श्री हरी स्तोत्र मराठी अर्थ

Submitted by राधानिशा on 10 September, 2020 - 05:29

जगज्जालपालं कचत्कंठमालम्
शरच्चंद्रभालं महादैत्यकालम् ।
नभोनीलकायं दुरावारमायं
सुपद्मासहायं भजेsहं भजेsहम् ।।१।।

जे सृष्टीचं पालन करतात , ज्यांच्या गळ्यात चमचमती तेजस्वी माला आहे ;

ज्यांचं मुखमंडल शरद ऋतूतील चंद्रासमान भासतं , जे दैत्यांचा विनाश करतात ;

ज्यांची काया निरभ्र निळ्या आभाळासमान आहे , ज्यांच्या मायेवर विजय मिळवणे अत्यंत कठीण आहे ;

आणि जे आपली पत्नी श्री लक्ष्मीदेवी यांच्यासोबत आहेत , त्या भगवंतांची मी आराधना करत आहे

सदाम्भोधिवासं गलत्पुष्पहासमं
जगत्सन्निवासं शतादित्यभासम् ।
गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं
हसच्चारूवक्रं भजेsहं भजेsहम् ।।२।।

जे नेहमी क्षीरसागरात निवास करतात , ज्यांचं हास्य उमलणाऱ्या फुलाप्रमाणे मधुर आहे ;

जे जगातील सदाचारी लोकांसोबत नेहमी असतात , ज्यांचं तेज शेकडो सुर्यांसमान आहे ;

ज्यांनी गदा , चक्र आदी शस्त्रे धारण केली आहेत , ज्यांनी पिवळी रेशमी वस्त्रे परिधान केली आहेत ;

ज्यांच्या मोहक चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असतं , त्या भगवंतांची मी आराधना करत आहे ..

रमाकण्ठहारं श्रुतिव्रातसारं
जलान्तर्विहारं धराभारहारम् ।
चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं
धृतानेकरूपं भजेsहं भजेsहम् ।।३।।

ज्यांच्या गळ्यात देवी लक्ष्मींनी घातलेली माला आहे ( / जे देवी लक्ष्मींच्या कंठातील हार आहेत ) , जे सर्व वेदांचे सार आहेत ;

जे क्षीरसागरात निवास करतात , जे पृथ्वीचा भार हरतात ;

जे चिदानंदस्वरूप आहेत , जे हर एकाचे मन मोहून घेणारे आहेत ;

ज्यांनी अनेक दिव्य अवतार घेतले आहेत ; त्या भगवंतांची मी आराधना करत आहे

जराजन्महीनं परानन्दपीनं
समाधानलीनं सदैवानवीनम् ।
जगद्जन्महेतुं सुरानीककेतुं
त्रिलोकैकसेतुं भजेsहं भजेsहम् ।।४ ।।

जे जन्म , वृद्धावस्था आणि मृत्यू यांच्या पलीकडे आहेत ( या गोष्टी त्यांच्यावर परिणाम करू शकत नाहीत ) , जे सदैव परमानंदात लीन असतात ;

जे सदैव ( आत्मरूपाचे संपूर्ण ज्ञान असल्याने ) समाधानात लीन असतात , जे हर क्षणी नवीन , जीवनशक्तीने परिपूर्ण असतात ;

जे या सृष्टीच्या जन्माचे कारण आहेत ( ज्यांच्यामुळे हे जग निर्माण झालं आहे ) , जे देवतांच्या सेनेचे रक्षक आहेत ;

जे तिन्ही लोकांना जोडणारे सेतू आहेत , त्या भगवंतांची मी आराधना करत आहे

कृताम्नायगानं खगाधीशयानं
विमुक्तेर्निदानं हरारातिमानम् ।
स्वभक्तानुकूलं जगद्गवृक्षमूलं
निरस्तार्तशूलं भजेsहं भजेsहम् ।।५ ।।

वेद ज्यांच्या गुणांचं स्तुती गान गातात , पक्षीराज गरुड ज्यांचं वाहन आहेत ;

जे मुक्ती प्रदान करतात , जे अहंकारी मनुष्यांचा गर्व हरण करतात ;

जे स्वतःच्या खऱ्या भक्तांची नेहमी काळजी घेतात , जे या जगद्-रुपी वृक्षाचं मूळ आहेत ;

जे सर्व दुःखांचा नाश करतात , त्या भगवंतांची मी आराधना करत आहे

समस्तामरेशं द्विरेफाभकेशं
जगद्विम्बलेशं हृदाकाशदेशम् ।
सदादिव्यदेहं विमुक्ताखिलेहं
सुवैकुण्ठगेहं भजेsहं भजेsहम् ।।६।।

जे सर्व देवतांचे स्वामी आहेत , ज्यांचे केस भुंग्याप्रमाणे काळ्याभोर रंगाचे आहेत ( / ज्यांचे सुगंधित केश भुंग्यांंना आकर्षून घेतात ) ;

हे संपूर्ण जगत् ज्यांचा एक छोटासा अंश मात्र आहे , ज्यांचं शरीर निरभ्र आकाशासमान आहे ;

ज्यांचा देह सदैव दिव्य असतो , आणि जे आसक्ती तथा सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त आहेत ;

वैकुंठ हे ज्यांचं निवासस्थान आहे , त्या भगवंतांची मी आराधना करत आहे

सुरालिबलिष्ठं त्रिलोकीवरिष्ठं
गुरुणागरिष्ठं स्वरूपैकनिष्ठम् ।
सदायुद्धधीरं महावीरवीरम्
महाम्भोधितीरं भजेsहं भजेsहम् ।।७।।

जे देवतांमध्ये सर्वात सामर्थ्यवान आहेत , जे तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठ आहेत ;

जे बलिष्ठांमध्ये सर्वात बलिष्ठ आहेत , जे आपल्या सत्य आत्मज्ञानाच्या ( निर्गुण निराकार ) स्वरूपात सदैव स्थित असतात ;

जे युद्धात नेहमी महापराक्रम दाखवतात , जे वीरांचे महावीर आहेत ;

जे क्षीरसागरात निवास करतात , त्या भगवंतांची मी आराधना करत आहे

रमावामभागं तलानग्ननागं
कृताधीनयागं गतारागरागम् ।
मुनीन्द्रैः सुगीतं सुरैः सम्परीतं
गुणोधैरतीतं भजेsहं भजेsहम् ।। ८ ।।

श्री देवी लक्ष्मी ज्यांच्या डाव्या बाजूला बसतात ( / देवी लक्ष्मी ज्यांच्या वामांगी आहेत ) , जे शेषनागासारख्या महासर्पावर शयन करतात ;

ज्यांना यज्ञांद्वारे प्राप्त केलं जाऊ शकतं , जे आसक्ती - अभिलाषेच्या बंधनांपासून मुक्त आहेत ;

ऋषीमुनी ज्यांच्या गुणांची स्तवनं गातात ; देवता ज्यांची सेवा करतात ;

जे सर्व गुणांच्या पलीकडे आहेत ( सगुणही .. निर्गुणही .. ) त्या भगवंतांची मी आराधना करत आहे ..

◆◆◆◆◆◆◆◆

इंग्रजी आणि हिंदी अर्थाच्या भाषांतरावरून हे भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे .. अर्थामध्ये काही चूक झाली असल्यास माफ करा ..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users