सोबत

Submitted by ज्येष्ठागौरी on 25 July, 2020 - 00:55

सोबत
बारा वर्षांपूर्वी नवीन घर बघायला आलो, सगळ्यात कुठली गोष्ट आवडली तर स्वयंपाकघराला लागून असलेल्या ड्राय बाल्कनीमधून दिसणारं नारळाचं झाड.अगदी तीन हातावर असणारं हे झाड एकदम आवडून गेलं.त्याला अर्थात कारण म्हणजे माझ्या माहेरी असणारी नारळाची झाडं, पण ती फार उंच होती , काही दिसायचं नाही जवळून.हे झाड मात्र खूप जवळून पाहता आलं.बराच वेळ त्यावर बसणारे छोटे पक्षी,येणारे छोटे नारळ, त्याच्या झावळ्या बघण्यात जातो माझा.म्हणजे सत्कारणी लागतो.
गेल्या काही दिवसात ह्या झाडापाशी खूप थांबलं गेलं.कामाला अगदी कमी वेळा जावं लागलं, खूप विश्रांती मिळाली, घरच्यांबरोबर खूप वेळ मिळाला,घर आवरुन झालं ,खूप वर्षांनी घड्याळाशी स्पर्धा न करता आयुष्य मिळालं पण त्यात मनस्वास्थ्य नाहीच मिळालं.अगदी ठरवून, आहे त्यात आनंदी राहायचं ह्या संस्कारांनी "कंटाळा आला"असं म्हणायचं नाही असं ठरवलं होतं आणि ते पाळलंसुद्धा.तरीही वाढणारे आकडे, काही अगदी जवळची जीवाभावाची माणसं ह्या लढाईत युद्धभूमीत आहेत ह्याची जाणीव,कुटुंबाची काळजी,भविष्यात काय होणारे,आर्थिक नुकसान,अगदी खूप नाही पण छोटे केलेले आणि आता कोसळलेले मनसुबे हे सगळं मनात मागे चालू आहे पार्श्वसंगीतासारखं पण तरीही ह्या क्षणात राहण्याचा प्रयत्न आटोकाट चालू आहे.
Live in the now हे सतत बजावत असताना ह्या नारळाच्या झाडाकडे बघताना कुठंतरी शांत वाटतं.
हे झाड पाठीमागच्या इमारतीच्या मागच्या बाजूला आहे,दर्शनी भागात नाही आणि ह्याच झाडाखाली त्यांच्या रखवालदाराचं एक खोलीचं घर आहे.पूर्वी घर नव्हतं .तो आणि ती दोघंच असतात. म्हणजे त्यांचं कुटुंब मोठं असावं पण इथं दोघचं असतात.पूर्वी ते पार्किंगमध्ये रहायचे, अलीकडेच सोसायटीने त्यांना एक पक्की खोली बांधून दिली आहे.आता तो आणि ती त्या पक्क्या घरात राहतात.इथे रहायला आलेल्या दिवसापासून मी पाहते आहे.म्हणजे आमचा संवाद हा सकारात्मक स्वरावर सुरु झाला नाही.आम्ही इथे आल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे एकदम लाकूड फोडल्याच्या आवाजानं जाग!नवीन जागा,दमणूक ह्या सगळ्यातून दुर्लक्ष केलं पण हा रोजचा प्रकार झाला.भल्या पहाटे हा माणूस लाकूडतोड्यासारखा लाकडं फोडत बसायचा.मग वरुन एकदा झकपक झाल्यावर त्यानी त्याची वेळ अकराला शिफ्ट केली त्यामुळेआमचा हसत खेळत वगैरे परिचय झाला नाही.मग दोन तीनदा खटके उडलेच.कधीतरी त्यांच्या इमारतीत पाणी वाहण्यावरून कधी काही!संबंध नसल्यानं फार सख्य वगैरे नाहीच म्हणाना!
माझ्या बाल्कनीत उभं राहिलं की खाली नजर टाकताच त्यांचा संसार दिसतो.खरंतर आपण दुसऱ्याच्या व्यक्तिगत बाबींमध्ये न पडणारे असतो पण तरीही अगदी मोकळ्यावर संसार असल्यानं सगळं दृष्टीस पडतं.
मी बऱ्यापैकी वर असल्यानं त्यांना दिसत नाही पण मला मात्र त्यांचं राहणं दिसतं. मुद्दाम बघावं लागत नाही,नारळाच्या झाडाकडे नजर टाकता टाकता खाली बघितलं की त्यांचा संसार मला दिसतोच. चिक्कार वस्तू जमवल्यात तिनं .भल्या सकाळपासून कायम कामात असते ती. रविवारी मी आळसावून नेहमीपेक्षा उशीरा उठून तिथे उभी राह्यले तर तिच्या तुळशीपाशी रांगोळी आणि दिवा दिसतो. एरवीपण उरका फार आहे तिचा. झाडाजवळ चूल लावलेली असते, त्यावर चहा करून थंडीत दोघंही तिथं बसून चहा घेत असतात. आमच्या सोसायटीत त्या चुलीतून येणाऱ्या काळ्या धुराबद्दल कधी तक्रारीचा सूर उठतो पण तेव्हढ्यापुरता. त्याच चुलीवर तिचं पाणी तापत असतं, सकाळ संध्याकाळी भाकरी होत असते.तिची भाकरी मी अनेकदा वरुन पाहिली आहे.हातावर आणि परातीत भराभर मोठ्या मोठ्या भाकरी थापत असते.मी ऑफिसला निघते,तेंव्हा ती सगळं आवरुन आमच्या गल्लीत कामाला आलेली दिसते.तो रखवालदार तर आहेच पण सतत झाडू मारणे आणि पडणाऱ्या झावळ्यांचे खराटे बनवायचा त्याचा छंद आणि जोड व्यवसाय असावा, दिवसभर तोही काहीतरी करत असतो. संध्याकाळी तुळशीपाशी दिवा असतो.दोघंही गप्पा मारत जेवतात.ती खोलीत झोपते तो बाहेर पार्किंगमध्ये.ती त्या परिस्थितीत सगळे सणवार करत असते. मोठी गुढी उभारते, दिवाळीत कंदिल लावते नातवंडांसोबत चार फटाके उडवते. नातवंड, मुलगा,सून, मुलगी जावई येत जात असतात. सगळ्यांशी नातं सांभाळून असावी दोघेही!
उन्हाळ्यात कधी कधी वाळवणं घालते ती पण यावेळेला नीट बघितलं. हळद , तिखट, शिकेकाई,सांडगे,कुरडया,बटाट्याचा कीस,शेवया.अखंड चालू असतं त्या दोघांचं काहीतरी. मला मजा वाटते बघताना. आनंद हा परिस्थितीवर नाही तर मनस्थितीवर अवलंबून असतो हेच खरं.परवा एक पाहुणी दिसली,बहुदा नणंद असावी. तिघेही आठ दहा दिवस अगदी छान मजा करताहेत.बाईला हिरवा अंगठा असावा,झाडं छान जगतात तिची आणि क्वचित मांजरांना वगैरे दूध देतानाही दिसते. पावसाळ्यात तर तिची खरी परीक्षा असते कारण आतातरी खोली आहे पूर्वी अगदी मोकळ्या आकाशाखाली असायचे ते दोघे.पण बिनधास्त राहतात.तिचं हे पाक कौशल्य आणि तिचं टुकीनं संसार करणं हे भावतं पण बाई आहे एकदम जबरदस्त. पहाडी आवाज आणि बोलायचा हेल मात्र नमुना आहे. दोन तीनदा तिला भांडताना ऐकलंय,माझे घरातल्या घरात पाय लटपटलेत.एकदा तिच्याशी दोन हात करायचा बाका प्रसंगही आलाय.तिनं मोठा आवाज काढायला सुरुवात केल्यावर, बापूंच्या पद्धतीनं मी माझा आवाज दोन पट्टी आणखी खाली आणला मग तिला इलाज उरला नाही आणि मग ठामपणे माझं म्हणणं तिला सांगून मी ते काम केलं.पण बाकी तिच्या नादी कोणी कधी लागत नाही. कामाला वाघ,कुटुंबाला जोडून ठेवणारी असावी ती. फक्त तिचं ते आक्रमक वागणं बोलणं मला रुचत नाही हे खरं. मी चार मजले वरुन तिला जोखत राहते. अगदी मनुष्यस्वभाप्रमाणे तिचा संसार बघत राहते, ह्याचं शल्य आहे,पण तो संसार बघणं हे कौतुकाचं असते हेही मी अगदी खात्रीनं सांगते.तिच्याकडे जाऊन भाकरी शिकावी किंवा ती कुरडया करुन देईल का असं विचारावं असं वाटतं पण हिंमत होत नाही.
नारळाच्या झाडावर तिचा हक्क आहे,चुकून नारळ किंवा झावळी आमच्या हद्दीत पडला तर शून्य मिनिटात ती आमच्या रखवालदाराकडून काढून घेते.ती आजच्या भाषेत दबंग किंवा डॉन म्हणावी लागेल.
आज मी पुन्हा नारळापाशी!मनातून खूप मळभ दाटून आलं आहे.हळुहळू काम सुरु होईल,आपण स्वतःला आणि कुटुंबाला कसं वाचवणार हा प्रश्न भेडसावतो आहे.साध्या साध्या गोष्टी परत कधी मोकळेपणाने करता येणार आहेत?हे समजत नाहीये. संशयाचं धुकं जे प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूभोवती आहे ते कधी विरघळणार कळत नाहीये.मी स्तब्ध आहे. खाली ती नातवंडांसकट वर्तमानात बसलीये,मोठ्या आवाजात गप्पा मारतीये, हसतीये.एरवी या आवाजानं माझी झोप अनेकदा मोडलीये. पण आजकाल संध्याकाळनंतर जी भीषण अंगावर येणारी शांतता आहे त्यात मला तिच्या आवाजाची सोबत वाटतीये.मी घरात बसून कानोसा घेऊ शकते तिच्या आवाजाचा.आज माझी प्रिय मंडळी मला भेटू शकत नाहीत,मनात असून, जवळ असून पण तिचं अस्तित्व मला कुठंतरी आत सुरक्षित असल्याचा विश्वास देतंय.आणि अगदी विरुद्ध परिस्थितीत असलो तरी ती मला बळ देतीये,हे मला कधीतरी तिला सांगायचं आहे.घराला आतून कड्या लावणारी मी आणि इमारतीच्या पार्किंगमध्ये पहुडणारी ती.निर्भयता मनातून यावी लागते,हे निश्चित.आज हे निश्चित जाणवतंय की जे आपल्याला रुचत नाही त्याची एक बाजू असते.आमच्यात कुठलंही नातं नाही,रोजचा संबंध नाही पण तरीही तिच्या अस्तित्वाचा ह्या कठीण काळात मला आधार वाटला आहे हे नक्की..पण असं म्हणतात there is always always always something to be thankful for आणि माझ्या आयुष्यात असणाऱ्या आणि मी कृतज्ञ असणाऱ्या अगणित अगणित अशा गोष्टींमध्ये ही एक जमा झाली.....
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
आमच्याही बाल्कनीतून अशी काही कुटुंबं दिसायची पूर्वी. पाचसहा होती. बांधकामावरचे मजूर असावेत. समोरच्या रिकाम्या प्लॉट मध्ये दोनतीन घरांमध्ये रहायचे. तेलगू असावेत. एकदोन महिन्यातून एकदा रविवारी सकाळी हमखास जोरजोरात भांडणाचे आवाज यायचे. बाकी रोजचे व्यवहारही दिसायचे. दगडी रगड्यात इडलीचं पीठ वाटायच्या त्या बायका. फावल्या वेळात त्याही हिरांच्या केरसुण्या बांधायच्या.
नंतर एकेक करून ते सगळे दुसरीकडे कुठेतरी रहायला गेले. मग ती घरंही पाडली. नारळाची झाडं सोडून बाकी गुलमोहर, बूच, करंज अशी झाडंही तोडून टाकली आणि प्लॉट्स मोकळे केले. आता तिथे बंगले उभे राहतायत. जमीन तीच, पण केवढा फरक पडला!

Jeshtagouri ekdam sunder lihita tumhi.... relate zhale... mazya saasri khidkisamor .. ek kapsache zaad hote.....gharatle vatavaran.. thode karmath.. gharat mobile la range nasaychi.... mi hi navin hote.. anpekshitpane tya zadane sobat keli mala.. tyavarche gharti.. vegvegle pakshi....sakali zadakhali kapsachi bonde padleli asayachi.. ti mi gola karun tyacha pillow banvala..aajhi ahe to mazyakade.. soiciety ne jevha te zaad kapayche tharvale.. tevha mala khup vait vatale..