तुम्हाला विनोदी लेखक व्हायचं असेल तर तुम्ही फार मोठी रिस्क घेत आहात हे लक्षात घ्या.
तुम्हाला अनेक चित्रविचित्र अनुभवातून जावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला वाघाचं काळीज लागेल. वाघाचं काळीज लागेल म्हणजे हे केवळ शाब्दिक बरंका नसता तुम्ही ताबडतोब ताडोबाच्या जंगलातुन खरा वाघ धरून आणाल आणि हार्ट सर्जन कडे घेऊन जाल व हार्ट सर्जनचे बीचाऱ्याचे भीतीने हार्ट बंद कराल. तसे कृपया करू नका.
विनोद करणं तसे फार सोपे असते असं मी माझ्या एका कवी मित्रास माझ्या पैशाने दोसा खाऊ घालताना सहज म्हणालो तेव्हा तो म्हणाला "होय माहितीये मला, माझ्या मुलाचं नाव विनोदच आहे." हे ऐकून मला हसावे का रडावे हे कळेना.
शेवटी मी पहिलाच पर्याय बरा म्हणून भरपूर हसून घेतले.
एक मल्ल महिला मला म्हणाली की "सर मला गंभीर विनोद करायचा आहे कसे करू?" मी तिला म्हणालो की सुरुवातीला छोटे शाब्दिक विनोद करायचा प्रयत्न कर आता उदाहरणार्थ:
"मारकुट्या मामीने मामाची मुंडी मिट मिटा मध्ये मुरगळली." हे ऐकताच ती प्रचंड खुश झाली.
मलाही आपल्या या शक्तिमान विद्यार्थिनीला विनोदी लेखिका करण्याच्या मार्गावर धाडल्याचा आनंद झाला.
काही दिवसांनी रशीद मामुच्या टपरीवर उधारीवर का असेना पण चहा पाव खाताना. एक माणूस उलटा चालत आला म्हणून थोडं आश्चर्याने बघितलं तर त्याच्या धडावर मुंडी उलटी बसली होती. मामू कडून सिगरेट घेऊन तो मनुष्य जेव्हा उलटा धूर सोडत रिव्हर्स चालत गेला तेव्हा मी आश्चर्य वाटून म्हटलं मामू ये क्या है?? इस्की मुंडी को क्या हुआ?
मामु खेदाने मान हलवित म्हणाले:
- "क्या बोलना भाईजान, इस्का भांजा अपने पास ही बीडी फुक्ता. उनहो मेकु बोलरा था की ईस्की बिवी ने, इस्कू मिटमिटा गावं मे ले जाके इसकु मुंडी पटक पटक के धोया. उस मॅच मे ईस्का ऐसा नजारा हो गया देखो."
मी मनोमन ठरवलं की याच्यापुढे कुणालाही सल्ला देताना त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करून मगच सल्ला द्यायचा.
विनोदी लेखक म्हणून चार लोक ओळखू लागले की कधीकधी बऱ्या घटना पण घडतात मध्यंतरी मी पाककृती म्हणून लिंबू सरबत कसं करतात हे अत्यंत सिरीयसली लिहिलं माझ्या दृष्टीने अत्यंत अवघड असलेल्या या पाककृतीला लोक इतके हसले की बरेच जण तर हॉस्पिटलमध्ये पोट दुखून ॲडमिट झाले आणि काही भल्या डॉक्टरनी रेफरल फी म्हणून मला दोन लिमलेटच्या गोळ्या पाठवल्या.
विनोदी लेखकाचं आणखीन एक दुःख म्हणजे ज्याप्रमाणे कवींचा एक कळप असतो आणि तो आपल्या थव्यातील कोणाच्याही कवितेला कशाही कवितेला किंबहुना न कवितेला देखील वाहवा वाहवा क्या बात है असे म्हणून प्रोत्साहन देतो तसे विनोदी लेखकाच्या नशिबात नसते ही एक दुर्दैवाची बाब आहे. साधारणपणे जसा एक प्राध्यापक दुसऱ्या प्राध्यापकाला पाण्यात पाहतो तसंच एक विनोदी लेखक दुसऱ्या विनोदी लेखकाच्या विनोदाला कधीही चांगलं म्हणत नसतो. ज्याप्रमाणे काही प्राचीन परंपरा आजही कालबाह्य झालेल्या नाही आहेत त्यातीलच ही एक आहे. खोटे वाटत असल्यास सदर लेखकाचे पुरस्कार प्राप्त विनोदी पुस्तक वाचा, शक्यतो विकत घेऊन वाचा (कारण कदाचित तुम्हीच पहिले पुस्तक विकत घेऊन वाचणारे भाग्यवान ग्राहक असाल) आणि इतर लेखकांचा विनोद वाचून तुम्हीच मला सांगा ते काय लिहितात आणि मी किती छान.. असो, म्हणतात ना माणसाने नेहमी पॉझिटिव बोलावे आणि विनोदी लेखनाच्या विश्वात असलेली परंपरा पाळावी.
आता या विषयावर आपण बोलतोच आहोत तर तुम्हाला हे सांगितले पाहिजे की कधी कधी चांगली माणसं पण भेटतात.
एकदा काय झाले की गॅदरिंगच्या नाटकात राक्षसाचाच रोल पाहिजे म्हणून एक मराठीचे शिक्षक खूपच हट्ट करू लागले.
नेहमीप्रमाणे लेखक दिग्दर्शक निर्माता मीच असल्याने मेकअपमनने मला विचारले यांना कुठला मेकअप करायचा शिंग लावायचे कि मोठ्या मिशा? त्यावर ते शिक्षक म्हणाले " कशाला तो फालतू खर्च? मी विदाऊट मेकअप स्टेजवर जाताच मुले घाबरून रडू लागतील मला खालपासून वरपर्यंत नीट निरखून पहा!" आणि काय आश्चर्य मी नीट पाहिले आणि तत्काळ मला ते मान्यच करावे लागले. आजकाल इतके प्रामाणिक शिक्षक मिळतात कुठे? ते पण मराठीचे!
असो आज साठी एवढे चिंतन पुरेसे आहे असे मला वाटते.
#comedy #writer
छान
छान
आभार!
आभार!
(No subject)
LoL
LoL
आभार सर्वांचे
आभार सर्वांचे
(No subject)