वास्तु १८

Submitted by जयश्री साळुंके on 11 April, 2020 - 23:18

गिरिजा जरी मनुष्य नसली तरी तिच्यामध्ये अजुन देखील बरीच माणुसकी शिल्लक होती. तिच्यावर झालेले अत्याचार ती विसरली नसल्यामुळे कोणत्याही दुसऱ्या मुलीवर तसं काही होणं तिला त्रासदायकच वाटत होतं. त्यातल्या त्यात सई वर तर नकोच, सौम्यचा जीव जडला होता सईवर आणि सौम्यसाठी का असेना गिरिजा कडून मदत होणं हे ठरलेलं होतं असं म्हणायला हरकत नाही. पण तिच्याकडून मदत मिळवणार कशी? तिला कळेल कसं की नक्की तिला काय करायचं आहे.
सई ज्यावेळी अघोऱ्याच्या इथे पोहचली त्यावेळी तो वार करण्याच्या तयारीत होता पण सईला बघून एका क्षणासाठी तो स्वतः देखील शांत झाला. कारण आता तिथे त्याला सई दिसतच नव्हती, तिच्या जागी दिसत होत्या त्या कुमुदिनी बाई. सौम्य, रिया आणि वास्तू यांनी ज्यावेळी तिला बघितलं त्यावेळी त्यांना फक्त तिचा पेहराव कुमुदिनी बाईंसारखा दिसला होता पण अघोऱ्याला तर समोर सई दिसतच नव्हती...
काय नाही घडलं त्या एका क्षणात...
त्या एका क्षणात अघोऱ्याच्या मनात एक हलकी भीतीची लहर येऊन गेली कारण कुमुदिनी बाई जर परत आल्या असतील तर इतक्या वर्षांत त्यांचा आत्मा प्रचंड शक्तिशाली झाला असणार, आणि त्यात जर तो आत्मा सौम्यच्या हातात असेल तर... त्याच एका क्षणात त्या सहाही मुलींचे आत्मे बाहेर पडले होते, त्यातल्या पाच जणींना लगेच मुक्ती देखील मिळाली होती, कारण सई येण्यापूर्वी अघोरी त्या आत्म्यांचा वापर करणार होता अस्त्र म्हणून. पण एक क्षण वाया गेला म्हणून त्या आत्म्यांची मुक्ती झाली ह्या बंदीवासातून... गिरिजा सौम्य जवळ पोहचली त्या एका क्षणात... आणि अघोरी एकटा पडला कुमुदिनी बाईंच्या कचाट्यात.
गिरिजा इकडे आल्यावर तिने सौम्यला कुमुदिनी बाईंबद्दल सगळं सांगितलं. त्यांना बघून अघोरी घाबरला म्हणजे नक्कीच काही तरी असणार, म्हणून सौम्य तिकडे जायला निघाला. वास्तू आणि रिया विहिरीजवळच राहून सौम्यला संरक्षण देणार होते. तर गिरिजाच ह्या जगातलं काम आता संपलं होतं आणि ती पुढे जाण्यासाठी तयार होती. एक - दोन क्षण दोघं बहीण भावांनी एकमेकांकडे बघितलं. निघायची वेळ झाली होती आणि ह्यावेळी त्यांना कमीतकमी शेवटचे निरोप तरी घेता येणार होते. दोघांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं पण वेळ जास्त नसल्यामुळे जाणं भाग होतं. जातांना गिरिजा फक्त एकच म्हणाली, "सई आणि कुमुदिनी यांच्यात नक्की साम्य काय ते शोध, तुला पुढचा प्रवास करायला सोप्पं होईल". ती गेल्यावर सौम्य देखील निघाला अघोऱ्याच्या जागेवर जायला. इकडे वास्तू आणि रियाने सौम्यच्या नावाने मृत्युंजय मंत्र पठण करायला सुरुवात केली.
ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
मंत्राच्या लहरींमुळे सर्वांवरच परिणाम झाला. अघोऱ्याच्या समोर पुन्हा सई उभी राहिली, कुमुदिनी बाईंवर देखील परिणाम झाला होता. पण त्या तर मदतीला आलेल्या कारण ह्या सगळ्यांची सुरुवात चुकून का असेना पण त्यांच्याकडूनच झाली होती. त्यांच्या भावना शुध्द असल्यामुळे त्या पुन्हा आल्या. पण तेवढा वेळ सई बेशुद्ध होती. कुमुदिनी परत येईपर्यंत सौम्य देखील तिथे पोहचला होता. समोरच दृश्य बघून तो एका झाडामागे लपला...कारण त्याला सुद्धा आता सई दिसत नव्हती, तिच्या ऐवजी तिथे कुमुदिनीबाई होत्या आणि त्यांनी एका लाथेने अघोऱ्याची पुजेसाठीची मानवी कवटी उडवून लावली... त्यांचे डोळे पुन्हा आग ओकत होते.
अघोऱ्याकडे बघत असतांनाच त्यांनी सौम्यला आवाज दिला,
"झाडामागे काय लपतोस, बाहेर ये, हा अघोरी तुझ्या केसाला सुध्दा धक्का लावणार नाही हे माझं वचन आहे."
त्यांचं बोलणं ऐकून सौम्य झाडामागुन बाहेर आला, आणि त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहिला. कुमुदिनी पुन्हा गरजल्यात, "तुला नरबळी पाहिजे होता ना, तो तर तुला तेव्हाच मिळाला होता, मग पुन्हा ह्या सर्व मुलींचा जीव का घेतला?"
एवढा वेळ शांत बसलेल्या अघोऱ्याच्या डोक्यात अचानक एक गोष्ट आली, की कितीही जूना असला तरी हा आत्माच आहे आणि आत्म्याला वश करणं खूप कठीण काम नाही...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त भाग!!!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत. आता अंतिम भाग आल्यावरच वाचेन!

खुप लेट येत आहेत भाग... मला आधीचे काहीच आठवत ही नही... प्रत्येक वेळेस नवीन भाग खुप जास्त लेट येतो मग आधिची रिवीजन करावी लगते... शिवाय खुप पुढे ही सरकत नाहीये कथा..
प्लीज लवकर लवकर भाग टाका. आता लॉक डाउन मध्ये हे कदाचित जमु शकेल..
मि शेवटचा भाग आला की च वाचेन अस वाटतंय

मॅडम कथेची उत्सुकता निर्माण झाली होती पण उशिरा येणार्‍या भागामुळे हिरमोड होतो.. प्लीज पुढील भाग लवकर अन दीर्घ टाका ना..