आपण सारेच बद्ध

Submitted by प्राचीन on 7 June, 2020 - 08:16

बद्ध (लॉक्ड)

लॉक डाऊन व त्याचे व्यक्तिशः झालेले परिणाम यावर बरेच लिहिले - बोलले जात आहे. तसा त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम आमच्या आयुष्यावरही होणे अपरिहार्य होते. परंतु मला ह्या परिणामांची निराळी दखल घ्यावी लागली, ती लेकाच्या रोजच्या फोन कॉल्समुळे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात साधारणपणे सुरू झालेले हे फोन आज ह्या दिवसापर्यंत सुरू आहेत. विस्ताराने सांगायचं झालं तर -
वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन, लॉक डाऊन मध्ये काम नसल्याने बेकार झालेल्या श्रमजीवी लोकांना अन्न /शिधावाटप स्वरूपात मदत सुरू केलेली आहे. (उदा: हर्पेन यांनी ‘मैत्री फाउंडेशन’ साठी तसं आवाहन इथे मायबोलीवर केलं होतं) अशा आवाहनास जमेल तसा आर्थिक प्रतिसाद दिला, की आपली जबाबदारी पार पडली, अशा भूमिकेतून मी जरा स्वस्थ होते. म्हणजे मनात कणव होतीच, परंतु आच जाणवली नव्हती.
पुढे असं झालं की, माझा लेक ज्या सामाजिक संस्थेशी कार्यकर्ता म्हणून जोडला गेलाय, त्या संस्थेनेही असा शिधा श्रमजीवी गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्या साखळीतील एक टप्पा पार पाडण्याची जबाबदारी माझ्या लेकावर सोपविण्यात आली. म्हणजे अशा गरजूंची जी यादी केली होती, त्यानुसार त्या व्यक्तींशी संपर्क साधणे, त्यांचे आवश्यक ते तपशील घेऊन नंतर ते पडताळून पाहणे व त्यानुसार शिधावाटप करण्यासाठी संस्थेकडे माहिती पाठवणे इ. शिवाय दात्याचे नाव उघड न करण्याचा संकेतही पाळावयाचा होता. रोज ह्या दहा तरी केसेस असत. लेकाचे प्रश्न वा चौकशी हे काम फोन स्पीकर वर टाकून चालायचे; कारण एकीकडे हे तपशील लेखी नोंदवण्याचे कामही तो करीत असे. हे सगळे संभाषण काही वेळा तिथे वावरताना माझ्याही कानांवर सहजच पडत असे. नकळतपणे मन गुंतत गेलं त्या लोकांच्या समस्यांमध्ये.
ह्या बहुतेक कुटुंबातील पुरुष हातमजुरी करणारे व स्त्रिया धुणीभांडी वा घरकाम करणाऱ्या. मुलांची संख्या एकपासून चारपर्यंत (साधारण मुली मोठ्या व धाकटा मुलगा) काही लोक गावाहून आलेले व लॉक डाऊन नंतर इथेच अडकलेले. काही वयस्क व्यक्तीही घरकाम करणाऱ्या असत.
या मंडळींना पडताळणीसाठी वय वगैरे विचारावं लागे. तेव्हा कधीकधी जरा मजेदार उत्तरं मिळत. काहीजणांना स्वतःचंदेखील वय नेमकं सांगता येत नसे. एका घरातील वडिलांना आपल्या मुलांचं वय काही केल्या सांगता येत नव्हतं. (तीन वेळा विचारलं तरी) हे माझ्या लेकाला चांगलंच खटकलं होतं. तर एका माणसाने पटकन स्वतःचं वय ८८ सांगितलं. खरंतर, त्याने सोपे जाते म्हणून जन्मसाल सांगितले असावे. पण ऐकणाऱ्याचा गैरसमज होऊ नये, या तळमळीने असेल बहुतेक, त्याची पत्नी अगदी त्वरेने म्हणाली, "३२".(बायका अशाच सांभाळून घेतात नाही?)
जर पलीकडील व्यक्ती शिकलेली असेल, तर तिची उत्तर देण्याची पद्धत, नेमकेपणा जाणवत असे. काहींची कागदपत्रे उपलब्ध नव्हती. एकदोघांनी ती गावाला राहिल्याचं सांगितलं. एका महिलेचं आधारकार्ड तिच्या आईच्या घरी होतं. "पटकन आणते आणि नंबर सांगते" असं म्हणाली. तिला म्हटलं, की नंतर चालेल सांगितले तरी. आता लॉक डाऊन मध्ये बाहेर कसे जाणार? "तर ती म्हणाली की, आई बाजूच्याच गल्लीत राहते. आणि खरंच दहा मिनिटांनी तिचा फोन आला.
खरोखर, माणसाच्या जीवनावर गरज या गोष्टीचं किती नियंत्रण असतं ना..
बहुतेक लोकांना रेशनकार्डावरील मदतीबद्दल विचारलं तर रेशनवर काहींना नुसते तांदूळ, काहींना गहू व तांदूळ, काही थोड्या लोकांना किलोभर डाळ मिळाली - असे कळले. संस्थेच्या धोरणाप्रमाणे, अगदी उपासमारीची वेळ असेल तर त्या लोकांना अग्रक्रम देत होते. म्हणजे आधी शिधा पोहोचवायला हवा होता. त्यामुळे ज्या घरांमध्ये विजेचे बिल, घरभाडे वगैरे भरण्याएवढी किमान आर्थिक परिस्थिती होती, त्यांच्याशी संवाद साधताना विचारले, की त्या महिन्यापुरती धान्याची सोय झाली असेल तर त्यांना पुढील महिन्यात मदत केलेली चालेल का? म्हणजे त्यांच्याहून गरजू कुटुंबाची आत्ता सोय करता येईल. तर अधिकांश लोकांनी मदतीची गरज आहे असे म्हटले. पण २% लोक मात्र सध्या मदत न मिळाली तर चालेल असे प्रामाणिकपणे व सहजपणाने म्हणाले. या त्यांच्या दृष्टिकोनाचं आम्हाला कौतुक वाटलं; कारण काहीजणांचा विपरीत व संधिसाधू अनुभवदेखील आला होता. (अपूर्ण वा चुकीचा तपशील देणे वगैरे.. मिळेल तितके पदरात पाडून घेण्यासाठी)
असो. व्यक्ती तितक्या प्रकृती..
रोजच्या ह्या संवादांची, नारायण धारपांच्या भाषेत मी केवळ एक निरीक्षक होते. तटस्थ मात्र नाही म्हणता येणार. त्यामुळे माझ्या आजवरच्या काहीशा सुरक्षित व पांढरपेशा जगास, हे, आजवर केवळ ऐकिवात असलेले वेगळे जग काहीसे अस्वस्थ करून गेले. माझा लेक खरंतर एक माध्यम म्हणून हे कार्य करीत होता, पण त्याच्यावरही ह्या निराळ्या परिचयाचा परिणाम झालाच. आपल्या महाविद्यालयीन मित्र व परिचित व्यक्तींची, या काळात घराबाहेर पडण्याची जी उत्सुकता होती त्यामागची कारणं, आणि दूरवरच्या ह्या जगाच्या - घराबाहेर पडण्यासाठी उत्सुक असण्यातील अपरिहार्यता किती भिन्न व टोकाची आहेत, या जाणिवेने मला वाटतं, त्याच्या मुळातील संवेदनशील मनाला निराळा स्तर प्राप्त झाला. विशेषतः इतर समवयस्कांप्रमाणे 'बोअर' होण्यासाठी उसंतच मिळाली नाही. चैनीच्या चोचल्यांपेक्षा अधिक निकडीचं काही असतं, रेषेच्या दुसऱ्या बाजूला आपण आहोत म्हणून किती सुदैवी आहोत, हे उमगलं. आपल्या व त्यांच्याही मर्यादांची जाणीव झाली.
मला कल्पना आहे, की समाजासाठी वर्षानुवर्षे अविरतपणे झटणाऱ्या अगणित व्यक्तींच्या कार्यापुढे हे अगदी इवलं बोट आहे.. पण त्या इवल्या अनुभवाने माझ्या आजवरच्या मर्यादित जगातून बाहेरच्या ह्या वेगळ्या जगाकडे नजर तरी गेली, हेही खरेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>तुमच्या मुलाचं कौतुक करावं तितकं थोडं. अशा तरुणांमधून सुजाण माणसं आकार घेतील.>>>>> + १००

वावे, धनवन्ती, मंजूताई, अज्ञातवासी, सामो प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कालपासून केसेस थोड्या कमी आहेत अनलॉकमुळे.