ओळख

Submitted by जाई. on 6 July, 2020 - 08:44

आमची सहनिवास सोसायटी म्हणजे एक मॅड प्रकरण आहे.माझा बाबा लहान असल्यापासून ही सोसायटी आहे. लहान म्हणजे मी आता आहे ना तेवढा .त्यात एकूण वीस घर आहेत.प्रत्येक घर त्या रेल्वेसारख आहे. सेपरेट डब्यासारख! चिकटुन बसलेलं आणि सारखच दिसणार

वीसजणांच्या या सोसायटीत दोन घरातील माणस सारखी बदलत असतात. ते भाडेकरु आहेत अस आजी म्हणते. ती दोन घर सोडली तर बाकीच्या घरातली माणस तीच ती असतात. खालच्या मजल्यावर काळे , देसाई, डिसोझा, वैद्य, चव्हाण. वरच्या मजल्यावर होनावर, सुर्वे , जोशी, केसरकर, दळवी मधे आम्ही, रेगे, पद्मनाभन, शहा. मोजून मापून तीच. आजीच्या भाषेत पाऊण मोठे पाव छोटे. सगळे आई-बाबा, आजी-आजोबा, लोक पाऊण मोठ्या गटात येतात. तर सगळी लहान मंडळी पाव गटात. गेल्या वर्षापर्यत मी पाव गटात मोडत होतो. या वर्षीपासून कधी पाव गटात येतो तर कधी पाऊण गटात . म्हणजे हे पाऊण गटवालेच मला कधी या तर कधी त्या गटात ढकलतात. मी आपला मधल्यामधे लोंबकळत. श्रीखंडाच्या चक्क्यासारखा . मन्वाताईला विचारलं तर ती तू अजून पाऊण पाव आणि अर्ध पाव गटात मोड्तोस अस म्हणाली. म्हणजे मी , अथर्व, राहूल, सोहम सर्वच . "तू कोणत्या गटात आहेस?" अस विचारल तर पाव पाऊण गटात म्हणाली. माझा परत गोंधळ. धड काय समजालायच नाही . गणिताच्या प्रश्नासारख तिथेच अडकून राहिलेलं.सुटता सुटत नसलेलं..

तर यातले काही लोकं देवबाप्पाकडे जातात. खालच्या मजल्यावरचे देसाई आजोबा गेले तसे. मलाही देवबाप्पाकडे जायच आहे सांगितल्यावर आजी ओरडली तर आईने धपाटा घातला. खरतर देवबाप्पा खूप पावरफ़ुल आहे अस सगळे म्हणतात. तो सगळयांना हव ते देतो अस आजोबा म्हणतात. मलाही देवबाप्पाला शेजारचा राहुल क्रिकेटमध्ये चीटींग करतो, त्याला चांगली शि़क्षा दे , वरच्या मजल्यावरच्या होनावर काकू चेंडू परत देत नाहीत त्यांना शिक्षा कर, बाबांच प्रमोशन कर , आजीचे गुडघे बरे कर, शाळेत बाईंना अभ्यास कमी द्यायाला सांग अस काही बाही बरच सांगायच आहे. पण ते कोणिच लक्षात घेत नाहीत. तू अजून लहान आहेस ची टेप वाजवतात .पण काही काही वेळेला मात्र अरे तु आता मोठा झालास ना हे ही म्हणतात. मग मी कंफ़्यूज होतो.कधी कधी काय चालू आहे ते समजतच नाही. नक्की मी काय आहे. लहान की मोठा ? माझा फ़्रेंड अथर्व म्हणतो ते बरोबर. ही मोठी माणस क्रॅकच असतात. आपल्याला जाम कंफ़्युझ करुन सोडतात. नीट काही सांगत नाही की बोलत नाही. अथर्व आणि मी बेस्ट फ़्रेंड आहोत . आम्ही दोघही एकाच बाकावर बसतो. स्टीकर्स एक्सेंचेंज करतो. बाबा आम्हाला जय वीरुची जोडी म्हणतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या सोसायटीत तसे सगळेच माझे मित्र आहेत. अथर्व बरोबरच राहूल, सोहम, सर्वेश, शनाया, सृष्टीही. वरच्या मजल्यावरची मन्वाताई आणि खालच्या मजल्यावरचा कॉलेजला जाणारा विनयदादा सुद्धा. मन्वाताई सतत खूप अभ्यास करत असते. आई म्हणते की तिला डॉक्टर व्हायच आहे. "पिंट्या तू डॉक्टर हॊणार की इंजिनीयर ?" अस आई बाबा अधून मधून विचारत असतात. छ्या ! पण एवढा अभ्यास करावा लागत असेल तर आपल्याला नाही व्हायच ब्वा डॉक्टर बिक्टर. आजी आजोबा काही बोलत नाहीत. मात्र खूप अभ्यास कर व मोठा हॊ अस म्हणतात. पण मोठा हो म्हणजे नक्की काय ते सांगतच नाहीत. अभ्यास तर मी करतोच की.

तर अस एकदा जाम म्हणजे जामच कंफ़्युजन झाल. कॊणिच काही ऐकत नाही, लक्ष देत नाही. सारख आपल कधी "मोठा झालास , शहाण्यासारख वाग , लहान आहेस का आता तू" तर कधी "जास्त आगाऊपणा करु नकोस, लहान आहेस, शिस्तित रहा" वगैरेची टेप लावलेली. विनूदादाच्या भाषेत डोक्याचा पार भाजीपाला झाला.मी नक्की आहे तरी कोण? लहान की मोठा ? पाव की पाऊण ? अर्ध पाव की अर्ध पाऊण ? काही समजेनास्च झालं. मग ’आता माझी सटकली करत त्याच्याच कडे गेलो सोल्यूशन मागायला. विनूदादा एकदम कूल बडी आहे. आजोबा त्याला मनमौजी म्हणतात. त्याचे मित्रही त्याच्यासारखेच कूल आहेत. कधी कधी तो आमच्याबरोबर खेळतो सुद्धा.

विनय दादाला हे सांगितल्यावर त्याने मला त्याने मला पहिल्यांदा टपली मारली. मी काही बोलणार तेवढ्यातच शिंदे आजोबांचा "काय चालू आहे विनय?" असा आवाज . आम्ही दोघेही पाठिला पाय लावून धूम पळालो. ओरडतील म्हणून नव्हे पण पाढे गणित विचारतील म्हणुन. ते पुर्वी शि़क्षक होते. ती सवय अजूनही गेली नाहीये अस विनूदादा म्हणतो. कोणि सापडला की गेलाच तो मग पार. कसली ती हार्ड पावकी , चौकीची गणित घालतात. विनूदादाला पण येत नाहीत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

तिथून पळालो ते डायरेक्ट सोसायटीच्या पाठी असलेल्या कट्ट्यावर. ती विनूदादाची खास जागा आहे. तिथे तो आणि त्याचे मित्र सारखे काही ना काही प्लान करत असतात. मी एकदा दोनदा तिथे गेलो तर त्याच्या मित्रांनी ’हा बच्चू इथे काय करतोय' अस विचारलेलं. मला असा राग आलेला. त्यात विनूदादानेही तू जा रे पिंट्या इथून. आम्ही मोठी मूल बोलतोय अस म्हणून टाकलं. मग मला डब्बल राग आलेला. पण तरी तो मला आवडतो. क्रिकेट भारी खेळतो. माझ्या प्रोजेक्टची चित्रही काढून देतो. डान्सपण भारीच करतो. पण आता ह्या सोलुशनच काय ते सांग म्हणून म्हटल तर तो काही ऐकायच काम नाही. शेवटी तुझ सिक्रेट आईला सांगेन अस म्हटल्यावरच त्याने मला सिरियस घेतलं. परीक्षा जवळ आल्यावरच तो अभ्यासाला सिरियस घेतो अस त्याचे बाबा म्हणतात तस.
कट्ट्याला चार पाच फ़ेर्या मारुन झाल्यानंतर टिव्हीवर आजोबा लावतात त्या चॅनेलवरच्या गुरुसारखा चेहरा केला. एक डोळा बंद आणि चेहर्यावर हात. मला एकदम सायन्सच्या बिडवे सरांची आठ्वण झाली. काही चुकल तर ते असाच चेहरा करतात. मी काही बोलणार एवढ्यातच " पिंट्या, तू माझ्यासारखा वाग . म्हण्जे हे कंफ़्युजन होणार नाही तुला" असा आवाज..

"तुझ्यासारखा ? म्हणजे नक्की काय करु ?"

"अरे म्हणजे माझ्यासारखा स्मार्ट , डॆशिंग चटपटीत वाग. यु नो" अजूनही चेहर्यावरच हात.

"म्हणजे ?"

"जाऊ दे! तुला समजणार नाही. तू अजून लहान आहेस."

झालं. हा कधी सरळ उत्तर देणार नाही. नेहमी कोड्यात बोलणार. वर विचारल तर अजून लहान आहेसची टेप. सोलुशन विचारल तर ह्याच आपल भलतच. आजीच्या भाषेत तिसर्याच ग्रहावरच ऊत्तर.

" पण सगळे म्हणतात विनूदादासारखा अभ्यास नाही करायचा. मोठ व्हायच असेल तर मन्वाताईसारख वाग. मगच चांगले मार्क्स मिळतिल." मी एकदम बोलून गेलॊ आणि लग्गेच जीभ चावली.

विनूदादाचा चेहरा अजूनच शांत झाला. आजीचा होतो तसा. आजोबा त्याला वादळापुर्वीची शांतता म्हणतात का काय ते.

"पिं ट्या प ळ इ थू न . इ थे दि स ला स त र ब घ . ल हा न आ हे स अ जू न "

हे ऐकून मी आपला पाठच्या पाठि परत. श्या! ज्या कामासाठी गेलो होतो ते राहिल बाजूला. ऊलट विनूदादाची खुन्नस घेऊन आलो.आता वायरीच्या गलोल कॊण करुन देणार ? क्रिकेट मैच मध्ये समोरच्या आर्क व्हू सोसाय़टीसमोर हरणार. विनूदादा नाही तर जिंकण इम्पॊसिबल. आई कधी कधी म्हणते ते बरोबर . मी तिरपागडच वागतो कधी मधी. ?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जेवणं झाल्यावर आजोबांना बोलावून आणायला खाली गेलो. आजीच्या शब्दांत जागतिक राजकारणाच पान त्यांना आणि वाळिंबे आजोबांना विचारल्याशिवाय हलत नाही ते ठीके. पण जेवून इथली पान हलवायला या सांगायला. तिथे गेलो दोघांच्याही गप्पा रंगात आलेल्या. नीटच ऐकलं तर हिटलरवर गप्पा चालू होत्या. मला एकदम आमच्या गणिताच्या सरांना हिटलर म्हणतात त्याची आठ्वण झाली. हे नाव आम्हाला वरच्या वर्गातल्या रोहनने सांगितलेलं . त्याच्या वर्गाने हेच नाव ठेवलेलं. मी एकदम हे सांगताच दोघेही इष्टाप. इष्टाप म्हणजे इष्टापच झाले. नंतर माझ्यावरच ओरडायला सुरुवात. "तू इथे काय करतोयेस? मोठ्या माणसांमध्ये बोलतात का? वर्गातल्या शि़क्षकांना अस बोलतात का? प्रदीपला सांगितल पाहिजे लक्ष दे वगैरे वगैरे " ह्यात मला आजीचा निरोप सांगायचा राहिलाच. आता परत वर गेल्यावर आई , आजी ओरडणार. अथर्व बरोबर बोलतो. आपल बॅड्लकच खराब आहे.

आईसुद्धा हल्ली ऊशिरापर्यत झोपलं की गधड्या लहान आहेस का आता?! मोठा झालास . ऊठ आता अस सुरु करते. त्या दिवशी क्रिकेटच्या सरांनी दिलेल्या फ़ॊर्मवर बाबांची सही हवी अस बाबांना सांगितलं तर त्यांच ऊलटच. " किति अभ्यास केलास ते सांग. आता मोठा झालायेस तू. लहान मुलासारखा काय खॆळतोस. मोठ्या मुलासारख शहाण्यासारख जब्बाब्दारीने वाग." वगैरे वगैरे.नंतर सही केली खरी पण मी आपल परत कंफ़्यूजन ही कंफ़्युजन मध्ये. काही बोलायच कामच नाही. नुसत आपल हाताची घडी तोंडावर बोट. एकदम मॅक डी मध्ये असलेल्या पुतळ्यासारख्या चीडीचूप. डोक्यात ते मॅड मॅड चक्र सतत चालू. गव्ह्याच्या पीठाच्या चक्कीच्या पट्ट्यासारख. मी आपला पिसतोय त्यात. बारीक बारीक होऊन.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोसायटीत कधी कधी आजोबांच्या भाषेत नवीन भरती होते. म्हणजे नवीन मेंबर येतात. माझी सुद्धा अशीच नवीन भरती झाली होती अस आजोबा म्हणतात. आजोबा कधी कधी त्या कवितेतल्या मॆड फ़ेलोसारखे वागतात. एकदम बेश्टं. आय लाईक हिम. अथर्वकडे सुद्धा असच झालेल अस आजी म्हणते. तो आणि त्याची बाहुली असेच आलेले. बाहुली म्हण्जे त्याची बहिण. क्युट आहे ती . बाहुलीसारखी दिसते म्हणून तिला सगळेच बाहुली म्हणतात. तिचे गाल गोबरे आहेत. मला आवडते ती. आम्ही खेळतो सुद्धा एकत्र.

त्या दिवशी हॊस्पिटलात जायच म्हणून मी लवकर तयार हौउन बसलेलो. आमच्याकडेही आजोबांच्या भाषेत नवीन भरती झालिये. म्हणजे आमच्याकडेही अथर्वच्या बाहुलीसारखी बाहुली आलिये. आजी म्हणते तिला देवबाप्पाने पाठवली आहे. देवबाप्पा आहेच तसा पावरफ़ुल. तर मी आपला भांग पाडून नवीन कपडे बिपडे घालून बसलेलो तर आजीचा "तू तिथे कशाला जातोस पिंट्या , शाळेत जायच नाहिय़े का? परीक्षा जवळ आलीये " असा ओरडा. या परीक्षा म्हणजे तर कटकटच आहेत. त्यात माझी आजी म्हण्जे एकदम भारी काम . पुढे काय बोलायच कामच नाही. अभ्यास कर म्हणजे कर, दुध पी म्हणजे पीच. मी आपला निमूटपणे ऊठलो . आणि शाळेत गेलो.

दुपारी घरी परत आलो तेव्हा दारात चपलांची गर्दी. आणि घरात गडबडीचा आवाज. अंदाजानेच मी कोण कोण आलेय ते ओळखल. वीणा आत्या, दीपाली मावशी , अथर्वची आई वगैरे आलेल्या. आल्या आल्या आजीचा ओरडा नको म्हणून दप्तर ठेवून हातपाय धूवून आत गेलो. बघतो तर बेडवर आई बसलेली. तिच्या हातात आमची बाहुली. बाजूला बाबा, आजी, आजोबा ऊभे. आत्या, मावशी, शेजारच्या होनावर काकू, सुर्वेकाकू कोंडाळ करुन राहिलेल्या. सर्वाच्यांच ओठांवर ते छानस अस हसू. अगदी जाहिरातीत दाखवतात तस. आई बाबांचे चेहरे खुश अगदी. वाट काढत आईपर्यत पोचलो तर ती परत छानस अस हसली. आई हसली की गोड दिसते. अशीच हसत राहिलेली मला आवडते.पुस्तकातल्या सुर्यफ़ुलासारखी दिसते मग. फ़ुलुन आलेली. बेश्ट एकदम

तेवढ्यात बाबांनी मला ऊचलून घेतलं. मी नेहमीसारखे त्यांच्या मानेत हात अडकवले. माझे बाबा एकदम सुपर आहेत. माझे फ़्रेंडही आहेत. बाबांची आणि माझी खास अशी गंमत आहे. आजी त्याला बाप लेकाच गूळपीठ अस म्हणते. मज्जा असते आमची.

"काय पिंट्या ! आता मोठे दादासाहेब झालात तुम्ही. " सुर्वेकाकूनी तेवढ्यात कौतुकाने म्हटलं.
"हो ना ! आता काच फ़ोडण बंद करा म्हटल " होनावर काकूंनी तेवढ्यात चान्स मारुन घेतला. सगळेच त्यावर हसले. बाजूलाच असलेल्या अथर्वने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले. पण माझी टेप दादासाहेब शब्दावर अडकलेली. म्हण्जे आता अथर्वच्या बाहुलीसारख आमचीही बाहुली मला दादा म्हणणार तर. मला तर एकदम भारीच वाटायला लागल. शाळेतल्या नाटकामध्ये शिवाजी महाराजांचा रोलसाठी बाईंनी निवडल तेव्हा वाटलेल अगदी तसच.

बाबांच्या हाताला लोंबकळून मी खाली उतरलो. तेवढ्यात वीणा मावशीने बाहुलीला आईच्या हातून अलगद ऊचलून घेतलं. मी तिकडे गेलो. आणि बाहुलीला नीटच पाहून घेतलं.
"डोळे, कान, नाक अगदी माझ्यासारखे आहेत ना आई ?" मी मोठ्यांदा विचारल
"हो,हो ! पिंट्यांची बाहुली अगदी पिंट्यासारखीच आहे. गोड अगदी. " बाबा प्रसन्नपणे म्हणाले.

वीणा मावशीनंतर , दीपाली आत्या, सुर्वे काकू , होनावर काकू सर्वानी थोडा थोडा वेळ बाहुलीला घेतल. मध्येच खालच्या मजल्यावरच्या जोशी काकू, काळे आजीही डोकावून गेल्या. पण माझ्याकडे कोणिच तिला देत नव्हतं. सगळे आपले तू अजून लहान आहेस तुला घ्यायला जमणार नाही बोलून बोअर करत राहिले. मी आपला सारखा सर्वाच्या पाठून इथे आणि तिथे धावत. ऎस्सेल वर्ल्डमधल्या चक्रासारखा गोल गोल फ़िरत . एकदम धुप्प व्हायला झालं. गोल गोल भोवर्यासारख फ़िरुन फ़िरुन दमलो. कंटाळून गेलो. शेवटी आजीने जेवायला बोलावल म्हणून जेवलो आणि झोपून गेलो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मध्येच जाग आली म्हणून पाहिलं तर बाबा केसात हात फ़िरवत होते. मला अचानक मस्तं मस्तं वाटायला लागलं. घट्ट मिठीच मारली बाबांना. बाबांनी हळूवारपणे "चल" अस म्हटलं. त्यांचे डोळे नेहमीसारखेच हसत होते. कुठे अस विचारल तर तोंडावर बोट ठेवलं. चूप आणि चाप. घर एकदम चिडिचूप होतं. शांताबाई आलेल्या दिसत नव्हत्या. आम्ही आईच्या खोलीत गेलो तर आई डोळे मिटून बसलेली . बाहुलीला थोपटत. ..

बाबांनी एकदम वर ऊचलून मला बेडवर ठेवलं. मी गोंधळून इकडे तिकडे पाहायला लागलो. तेवढ्यात "पिंट्या, बाहुलीला घ्यायच आहे ना हातात ?! " आई एकदम मनातल ओळखल्यासारख बोलून गेली. बाबा गाल्यातल्या गालात हसले. माझी आई मनकवडी का काय म्हणतात तश्शी आहे. तिला सर्व समजत पटकन. मी ही मग खुदकन हसलो.
हात पुढे करताच बाबांनी बाहुलीला ऊचलून माझ्या मांडीवर ठेवलं. ’नीट पकड हां’ आई कुजबुजली. बाबांनी मागून हात दिला.

बाहुली एकदम छान दिसत होती. रामप्रकाश भय्याच्या कापसासारखी. गोड , गुलाबी , मऊसर. इवले इवलेस हात पाय . छोट्स अपर नाकं. त्या पांढर्या कापड्यात गुंडाळलेला गुलाबी गोळाच . "अगदी तुझ्यासारखी दिसतेय ना , आता तू दादा झालास . माझा पिंट्या मोठा झालाय. आता तो शहाण्यासारख समजूतदारपणे वागणार. हो ना पिंट्या" आईन हळूच म्हटलं. मला एकदम हलकं , बरं वाटायला लागलं. गालावरुन मोरपिस फ़िरवावं तस अगदी वाटून गेलं. एक छान गुलाबी कापूस आपल्या हातात आहे, अगदी गोड वाटतय, काहीतरी छान घडतय. हे असच राहू दे मनाशी म्हणत डोळे अगदी मिटून घेतले. पोटात अचानक डूबुक झालं. मी आता मोठा झालोय. खूप मोठ्ठा . दादा झालोय ना मी. आता मला शहाण व्हायला हवय.माझी बाहुली आलीय. डिट्टो त्या गुलाबी कापसासारखी. गोड आणि प्रसन्न करणारी..

"आई- बाबा , आपण हिच नाव पिंकी ठेवायच का ?! " मी एकदम बोलून गेलो.

"हो, चालेल की. मोठ्या पिंट्याची छोटी पिंकी " आई , बाबा दोघेही हसले. मी ही हसलो.

तेवढ्यातच श्रावणातलं ओळखीच पिवळसर ऊन आमच्या चेहर्यावर पसरुन गेलं......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच लिहिलंय.
पहिल्याच ओळीत आलेल्या मॅड ह्या शब्दामुळे असेल कदाचित, एकदमच लंपनच्या साच्यातून काढल्यासारखे वाटले, म्हणजे रेखीव, सुबक सर्वांगसुंदर सगळं काही आहे एकाच साच्यातून काढलेल्या मूर्ती जणू

माझा पिंट्या मोठा झालाय. आता तो शहाण्यासारख समजूतदारपणे वागणार. हो ना पिंट्या" आईन हळूच म्हटलं. >>>>>

हे वाचून एकदम, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे ही ओळ आठवली.

धन्यवाद लोकहो .

चिंगी, धनवंती, हरपेन , चनस : लंपन आठवला >>>> धन्यवाद . एका लहान मुलाच बदलत जाणारं भावविश्व हे कथाबीज डोक्यात होतं. ते उतरवून काढताना आवडत्या व्यक्तिरेखेच्या जवळपास जाता आलं आणि ते aknowledge झालं याच समाधान आहे Happy

जाई, खुप सुंदर लिहिले आहे. लंपनची आठवण झालीच पण ' देनिसच्या गोष्टी' हे एक रशियन भाषांतरीत पुस्तक वाचलं होतं लहानपणी त्यातील देनिस आठवला. Feeling nostalgic.

थँक्स ऑल !!! Happy

सुमित्रा , खरंच ! डेनिसच्या गोष्टी वाचून खुप दिवस झालेत . परत वाचायला हवं .

Pages