खाट्टा मग

Submitted by मेधा on 8 June, 2020 - 14:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी अख्खे ( सालासकट) मूग
एक मध्यम कांदा बारीक चिरून
एक मध्यम टॉमेटो बारीक चिरून
दोन लवंगा, एक इंचभर दालचिनीचा तुकडा, २ हिरवे वेलदोडे
तेल, हळद, हिंग, मोहरी, मीठ, कढीपत्ता
आमचूर / लिंबाचा रस यापैकी एक

क्रमवार पाककृती: 

सिंडरेलाच्या वाढदिवसानिमित्त अजून एक मुगाची पाककृती. मागच्या दोन पाककृतींवर मुगाची सालं काढण्यावरूनच चर्चा झाली होती चिकार. म्हणून ही सालं न काढता पाककृती.

वाटीभर मूग भरपूर पाण्यात भिजवून घ्यावेत ४-५ तास तरी. हा वेळे कृतीमधे धरलेला नाही.

भिजलेले मूग निथळून परत थोडे ( मूग बुडतील एवढेच) पाणी , चवीपुरते मीठ आणि पाव टीस्पून हळद घालून प्रेशर कूकरमधून शिजवून घ्यावेत. दोन शिट्टया पुरतील. अगदी गाळ नाही करायचेत.
कढईत तेल तापवून आधी लवंग दालचिनी वेलदोडे घालून ३० सेकंद परता.
मग मोहरी , कढीपत्ता , हिंग घाला. लगेच बारीक चिरलेला कांदा घालून परता.
कांदा मऊ झाला की बारीक चिरलेला टॉमेटो घालून परता .
टॉमेटो शिजत आले की शिजवलेले मूग घाला.
उसळीपेक्षा जास्त पात़ळ आणि मिसळीपेक्षा दाट अशी कंसिस्टंसी असते. आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
आमचूर असल्यास लगेच घाला. लिंबाचा रस असल्यास एक उकळी आल्यावर घाला. आंबटसर चव आली पाहिजे.
पोळीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाता येईल.

वाढणी/प्रमाण: 
४ लोकां साठी
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसिपी. मागची खोबऱ्याच्या वाटणातली मूग कृतीही करून पाहिली होती. तीही आवडली होती. हीही करून पाहीन. उस्तवार कमी आहे. Happy

वेगळी रेसिपी. मी परवाच मूग करुन झाले पण मी सारखे मूग खाऊ शकते. तुमची ती बिरडं स्टाइल रेसिपी केली होती (सालं नं काढता) आवडल्याचं कळवलंय तिथेही. ही पण इंटरेस्टिंग वाटते. मुलं कदाचीत खाणार नाहीत असा एक फील येतोय पण त्यांना काय उकडेलेले मूग पण देता येतात. कुणी केले तर फोटो टाका बरं. Happy

अरे वा! बर्‍याच वर्षांनी बड्डे गिफ्ट दिलं की शोन्वाक्कांनी. पण दर वेळी काय मला मूग गिळायला लावता? Proud वेगळी दिसतेय रेसिपी, करण्यात येइल लवकरच.