मिसेस अमेरिका - स्त्रीवादी चळवळीची ग्लॅमरस कहाणी

Submitted by सनव on 15 May, 2020 - 12:05

सध्या मिसेस अमेरिका ही मिनिसिरीज बघत आहे. 9 पैकी 7 भाग प्रदर्शित झाले आहेत.

मिसेस अमेरिका म्हणजे Phyllis Schlafly ही रिपब्लिकन पक्षाची कर्मठ विचारांची महिला नेता. 1970 च्या दशकात अमेरिकन स्त्रीवादी बायकांनी समान हक्क कायदा (Equal Rights Amendment- ERA) नावाचा एक कायदा आणण्याचे प्रयत्न केले होते. या कायद्याला कर्मठ, जुन्या विचारांच्या पुरुषांचा अर्थातच विरोध होता. यात काही नवल नाही. पण या कायद्याला काही महिलांचाही विरोध होताच.
इलिनॉयमध्ये एक गृहिणी, श्रीमंत वकील पतीची पत्नी आणि सहा मुलांची आई असलेल्या फिलिसचे तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणात स्वतःचं स्थान प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू होते. तिने या कायद्याविरोधात महिलांची चळवळ उभारली. आसपासच्या गृहिणींना हाताशी धरून फेमिनिस्ट बायकाना फिलीसने केलेल्या विरोधाची कहाणी म्हणजे मिसेस अमेरिका ही सिरीज.

यात फिलिसची भूमिका मध्यवर्ती असली तरी The Feminine Mystique लिहिणारी Betty Friedan, Ms मॅगझीन चालवणारी ग्लॅमरस सौंदर्यवती Gloria Steinem , वकील व डेमोक्रॅटिक राजकारणी Bella Abzug, आफ्रिकन अमेरिकन राजकारणी Shirley Chisholm, रिपब्लिकन पक्षाची स्त्रीवादी राजकारणी Jill Ruckelshaus आणि इतर स्त्रीवादी महिलांचीही ही स्टोरी आहे. प्रत्येकीवर एकेका एपिसोडमध्ये फोकस केलेलं आहे.

सर्व प्रमुख व्यक्तिरेखा महिला आहेत आणि प्रत्येकीने कमाल काम केलंय. याचा अर्थ यात पुरुष नाहीत असा नाही. या बायकांचे नवरे, मुलगे, प्रियकर, सहकारी, मित्र या भूमिकांमध्ये चमकणाऱ्या सर्व पुरुष कलाकारांनीही अतिशय उत्तम पद्धतीने आपापलं काम केलं आहे. सत्तरच्या दशकातील वातावरण अचूक उभं राहीलं आहे. त्या काळातील घरं, फर्निचर, गॅजेट्समुळे त्या काळात गेल्यासारखं वाटतं. सर्वच महिलांचे कपडे, ऍक्सेसरीज, मेकअप, हेअर, स्टायलिंगवर खूप मेहनत घेतली आहे. ( 70s style vintage clothing? What's not to like!) शिवाय डॉक्यु-ड्रामा पद्धतीने बरंच जुनं खरं न्यूज फुटेज वापरलेलं दिसतं.

**

******थोडं विस्ताराने पुढे लिहीत आहे. स्पॉयलर अगदीच नको असतील तर पुढे वाचू नका.********

**

तर ही लढाई फिलिसने जिंकली. ERA हा कायदा काही पारित होऊ शकला नाही. आजतागायत होऊ शकलेला नाही. पण त्या कायद्याचा आणि एकूण स्त्रीवादी चळवळीचा जो उद्देश होता तो बऱ्याच अंशी साकार झालेला दिसतो. अमेरिकेत महिलांनी बरीच प्रगती केली आहे. अमेरिकन कल्चरच्या जगावरील प्रभावामुळे स्त्रीवादी विचार उर्वरित जगातही पोचत आहेत. She won the battle but lost the war. फिलीसने एक लढाई जिंकली पण चाळीस वर्षात युद्ध मात्र ती हरलेली दिसतेय. (निदान 2016 पर्यंत तरी तसं चित्र होतं खरं!)

Phyllis Schlafly ही व्यक्ती मला मी स्वतःला स्त्रीवादी मानत असल्यामुळे आवडण्यासारखी नाही. पण ती one dimensional खलनायिका नाही. ती complex आहे. ती डिबेटमध्ये खोटे दाखले देते(फेक न्यूज!) पण स्वतःच्या वृद्ध आईची जबाबदारीही उचलते. तिला स्वतःची अशी फारशी प्रिन्सिपल्स नाहीत पण घरातल्या आफ्रिकन अमेरिकन मदतनीस बाईशी ती प्रेमाने वागतानाही दिसते. राजकारण म्हणजे पुरुषांचं जग. तिलाही राजकारणात सत्ताच हवी आहे. तिथे राजकारणातल्या पुरुषांच्या तालावर ती नाचत नाही. She puts them in their places. त्या अर्थाने तीही फेमिनिस्ट आहेच. अशी ही न-नायिका Cate Blanchett ने अफाट साकारली आहे. (बाकी सगळं बाजूला ठेवून एक पॉलिटिकल ड्रामा म्हणूनही ही सिरीज उत्कृष्ट जमली आहे.)

स्त्रीवादी चळवळीतही अनेक वादविवाद आहेत. स्त्री म्हटलं की मल्टिटास्किंग आलंच. एकाच वेळी ERA, अबोर्शन, LGBT, वर्णभेद अशा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे आणि त्यात कशाला प्राधान्य द्यायचं हा सततचा प्रश्न समोर आहे. स्त्रीवादी महिलांकडून गृहिणी दुखावल्या जात आहेत आणि त्यातून त्या चळवळीच्या विरोधात जात आहेत (जरी चळवळीचा फायदा त्यांनाही झालाच असता!). गृहिणी-नोकरदार, गरीब-श्रीमंत, मॉम्स- चाईल्डफ्री, स्ट्रेट-लेस्बियन, गोऱ्या-कलर्ड, ग्लॅमरस- प्लेन, विवाहित-अविवाहित असे तट बायकांत पडत आहेत किंवा मुद्दाम पाडले जात आहेत व त्यातून conflicts तयार होत आहेत. पण या बायका ते conflicts सोडवून सर्वाना सोबत घेऊन पुढे जात राहतात. कर्मठ पुरुषांकडून होणाऱ्या कडव्या हिंसक विरोधाला, धमक्या, चारित्र्यहनन, हेटाळणी या सर्वाला तोंड देऊन त्यांचं आपलं काम करत राहणं कौतुकास्पद वाटतं.

प्रत्येक महिलेने आवर्जून बघावी अशी ही सिरीज अमेरिकेत हुलूवर आणि भारतात हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

Group content visibility: 
Use group defaults

वाह आजच सुरु करणार. Mrs. America सारखं डोळ्यासमोर नाचत होतं पण काय असेल हे शोधायचा कंटाळा केला. इथे लिहिल्याबद्दल आभार!

छान.
तुम्ही लिहिलय ते वाचुन ही सिरीज बघावी वाटते. केटसाठी तर नक्कीच बघेन.