Beethoven & Mozart- (Part-5)

Submitted by बिथोवन on 1 August, 2020 - 10:31

बिथोवन आणि मोझार्ट-(५)

दुसरा अंक कधी सुरू होत आहे याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच परत एकदा मोझार्टने आपली सातवी सिंफनी वाजवावी अशी प्रेक्षकांनी गळ घातली. त्या सिंफनीने इटलीतल्या लोकांना वेडच लावलं होतं. मग दुसरा अंक सुरू झाला.

इस्मीन फर्नासेच्या प्रेमात पडते पण अस्पाशीयाचे प्रकरण तिला कळले आहे याचा सुगावा फर्नासेला लागतो आणि हे कुणाला कळता कामा नये अशी तिला तो धमकी देतो. तरीही ती हे प्रकरण मेट्रिडेटला सांगते. तिने सिफारे शी लग्न करावं असे मेट्रिडेट तिला सुचवतो. दरम्यान मेट्रिडेट अस्पाशीया ला आपण लग्न करूया म्हणून लग्नाची तयारी करतो तेंव्हा अस्पाशीया नकार देते. तू माझा विश्वासघात केलास असे  मेट्रिडेट तिला म्हणतो.

अस्पाशीया सिफारेला भेटून मी तुझ्यावर प्रेम करत असून तुझ्याशीच लग्न करणार असल्याचे सांगते पण ती आपल्या वडिलांची वधू आहे हे समजून
सिफारे तिला सोडून निघून जातो. प्रेम आणि कर्तव्याच्या संघर्षामुळे अस्पाशीया अस्वस्थ होते.
 
रोमनांसोबत फर्नासेने आपल्याविरूद्ध कट रचल्याची माहिती मिट्रिडेटला कळते. रोमन अधिकारी मार्झिओ समेट घडवून आणतो आणि राजद्रोह म्हणून फर्नासेला अटक करून फाशीची शिक्षा सुनवतो. इस्मीन त्याची सुटका करायचा प्रयत्न करते तेव्हा तो आपल्या विश्वासघातकीपणाची कबुली देतो पण आपण हे सिफारेच्याच सांगण्यावरून केले असे सांगून त्याला अडकवतो. सिफारेचा ह्या कटात हात नाही असे अस्पाशीया सांगत असतानाच तिच्या तोंडून आपण सिफारेवर प्रेम करत असल्याचे वाक्य बाहेर पडते आणि ते मिट्रीडेट ऐकतो. तो त्या दोघांचा सूड घेण्याची शपथ घेतो. मिट्रीडेटच्या धोक्यांमुळे अस्पाशिया आणि सिफारे एकत्र मरण्याची इच्छा व्यक्त करतात.

इस्मीन, जी अद्याप फर्नासेच्या प्रेमात आहे, मित्रीडेटला अस्पाशीयाला क्षमा करण्यास पटवून देण्याचा प्रयत्न करते. रोमन आक्रमण करतात आणि मित्रीडेट युद्धासाठी निघतो. अस्पाशिया विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. सिफारेही 'मेलो तर युद्धात मरण'असा विचार करून वडिलां बरोबर युद्धावर जातो.

मार्झिओ फर्नासेला मुक्त करतो आणि नेम्फियमच्या राज्यावर बसवतो. या काळात फर्नासेच्या वागणुकीत बदल घडतो आणि तो मिट्रिडेटच्या बाजूने निर्णय घेतो. युद्धात मिट्रिडेटचा पराभव झाल्यामुळे बंदिवास टाळण्यासाठी तो आत्महत्या करतो. मरण्यापूर्वी तो सिफारे आणि अस्पाशिया यांना आशीर्वाद देतो आणि फर्नासेला क्षमा करतो. तो इस्मीनशी लग्न करण्यास सहमत होतो. हे चारही लोक रोमपासून जगाला मुक्त करण्याचा संकल्प करतात. सिफारे आणि मेट्रिडेट प्रत्येकी पाच,अस्पाशिया, इस्मीन आणि फर्नासे प्रत्येकी तीन, अर्बाते आणि मार्झिओ प्रत्येकी एक असं मिळून एकूण एकवीस गाणी असलेला हा मेट्रिडेट, रे डी पोंटो ऑपेरा समाप्त होतो.

व्हिएन्नामध्ये शोनबर्नला मोझार्टने जो कार्यक्रम सादर केला होता त्यानंतर  सम्राट फ्रांझ जोसेफ याने मोझार्टला दिलेल्या हिऱ्याच्या अंगठ्या, भेटवस्तू आणि वस्त्र प्रावरणे घेऊन मोझार्ट, लिओपोल्ड आणि नॅनल,फ्रँकफुर्टच्या दिशेने निघून तिघेजण पुढील दोन वर्षे संगीताचा कार्यक्रम करत युरोप भर हिंडले.

त्यानंतर इंग्लंडमध्ये किंग जॉर्ज तिसरा सम्राट असताना मोझार्ट आणि त्याची बहीण आणि लिओपोल्ड त्याच्या दरबारात संगीताचा कार्यक्रम करायला पोचले. राजा आणि राणी यांनी मोझार्टला जॉर्ज हँडेल याने रचलेला वॉटर म्युझिक आणि योहान सेबॅस्टियन बाख यानं रचलेल्या ब्रांडेन बर्ग कन्सर्टोज वाजवायला सांगितल्या. मोझार्टने त्या जशाच्या तशा वाजवल्याच पण त्यात स्वतःच्या वेरीएशन टाकून आणखी आकर्षक बनवल्या. राजाने मग ४ जूनला स्वतःच्या वाढदिवशी मोझार्टला कन्सर्ट तयार करण्यास सांगितले. तोच कोन्सर्ट ५ जूनला रॉयल हॉलमध्ये सादर करण्यास सांगितले. मोझार्टची कीर्ती युरोपभर पसरली असल्याने रॉयल हॉल तुडुंब भरला होता. संगीतातील १०० जाणकार मंडळीना खास निमंत्रण दिलेले होते की जेणेकरून मोझार्ट कुठे चुकतो का ते शोधण्यासाठी. पण आठ वर्षाच्या मोझार्ट ने साठ वर्षांच्या जाणकारांना त्यांच्या तोंडात बोटे घालायला लावली.

क्रमशः

 
 

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीताय तुम्ही , जरा मोठे मोठे भाग टाका की दादा Happy ! वाचायला पाच मिनीट सुद्धा लागले नाही , आवडतयं म्हणून सांगितले हं Happy . पुभाप्र .

पाचही भाग आता वाचले. छान चाललीय कथामालिका.

भाग खूप छोटे आहेत. मोठे भाग टाका प्लिज.

यात उल्लेखलेल्या सिंफनीज ऐकायला हव्यात.