स्वच्छंदी

Submitted by Theurbannomad on 26 May, 2020 - 09:12

' आपल्या मर्जीचा मालक ' हे विशेषण बरेच वेळा बिनधास्त, बेलगाम जगणाऱ्या व्यक्तींना आपण सर्रास चिकटवत असतो. कोणाचाही मुलाहिजा नं बाळगणारे, जबाबदाऱ्यांचा फारसा विचार नं करणारे ,सहसा लग्नाच्या बंधनात नं अडकणारे आणि अडकलेच तर मुलं जन्माला घालून आपल्या 'स्वातंत्र्यावर' गदा आणू नं देणारे असे महाभाग आपल्याला अनेकदा आजूबाजूला दिसत असतात. युरोपमधल्या भटक्या हिप्पी जमातीच्या आत्म्यांचा जणू पुनर्जन्म झालेला आहे, अशा थाटातलं त्यांचं वागणं नाकासमोर बघून जगणाऱ्या लोकांसाठी 'अब्रमण्यम' असतं. अशाच एका मुलखावेगळ्या मनुष्याची माझ्या नव्या ऑफिसमध्ये गाठ पडली आणि सुरुवातीला काहीसा त्रासदायक वाटलेला हा अतरंगी प्राणी हळू हळू माझा चांगला दोस्त झाला.

पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या मला रिसेप्शनिस्टने ' ओरिएंटेशन' साठी मीटिंग रूम मध्ये बसायला सांगितलं आणि मदतनीसाला माझ्यासाठी कॉफी तयार करायला सांगितली. ही रिसेप्शनिस्ट माझ्या आधीच्या ऑफिसच्या रिसेप्शनिस्टप्रमाणे नाजूक, गोड आवाजाची वगैरे औषधालाही नव्हती. तिचा आवाज आयुष्यात पहिल्यांदा जो क्लायंट ऐकेल, तो आपण चुकून पोलीस स्टेशन अथवा जेलमध्ये फोन लावल्याच्या समजुतीने माफी मागून फोन ठेवेल अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. या नव्या जागी अजून काय काय बघायला मिळणार आहे, याच्या विचारात असताना त्या मीटिंग रूममध्ये धाडकन दरवाजा उघडून मनीष आत घुसला.

" तू नया वाला आर्किटेक्ट है नं? बाहेर चल, तुझी सगळे वाट बघतायत..."

" वाट?"

" मी काय बोललो कळलं नाही का? मराठी आहेस ना? आम्ही तुझी वाट लावल्यासारखा काय विचारतोस?"

मी थोडासा चिडलो. हा कोण आहे आणि अशा विचित्र पद्धतीने का बोलतोय, याचा उलगडा मला झाला नाही. साडेपाच फुटाच्या आतबाहेरची उंची, पोरगेलासा चेहरा, बारीक कापलेले आणि समोरून तुरे उभे केलेले केस, कवट्या आणि हाडांच्या चित्राचा टी-शर्ट आणि खाली ठिकठिकाणी फाटलेली जीन्स अशा दिव्य अवतारातला हा मनुष्य मॅनेजर नसू दे, अशी मनोमन प्रार्थना करत मी बाहेर पडलो. तिथे ऑफिसच्या सगळ्या साळकाया - माळकाया आणि पुरुष जमलेले होते. ते दृश्य बघून मी चुकून दुसऱ्याच ऑफिसमध्ये तर आलो नाहीये ना, अशी शंका मनात चाटून गेली आणि मी मुद्दाम रिसेप्शन टेबलाच्या मागच्या भिंतीवर ऑफिसचं नाव पुन्हा बघून घेतलं. नशिबाने मी योग्य जागी आलो होतो.

" ऑफिसचा एक नियम आहे, नव्या बकऱ्यांची ओळख परेड होते...तुझी माहिती दे...तुला किती बायका - मुलं आहेत ते सांग..."

" म्हणजे?" मी तडकलो.

" अरबी देशातून आलायस ना...तिथे चार चालतात ना? " मनीष गालातल्या गालात हसत उत्तरला.

" अरे पण मी भारतीय आहे ना? "

" मग तिथे का गेला होता?"

" काम करायला गेलो होतो...लग्न करायला नाही...आणि काय आचरटपणा चाललाय? हे काय कॉलेज रॅगिंग आहे का?" माझ्या संयमाचा बांध अखेर फुटला.

" अपर्णा, मी बेट जिंकलो. दोन मिनिटापेक्षा कमी वेळ...बघ.." मनीषने घड्याळ आमच्या त्या भारदस्त रिसेप्शनिस्टपुढे नाचवलं. " तू सिनिअर सिटीझन आहेस, म्हणून शंभरऐवजी पन्नास रुपये दे...तुला डिस्काउंट.." ती त्याला पकडायला धावली तसे बाकीचे हसत हसत आपापल्या जागेवर गेले. थोड्या वेळाने आमचा मॅनेजर मागून ऑफिसमध्ये शिरला...त्याच्या घड्याळाची वेळ ' भारतीय ' पद्धतीची असल्यामुळे तो चांगला तास-दीड तास उशिराने अवतरला होता.

" माफ करा, तुम्हाला थांबावं लागलं...काही त्रास नाही ना झाला? अपर्णाने कॉफी दिली असेलच ना? " त्याने बोलता बोलता मला घेऊन थेट मीटिंग रूम गाठली. तिथे ऑफिस कल्चर , प्रोजेक्ट्स, कामाच्या पद्धती अशा चावून चोथा झालेल्या माहितीचं एक अजून पारायण झालं आणि मॅनेजरने ऑफिसच्या लोकांना बोलावलं. माझी सगळ्यांशी ओळख करून दिली आणि मला नको असूनही मी दुबईमध्ये काय काम केलंय, मी कसा ऑफिससाठी महत्वाचा आहे अशा नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसलं. त्या पाच मिनिटाच्या नीरस 'भाषणानंतर' तो एकदाचा आपल्या केबिनमध्ये शिरला आणि मी माझ्या खुर्चीवर बसलो.

" तेरा नाम आशिष है ना? " मनीष पुन्हा बाजूला येऊन उभा.

" हो...मगाशी ऐकलं नाही का?" माझ्यातला खडूस पुणेरी जागा झाला.

" नाही रे, तेरे नाम से आज पार्सल आयेगा ना...चार बजे..."

" म्हणजे?"

" ऑफिसचा नियम...नव्या बकऱ्याला पहिल्या दिवशी पार्टी द्यावी लागते. मी मागावलंय सगळ्यांसाठी...तुला काय हवं बोल..."

" अरे विचारायची पद्धत..."

" हो आहे ना..म्हणून विचारलं तुला काय मागवू...आपले मॅनर्स चांगले आहेत..." मनीषने हजारजबाबीपणे तिथल्या तिथे मला गार केलं. चार वाजता खरोखर इडल्या, डोसे, वडे, चाट, सँडविच अशा अनेक खाद्यपदार्थांनी भरलेला खोका घेऊन एक जण आला. माझ्या खिशाला भोक पडून त्या दिवशी ऑफिसने माझा सुरेख स्वागत केलं.

हळू हळू ऑफिसमध्ये रमलो तसा माझा या प्राण्याशी परिचय वाढला. मनीष म्हणजे ऑफिसमधला धुडगूस घालण्याच्या कामात पुढे असणारा वल्ली आहे हे माझ्या ध्यानात यायला लागलं. हा प्राणी इतका चुळबुळ्या आणि वात्रट होता, की आल्यापासून जाईपर्यंत ऑफिसमध्ये सतत याचे काही ना काही उद्योग चालायचे. टिवल्याबावल्या करण्याचाच पगार त्याला ऑफिस देते की काय, अशी शंका यावी इतका तो उचापतखोर होता. त्याच्या स्वभावात मुळातच एक 'स्ट्रीट-स्मार्टनेस' होता. आपण कोणाला काय बोलतोय, त्याला त्याचं काय वाटतंय, आपलं कोणाला राग येतोय का याची पर्वा तर नावालाही नव्हती. आमच्या ऑफिसच्या डिरेक्टरपासून मॅनेजरपर्यंत कोणाशीही तो एकेरी संबोधनानेच बोलायचा. त्यांच्याही टिवल्याबावल्या करायचा. पण कसाही असला तरी तो ऑफिसच्या वातावरणात एक हलकाफुलका अनौपचारिकपणा निर्माण करत असल्यामुळे आम्हाला काम करताना मजा यायची.

एके दिवशी आमच्या मॅनेजरने केबिनबाहेर येऊन मनीषला समोर बोलावलं. मनीषने त्याच्या महागड्या परफ्यूमच्या बाटलीतलं अर्धं अधिक परफ्यूम संपवल्याचा साक्षात्कार त्याला झाला होता.

" अरे तू मेरे डेस्क से मेरा परफ्यूम क्यों उठाया ? "

"अरे सॉरी ना...तेरा परफ्यूम मस्त है रे...मी मागच्या शनिवारी इथून थेट पार्टीसाठी गेलो होतो ना...काय करणार...तूच दिलेलं जास्तीचं कामं..आता पार्टीला जाताना टिपटॉप जायला नको का? मग समोर दुकानात जाऊन नवा टीशर्ट घेतला आणि तुझा परफ्यूम मारलं..."

" अरे लेकिन इतना परफ्यूम? एका वेळेस इतका परफ्यूम मारलास?"

" अरे नाही...या आठवड्यात पण चार वेळा मी उशिरापर्यंत बसलो...."

" तू दर दिवशी पार्टीला जातोस?"

" अरे नाही...पण मला परफ्यूम इतका आवडला की रोज मारला थोडा थोडा..."

मॅनेजरने कपाळ बडवून घेतलं. मनीषला समज दिली आणि ' पुन्हा असले प्रकार केलेस तर काढून टाकीन ' ची याआधीही अनेकदा दिलेली धमकी पुन्हा दिली. अर्थात मनीष हा प्राणी काय रसायन आहे, हे सगळ्यांना माहीत होतंच. त्याने पुढे जे केलं, ते ऐकून मी थक्क झालो. एखाद्या मनुष्याच्या अंगात किती उद्योग असू शकतात, याचं ते उदाहरण होतं. त्याने मुंबईच्या रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या बनावट परफ्यूममधून बरोब्बर तशाच बाटलीतला तो परफ्यूम शोधुन काढला. तो नुसता हवेत उडवून अर्धं रिकामा केला आणि हळूच मॅनेजरच्या परफ्यूमच्या बाटलीची अदलाबदल केली.

" मनीष, मॅनेजरला समजलं तर.."

" घंटा...अरे तो मॅनेजर असला तरी त्याला अक्कल नाहीये...ब्रँड दिसला की तो लटटू. मी मागचे तीन वर्षं त्याला त्याच्या वाढदिवसाला असेच रस्त्यावरून घेतलेले 'ब्रँडेड' परफ्यूम देतो आणि तो बावळट खुश होतो...एकदा आम्ही पिझ्झा पार्टी केली तेव्हा जाम उडत होता की मी रस्त्यावरचा पिझ्झा खाणार नाही...चार गल्ल्या सोडून पुढे एक टपरी आहे, तिथे रशीद पिझ्झावाला आहे ना....तो सेम 'डॉमिनोस' सारख्या दिसणाऱ्या खोक्यात घालून त्याचे पिझ्झा देतो...तू आणला आणि याला दिला. हा मिटक्या मारून खात होता आणि आम्ही हसत होतो..."

मनीष आपल्या कामात मात्र अतिशय तरबेज होता. कामाच्या बाबतीत कोणालाही त्याने कधीही निराश केलं नाही. एकदा हातात काम आलं, की मान मोडून झपाटल्यासारखं काम करायची त्याची सवय होती. तो स्वतः साधा ड्रॅफ्ट्समन असूनही त्याने तीन वर्षातच ड्रॅफ्टिंग टीमच्या प्रमुख कोऑर्डिनेटरच्या जागेपर्यंत मजल मारली होती. दिलेल्या वेळेत आपलं आणि आपल्या टीमचं काम चोख करून देणं यात त्याचा हातखंडा होता.

त्याच्याच टीममध्ये असलेला आमच्या ऑफिसचा बऱ्यापैकी ज्येष्ठ ड्रॅफ्ट्समन हेमंत हे त्याचं खास 'राखीव टार्गेट' होतं. दोघांमध्ये 'टॉम आणि जेरी' चं नातं होतं. हेमंत पन्नाशीच्या पुढचे आणि मनीष जेमतेम तिशीत, पण वयाचा कसलाही मुलाहिजा ना बाळगता मनीष हेमंतना मनसोक्त पिडायचा. कधी त्यांचा डबा लंपास करून त्यातली पोळी-भाजी उडव, कधी त्यांच्या कम्प्युटरचा पासवर्ड बदल अशा वेगवेगळ्या मार्गाने तो त्यांच्या संयमाची परीक्षा घ्यायचा. एकदा चार-पाच दिवस राब राब राबून एका मोठ्या प्रोजेक्टचा ड्रॉईंग सेट आमच्या ऑफिसमधून बेहेरे पडला आणि दमल्यामुळे त्या प्रोजेक्टच्या टीमने दुपारी एक पेंग काढायचं ठरवलं. हेमंत रात्री उशिरापर्यंत कामं करून चांगलेच दमलेले होते. खुर्चीवरच त्यांनी अंग सैल करून डोळे मिटले , डोक्यावर टोपी घालून ती डोळ्यापुढे ओढून घेतली आणि काही सेकंदात ते गाढ झोपी गेले.

मनीष हा प्राणी किती वेळ झोपतो, हे काही मला माहीत नाही, पण इतर जण पेंगुळले असले तरी याच्या अंगात मात्र नको तितका उत्साह टिकून होता. त्याने कुठूनतरी एक दोरा आणला, चिकटपट्टी आणली आणि अलगद तो दोरा त्याने हेमंतच्या टोपीला चिकटवला. हेमंतच्या प्रत्येक श्वासाबरोबर दोरा हलत होता.

" मनीष, आता हे काय?" मी प्रश्न केला.

" अरे बाबा वय झालं ना त्याचं....दोरा हलला नाही की घरी कळवायला सोपं जाईल..."

थोड्या वेळाने जाग झाल्यावर झाला प्रकार समजल्यावर हेमंत भडकले. पण त्यांचा स्वभाव इतका मवाळ, की त्यांच्याकडून चिडल्यावर सुद्धा मनीषला ' नको ना रे असले प्रकार करू..' ची गयावयाच बाहेर आली. " अरे, घाबरू नको...तुझ्या LIC पॉलिसीवर लाभार्थी म्हणून माझं नाव टाकेपर्यंत तुला नाही जाऊ देणार मी..." असं उत्तर देऊन मनीषने त्यांना अजून उकसवलं. शेवटी कडेलोट होऊन हेमंतच्या तोंडून मागच्या पन्नास वर्षात न निघालेली एक अस्सल शिवी बाहेर पडली आणि ऑफिस अवाक झालं. मनीष नावाच्या माणसाची ती किमया होती.

हा माणूस असाच बेधडक, स्वछंद आणि बेलगाम जगला. आमच्याच ऑफिसच्या जुन्या रिसेप्शनिस्टबरोबर त्याने सूत जुळवलं आणि काही वर्षं 'लिव्ह इन' मध्ये काढल्यावर त्यांनी लग्न केलं. मला हे सगळं कळल्यावर मला त्या मुलीची चिंता वाटायला लागली. बेलगाम घोड्याला काबूत आणायला खूप परिश्रम घ्यावे लागतात..इथे तर घोडा नुसता बेलगाम नव्हता, तर चौखूर उधळलेलाही होता. एके दिवशी त्याची सहधर्मचारिणी आमच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला आली आणि माझी तिच्याशी ओळख झाली. तिला बघून आधी माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. अतिशय टापटीप आणि देखणी असलेली निशा या प्राण्याची बायको आहे, हे पटायला मला थोडा वेळ लागला. कुंभमेळ्यातला साधू आणि एखाद्या संस्थानाची राजकुमारी एकत्र आले तर जितके विजोड दिसतील, तितका तो जोडा विजोड होता.

" मनीष, बीवी को देख...अपने आप को देख...थोडा स्टाइलिश बन जा अब..." मी डिवचलं.

" मी गुळगुळीत दाढी करून, छान इस्त्री केलेला शर्ट आणि पॅन्ट घालून तिच्यासमोर उभा राहिलो तर ती माझी ओळख विसरेल...आणि काय आहे माहित्ये, तुम्ही लोक आईने तयारी करून दिल्यासारखे दिसता...मी टापटीप नसलो तरी 'कूल' आहे समजलं?" निशा सगळं ऐकून हसत होती. एकूण काय, तर तिने त्याला 'आहे तसा' स्वीकारलेला होता आणि ती त्याच्याबरोबर अतिशय मजेत होती. 'राम मिलायी जोडी' चं ते जिवंत उदाहरण होतं.

त्याच्या घरी एकदा मी माझ्या बायको-मुलीसह गेलो होतो. मनीष आणि माझी बायको मुंबईत एकाच भागात राहणारे. तिथेही त्याने आम्हाला घरचा पत्ता सांगताना मुद्दाम थोडं फिरवलं. एकदा चुकून समोरच्या अंगणात तिरडी ठेवलेल्या घरासमोर आणि दुसऱ्यांदा कुत्रा भुंकत असलेल्या घरासमोर पोचल्यावर शेवटी तिसऱ्या वेळी आमची शोधयात्रा योग्य त्या घरापुढे थांबली आणि आम्ही त्याच्या घरात एकदाचे अवतरलो. त्याच्या आईला भेटलो. ती सुद्धा आपल्या या कुलदीपकाच्या माकडचाळ्यांमध्ये आनंदाने सामील होतं होती. कदाचित तिने सुद्धा मनीषला आहे तसाच्या तसा स्वीकारला होता.

काही महिन्यांनी अचानक आम्हाला त्याने त्याची आई कॅन्सरने गेल्याची बातमी दिली. त्या वेळी आयुष्यात पहिल्यांदा तो गंभीर होऊन बोलताना मी ऐकला. आईवर त्याचं अतिशय प्रेम होतं. आई या जीवघेण्या आजारातून वाचणार नाही, हे त्याला कदाचित माहीत असावं, कारण ती जिवंत असेपर्यंत त्याने तिला एक क्षण डोळ्यात पाणी आणू दिलं नव्हतं. आतून तो गलबललेला वाटत होता. आईच्या आठवणी त्याच्या मनात दाटून आलेल्या होत्या आणि एरव्ही टिवल्याबावल्या करणारा मनीष पहिल्यांदाच शांत दिसत होता.

" मनीष, आईला तू खूप हसवलंस...खूप प्रेम दिलंस...मला माहीत आहे तुला त्रास होतोय, पण आता वस्तुस्थिती स्वीकार..." मी त्याचं सांत्वन केरायचा प्रयत्न केला.

" मला माहीत आहे...आणि काळजी करू नको, आईने जाताना माझ्याकडून एक प्रॉमिस घेतलं होतं...मी ते पूर्ण करणार..."

" काय?"

" ती म्हणाली, असाच आयुष्य ' जगत ' रहा..."

खरोखर काही दिवसातच मनीष पूर्वीसारखा झाला आणि आम्हाला त्याच्या टिवल्याबावल्या पुन्हा एकदा त्रास द्यायला लागल्या. हा माणूस माझ्यासाठी मिठासारखा होता. कितीही खारट लागला, तरी त्याच्याशिवाय कशालाही चव येत नव्हती हेच खरं !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद !
माझ्या ब्लॉग्सना भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. शक्य असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना ब्लॉग वाचण्याची माझ्यातर्फे विनंती करा.

https://humansinthecrowd.blogspot.com/
https://demonsinthecrowd.blogspot.com/

छान

लेख खूप आवडला.
तुमचा हा लेख वाचताना मला "वपुंची" आठवण आली. वपु हे तुमचे ऊर्जास्रोत दिसतात?!