अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455
८ मार्च | दिवस ३०
पपा,
काल दुपारी जेवण आटपून गोहाटीचे फ्रॅन्सी मार्केट फिरून आले. खाण्यापिण्याची चंगळ केली. भरपूर खरेदी केली. रात्री दमून गादीवर अंग टाकले आणि राज चा फोन आला. मोबाईलची बॅटरी थोडीशी चार्ज झाली होता म्हणून वाजला. तेवढे माझे नशीब चांगले होते असे म्हणायला हवे. कारण की, “संध्याकाळी विमान पकडायला वेळेवर यायला हवे म्हणून पहाटे लवकर पिकॉक आयलंड फिरायला निघणार”, हा माझा बेत राजला फोनवर सांगितला तसा त्याने मला धक्काच दिला. माझे विमान 8.35 pm ला नाही तर 8.35 am ला होते आणि त्याची मला मुळीच कल्पना नव्हती.
माझ्या प्रवासातले बारा तास जसे एका क्षणात गळून पडले तसे मला खूप जास्त अस्वस्थ व्हायला झाले. आता इथे मुंबई एअरपोर्ट वर बसून शेवटचे पत्र लिहित आहे. एकदा घरी परतले की पत्र लिहायला अवधी मिळणार नाही हे आहेच पण जणू अजून एखादा तास ट्रीप ओढून ताणून धरायचा प्रयत्न करते आहे कारण असा प्रवासही पुन्हा होणे नाही, याची जाणीव आहे. अगदी हेच वाक्य सर्वात पहिल्या पत्रात लिहिले होते. पण जिने ते लिहिले होते तिच्यात इतका बदल झालाय की, वाक्याचा संदर्भही पहिल्यासारखा राहिला नाही. तेव्हा तसे लिहिले होते कारण माझ्या आयुष्याचा शेवट करायचा या निश्चयाने निघाले होते आणि आता त्या मार्गाकडे पुन्हा नजरही जाणार नाही याबद्दल शंकाच नाही.
ज्या आयुष्याने हैराण केले होते त्यातून सुटका करायची तर ते संपवणे हा एकच मार्ग आहे, इतपतच अक्कल होती. शिवाय माझे मरण माझ्याच हातात आहे असा भ्रम होता. म्हणूनच जगणे असह्य झाले, असे झाले तेव्हा मरणाच्या दिशेने प्रवास करून पाहिला. लोक आपली निंदा करतील असे वाटले की आपसुख आपण त्याचे कारण लपवायचे मार्ग शोधायला लागतो. तेच साधावे म्हणून केवढा खटाटोप केला, किती दक्षता घेतली. सरतेशेवटी त्या मरणाच्याच वाटेवर आयुष्य जगायचे धडे शिकून परत आले. जे शिकले ते मुळात माहितच नव्हते असं नाही, अनुभवले नव्हते असंही नाही, पण माझ्या विचारांच्या मातीचा कसच असा की कुठचेही बी रुजले तरी उफाडयाने वाढते. तशीच एक वेल चढत गेली जिने आयुष्याच्या बहरदार फांद्यानाही जखडून टाकले होते.
या प्रवासात सर्वात आधी काय लक्षात आले असेल तर माझा जन्म आणि माझे मरण हे दोन्ही माझ्या हातात नाहीच, कसे जगावे आणि कसे मरावे ही कला शिकणे हे मात्र आहे.
आपल्याला वाटत दु:ख हाच फक्त जाच आहे. पण सुखाचा आनंद घेणे म्हणजे श्वापदाला रक्ताची चव लागण्यासारखे आहे. तेच मिळवण्यासाठी मनाची जी घालमेल होते तो काही कमी जाच नाही. या प्रवासात बऱ्यावाईट अनुभवाकडे तिर्हाेईतासारखे बघायला शिकले त्याने साऱ्याच जाचातून आपसुख सुटका होते हे चांगलेच लक्षात आले. किनाऱ्यावर स्वस्थ बसून एकेक भरती आणि ओहटी ला फक्त पहात रहायचे, समजायला कठीण वाटते पण परिपूर्ण आयुष्य जगायची ट्रिक इतकी साधी आहे. हाच या प्रवासात घेतलेला हा सर्वात मोठा धडा आहे.
आणि तिसरे आणि शेवटचे उत्तर ह्या प्रश्नाचे शोधले की, जे माझे माझे वाटत होते ते माझे झालेच कसे? मी धडपड करून मिळवले? नशिबाने लाभले का? की कोणी परोपकार करून माझ्या पदरात घातले. पण आता ते कुठेच दिसत नाही ते, गेले कुठे? ज्याचा उगम माहित नाही असे कुठूनसे येउन एक झलक दाखवून गायब झाले. माझे माझे करत ज्या प्रवाहात डुंबत राहिले होते तो निव्वळ क्षणभंगुर कणांनी व्यापुन टाकला होता. दोन्ही हात कधीचे रिकामेच आहेत. माझा 'मी पणा' गळून गेला असे म्हणणार नाही, नाहीतर राजबरोबर भांडायला लागले की मला अचूक पकडाल. पण त्याच्या क्षीणतेची प्रखर जाणीव झाली. हे ही नसावे थोडके!
या ना त्या प्रकारे, आयुष्याची थोडीफार समीकरणे मी आधीच सोडवली होती. या प्रवासात त्यांची उजळणीही झाली.
आज जेमतेम चार किलो चे सामान पाठीवर घेउन मी महिनाभर हिंडते आहे. माझे कुठे काय अडले? त्या मानाने चार भिंतींच्या ओनरशिपच्या घरात आयुष्यातली आव्हाने कमीत कमी असायला हवीत. तरीही चारचार पैशांच्या वस्तूंनी आपण त्याचा कोपरा न कोपरा भरून टाकतो. मला कसली गरज आहे, यापेक्षा माझ्याकडे काय आहे याकडे जास्त लक्ष द्यायची आपल्याला सवय असते. मी तर हनिमून ला सुद्धा दोन मोठ्या सुटकेसेस घेउन गेले होते. पण ती सवय नंतर कधी जळून खाक झाली. आता प्रवासात कुठचे आणि किती ओझे बाळगावे याचे मर्म मला चांगलेच कळले आहे.
जेव्हा कोणी दुसऱ्याला ताप देतच असेल त्याचे फक्त एकच कारण की तो स्वत: जळत असतो, ह्याची जाणीव तर माझ्या स्वत:च्या उदाहरणावरून झाली होती. या प्रवासातील बऱ्यावाईट प्रसंगात ती पडताळता आली आणि दृढ झाली.
कधीकधी जवळची शक्ती संपून जायची वेळ आली तरी दुसऱ्यासाठी झिजलो त्याचे चीज झालेले दिसत नाही. तेव्हा चांगुलपणावरचा विश्वास उडतो. मन खिन्न होते. हे माझ्याच वाट्याला का आले ह्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. आपापल्या आयुष्याच्या मागण्या पुऱ्या करता करता बेजार झालेले अनेक जीव मला या प्रवासात भेटले. स्वत:च्या कठीण परिस्थितीतही त्यांनी काय म्हणून मला आदर दिला? प्रेम दिले? स्वत:कडे अल्प असल्यातून थोडे काढून माझ्या झोळीत टाकले त्याच्यापुढे काय बिशाद आहे की मी माझ्या चांगुलपणाचा टिमका मिरवेन? अनादि कालापासून चराचराला फुटलेला चांगुलपणाचा पान्हा अखंड वहातोच आहे. त्यातच माझे संपून गेले होते ते भरभरून घेतले तेव्हा मी परत निघाले.
माझ्या जन्माच्या वेळेस तुम्ही कोणती प्रार्थना म्हटली असेल? मी मोठी होता होता काय आशीर्वाद दिला असेल? मी जाणती झाल्यावर कुठचा सल्ला दिला असेल? ज्याची तडजोड करायचीच नाही असं कुठचं स्वप्न एखादे वडिल आपल्या मुलीसाठी पहातील? पपा, या प्रवासाआधीचा माझा प्रवास आकाशातून पहात असताना तुम्हाला खूप दु:ख झाले असेल. पण एकदाच मला माफ करा. या प्रवासाच्या निमित्ताने जे सार कळले त्याचा सराव मी आयुष्याच्या प्रवासात चालूच ठेवेन. मी वाट पुन्हा चुकणार नाही ह्यावर तुम्हीही आकाशातून माझ्यावर नजर ठेवालच. पण तुमचे स्वप्न साकार झाले आहे. पपा, मी खरच खूप शहाणी झाले आहे.
चला. आता इथून थेट घरी जायचे. मला कोणीच बळेबळे ओढून ह्या वाटेवर परत आणलं नाही. आपोआप सारे घडत गेले. मी मार्गी लागत गेले. कसे ते या पत्रमालिकेत लिहिले आहेच. जे थोडेसे साऱ्या पत्रातून लपवून ठेवले होते, आज तेही ओझे उतरवून मोकळी झाले. पत्रावर नाव जरी तुमचे असले तरी यंदा प्रथमच वास्तविक हितगूज थेट जगाशी झाली. ती तशी करायची इच्छा मी डायरीला लिहिलेल्या पहिल्या पत्रातच व्यक्त केली होती. पण तेच तर ... ते पत्र जिने लिहिले ती मी नाहीच. प्रवासाला निघालेली आणि प्रवासाहून परतणारी मी यात जमीन अस्मानाचे अंतर आहे अस वाटतंय. फिरून तिथेच परत आले असे वरकरणी दिसत असेलही पण प्रत्यक्षात आयुष्याला एक पूर्ण प्रदक्षिणा घालून मी बाहेरच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चला आता डोळे पुसून तुमच्या लाडक्या मुलीचे अभिनंदन करा आणि ज्यांना ज्यांना त्या कक्षेतून बाहेर पडण्याची गरज असेल त्यांना माझ्यासारखी अशीच एक संधी मिळू दे, अशा शुभेच्छा द्या.
तुमची सुप्रिया.
मी तुमची पुर्ण लेखमाला वाचत
मी तुमची पुर्ण लेखमाला वाचत आले आहे.. आणि पुढच्या भागाची वाट पाहत होते.. ठरवलं होत पुर्ण प्रवास संपल्यावर प्रतिक्रिया द्यायची.. मला आवडलं, नुसतं तुमचं solo tripच धाडसंच नाही तर तुमचं ते वर्णन प्रामाणिक पणे शब्दात मांडण सुद्धा..
सुरेख समारोप.
सुरेख समारोप.
काय प्रतिसाद देऊ!
काय प्रतिसाद देऊ!
ईतकी परिस्थिती झाली की प्रवासाला निघायची कल्पना छान आहे.
प्रवासाच्या सुरुवातीला जाणवलं होतं की something is wrong पण
शिवाय फोटोतील डोळे !
ह्या पत्रानंतर मागच्या (second last) पत्राचा relevance काहीसा संपतो.
कधीतरी प्रवास म्हणून प्रवासाला निघाल अशी शुभेच्छा.
या लेखातील, मुक्तचिंतन सखोल
या लेखातील, मुक्तचिंतन सखोल आहे? _/\_
खुप छान झाली लेखमाला. तुमचे
खुप छान झाली लेखमाला. तुमचे अनुभव वाचताना आणि पहाताना फार मस्त वाटत होतं. एकटीने असे धाडस केलेत म्हणून खूप कौतुकही वाटलं. ह्या शेवटच्या लेखाच्या सुरुवातीलाच मात्र जरा धक्का बसला.
राज ला पण शाबासकी (?? योग्य शब्द सुचत नाही).. भरल्या संसारात बायकोनी असं एकटीनी जायचं म्हटल्यावर त्या नवर्याचा प्रतिसाद सहाजिक वाटला.
ट्रीप मुळे मिळालेला जगायचा नवा दृष्टीकोन आणि अनुभवांनी समृद्ध झालेले मन घेऊन पुढील वाटचाल यशस्वी कराल ह्याची खात्री आहे.. शुभेच्छा..
मला हे सगळं एकदा निवांत
मला हे सगळं एकदा निवांत वाचायचं आहे
थोडा धक्का बसला आणि थोडे वाईट
थोडा धक्का बसला आणि थोडे वाईट वाटले. तुम्ही आता त्याविचारांमधून बाहेर आलात हे बघून सकारात्मक वाटले.
! काळजी घ्या. आनंदी रहा.
तुमची लेखमालिका अप्रतिम आहे आणि पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहे.
तुमच्या बाबांचे आशीर्वाद असतील की तुम्हाला "यासाठी" प्रवासाची कल्पना यावी. आणि तो आयुष्य बदलून टाकणारा व्हावा.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा hugs
धन्यवाद
>>>>>>>>पण सुखाचा आनंद घेणे
>>>>>>>>पण सुखाचा आनंद घेणे म्हणजे श्वापदाला रक्ताची चव लागण्यासारखे आहे. तेच मिळवण्यासाठी मनाची जी घालमेल होते तो काही कमी जाच नाही. >>>>> काहीच्या काही सुंदर इनसाईट आहे.
>>>>>थोडा धक्का बसला आणि थोडे वाईट वाटले. तुम्ही आता त्याविचारांमधून बाहेर आलात हे बघून सकारात्मक वाटले.>>>>> + १०००
कोणाशी बोलावेसे वाटले तर जरुर विपू करत जा. काळ्जी घ्या. आनंदी रहा.
तुमच्या धाडसाचे,
तुमच्या धाडसाचे, प्रामाणिकपणाचे पुन्हा एकदा कौतुक आणि तुम्हाला अनेक शुभेच्छा!
या एकल प्रवासात काय कमावले याचा प्रांजळ लेखाजोगा आवडला. ते संचित मिळवताना आयुष्यासह बऱ्याच गोष्टी पणाला लावल्या होत्या हे वाचून जरा धक्काच बसला.
काय लिहू कळत नाहीये. स्वतःची
काय लिहू कळत नाहीये. स्वतःची काळजी घ्या!
देव करो आणि ही वेळ कधीच न येवो पण यदा कदाचित असे काही पुन्हा वाटले तर प्लीज प्रोफेशनल हेल्प घ्या.
स्वतःची काळजी घ्या आणि
स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला शुभेच्छा.
प्रांजळ अनुभवकथन.
प्रतिक्रियेतील एकेक वाक्य
प्रतिक्रियेतील एकेक वाक्य +१०० एवढे जवळचे वाटते आहे
मला पण सुचत नाही?की अजून काय लिहू?
तुमच्या बाबांचे आशीर्वाद असतील की तुम्हाला "यासाठी" प्रवासाची कल्पना यावी. आणि तो आयुष्य बदलून टाकणारा व्हावा.>> हे खूप जास्त आवडणारे आहे.
माझ्यावर असा प्रसंग आला होता ते ही आता गोष्टीसारखे वाटते; पण कोणाच्याच आयुष्यात तसा प्रसंग येउ नये. असे किंवा याहून लहान मोठे संकट आलेच तर त्यांननाही एखादा असा अनुभव मिळावा की त्यामुळे मोठे सकारात्मक बदल घड्तील. मग ते संकट सुद्धा युनिव्हर्सची योजना वाटेल, स्वत:चे भाग्य वाटेल. थोडेसे मी-अस्मिता ने म्हटले तसे.
मला वाटलं होत की शेवटचं पत्र लिहून मला फार ऐकून घ्यावे लागणार उलट मला खूप प्रेम मिळते आहे. पण आता माझी झोळी भरलेली आहे. ज्यांना असे पत्र लिहिता आले नाही त्यांना हे दान देता यावे. पुस्तकाचा खटाटोप करेन. पण तो फक्त एक मार्ग आहे.
कोणालाही माझ्याकडचे काही देण्यासारखे असेल तर मला सुद्धा कधीही लिहा.
सर्वाचे भले होवो.
सर्वांना खूप खूप धन्यवाद.
सुचत नाहीये काय प्रतिक्रिया
सुचत नाहीये काय प्रतिक्रिया देउ. पुर्ण मालिका एखाद्या रोलरकोस्टर सारखी आहे, आणि हा भाग वाचून मी नि:शब्द झाले.
वरच्या सगळ्यांचे प्रतिसाद खुप आवडले. मला तसं लिहीता येत नाही. पण तेच वाटतय. आणि एक घट्ट मिठी
घट्ट मिठी ... छान होती
घट्ट मिठी ... छान होती
stay safe, stay blessed धनुडी
काय लिहू कळत नाहीये. स्वतःची
काय लिहू कळत नाहीये. स्वतःची काळजी घ्या!
देव करो आणि ही वेळ कधीच न येवो पण यदा कदाचित असे काही पुन्हा वाटले तर प्लीज प्रोफेशनल हेल्प घ्या. >> +१
थॅन्क्स अमा
थॅन्क्स अमा
१ कोणाला क्लिनिकल डिप्रेशन येणे,
२ प्रोफेशनल हेल्प घेणे,
३ प्रोफेशनल हेल्प मिळणे
४ सुयसायडचा विचार येणे,
५ टेन्न्डन्सी असणे,
६ प्रयत्न करणे
हे सर्व वेगवेगळे वर्ग झाले.
There are various factors contributing to the cause and the effect of each of them. Moreover each case is different and even the same environment or ecosystem does not produce the same results.
माझ्या वर्गासाठी माझ्या केस मध्ये घ्या प्रवासाने एखाद्या औषधापेक्षा मोठे काम केले आहे. याचा अर्थ मेडिकल हेल्प घ्यायची नाही असा मुळीच नाही आणि पण त्याने प्रोब्लेम्स कायमचा संपून जाईल, हे ही जरुरी नाही.
आपली सपोर्ट सिस्टम असते त्याने मात्र वरच्या सर्व वर्गात फरक पडतच असतो. त्यात कुटुंब, मित्रमंडळी, ऑफिस, शेजारी, सोशल मिडिया, डॉक्टर्स आणि गव्हर्मेंट यंत्रणा आलीच पण त्यापलीकडे मला तर युनिव्हर्स चे ब्लेसिंग मिळाले असा माझ्यापुरता निष्कर्ष मी काढलेला आहे. औषधाने जे समूळ निघून गेले नसते ते मूलगामी सकारात्नमक बदल माझ्यात झाले. त्यामुळे हा अनुभव हे माझे दुर्भाग्य नाही तर मी भाग्य समजते.
जर मच्युअर अॅडल्ट सारखा विचार कोणी करू शकत असेल तर ती category वर उल्लेख केलेल्या सहा वर्गात मोडणारच नाही.
किंवा उलट सांगायचे तर जेव्हा कोणाच्या वाट्याला वरील सहा वर्गातील एक अनुभव येत असतो तेव्हा तो mature adult सारखा विचार करायच्या परीस्थितीत नसतो. शेवटी तू लिहिलेला सल्तुला खूप मोलाचा आहे खरतर पण दुर्दैवाने ज्या माणसाने तो पाळायला हवा त्याला तेव्हा तो पाळयला जमत नाही. जेव्हा कोणाच्या आतून चांगली किंवा वाईट प्रेरणा येते तेव्हा ती सर्व थीओरि -नोलेज्च्या वरचढ असते. मला ती प्रेरणा मिळाली हेच नेमके माझे भाग्य आहे.
पण एवढे मोलाचे अनुभव मिळाल्यानंतर आता मच्युअर अॅडल्ट सारखा हा विचार आता केला नाही तर मात्र ते अयोग्य आहे, असे वाटते. खर सांगू मला शेवटच्या पत्रात खूप मैत्री, सदिच्छा मिळाल्या, पण आता माझ्याकडे भरभरून आहे. इतके की मी या वर्गापेक्षा वेगळ्या सातव्या वर्गात मोडत आहे. माझ्याजवळचे इतराना द्यायचे थोडेफार काम मी करू शकले तर या अनुभावामागे युनीव्हर्स चा माझ्या एकटीच्या आयुष्याहून फार मोठी योजना असावी असे मला वाटेल. त्यासाठी प्रार्थना करा. माझ्या परीने या क्षेत्रात मी काम सुरु सुद्धा केले आहे. ज्यांना जेव्हा अशा life altering सपोर्टची गरज आहे त्यांना ते वेळीच मिळावा एवढी इच्छा आहे.
अमा खूप आभारी आहे, मनातील सारे प्रश्न प्रामाणिकपणे विचारल्याबद्दल.
tc
इथेही प्रतिसाद लिहिला कारण कोणीच काळजी करू नये उलट मला अनेक लोकांना मदत करता येईल याबद्दल प्रार्थना नक्की करा.
आणि के लेखमाल इथे सुरु केली तेव्हा असे वाटले होते की अनोळखी लोकांकडे लिहिले की विशेष काही विचार करायची गरज नाही पण आता अनोळखी ही परिचयाचे झाले. तुम्ही एवढे सारे लेख वाचून प्रोत्साहन दिले त्याबदल आभारी आहे. माझे इथे परत येणे होणार नाही. मी काही लेखिका नाही. (एक व्हिदिओ राहिलाय आणि सर्वांना प्रोमीस केले तसा एक लेख बकपेकिंग वर लिहेन.) पण इतर विषयातही माझी कोणाला काही मदत होऊ शकेल तर नक्की लिहा. स्वत:ची काळजी घ्या
~सुप्रिया