच हवेत. ते आले की मी तुला बोलवतोच. तो पर्यंत तू वाजव की पियानो..." असं म्हणत त्याने कोपऱ्यातल्या पियानोकडे बोट दाखवले आणि बाहेर गेला.

हा माणूस म्हणजे जिवंत दंतकथा आहे. १४ वर्षांच्या मोझार्टने १४ व्या क्लेमेंट पोपचा एक अनमोल ठेवा- एक अत्यंत पवित्र प्रार्थना- व्हॅटिकनच्या बाहेर चोरून नेली. चर्चच्या नियमाप्रमाणे हा एक अत्यंत घोर अपराध होता. पण त्याला शिक्षा करण्याऐवजी पोपने त्याचा व्हॅटिकनचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला. केवळ अद्भुत!

एप्रिल १७७०चा दुसरा आठवडा म्हणजे होली वीक. व्हॅटिकन इथल्या सिस्टीन चॅपलला मोझार्ट गेला. या चॅपलमध्ये प्रसिद्ध आणि अद्वितीय ‘मिसेरेरी’ हे पवित्र संगीत ग्रेगोरियो अ‍ॅल्लेग्री (१५८२-१६५२) याची रचना. १२-१४ मिनिटं चालणारी ही प्रार्थना. ती त्याने ऐकली. ही प्रार्थना नि:संशय सुंदरच. या संगीताच्या फक्त तीनच प्रती उपलब्ध होत्या. त्यातली एक स्वत: पोप यांनी सिस्टीन चॅपलमध्ये कडीकुलपात बंद करून कडेकोट बंदोबस्तात ठेवलेली होती. उरलेल्या दोन प्रती पोप यांनीच खास भेट म्हणून एक प्रत होली रोमन साम्राज्याचा व्हिएन्नातील सम्राट पहिला लिओपोल्ड याला आणि दुसरी प्रत पोर्तुगीजच्या राजाला दिली. एखादा अत्यंत मौल्यवान हिरा असावा त्याप्रमाणे व्हॅटिकनने जतन केलेली ‘मिसेरेरी’ गायला, वाजवायला आणि त्याच्या प्रती बनवायला आणि सिस्टीन चॅपलच्या बाहेर घेऊन जायलादेखील मनाई होती. तसं कोणी केलं तर त्याचा सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकलं जाण्याची शिक्षा ठरलेली. ही प्रार्थना सिस्टीन चॅपलमध्ये फक्त पोप यांचा खासगी क्वायरच गाणार आणि वाजवणार वर्षांतून फक्त एकदाच पवित्र आठवडय़ात. आणि हे संगीत मोझार्टने बेमालूम पळवले. कसे? केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर!

बुधवारी सिस्टीन चॅपलमध्ये मोझार्ट मिसेरेरी प्रार्थनेसाठी हजर राहिला. हॉटेलात परतल्यानंतर प्रार्थनेचं संपूर्ण संगीत त्याने केवळ स्मरणातून लिहून काढलं. ११ एप्रिल गुड फ्रायडे ला मिसेरेरी ही प्रार्थना परत सादर झाली. हॉटेलात लिहिलेली मिसेरेरीच्या संगीताची ती संहिता मोझार्टने हॅटखाली लपवली आणि ती प्रार्थना पुन्हा एकदा ऐकताना मोझार्टने त्या संहितेत किरकोळ सुधारणा गुप्तपणे केल्या! अशा तऱ्हेने १४ वर्षांच्या मोझार्ट कडे त्या संगीताची चौथी प्रत आली!

मोझार्टने ही अनमोल रचना व्हॅटिकनबाहेर नेली आणि चार्ल्स बर्नीने ती प्रत मोझार्टकडून इटलीमध्येच मिळवली. मोझार्ट ने देखील उदार मनाने ती त्याला देऊन टाकली. ती लंडनला नेऊन त्याने १७७१ साली प्रकाशित केली आणि संगीताच्या प्रती फ्रान्स, जर्मनी आणि इटलीमध्ये सहज मिळू लागल्या.

मग पोपने काय केले? १४ व्या पोप क्लेमंटने मोझार्टला बोलावले. पण आश्चर्य! त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याऐवजी त्यांनी ‘ऑर्डर ऑफ द गोल्डन स्पर’ हा व्हॅटिकनचा सर्वोच्च किताब बहाल केला. त्याचे कौतुक केले आणि त्याचा गौरव केला.

......

Group content visibility: 
Use group defaults

अद्भुत

अद्भुत