उत्कटता

Submitted by Snehalata on 11 May, 2020 - 06:29

उत्कटता
"आयुष्य", किती मोठा शब्द, म्हणाल तर मोठा नाहीतर छोटा. या आयुष्याला किती रंग, किती छटा. काही सुंदर नाजूक तर काही गडद छटा. पण सर्व छटा नसतील तर आयुष्याचे चित्र पूर्ण होणारच नाही. त्यात फिक्कट आणि गडद दोन्ही रंग हवेच. उन्हाळ्याची दाहकता न अनुभवता पावसाळ्याची शीतलता अनुभवता येत नाही. रणरणत्या उन्हात, जीव कासावीस झ्याल्यानंतर जी पाण्याची अवीट गोडी चाखता येते ती इतर वेळी येत नाही. म्हणजे इथे प्रश्न फक्त उत्कटतेचा आहे. तशीच आयुष्याची गोडी हि जगण्याच्या उत्कट इच्छेवर अवलंबून आहे.
उत्कटता हवीच, भक्तीमध्ये उत्कटता नसेल तर भगवंत कसा भेटेल? प्रेमात उत्कटता नसेल तर पूर्णत्वाची भावना कशी येईल?
माणसाची सगळी धडपड या उत्कटतेसाठीच आहे. मग ती उत्कट गरज कशाचीही असू शकते. ती कधी भुकेची असेल तर कधी शरीराची, आणि कधी मनाचीही. कधी विचार केला आहे का? सर्व सुखे पायाशी लोळण घेत असतानाहि आपल्याला अपूर्ण का वाटत? कशाचा शोध असतो? काय हवं आहे आपल्याला? मग आपण धावत सुटतो, शोधायला. पण धावताना कधी विचारच करत नाही कि आपल्याला काय हवं आहे? माणसाला आहे त्यापेक्षा अजून काहीतरी हवं असतं. नेहमीच त्या अजून च्या शोधात आपण दम लागेपर्यंत धावतो. धावताना काही गोष्टी मिळवतो खऱ्या, पण त्या मिळवण्यात उत्कटता नसेल तर हा शोध थकेपर्यंत थांबत नाही.
प्रत्येकाची शोध घेण्याची पद्धत वेगळी आणि जागाही... साधुसंतांनी उत्कटता भक्तीत शोधली, उद्योकर्त्यानी ती कामात शोधली, मीराबाईंनी प्रेमात शोधली, तर जनाबाईंनी ती दास्यात शोधली. काही जणांनी ती कुंटणखान्यात आणि नशेतही शोधली. शोध तोच पण तऱ्हा अनेक , असे का? अगदी दारू पिणाऱ्यालाही ती उत्कटता क्षणभंगुर का होईना जगायची असते आणि त्यासाठी तो शरीराचा त्याग करायलाहि तयार असतो.
इतकी महत्वाची का आहे हि धुंदी? हि उत्कटता? कि माणसाला तिच्याशिवाय जगणं कठीण वाटावं. आपण हि उत्कटता शोधतो, पण राधा हि उत्कटता जगली. किती परिपूर्ण जीवन! कृष्ण तिच्याजवळ नसले तरी तिला माहित होते कि कृष्ण माझाच आहे. कृष्णालाही माहित होते कि राधा माझीच आहे. कुठेही शंकेला इतर विचारला स्थान नाही. स्थान होते ते फक्त उत्कट प्रेमाला. म्हणूनच ते परिपूर्ण होते, आहेत आणि राहतील.
उत्कट भावनेची गरज प्रत्येकालाच असते. आईच्या काळजीत उत्कटता असते, म्हणून आजारी पडले कि आईच आठवते. लेखकाच्या भावनेची उत्कटता त्याच्या शब्दांना मिळते आणि सुंदर कलाकृती जन्म घेते. नर्तकाच्या भावनेची उत्कटता जेव्हा त्याच्या कलेशी समरूप होते तेव्हा अप्रतिम नाट्य जन्माला येते.
राईट बंधूंच्या कल्पनाशक्तीला जर उत्कटतेची साथ नसती तर कदाचित विमान हे पुराणातील कथेतच राहिले असते. भावना जेव्हा उत्कट बनते तेव्हा ती सगुण साकार होते. भावना कशी असावी याचे मापदंड नाहीत पण उत्कट भावना आकार घेते हे मात्र नक्की, मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक.....
हो, पण हि उत्कटता सांभाळणे फार कठीण. ज्याला सांभाळता आली तो योगी आणि ज्याला नाही तो सर्वसामान्य माणूस. आपण कधी उत्कटतेच्या मागे वाहवत जातो तर कधी तिच्याशीच दोन हात करण्याचा पवित्रा घेतो. दोन्ही चूक आहे, उत्कटतेशी दोन हात आपले आयुष्य उधव्स्त करते. उत्कटता हा अत्यंत सामर्थ्यवान प्रवाह आहे, आणि बऱ्याचदा प्रवाहाला समर्पण करणेच योग्य असते.
उत्कटतेशी समरूप झालेल्या व्यक्तीला यशाची उंच शिखरे गवसतात, पण त्यांच्यासाठी ती महत्वाची नसतात, कारण आता त्यांच्याकडे परिपूर्ण आयुष्य आहे. आता त्याला उत्कटता अनुभवण्यासाठी काही मिळवण्याची किंवा काही करण्याची आवश्यकता नाही. अनेक साधुसंत, कलावंत, ध्येयवादी माणसे याच शोधात जगली.
मीही शोधत आहे माझी उत्कटता! कदाचित मला सापडेल, समजेल कि माझी उत्कटता कशात आहे, पण तोवर हे वाट पाहणं आलं, धडपडणं आलं, आणि अपृणत्वही आलंच.......
स्नेहलता

Group content visibility: 
Use group defaults

अतिशय सुंदर विषय. अतिशय सुंदर शब्द - उ-त्क-ट-ता!!
आपण सुरेख लिहीले आहेत.

ज्योतिषात, नेपच्युन म्हणजे वरुण ग्रह ही कमालीची उत्कटता प्रदान करतो आणि प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या घरात तो असतोच. त्याचे आस्पेक्टस म्हणजे दृष्टी आदिमुळे ही उत्कटता प्रखर होते. कलाकारांना, चित्रकार, शिल्पकार, नर्तक, अभिनेते, कवि यांना जी या सृष्टीपलिकडची हाक ऐकू येते, एक अनाम शीळ ऐकु येते. ती साद म्हणजे वरुणाची साद. उत्कट, जीवास पिसे लावणारी. काही लोकं नाचतात आणि पहाणार्याला नवल वाटते की हे लोक नृत्य का करत असावेत, याचे कारण त्यांना ऐकू येणारे संगीत आपल्याला ऐकू येत नसते. हा जो प्रतिभाविलास आहे सृजनाचा , नवनवोन्मेषशालीन ध्यास आहे, तरलता आहे, दिव्य सौंदर्य आहे ते म्हणजे वरुण. वरुण या प्रतला वरील, रोजमर्रा जिंदगीचा, धबडग्याचा ग्रह नाहीच. तो आहे आउटर प्लॅनेट. शुक्राचे हायर ऑक्टेव्ह म्हणतात त्याला. शुक्र जो स्वतः इतका तेजस्वी, कलासक्त, रसिक छानछोकीचा ग्रह, त्याचेदेखील टोकदारपण, त्याचे विस्तारलेपण म्हणजे वरुण.

खूप आवडले. उत्कट असणे हा सद्गुण व दुर्गुण दोन्ही असु शकतो. उत्कटता आणि सारासारविवेक दोन्ही एका वेळेस असला तर आपण काही तरी विशेष साध्य करू शकतो. उत्कटता असल्याशिवाय उत्कृष्ट निर्मिती होऊ शकत नाही.
काही यशस्वी लोकांना विशेषतः कलाकारांना पाहिले की वाटते की किती eccentric behavior आहे पण कदाचित उत्स्फूर्त अशा उत्कटतेमुळे आपल्याला त्यांच्या स्वभावाचे नीट आकलन होऊ शकत नाही !
धन्यवाद snehalata Happy