बिथोवन - १

Submitted by बिथोवन on 13 June, 2020 - 02:19

बिथोवन-१

मी पलंगाखाली ठेवलेली संदुक ओढली आणि अगदी हळुवार हाताने उघडली. वरतीच असलेलं तिचं रंगीत चित्र मी हातात घेतलं आणि तिच्या निळ्या डोळ्यांवर माझी नजर स्थिरावली. मिस्किल हसत होती ती अगदीं! तिच्या सोनेरी केसांच्या बटा कपाळावर रुळत होत्या आणि डोळ्यात जे हसू उमटलं होतं त्या मुळे तिच्या ओठाच्या कडा रुंदावल्या होत्या. नकळत माझे डोळे पाणावले आणि तिला लिहिलेल्या पत्रावर मी नजर टाकली. " मायअँजेल, टी.. बी.. माझी परी, केवळ तूच मला समजावून घेतेस, जोसेफाईन पेक्षा ही जास्त.... ती तुझी बहीण असली तरी माझं मन तुझ्या भोवतीच रेंगाळतय..... " मी चित्र पालटलं. मागच्या बाजूला तिनं लिहिलं होतं, To the rare genius, the great artist and good man.... TB.

एवढ्यात दार ढकलण्याचा आवाज आला. दारात बँरन स्पॉन उभा होता. मी ते चित्र परत पेटीत ठेऊन दिलं. पेटी पायानीच परत पलंगाखाली ढकलून दिली आणि वळलो. " बराच खूष दिसतोस आज.." बँरन म्हणाला.

मी हसलो, " अरे सकाळीच माझ्या परीचं दर्शन झालं ना.."

" व्वा, म्हणूनच तुझ्या पाणीदार डोळ्यात चमक दिसतेय.. बर.. हे तुझं पुस्तक.." त्यानं संगीताचं मी त्याला दिलेलं पुस्तक मेजावर ठेवलं आणि जाण्यासाठी वळला.

" अरे बस ना.." मी म्हणालो.

" नको रे बाबा.." त्यानं उत्तर दिलं, " विद्यार्थी बसलेत व्हायोलिन शिकायला. जातो मी" असं म्हणत तो निघून गेला.

मी दार बंद केलं तसं काल रात्रीचा प्रसंग आठवला. काल रात्री तिच्या घरातून निघताना आपला मफलर आणि कोट आपण विसरलो आणि अर्ध्या रस्त्यावर आल्यावर आपल्या लक्षात ते आलं आणि आपण वळलो तर ती धावत पळत येतच होती ते हातात घेऊन.... तेवढ्यात तो तिचा बटलर आला, त्यानं तिच्या हातातून ते घेतलं आणि आपल्याकडे आणून दिलं. तिनं हात हलवला, असा हलवला की जणू काय ती माझा निरोप घेतेय. खरं म्हणजे मीच तिचा निरोप घ्यायला गेलो होतो पण मी जातोय आता, परत केंव्हा येईन मलाही माहित नाही, हे सांगायचं धाडस मला झालं नाही. ती वळाली, परत जायला घराकडे. तिच्या आईला जर हे कळलं असतं तर? माझं येणं बंदच केलं असतं तिने. माझ्यासारख्या सामान्य माणसात ह्या राजकन्येला काय दिसलं असेल बरं.....?

त्या दिवशी मी तिला म्हणालो होतो,
"Would you your true heart show me.
Begin it secretly, For all the love you trow me,
Let none the wiser be.
Our love, great beyond measure, To none must we impart;
So, lock our rarest treasure Securely in your heart " ती हसली.

नंतर बाहेरच्या बागेत मी तिला भेटलो आणि सांगितलं, माझ्या पुढच्या ऑपेराची तूच नायिका असणार. फ्रांझ, तिचा भाऊ तिथेच होता.
त्याला माझी तगमग कळत होती. तो मला म्हणाला होता की काही तरी विशेष, मोझार्ट सारखं बनून दाखव आणि मग बघ माझी आई कसं तुझं स्वागत करेल ते. अरे, माझी बहिण पण तुझ्यावर प्रेम करतेय, अगदी निस्सीम. चल आजच तुझं आणि तुझ्या ह्या प्रेयसीचं लग्न उरकून टाकू. पण हे अगदी गुपित ठेवायचं, तो म्हणाला. आम्ही गुपचूप लग्न उरकून टाकलं. आमच्या तिघांचच गुपित होतं ते.

हे सगळे विचार तिचे चित्र बघताना माझ्या मनात तरळून गेले. चला आता.. निघायला हवं..उशीर झाला आहे अगोदरच. माझी परी मला मिळायला हवी असेल तर काहीतरी करायला हवं.. असं म्हणत मी आपलं सामान आवरलं आणि निघालो फुरेंनच्या दिशेने.

माझ्या डोळ्यासमोर माझा भूतकाळ उभा राहिला. जेमतेम दोन खोलीत राहणाऱ्या आमच्या कुटुंबात वडील आणि आजोबा दोघंही पियानो वादक. १७७० च्या १७ डिसेंबरला बॉन जन्मलो आपण. वडील योहान, कोलोनच्या राजदरबारात व्हायोलिन वादनाचं काम करत. पण ते तरी त्यांनी मन लावून करावं? संगीतापेक्षा व्यसनाच्या आहारीच जास्त गेले ते. माझी आई, मारिया, किती प्रेम करायची माझ्यावर. आजोबा लुडविग पण माझ्यावर माया करायचे.
वडील आणि आजोबा दोघांनी मला पियानो आणि व्हायोलिनचे धडे दिले. त्या मोझार्टची कीर्ती त्यांच्या कानावर गेली होती आणि त्याच्यासारखं मला वाजवता यावं म्हणून तासनतास पियानोचा सराव करायला लावायचे. त्या पश्चिमात्य धून वाजवताना हाताची बोटं सुन्न व्हायची. आणि फक्त एक धून होती का ती? शेकडो वाजवावी लागत. दोन्ही हातानी वेगवेगळी धून. माझी बोटं पियानो पर्यंत पोचतही नसत. मग काय, उभारायचं स्टूलावर. आणि वाजवायला चुकलं की बाबा जे हातात मिळेल त्यानी बदडायचे. एकदा मी वाजवत असतानाच डुलकी लागली आणि मी पियानोवरच कोसळलो. वीस पंचवीस पट्टया एकदम वाजल्या आणि हा कुठला तार सप्तकातला कॉर्ड वाजतोय ते बघायला बाबा आले आणि असं मारलं मला...! कसा होणार मी मोझार्ट सारखा असा आळस केला तर, ते किंचाळले. आपण संगीत शिकलो नाही तर गरिबीतच दिवस काढावे लागतील असं ओरडले आणि त्या दिवशी उपाशी ठेवलं मला. मी जेमतेम सहा वर्षाचा झालो आणि बाबा माझ्या मागं लागले. मोझार्ट सहा वर्षाचा होता तेंव्हा त्याने जाहीर कार्यक्रम केला होता, तुला पण करावा लागेल आणि मला त्यांनी पियानोला जुंपलच. सकाळी चार तास पियानो आणि दुपारी चार तास व्हायोलिन. आठवं वर्ष लागलं आणि बाबांनी माझा जाहीर कार्यक्रम ठेवला. एका मोठ्या हॉल मध्ये मोठा पियानो ठेवला. कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर मी त्याच्यावरती बोटे फिरवून सराव करत होतो तेंव्हा सी मायनर नीट वाजतच नव्हता. पियानोच्या पट्टया थोड्या घट्ट होत्या. तशाही स्थितीत मी मोझार्टची "मेट्रीडेट" मधली सातवी सिंफनी वाजवली. लोकांनी टाळ्या वाजवल्या. कार्यक्रम संपल्यावर ' मोझार्ट तो मोझार्ट, त्याची सर याला नाही' असं लोक म्हणाले. त्यांना काय माहिती पियानो नीट नव्हता ते....
आम्ही घरी आल्यावर बाबांनी जाहीर केलं की ते आता मला शिकवणार नाहीत. माझा जीव भांड्यात पडला. त्यांचा मार आता चुकणार होता. घरातले पैसे तेंव्हा संपत आले होते. बाबांची आवक थांबली होती. शेवटी एक खोली भाड्याने द्यावी असे ठरले. तो भाडेकरू आला आणि भाडं असं ठरलं: अर्धे भाडे द्यायचे आणि राहिलेल्या पैशात मला पियानो शिकवायचे. बाबांनी भाडेकरू म्हणून संगीत शिक्षकच ठेवला. बाप रे! हा शिक्षक बाबांसारखा मारझोड करणारा निघाला तर....? नाही. तो मारत नव्हता पण रात्री बेरात्री झोपेतून उठवून पियानो शिकवायचा. डोळ्यावर पाणी मारायचे आणि वाजवायचे. त्याच वेळी लॅटिन ग्रेड असलेल्या शाळेत मी जायला लागलो. शाळेचं नाव काय होतं बरं...? हां.. तिरोशीनियम. अभ्यासात अगदी साधारण होतो मी. फ्रेंच आणि इटालियन भाषेचा अभ्यास करावा लागायचा. इटालियन तर यायलाच हवे. सगळया ऑपेरा इटालियन भाषेतच बनायच्या. बोलतांना शब्द अडखळायचे आणि स्पेलिंग चुकायचे. मला डीस्लेक्सिया आहे असं ठरवून टाकलं सगळ्यांनी. मुलं मला अग्ली डक्लिंग म्हणायची माझ्या मागे. मी एकलकोंडा होण्याची ती सुरुवात होती. मी संगीतात मग मन गुंतवायला लागलो.

काही महिन्यानंतर आता मी चांगलं वाजवतो आहे असं आईला जेंव्हा कळलं तेंव्हा आपण हॉलंडला जाऊ आणि काही श्रीमंत सरदार, दरकदार, वतनदार यांच्या महालात कार्यक्रम करून चार पैसे मिळवू अशी कल्पना तिने मांडली. मी आईला सांगितलं डच लोकं मुळात कंजूस आणि ते काय आपल्याला पैसे देणार? पण शेवटी आईचं मला ऐकावं लागलं आणि आम्ही हॉलंडला जायला निघालो.

तिथे गेल्यावर बरेच कार्यक्रम केले. माझं मन तिथे रमलं नाही. आम्ही परतलो बऱ्यापैकी पैसा घेऊन. पण म्हणावे इतके पैसे मिळाले नाहीत. शेवटी डच लोकच ती. आल्यानंतर मी चर्चमध्ये ऑर्गन वाजवायला सुरुवात केली. तिथला तो वादक.. त्याचं नाव क्रिस्टीयन निफ. तो मला ऑर्गनच्या रचना पियानोवर वाजव म्हणायचा. मी त्यात तरबेज झालो. अकरा वर्षाचा झालो तोवर मी योहान सेबेस्तियान बाखच्या 'वेल टेंपर्ड क्लोवीकॉर्ड' ही संपूर्ण संगीत रचना पियानो वर वाजवू लागलो. चर्चमध्ये गर्दी जमू लागली आणि माझी थोडीशी प्रसिद्धी झाली. बाखची ही रचना म्हणजे सांगीतिक बायबलच.
ए, बीफ्लॅट, बी, सी, सीशार्प, डी, डीशार्प, इ, एफ, एफशार्प,जी, आणि जीशार्प ह्या प्रत्येक बारा सुरांच्या प्रत्येकी दोन प्रिल्युड आणि दोन फ्यूग अशा चोवीस आणि चोवीस अठ्ठेचाळीस कार्ड्स मला सफाईने वाजवता येवू लागल्या. मेजर आणि मायनर स्केलच्या असेंडींग आणि डीसेंडींग दोन्ही बाजूंनी मी तरबेज झालो. टॉनिक पासून ऑक्टेव पर्यंत माझी बोटं सफाईने फिरू लागली आणि नीफच्या गैरहजेरीत मी कामाचा भार सांभाळू लागलो. एके दिवशी नीफने सकाळीच चर्च मध्ये मला बातमी दिली. त्याची बदली मनस्टर इथल्या चर्चमध्ये झाली होती आणि इथला वादक म्हणून राजाला त्यानं माझं नाव सुचवलं होतं. मलाही नोकरी हवीच होती. बाबांचा आवाज पार ढासळला होता आणि पैशाचा ओघ ही आटत चालला होता.

मी चर्चमध्ये वादक म्हणून रुजू झालो. पण पैसे तुटपुंजे मिळायचे. मी कसं काम करतोय ते वर्षभर बघूनच राजा ठरवणार होता सहाय्यक वादकाची जागा मला द्यायची की नाही. कामाचा व्याप बराच असायचा आणि मोबदला त्या मानाने कमी. खूप कंटाळवाणं वाटू लागलं. अशीच पाच वर्षे गेली. सतराचा झालो होतो मी आता. अंगात तारुण्याच्या ऊर्मी उसळत होत्या. काहीतरी वेगळं करावं असं वाटायला लागलं. मी विचार करू लागलो की आता व्हिएन्ना गाठावं आणि तिथे काही जमतं का बघावं. संगीताची राजधानी व्हिएन्ना. तिथे आणि साल्झबर्ग मध्ये कार्यक्रम करावेत, मोझार्टला भेटावं, जोसेफ हेडनची गाठ घ्यावी आणि काही नवीन रचना कराव्यात असं ठरवलं. हेडन म्हणजे सिंफनीचा जनक. त्याला भेटलंच पाहिजे. आणि मोझार्ट.. खरं म्हणजे त्याचं नाव योहानस ख्रीसोस्टोमस वूल्फगॅंग थिओफिल्स अमाडियास गोटलीब सिगीमाँड्स मोत्झार्ट एवढं मोठं...! नावाप्रमाणेच मोठा संगीतकार. आणि माझं? एवढंसं.. लुडविग बिथोवन. मी मोझार्ट सारखा मोठा बनेन? कोणास ठाऊक?

मी दुसऱ्या दिवशी राजासमोर व्हिएन्नाला जाण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्यांनी तो मान्य केला देखील. १७८७ चा एप्रिल महिना असावा तो आणि मी व्हिएन्नामध्ये दाखल झालो. दुपारी आकाश काळवंडले होते आणि बहुतेक पाऊस पडणार असे वाटत होते. मी मोझार्टच्या घराकडे जाणारा रस्ता पकडला आणि चालू लागलो.

Group content visibility: 
Use group defaults

रोचक!
भरपूर सविस्तर लिहा, नक्की वाचणार

छान सुरवात.
भरपूर सविस्तर लिहा, नक्की वाचणार >>+१