कलिंगडाची गारेगार कुल्फी
अगदीच मिडलक्लास शीर्षक वाटत असेल तर आपण याला वॉटरमेलन पॉपसिकल्स असेही वाचू शकता.
----------
घरात पहिला फ्रिज किती साली आला आता नेमके आठवत नाही. पण माझे शालेय शिक्षण तेव्हा आटोपले होते एवढे आठवतेय. आमच्या लहानपणी खेळायला मोबाईल नव्हते, असे हल्लीच्या पोरांना आपण बरेचदा कौतुकाने सांगतो. माझे बालपण फ्रिजशिवाय गेले आहे. त्यामुळे थंड पाण्याचेही एक कौतुक होते. नुसता बर्फ चोखण्यातही एक नशा होती. किसलेल्या बर्फाच्या गोळ्यावर सरबत शिंपडले की त्या वयातला जगातला सर्वात भारी पदार्थ तयार व्हायचा. जो जवळपास तितक्याच चवीने रोजच खाल्ला जायचा. त्या गोळ्यावर बाटलीतले सरबत, जे दहापैकी नऊ वेळा कालाखट्टाच असायचे, ते शिंपडताना जेव्हा तो बर्फ संपृक्त अवस्थेत यायचा, तोपर्यंत आपल्या तोंडातले पाणीही त्या अवस्थेला पोहोचले असायचे. आणि मग तो थबथबणारा गोळा हातात घेत आता अजून एकही थेंब गळून वाया जाऊ नये म्हणून पहिलीच जोरदार घेतलेली चुसकी.. आहाहा!.. मित्रांच्या गप्पा त्या चुसकीनंतरच सुरू व्हायच्या.
मग एक तो चम्मच मिळायचा. कुस्करलेला बर्फ ग्लासात टाकून त्यात वरून ओतलेले सरबत. हे गोळ्यासारखे ओठांनी चोखून चोखून खायचे नसून चमचा चमचा तो सरबतमिश्रित बर्फ तोंडात ढकलून चावत चघळत खायचा असतो. म्हणून याचे नाव चम्मच.
पन्नास पैश्याला गोळा मिळायचा. एक रुपयाला चम्मच. एक रुपयाला सरबत देखील मिळायचे. आम्ही आठ आण्याचा गोळा घेऊन एक रुपयाचे सरबत घ्यायचो. आणि तो गोळा त्यात बुडवून बुडवून खायचो. लवकरच हा प्रकार ईतका हिट झाला की त्या भैय्याने स्वत:च गोळासरबत असा स्पेशल आयटम दोन रुपये लाऊन विकायला सुरुवात केली.
असो, विषयावर येऊया... तर कलिंगडाची गारेगार कुल्फी
उन्हाळा सुरु झाला की रोज रात्री बिल्डींगमध्ये कुल्फीवाला यायचा. पोराथोरांना सगळ्यांनाच हि कुल्फी आवडायची. ऐय कुल्फीssssय्य... अशी आरोळी ऐकली की बासरीवाल्याच्या मागे उंदरे जमावीत तसे लोकं घरातून बाहेर पडायचे आणि बघता बघता दादरावर कट्टा जमायचा. दक्षिण मुंबईतील जुन्या बिल्डींगमध्ये राहण्याची हिच मजा होती.
ईतरवेळी गोळ्याच्या नावाने नाक मुरडणारे घरचे मोठे लोक्स, हि कुल्फी दूधाची असते म्हणून स्वत:हून खाऊ घालायचे. हा दूधाचा फंडा पेप्सीकोल्यालाही लागू व्हायचा. पेप्सीकोला हे समजावे म्हणून लिहिले अन्यथा पेप्सीच म्हटले जायचे. हल्ली पेप्सी म्हटले की ते डब्बा बाटलीतले फसफसणारे पेय आठवते. तेव्हा पेप्सी म्हटले की विषय संपला. क्रिकेट खेळून झाल्यावर पेप्सी खाऊनच घरी जायचे हे कंपलसरी होते. तर आपल्या पोराने दूधाची पेप्सीच खावी असे घरच्यांना वाटायचे. पण कुठल्याही पोराला विचाराल तर त्याला त्याच्या निम्म्या किंमतीत मिळणारी सरबताची पेप्सीच चोखायला आवडायची. काल जेव्हा घरी कलिंगडाची कुल्फी बनवली तेव्हा सर्वात पहिले आठवली ती हिच पेप्सी. या पेप्सी आणि पॉपसिकल्स शब्दांचा आपसात काही संबंध असल्यास कल्पना नाही.
असो, विषयावर येऊया... तर कलिंगडाची गारेगार कुल्फी
तर फ्रिज घरात नसला तरी काकामामांकडे होता. सुट्टी पडली की आळीपाळीने एकेकाच्या घरी जाणे व्हायचे. तेव्हा भावंडांना हाताशी धरून रोजचाच हा उपक्रम असायचा. पाण्यात वा दूधात विविध प्रकारचे सरबत, फळांचे रस वा खाऊच्या गोळ्या पाण्यात विरघळवून तो द्रव पदार्थ विविध आकारांच्या पात्रात फ्रिजरमध्ये ठेवायचा आणि सेल्फमेड आईसक्रीमचा लाभ घ्यायचा. रोज आईसक्रीम केले नाही तर फ्रिजचे पैसे वसूलच होणार नाहीत हि माझी तेव्हा ठाम धारणा होती. फ्रिजचे माझ्यामते तेव्हा दोन आणि दोनच उपयोग होते. एक म्हणजे थंड पाणी किंवा बर्फ मिळते आणि दुसरे आईसक्रीम.
पुढे फ्रिज घरी आला तेव्हा मी कॉलेजला जाऊ लागलो होतो. नव्याचे नऊ दिवस म्हणून हे आईसक्रीमचे खेळ केले. पण तेव्हा त्यात मजा घ्यायचे वय उरले नव्हते म्हणा की भावंडांची सोबत नव्हती म्हणा. तितकीशी मजा कधी आलीच नाही.
आता मात्र लॉकडाऊन काळात कुल्फीपात्रांचा खजिना हाती लागला. सोबत तितकीच उत्साही पोरंही होती. त्यामुळे पुन्हा एकदा या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. सुरुवात आपल्या याच शीर्षकातील कलिंगडाच्या गारेगार कुल्फीने ...
पाकृ अगदी सोपी आहे. बहुतेकांना माहीत असेलच. तरीही औपचारीकता पुर्ण करतो -
१) कलिंगड छानपैकी कापायचा. मस्त छोटेमोठे तुकडे करून त्यातील बिया सुरीने अलगद काढून घ्यायच्या.
आमच्याकडे हे काम आईने केले.
२) मग ते तुकडे मिक्सर, ज्युसर आदि मशीनीत टाकून त्यांचा रस काढायचा. तो छानपैकी गाळून घ्यायचा आणि त्यात चवीनुसार मीठ, साखर टाकायचे.
आमच्याकडे हे काम बायकोने केले.
३) मग तो ज्यूस कुल्फीपात्रात भरायचा. संदर्भासाठी खालील फोटो बघू शकता. ते पात्र डीप फ्रिजरमध्ये ठेवायचे. एक बराच मोठा जीवघेणा काळ वाट पाहायची. सारखे फ्रिजचा दरवाजा उघडू नये हे सतत मनाला बजावत राहायचे. तरीही अधूनमधून उघडून चेक करत राहावे. त्याशिवाय मनाचे समाधान होत नाही. अखेर कुल्फी जमली असे वाटले की दांडीला पकडून खचकन खेचून बाहेर काढावी
आमच्याकडे हे काम पोरीने केले.
४) त्याचा छानपैकी फोटो काढून अपलोड करावा. माजघरातील पदार्थ जगभरात पोहोचवावा. आणि कुल्फी खाण्यातील आनंद द्विगुणित करावा.
आमच्याकडे हे काम.... अर्थात, मीच केले
५) मग काय, मस्त पेप्सीकोल्यासारखे चोखत चोखत खायची.
अरे हो,
आमच्याकडे हे काम सर्वांनी केले. पुन्हा पुन्हा केले. करतच आहेत. काय करणार, चव तोंडाला लागली की कंट्रोलच होत नाही
अवांतर - काकांनी काकूला कौतुकाने कवेत कोंडले कारण काकूंनी किचनमध्ये कलिंगड कापून कलिंगडाची कुल्फी केली
कु. ऋन्मेष
घरातल्या कुल्फीपात्राचे
घरातल्या कुल्फीपात्राचे उदघाटन ह्या रेसीपीने करीन आता Happy
>>>>
प्रयोग केल्यास रिझल्ट नक्की कळवा..
आणि हो, पोरं गोड आहेतच Happy >>> धन्यवाद
कुणावर गेलीत ते आम्ही सौ अभिषेक ह्यांचा फोटो पाहून ठरवू Wink >>>> निदान मोठ्या पोरीबाबत तरी तिने मान्य केलेच आहे की ती माझ्यासारखी जास्त आहे. छोट्याला अजून रंगरूप पकडू दे. लोकं उगाच पोर कोणावर गेले म्हणून पहिल्या दिवसापासून भांडत बसतात
लोकं उगाच पोर कोणावर गेले
लोकं उगाच पोर कोणावर गेले म्हणून पहिल्या दिवसापासून भांडत बसतात --
हे बरिक खरं हो....
आणि सगळ्यांना ते बाळ आपल्या फॅमिली सारखं वाटत असतं.. म्हणजे paternal आजी म्हणते बाबांवर गेलाय आणि maternal आजीला बाळाच्या आईचे रंगरूप दिसते, मजा असते
रच्याकने,
परीकथा आताही लिहीत आहात का?
पोरं कोणावर गेलेय यावरचे वाद
पोरं कोणावर गेलेय यावरचे वाद हा वेगळ्या धाग्याचा लेखाचा विषय होईल....
परीकथा आताही लिहीत आहात का? >>> हो, ते फेसबूक स्टेटस होते. तिथे लिहिणे होतेच. आता ऋ = अभिषेक हे डिक्लेअर केल्यावर कधीतरी निवडक ईथे टाकावे असा विचार करत होतो मध्ये.. पण या कोरोनामुळे राहिलेच.
असो,
आता झोपायच्या आधी आजच्या गुलाबकांडीचा फोटो टाकतो.
(No subject)
कुणावर गेलीत ते आम्ही सौ
कुणावर गेलीत ते आम्ही सौ अभिषेक ह्यांचा फोटो पाहून ठरवू Wink>>>> अनुमोदन
कुलफ्या भारीच दिसताहेत.
कुलफ्या भारीच दिसताहेत.
एक रुपयाचे सरबत घ्यायचो. आणि
एक रुपयाचे सरबत घ्यायचो. आणि तो गोळा त्यात बुडवून बुडवून खायचो.
>>>> कधीची गोष्ट आहे..... इतका स्वस्त ??
नवीन Submitted by च्रप्स on 16 May, 2020 - 06:4
च्रप्स १९८३-८४, पार्ले टिळकमध्ये चार आण्याला समोसा मिळायचा.
गेट्बाहेर १० पैशाला पाण्याचा पेप्सी आणि चार आण्याला दुधाचा. पुढे १९८५ मध्ये चार आण्याला पाण्याचा आणि आठ आण्याला दुधाचा झाला तेव्हा केवढी भाव वाढ वाट्ली होती. गोळा खायला आम्हा मुलीना तसे अवगढ होते कारण तेथे बरीच पोरे गर्दी करुन असायची.
कसलं सुंदर लिहीले आहे.
कसलं सुंदर लिहीले आहे.
चार आण्याला पाण्याचा आणि आठ
चार आण्याला पाण्याचा आणि आठ आण्याला दुधाचा झाला
>>>
या किंमतीला हे पदार्थ मी सुद्धा खाल्ले आहेत
गोळा खायला आम्हा मुलीना तसे अवगढ होते कारण तेथे बरीच पोरे गर्दी करुन असायची.
>>>
हो गोळेवाल्याकडे पोरांची गर्दी असायची आणि चिंचबोरेवाल्याकडे पोरींची..
मला याचे फार वाईटही वाटायचे..
फक्त आमचा सातवीला स्कॉलरशिपचा क्लास असायचा तेव्हा तासाभराने आम्ही घरी परतताना तो गोळेवाला रिकामाच असायचा. तेव्हा स्कॉलरशिप क्लासच्या पोरीही सुटल्या असायच्या त्या गोळ्याचा आस्वाद घेताना दिसायच्या. अर्थात आमची पावलेही तिथे वळायची. आणि मग दुसरया दिवशी चिडवाचिडवी
@ सामो. धन्यवाद
आज रोज सिरप आणि दूध उकळून
आज रोज सिरप आणि दूध उकळून एकत्र केले.
पण थोडे क्रिस्टल क्रिस्टल झाले.
परिणामी कुल्फी खेचताना तुटून हातात येऊ लागली.
यावर काही ऊपाय असतो का?
ब्रिटल झालेली दिसतेय कुल्फी.
ब्रिटल झालेली दिसतेय कुल्फी. दूधात पाणी असेल. चांगलं उकळून दाट करा ना दूध. मला वाटतं इश्यु सॉल्व होइल. नाहीतर थोडा खवा घालायचा किंवा मिल्क पावडर.
छान आहे पाककृती.
छान आहे पाककृती.
मागच्या दोन्ही वेळेला बेक्कार कलिंगडं मिळाली. एक खुटखुटीत आणि एक भुसभुशीत .
आता कलिंगडं ब्रेक घेतला आहे.
Rose yummy दिसतय.
****************
आम्ही Fanta soda चा सोडा उडून गेल्यावर त्यात साखर घालून मोल्ड करून orange popsicle केले होते. आणि दोन can evaporated milk + 1can sweetened condensed milk घेऊन कुल्फी करते.
Mango kulfi....1 cup mango pulp विकतचा + 1 cup unsweetened condensed milk+ 2 cup cream and sugar!
Just mix , pour and freeze. No cooking.
बेबी बनीज् गोड आहेत ऋ ही स्टेज फार लवकर जाते .सो एन्जॉय !!
परिणामी कुल्फी खेचताना तुटून
परिणामी कुल्फी खेचताना तुटून हातात येऊ लागली.
यावर काही ऊपाय असतो का?
>>> मायक्रोवेव्ह करून रबडी पिणे हा एक उपाय होऊ शकतो....
आदिश्री भुसभुशीत म्हणजे रवाळ
आदिश्री भुसभुशीत म्हणजे रवाळ असेल ग ते. काय सुपर्ब लागतं रवाळ कलिंगड.
सामो ओके. ट्राय करतो. तसे
सामो ओके. ट्राय करतो. तसे गाईचे दूध होते. आता खाली जाईन तेव्हा म्हशीचेही एखाद लीटर आणेन. आज प्रयोगाला म्हणून चारच कुल्फ्या बनवलेल्या. त्यातल्या दोन प्लेटमध्ये घेऊनच खाल्ल्या. उरलेल्या दोन उद्या फस्त करतो. तसे आई म्हणाली की पुन्हा विरघळव आणि पुन्हा उकळव. पण आता दोन कुल्फ्यांसाठी कशाला ती मेहनत.
अरे हो, मिल्क पवडर चालते का? चालत असल्यास लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. लॉकडाऊन सुरुवातीला काही पॅकेटस आणलेले. पण वापरायची वेळच नाही आली. उलट काही मिळो न मिळो, दूध दही लस्सी ताक चीज मुबलक मिळतेय ईथे. तर ते मिल्क पावडर संपवतो या कुल्फी प्रकरणात.. ती ओरिजिनल दूधातही टाकून दुधाला घट्ट करू शकतो का?
बेबी बनीज् गोड आहेत ऋ Happy
बेबी बनीज् गोड आहेत ऋ Happy ही स्टेज फार लवकर जाते .सो एन्जॉय !! >>>> धन्यवाद आदिती आणि हो, सध्याही लॉकडाऊनचा फायदा ऊचलत तेच एंजॉय करतोय. हे रोजचे सूप, मॅगी, ताक लस्सी आणि कुल्फी बनवणेही याचाच भाग आहेत.
तुमचे कुल्फी कॉम्बिनेशन नोट केले. दूधाचे प्रयोग करायला आईबायकोचेच सल्ले मदत द्यावी लागणार असे दिसतेय.
त्याआधी टॅनगचे पाकिट आहेत घरात दोन ऑरेंज आणि लेमन. ते वापरणे ऊत्तम. मुलांनाही असलंच जास्त आवडते.
बाई दवे,
बाई दवे,
कालाखट्टा सरबत कुठे मिळते? गोळेवाला सोडून कधी दिसले नाही मला कुठे विकत घ्यायला...
>>>ती ओरिजिनल दूधातही टाकून
>>>ती ओरिजिनल दूधातही टाकून दुधाला घट्ट करू शकतो का?>>>> असं दिसतय. आज मी गाजरहलवा बनवला. त्यात दूध + दूधाची पावडरच घातली. काय मस्त झालाय.
मी क्रिम +मिल्क पावडर करून
मी क्रिम +मिल्क पावडर करून खवा करते. त्याचे पेढे पण अगदीच मथुरेचे पेढे होतात. आधी इडली पिठाची कंसिस्टंसी करून परतायचे. खवाच खवा ते ही कमी वेळात !!
बाई दवे,
बाई दवे,
कालाखट्टा सरबत कुठे मिळते? गोळेवाला सोडून कधी दिसले नाही मला कुठे विकत घ्यायला...
>>रसना होते http://rasnainternational.com/wp10/works/kala-khatta/
ऋ तु आणि कटप्पा एकच ना?
मैं आजभी ऐसे सवालों का जवाब
मैं आजभी ऐसे सवालों का जवाब नही देता
मस्तच. जुन्या आठवणी आल्या. १
मस्तच. जुन्या आठवणी आल्या. १ रुपायाचा गोळा. चम्मच गोळा. सरबत, २ अडीच रुपायाचं दुध सरबत सबजा घालुन.
कलिंगड आइस कॅन्डी मस्तच.
दुध आटवुन कुल्फी करता येईल.
निलिमा कालाखट्टा लिंकसाठी
निलिमा कालाखट्टा लिंकसाठी धन्यवाद, ऑनलाईन तरी बघता येईल आता हे
ऋ तु आणि कटप्पा एकच ना? >>> काही दिवसांपूर्वी असे काही लोकांना वाटत होते.... आणि अचानक कटप्पा अमेरीकेला पोहोचले
आता मी त्या ठामपणे कट्प्पा = ऋ बोलणारया लोकांना शोधतोय, पण कोणी सापडत नाहीये
असो, कश्याला दर धाग्यावर ती डु आय चर्चा....
खरंच . काय ती दर धाग्यावर डु
खरंच . काय ती दर धाग्यावर डु आयडी चर्चा . अर्थात हरकत घेणारा मी कोण म्हणा .
पण वाचून कंटाळा येतो . अर्थात एकच गोष्ट आहे त्याबद्धल कितीही चर्चा झाली तरी कंटाळा येत नाही . तो म्हणजे अर्थातच आपल्या सर्व मायबोलीचा लाडका शाहरुखSSS
Tang popsicle Orange Flavour
Tang popsicle Orange Flavour
पोरगी नुसती तुटून पडलीय. याची कल्पना होती म्हणून मध्ये ब्रेक घेतलेला.
नॉर्मल सरबतात जितके पाणी टाकतो त्यापेक्षा कमी टाकून दाट बनवले होते.
मस्तच दिसताय popsicle. कुल्फी
मस्तच दिसताय popsicle. कुल्फी चा साचा नाहीये पण घरी आईस ट्रे मध्ये करून बघते. ॠ तुझी पिल्लं खरंच गोड आहेत,
त्यासाठी बायको सोबत तुलाही क्रेडीट बरं का लकी यू
त्यासाठी बायको सोबत तुलाही
त्यासाठी बायको सोबत तुलाही क्रेडीट बरं का Wink >>> धन्यवाद भाग्यश्री.. याला बोलतात प्रामाणिक पोस्ट
संध्याकाळी Ice Tea Peach
संध्याकाळी Ice Tea Peach flavour ट्राय केले. एकदम चटपटीत. असेही पडून होते पाकीट बरेच दिवस. सार्थकी लागले
माझ्या भाच्याला आज हा फोटो
माझ्या भाच्याला आज हा फोटो दाखवला टँग कुल्फीचा. त्यानेही लगेच एक ग्लासभर टँग बनवून चार छोट्या कुल्फ्या बनवल्या. फोटो असेल तर टाकेन. तीन तर खाऊन झाल्या बहुतेक त्याच्या.
चंपा ग्रेट
चंपा ग्रेट
फोटो असो वा नसो, धागा सार्थकी लागला. एखाद्या पोराला हे बघून करावेसे वाटणे यापलीकडचा आनंद नाही. तीन मटकावले म्हणजे आवडलेही असावे
Pages