हाऊसफुल

Submitted by तुषार विष्णू खांबल on 30 May, 2020 - 02:38

हाऊसफुल
शब्दरचना :- तुषार खांबल
 
परशुराम शिवलकर…. म्हणजेच आबा शिवलकर… जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील, घरातूनच कलेचा वारसा लाभलेले आबा 70 च्‍या दशकात दशावतारामधुन नाव गाजवीत होते.
 
उंच धिप्पाड आणि रांगडा व्यक्तिमत्त्व असलेल्या आबांनी अनेक दशावतारात असुरांच्या भूमिका उत्तमरीत्या साकारल्या होत्या. ‘गजासुरचा वध' या नाटकातील त्यांची भूमिका तर खुप लोकप्रिय होती. त्यांचें नाव फलकावर लागलें की प्रयोग "हाऊसफुल" होणार हे निश्चित असायचे.
 
जितका कृर अभिनय त्यांचा नाटकात होता त्याच्या बरोबर विरुद्ध त्यांचा स्वभाव. गावात कोणाकडे काहिही कार्यक्रम असला किंवा कोणाला कसलीही मदत हवी असल्यास आबा हजर असायचे.. त्यांची पत्नी पार्वती काकी यादेखील खंबीरपणे सदैव त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. आबा दौऱ्यावर असताना घराची आणि सर्व मुलांची जबाबदारी त्या उत्तमरित्या सांभाळत होत्या. तीन मुलगे, दोन मुली, आई वडिल आणि पत्नी अश्या भरल्या कुटुंबासमवेत आबांच आयुष्य हळूहळू पुढे सरकत होते.
 
काही वर्षांनी अनुक्रमे आई आणि नंतर वडिलांचे छत्र हरपले. मुले मोठी झाली. त्यांनी शिक्षण आणि नोकरीकरिता मुंबई-पुणे सारखी शहरे गाठली. जसजशी मुले वयात आली तसतशी सर्वांचे शुभमंगल उरकुन आबा आपल्या पत्नी सोबत गावच्या घरी राहू लहले.
 
काळ बदलत होता.दशावतार, डबलबारी यांची जागा आता बेंजो आणि डीजेने घेताली होती. आबांनी सुद्धा आता दौरे बंद करून येणाऱ्या नवीन आणि इच्छुक पिढीला ते अभिनयचे धडे देत होते. काही हरहुन्नरी कलाकारांना सोबत घेऊन त्यांनी आपली कला पुढे सुरू ठेवली होती. एका गोष्टीची सल त्यांना नेहमी जाणवत असे की आपल्या नंतर आपल्या कुटुंबातील कोणीही नाही जो ही कला पुढे सुरू ठेवेल. मुलांशी याबाबत बोलण्याची तर सोयच नाही होती. कारण त्यांनी तर गावी येणे जवळपास बंदच केले होते. नोकरीमुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ मिळत नव्हता ते कला काय जोपासणार??? पैसे पाठविणे आणि कधीतरी फोनवर चौकशी करणे इतकेच काय ते संबंध मुलांनी ठेवले होते. प्रत्येकाला त्याचे वेगळे आयुष्य असते हे सत्य आबांनी आता स्वीकारले होते आणि त्यांनी स्वतःला कलेच्या आणि समाजाच्या सेवेसाठी वाहून घेतले होते.
 
दिवस सरत होते की एक दिवस अचानक टीव्हीवर बातमी येऊन झळकली. "संपूर्ण जगामध्ये कोरोना रोगाने थैमान घातले आहे. लोक धडाधड मुत्यूमुखी पडत आहेत." झालं..... सर्वत्र खळबळ माजली. प्रत्येकजण स्वतःच्या जीवाची पर्वा करीत होता. आबांनी सुद्धा आपल्या गावात सर्वाना काळजी घेण्यास सांगितले होते. त्यांनी स्वतः तालुक्याला जाऊन मेडिकल मधून मास्क आणून सर्वांना वाटले हिते. प्रत्येक वाडीत जंतुनाशक फवारणी, हात धुण्याची व्यवस्था। करून दिल्या होत्या. कोणी बाहेर पडू नये म्हणून आबा स्वतः आठवड्याला तालुक्याला जात असत आणि लोकांना लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी आणून देत असत. वाडीत आणि गावात सर्व काही व्यवस्थित आहे याची ते जातीने पाहणी करीत असत....
 
अशातच एक दिवस उजाडला. रोज सर्वांची आस्थेने चौकाशी करणारे आबा त्यादिवशी गावात फिरकलेच नाहीत. चौकाशी केल्यावर त्यांना ताप आला आहे आणि श्वास घ्यायला पण त्रास होत आहे असे समजले. ही सर्व लक्षणे कोरोनाची आहेत हे एव्हाना सर्वाना माहीत झाले होते. गावकऱ्यांनी ग्रामपंचायती मार्फत डॉक्टरांना बोलावून तपासणी करून घेतली.

दुसऱ्या दिवाशी एक रुग्णवाहिका वाडीबाहेर येऊन थंबली. रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आता आबांना तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागणार होते. सारा गाव हळहळू लागला होता. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आबांना रुग्णवाहिकेत बसविले आणी पहाता पहाता गाडी नजरेआड झाली.

इकडे सर्व गाव हादरून गेला होता. पार्वती काकींनी तर अन्नपाणीच सोडून दिले. आपल्या नवऱ्याला झालेला हा आघात त्या सहनच करू शकत नव्हत्या. गावातील मुलांनी आबांच्या मुलांना झालेल्या प्रसंगाबद्दल कळविले. आधीच शहरात लॉकडाऊन मुळे त्रस्त आणि त्यात ही अशी धक्कादायक बातमी. सर्व हकीकत समजताच आबांच्या सर्व मुलांनी आणि मुलींनी त्यांच्या कुटुंबासाहित मिळेल त्या वाहनाने आपले गाव गाठले.
 
नियमाप्रमाणे त्यांनी स्वतःला १४ दिवस गावच्या शाळेत क्वारंटाईन करून घेतले. आपली मुले गावात आल्याची खबर एव्हाना पार्वती काकींपर्यंत पोहचली होती. त्यामुळे त्यांच्या एकटेपणाला काहीसा मानसिक आधार मिळाला होता. १४ दिवसांनी डॉक्टर तपासणी करून त्यांना घरी जाऊ देण्यात आले. सर्वाना एकत्र समोर पाहून पार्वती काकींना अश्रू अनावर झाले.
 
इकडे आबा त्या बलाढ्य आजाराशी दोन हात करीत होते. आपल्यापेक्षा मोठा असुर कोणी असू शकत नाही अशी समजूत ते स्वतःच्या मनाला देत होते. इकडे सर्व गाव त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करित होता. आणि शेवटी तब्बल २२ दिवनांतर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने आणि ईश्वराच्या कृपेने आबा पूर्णतः बरे झाले होते. हॉस्पिटलमार्फत तशी सूचना गावात देण्यात आली होती.

सारा गाव आनंदात नाहून निघाला होता. सर्वांनी आबांच्य स्वागताची तयारी केली होती. या २२ दिवासात गावत काय काय घडले याची सुतराम देखील कल्पना आबांना नव्हती. इतक्यात रुग्णवाहिका गावात आली. आबा त्यातून खाली उतरले. सर्वप्रथम त्यांनी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. वाडीच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतः सरपंच आबांच्या स्वागतासाठी हजर होते. ठराविक अंतरावर उभे राहून सर्व गावकरी आबांवर फुलांचा वर्षाव करीत होते. एक एक पाऊल पुढे टाकत आणि सर्वांचे अभिवादन स्वीकारत आबा आपल्या घराकडे चालत होते. घराच्या जवळ जाताच पार्वती काकी भाकर तुकडा घेउन आल्या. त्यांनी आबांची दृष्ट काढली आणि त्यांना घरात जाण्यास सांगितले. आबांनी हळूवारपणे घराचे दार उघडले आणि आतील दृश्य पाहून ते अगदी हेलावून गेले.
 
त्यांची सर्व मुले, सुना, जावई, नातवंडे त्यांच्या स्वागताला हजर होती. हे सर्व चित्र पाहून आबांना अश्रू आवरता आले नाहीत. सर्वांनी आबांना कडकडून मिठी मारली. इतक्या वर्षांनी घडत असलेली ही भेट खरचं अविस्मरणीय होती. कोरोनामुळे का होईना.... आबांच्या एन्ट्रीसाठी त्यांचे घर आज पुन्हा एकदा "हाऊसफुल" झाले होते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults