समुद्र !

Submitted by Swati Karve on 13 June, 2020 - 00:17

समुद्र !

समुद्र पहिला कि मी स्वतःच स्वतःला एका अंतरावरून पाहतेय असा वाटत राहतं…
त्याचा ते अगाध रूप, अमर्याद अथांगता,
अगदी माणसाच्या मनासारखचं,
जणू विचारांची भुसभुशीत वाळू आणि भावनांच्या लाटा...

सागराचे ते विराट, भव्य रूप पाहून, सारे पाश,
हेवे दावे, राग, लोभ, भावनांची आंदोलनं,
जीवनाबद्दलची अतीव आसक्ती, सारं सारं शांत होतं.
निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यात, आपल्या चिमूटभर आयुष्यातल्या,
शुल्लक सुख दुःखांचा किती अवडंबर करत असतो आपण हे प्रकर्षाने जाणवतं….

लाटांचा आणि वाऱ्याचा तो आवाज सुखावह असला,
तरीही काहीशी अस्वस्थता निर्माण करतो,
माणसाच्या मनाप्रमाणेच काय काय सामावलेले असेल समुद्राच्या या गर्भात,
हा विचार मनाला एका गूढ, रहस्यमय भावाने व्यापून टाकतो...

मग मावळतीला आलेल्या त्या सुंदर तेजोमय सूर्याकडे नजर जाते,
आणि मग का कुणास ठाऊक, या क्षणभंगुर आयुष्याची,
आणि त्या नंतरच्या क्षितिजा पलीकडच्या प्रवासाची उगीचंच जाणीव होते…
समुद्राच्या त्या उसळत्या लाटा आणि बुडणारा सूर्य पाहता पाहता,
मन अचानक अंतर्मुख होते,
आपल्या आतला सूर्य कायमचा मावळ्ण्याआधी,
काय काय कमवायचे आहे,
या विचारात मन गुरफटून जाते.

मग अचानक अवघा आसमंत क्षणभरासाठी,
प्रकाशाने झळाळून टाकणाऱ्या विजेप्रमाणे,
सागरमंथन आणि त्या नंतरच्या,
अमृताच्या कलश प्राप्तीच्या गोष्टीची आठवण होते,
आणि आपल्या आतला सूर्य ओळखून,
मनरूपी सागरचे मंथन करून,
साऱ्या आयुष्याचे अमृत करण्याची
विलक्षण प्रेरणा मनात घर करून जाते...

- स्वाती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users