भाकरीचे भन्नाट कॅरमल पुडींग -
लागणारा वेळ - दिड तास
लागणारे साहित्य -
दूध - ३ कप
ज्वारीची भाकरी - २-३
साखर - दिड वाटी
कॅरमल साठीची साखर - १ वाटी
अंडी - ४
वॅनिला इसेन्स
नाव ऐकून उत्सुकता वाढेल पण खायची हिम्मत होणार नाही अशी ही रेसिपि वाटत असली तरी माझ्या फार आवडीची.. आणि असायलाच हवी कारण ही रेसिपि मी माझ्या पहिल्या बाॅयफ्रेंडच्या आईकडून शिकले होते..
तो ख्रिस्ती धर्माचा होता त्यामुळे त्याच्या डब्यात वरचेवर बेक केलेले पदार्थ यायचे..एकदा त्याने डब्यात हे भन्नाट पुडींग आणलं होतं.. सगळ्यांनी अगदी मिटक्या मारत मारत संपवलेलं आठवतंय.. ह्यावर विचारल्यावर कळालं कि ते ज्वारीच्या भाकरीचे ग्लुटन फ्री पुडींग आहे .. सगळेच क्षणभर आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिले..
म्हणजे फ्राॅक घातलेली त्याची आई किचन मधे उभी राहून भाकऱ्या थापते ही कल्पनाच वेड लावणारी होती .. मी त्याला म्हटलं “तुझ्या आईला सांगशील का ही रेसिपि लिहून द्यायला “..त्यावर तो म्हणाला “आई सहसा रेसिपिज् शेअर करत नाही .. तुला हवं असेल तर घरी येऊन प्रत्यक्ष तीच्याकडून शिकून घे” .. ह्याला म्हणतात नेकी और पूछ पूछ... मी माझ्या हातचे कांदेपोहे त्यांना खाऊ घालेन तेव्हा घालेन पण त्याच्या घरी जायची संधी आणि त्याच्या आईच्या हातचे पुडींग, ह्या दोन्ही गोष्टी सोडायच्या नव्हत्या.. मी लगेचच होकार दिला आणि त्याच आठवड्याच्या रविवारी सकाळी त्याच्या दारात प्रकट झाले.. मी विचार केल्याप्रमाणेच त्याच्या आईने एक छानसा फ्राॅक परिधान केला होता.. घरी जातात त्याची आई मला किचनकडे घेऊन गेली.. भाकरी थापायची सगळी तयारी करून ठेवली होती .. त्याचे बाबा कुठलीही कुरकूर न करता एका बाजूला भांडी घासत आणि मस्त खुसखुशीत जोक्स मारत उभे होते..आपले भविष्य असं असणार ह्या विचाराने माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या .. एकंदरीत वातावरण अगदी कुल होते.. त्याच्या आईने लगेचच भाकऱ्या थापायला घेतल्या.. ह्यापूर्वी मी माझ्या सहावारीतल्या आईला आणि नऊवारीतल्या आज्जीलाच भाकऱ्या थापताना पाहिले होते.. पण हे असं फ्राॅकमधे भाकरी थापत बघताना मला त्यांच फार कौतुक वाटलं.. गरमागरम भाकऱ्या त्यांनी हाॅटपाॅट मधे ठेवत त्या मऊ राहण्यासाठी झाकून ठेवल्या.. त्यानंतर म्हशीचे दूध जे उकळून तयार होतं त्यात भाकरीचा चूरा घातला.. नंतर त्या बॅटरमधे इसेन्स घालून फेटलेली अंडी व साखर घालून मिश्रण एकजीव केले.. एका पॅनमधे साखरेचं कॅरमल बनवून साच्यात ओतून घेतलं.. ते थंड होताच त्यात बॅटर ओतलं आणि एका मोठ्या टोपात पाणी गरम करून त्यात एक लहान टोप पालथा ठेवत त्यावर हा साचा ठेवला.. टोपावर झाकण ठेऊन १ तास असेच वाफेवर शिजू दिले..
ते शिजेपर्यंत सगळ्यांसोबत काही वेळ पत्ते कुटले गेले.. मी आवर्जुन पत्त्यांना कैंची मारण्याचे माझे कौशल्य दाखविण्याचा मोह आवरला.. कैची मारून दाखवली असती तर त्याच्या आईच्या स्वप्नात मी रोज पीसत राहिले असते हे जाणून होते .. काही डाव मुद्दाम हरले देखिल.. असो, तर तासाभरानंतर पुडींग शिजून तयार होतं.. ते टोपातून बाहेर काढत सेट होण्यासाठी फ्रिजमधे ठेवले गेले..तेवढ्या वेळात आईने आदल्या दिवशी बनवलेली चिकन बिर्याणी मला खाऊ घातली .. ह्यातून एक गोष्ट लक्षात आली, धर्म कोणताही असो सूनेला सगळीकडे अशीच वागणूक मिळते.. पण मला शीळीच बिर्याणी जास्त आवडते असं म्हणत मी ती चांगलीच हाणली.. काही वेळात फ्रिजमधे सेट झालेलं पुडींग बाहेर काढत ते एका ताटात पालथं केलं आणि लगेचच तळाशी असलेले कॅरमल पुडींगवरून ओथंबून वाहू लागलं.. छान मऊ, लुसलुशीत पुडींग खाण्यासाठी तयार होतं..पहिला घास तोंडात घालताच एखाद्याची ब्रम्हानंदी टाळी लागले अशी अप्रतिम चव.. त्यानंतर पुडींगचे आणि त्याच्या आईचे जोरदार कौतुक करत व काही पुडींग डब्यात ढकलत मी तिथून निघाले.. घरी येताच रेसिपि जशीच्या तशी वहीत उतरवली..
बरं झालं तेव्हाच्या तेव्हा लिहिली होती नाही तर आता पुन्हा जाऊन विचारायची सोय नव्हती..
Jokes apart .. भाकरीचे कॅरमल पुडींग असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही.. कृपया हा प्रयोग करून बघू नका.. उगाच बनवाल आणि माझ्या नावाने खडी फोडाल
खालचा फोटो ब्रेड कॅरमल पुडींगचा आहे .. भाकरीला ६ लादी पाव किंवा ८ ब्रेडच्या स्लाईसेस ने रिप्लेस करा आणि रेसिपि पुन्हा एकदा वाचा.
ओवन मधे बेक करायचं असल्यास ३५०F वर ५० मिनिटे बेक करा.
खुसखुशीत
खुसखुशीत
कडक लिहिलंय.....मला तर खरच
कडक लिहिलंय.....मला तर खरच वाटलं सगळं...आणि ती फ्रॉक वाली ऑंटी इमॅजिन केली..ख्रिश्चन बॉयफ्रेंड ...ख्रिश्चन सासरा....मस्तच...
यु मेड माय डे आज दिवसभरातील
यु मेड माय डे
आज दिवसभरातील हे सर्वोत्तम लिखाण ......
म्हाळसा
म्हाळसा
बॉयफ्रेंड तरी खरा होता़ का?
मला पण खरंच वाटलं सगळं, आणि
मला पण खरंच वाटलं सगळं, आणि आधी स्क्रोल करून फोटो बघितल्याने आता आज करूच असं झालं
:-. सही लिहिलंय म्हाळसा.
सही sssss . बाकी म्हाळसा
सही sssss . बाकी म्हाळसा म्हणजे लेडी ऋन्मेsssष म्हणायला हरकत नाही
क्या बात2 !
क्या बात!
म्हाळसादेवी मन जिंकलत हो
नाही, त्यांची स्वतंत्र आयडेंटिटी आहे, उगाच ऋ बरोबर तुलना कशाला
भारीच....
भारीच....
मस्त लिहीलंय
मस्त लिहीलंय
मी शीर्षक वाचूनच खुर्चीवर बसल्या बसल्या माझ्या एक्स गर्लफ्रेंडला हाक मारून सांगितले की तुला माहीतेय का भाकरीचेही कॅरामल पुडींग बनवतात. असं काहीतरी एकेक भन्नाट मी शिकत असतो मायबोलीवर
मस्त बनवलंय.
मस्त बनवलंय.
सगळ्यांना आणि पुडिंगला.
ह्यातून एक गोष्ट लक्षात आली,
ह्यातून एक गोष्ट लक्षात आली, धर्म कोणताही असो सूनेला सगळीकडे अशीच वागणूक मिळते.. पण मला शीळीच बिर्याणी जास्त आवडते असं म्हणत मी ती चांगलीच हाणली.. >>

शेवटचा यु टर्न तर अफलातुन. रेसिपी लिहितानाच एवढ्या फिरक्या घेतल्यात की आता ही रेसिपी कधीच विसरणं शक्य नाही. भाकरीचंच पुडिंग बनवलं जाणार
भारी रेसिपी.
भारी रेसिपी.
ही कथा खोटी नसावी अशी शंका येत आहे. भाकरी ऐवजी झगेवाल्या आईने ब्रेडचंच पुडिंग केलं असेल.
हाहाहा! जमलाय लेख.
हाहाहा! जमलाय लेख.
सगळेच लय भारी..
सगळेच लय भारी..
भाकरी आणि अंडं वाचून जरा ठसका
भाकरी आणि अंडं वाचून जरा ठसका लागला.
बाकी बरं लागेल जे काही असेल ते
भारीच
भारीच
मस्त पुडींग!
<<<भारी रेसिपी.
<<<भारी रेसिपी.
ही कथा खोटी नसावी अशी शंका येत आहे. भाकरी ऐवजी झगेवाल्या आईने ब्रेडचंच पुडिंग केलं असेल. Happy>>>
सहमत.. लेख झकास..
Omg ! अगदी खरच वाटले मला.
Omg ! अगदी खरच वाटले मला. मस्त लिहिलेय आणि हे पुडिंग मला प्रचंड आवडते.
खुसखुशीत
खुसखुशीत
भाकरीचे भन्नाट कॅरमल पुडींग
भाकरीचे भन्नाट कॅरमल पुडींग बघायला केवढ्या मोठ्या आशेने आले होते.

मला पण खरंच वाटलं सगळं, >>>+१
मला पण खरंच वाटलं सगळं, >>>+१.
भन्नाट लिहिलंय!
भाकरीचं पण बनू शकेल लेख जोक
भाकरीचं पण बनू शकेल लेख जोक असला तरी.नाचणीचा केक बिक करतातच ना तसे.
कोणीतरी करून आणि खाऊन बघून सांगा रे.
(ब्रेड पुडिंग चा फोटो भन्नाट आहे.लादी पाव वापरून असा फ्लॅट बेस कसा मिळवता आला?कृती पण लिहूनच टाका.)
"बरं झालं तेव्हाच्या तेव्हा
"बरं झालं तेव्हाच्या तेव्हा लिहिली होती नाही तर आता पुन्हा जाऊन विचारायची सोय नव्हती.."
इथेच कळलं आणि गालातल्या गालात हसू आलं.
खुसखुशीत आणि कडक. पर्फेक्ट चकलीसारखं .
भाकरीचे कॅरमल पुडींग असा
भाकरीचे कॅरमल पुडींग असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही.. >>>> आरारारारा. नुकतीच भाकरी करायला शिकलोय. केवढ्या उत्साहानी मी वाचत होतो. माझा शनिवारचा प्लॅनपण मनातल्या मनात तयार होत होता हे ट्राय करायचा. तुम्ही पार पोपट केलात शेवटी, म्हाळसाकाकू
पण आता माघार नाही. शनिवारी पुडिंग झालच म्हणून समजा भाकरीच. बेस रॉ मटिरियल तर ठरल.
तज्ञ लोकांना सांगितल की मी रेसिपी वाचलीय पण त्यात काहितरी चूक वाटतेय, तर कहितरी उपाय मिळेलच नक्की.
अंडी, भाकरी, दूध व साखर गेला बाजार फ्रेंच टोस्ट सारखी तर लागेल.
पण तुम्ही लिहिलय मात्र मस्त.
उगाचच सासरला ठोकल्याबद्दल मात्र तीव्र निषेध.
बॉयफ्रेंड तरी खरा होता़ का? >
बॉयफ्रेंड तरी खरा होता़ का? >>नवऱयाला रेसिपि वाचायला दिली होती.त्याने देखिल हाच प्रश्न विचारला .. त्याला दिलेलेच उत्तर इथेही लिहीते.. तुम आम खाओ आम,गुठलि के दाम क्यो गिनने।
ही कथा खोटी नसावी अशी शंका
ही कथा खोटी नसावी अशी शंका येत आहे. भाकरी ऐवजी झगेवाल्या आईने ब्रेडचंच पुडिंग केलं असेल. >>बिंगो
फारच मस्त. हहपुवा. यातलं
फारच मस्त. हहपुवा. यातलं नक्की काय खरं होतं
आपले भविष्य असं असणार ह्या
आपले भविष्य असं असणार ह्या विचाराने माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या ..>> मग आता वर्तमानात फुटतात का हो उकळ्या..??
>>>तुलनात्मक आहे ते. ज्याचा
>>>तुलनात्मक आहे ते. ज्याचा थांग लागणं शक्य नाही अशा गोष्टींची थियरी उगाळण्यापेक्षा काहीतरी व्यवहारातील भौतिक करणे जास्त बरे अशा अर्थाने.>>> हाहाहा व्हेरी स्मार्ट आन्सर!! छान उत्तर दिलत.
आवडली ही कथा.
Pages