बिथोवन आणि मोझार्ट-(४)
खानसाम्याने ठेवलेले पॉलेंती, पॉर्क आणि केक खाल्ल्यावर जरा बरे वाटले. संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम आहे असे म्हणाला होता मोझार्ट. मागच्याच वर्षी त्याने प्रागमध्ये मे महिन्याच्या पहिल्या तारखेला केलेला 'ले नोझ्झे दी फिगारो' काय जबरदस्त गाजला होता! द मॅरेज ऑफ फिगारो! 'बो मार्शे'ने लिहिलेल्या विनोदी नाटकावर आधारित ही सांगीतिका 'लॉरेन्झो डा पोंटे' याला लिब्रेट्टो मध्ये अनुवादित करायला मोझार्टने सांगितले आणि असे अप्रतिम संगीत दिले की नववा प्रयोग सुरू होईल आता इथे व्हिएन्नामध्ये. सुरुवातीचे ओवरचर्स तर कान तृप्त करणारे. दुसऱ्या अंकात सुझानाचे दुःखी कष्टी मन रडताना जे संगीत दिलंय त्याला तर तोडच नाही. तिसऱ्या अंकात मोझार्टने केवळ आणि केवळ बी-फ्लॅट कॉर्डसचा वापर करून प्रेक्षकांना असे खिळवून ठेवले आहे की काय सांगावे! लोकं केवळ ह्याच ऑपेराची आणि त्यातल्या मोझार्टच्याच सिंफनीची चर्चा करतायत. ऑपेरातली सुझाना आणि चेरुबिनो ह्या दोन पात्रांना तर लोकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतलंय!
" कोण आहात आपण?" असा मंजुळ स्वर ऐकू आला आणि मान वळवून मी मागे पाहिले. मी पटकन उठून उभा राहिलो . "मी बिथोवन, बॉन वरून आलोय, सरदार मोझार्ट यांना भेटायला." मी उत्तर दिले.
" मी काँस्तांझा, मिसेस मोझार्ट," ती स्त्री म्हणाली, "बसा ना हेर्र बिथोवन, तुमचं जलपान झालंय का?"
" होय फ्रॉ काँस्तांझा, धन्यवाद." मी उत्तरलो.
" ठीक आहे. आराम करा मग थोडा वेळ." मिसेस मोझार्ट म्हणाल्या आणि बाजूला असलेल्या जिन्याने चढत वरती गेल्या. नुकतंच त्यांच्या छोट्या बाळाचा मृत्यू झाला होता. केवळ दोन महिन्यांचं बाळ. मिसेस मोझार्ट यांच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. मोझार्ट पण अगदी हसतमुख दिसत होता. कशी दाबत असतील ही लोकं आपल्या वेदना मनात? रात्री उशीवर डोकं टेकल्यावर वेदनांना जाग येत असेल आणि वेदनेला सोबत देण्यासाठी आपणही जागे राहत असू तर काय अर्थ आहे अशा आयुष्याला? जगाला मान्य नसतं तुमचं रडगाणं. जगासमोर वेगळाच मुखवटा धारण करावा लागतो. दुःख उराशी कवटाळून समाजात हसतमुख बनून वावरताना काय यातना होत असतील ते मला नाहीतर कुणाला ठाऊक असणार...? सुखाला उराशी कवटाळलं तर कदाचित् सुखाच्याच उराला हृदय विकाराचा झटका येत असावा इतकं ते सुख नाजूक आणि तकलादू. दुःख पचवण्यात हा बिथोवन एकदम तरबेज झालाय आता!
मोझार्ट पचवत असेल का दुःख? असावा कदाचित्. मोझार्टला मारिया थरेसा ने हिऱ्याची अंगठी दिल्यानंतर मेजवानी संपली तेंव्हा मोझार्ट आणि राणीची छोटी मुलगी मेरी अँतवानेत दोघं बाहेरच्या बागेत खेळायला गेले होते त्यावेळी मोझार्ट घसरून पडला होता आणि मेरी अँतवानेतने त्याला सावरले होते. दोघं एकाच वयाचे. ती केवळ दोनच महिन्याने मोठी. त्यावेळी छोट्या मोझार्टने तिला 'विल यू बी माय वाइफ?' असे विचारले होते आणि तिने होकार दिला होता. पण तसे घडले नाही. ते त्याला आठवत असेल का? ती फ्रान्सची राणी झाली सोळाव्या लुईशी लग्न करून. मोझार्ट तर सामान्य माणूस. तो राजपुत्र थोडाच होता? परंतु पंधराव्या वर्षी मेरी अँतवानेत राणी झाली असली तरी मोझार्टही सामान्य माणूस राहिला नव्हता. चौदाव्या वर्षी मोझार्टने मेट्रिडेट हा ऑपेरा लिहिला आणि त्याचा एक भाग म्हणून त्याची सुप्रसिद्ध सातवी सिंफनी लिहिली, आणि संगीत सम्राट म्हणवून घेण्याच्या दिशेकडे त्याने वाटचाल सुरू केली होती. हीच ती सातवी सिंफनी... जी मी आठ वर्षाचा असताना जाहीर कार्यक्रमात वाजवली होती आणि सी मायनरच्याच पट्ट्या जाम झाल्या होत्या.
चौदाव्या वर्षी मोझार्टचा कल्पना विलास किती उत्तुंग होता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा ऑपेरा मेट्रिडेट, रे डी पोंटो. २६ डिसेंबर १७७० ला मिलान कार्निवल मध्ये या ऑपेराचं तीएत्रो रेजिओ ड्युकल इथे उद्घाटन झालं. सोप्रानो, अल्टो आणि टेनर अशा आवाजाचा उपयोग करून मोझार्टने आपली सातवी सिंफनी अशी पेश केली की त्या सिंफनीने इटलीतल्या लोकांना वेडच लावलं!.
ऑपेराची कथा तुर्कस्तान येथील अर्म्फ्यूम राज्याच्या क्रिमिअन बंदरावर घडते. काळ ख्रिस्त पूर्व ६३. ऑपेरातल्या राजाचं नाव मेट्रिडेट. रोमन सम्राट पॉम्पीचे साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी तो चालून जातो. युद्धात तो मारला गेला अशी बातमी राज्याचा राज्यपाल अर्बाते, राजाची दोन मुलं, फर्नासे व सिफारे आणि राजाची होणारी बायको अस्पाशिया यांना कळवतो. अर्थातच फर्नासे व सिफारे पहिल्या बायकोची मुलं असतात आणि अस्पाशीयाच्याच वयाची असतात. प्रचंड पराभवाचा सामना करणाऱ्या मिट्रिडेटला मृत मानले जाते.
पहिल्या अंकात अर्म्फ्यूमचे राज्यपाल अर्बाते, सिफारे यांचे स्वागत करताना दाखवले आहे. सिफारे आपला भाऊ, फर्नासे याच्यावर प्रचंड संतापलेला असतो कारण तो शत्रूंबरोबर, रोमन साम्राज्याला फितूर झालेला असतो. अशा परिस्थितीत अर्बाते सीफारेवर निष्ठा ठेवण्याचे वचन देतो. अस्पाशीयावर फर्नांसे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून अस्पाशीया सीफारेला फर्नासेपासून संरक्षण करण्याची विनंती करते. तो तिची विनवणी स्वीकारतो आणि तिच्याबद्दलचे त्याचे प्रेम प्रकट करतो.
फर्नासे परत एकदा अस्पासियाला वश करण्यासाठी प्रयत्न करतो पण ती त्याला नकार देते. सिफारे तिला वचन दिल्याप्रमाणे आपल्या भावापासून तिचे रक्षण करतो. त्याच वेळी मेट्रिडेट जिवंत आहे आणि तो आपल्या राज्यात परत येत आहे अशी बातमी थडकते. राज्यपाल अर्बाते दोघा बंधूंना त्यांचे मतभेद लपवून ठेवण्यास व वडिलांना अभिवादन करण्यास उद्युक्त करतो. दोन्हीं भाऊ अस्पासियाबद्दलच्या भावना लपविण्यास सहमत होतात परंतु त्याच वेळी फर्नासे मेट्रिडेटच्या विरुद्ध रोमन सैनिकी अधिकारी मार्झिओ यांच्या बरोबर कट रचतो.
मेट्रिडेट परत येतो तेंव्हा युद्धातला त्याचा सहयोगी राजा पार्थियाची मुलगी राजकुमारी इस्मीनसोबत निमफॅमच्या किनाऱ्यावर येतो. मेट्रिडेटची इच्छा असते की सहयोगी राजाला वचन दिल्याप्रमाणे फर्नासेने इस्मीनसोबत लग्न करावे. इस्मीन फर्नासेच्या प्रेमात पडते पण अस्पाशीयाचे प्रकरण तिला कळते आणि तिला निराशा जाणवू लागते. अर्बाते मेट्रिडेटला फर्नासे अस्पाशीयाच्या मागावर आहे असे सांगतो परंतु सीफारेचा उल्लेख करत नाही. मेट्रिडेट संतापतो आणि फर्नासेचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करतो.
मोझार्टने इथे मध्यांतर केले आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला कशी पोहोचेल याची तजवीज केली. लोकांना हा ऑपेरा चौदा वर्षाच्या मुलाने लिहिलाय आणि संगीतबद्धही केले आहे यावर विश्वास ठेवावा की नाही याची आपापसात चर्चा करू लागले.
(क्रमशः)
Interesting आहे. छान चाललेय.
Interesting आहे. छान चाललेय.
मस्त
मस्त
मस्त...!!!
मस्त...!!!
छान लिहीत आहात
छान लिहीत आहात
खुपच छान !!!
खुपच छान !!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
Thanks all you guys. There
Thanks all you guys. There won't be any parts in future since I find very less takers for this subject. Thank you all for being patron for these two wonderful musicians. See you.
मज्जा येतेय. सर पुन्हा एकदा
मज्जा येतेय. सर पुन्हा एकदा विनवणी आहे की क्रुपया ही मालिका बंद करु नये. प्रतिसादापेक्षा वाचकसंख्या पहा. प्रतिसाद कमी असतील म्हणुन नाउमेद होउ नका. लिहिते रहा. या सबजेक्ट्ला अजून तरी कोणी हात लावला नव्हता. माझ्यासारख्या मराठी रसिकांना पाश्चात्य संगीताबद्द्ल खूप कमी माहित असते.तुमच्यासारख्या लेखकांमुळे आम्हाला इतकी सुंदर माहिती मिळते. तेव्हा प्लीज लेखमाला चालु ठेवा.
छान लिहीत आहात.
छान लिहीत आहात.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
हा भाग पण छान.
हा भाग पण छान.
अहो नका थांबवू ही मालिका.
अहो नका थांबवू ही मालिका. आम्हाला खरेच आनंद वाटतो वाचायला.
तुम्ही लिहीत जा. लिहिण्यात ही आनंद आहे. तो का गमावता.