कातरवेळ

Submitted by बोकलत on 5 May, 2020 - 02:31

अशाच एका कातरवेळी पाऊस रिमझिम पडतो. ओल्या मातीचा सुगंध सगळीकडे दरवळतो. पाऊस थांबल्यावर कोणीतरी आजूबाजूचा कचरा एकत्र करून काडीपेटी लावतो. त्यातून निघणारा तो धूर त्या कातरवेळेला एक गंध देतो. तो धूर माझ्या छातीत साठवून ती कातरवेळ सरुन जाते.

अशाच एका कातरवेळी आभाळ दाटून येतं. मावळतीच्या सूर्याचा तांबूस तवंग क्षितिजावर पसरतो. मंदिरात कोणीतरी घंटानाद करतो. तो घंटानाद त्या कातरवेळेत एक ताल भरतो. तो घंटानाद माझ्या कानात साठवून ती कातरवेळ सरून जाते.

अशाच एका कातरवेळी सोसाट्याचा वारा सुटतो. जमिनीवरची धूळ गगनाला भिडवतो. कोणीतरी लगबगीने घर गाठतं. ती लगबग त्या कातरवेळेत एक तरंग उत्पन्न करते. ती लगबग माझ्या डोळ्यात साठवून ती कातरवेळ सरून जाते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अशाच एका कातरवेळी कोरोनामास्क साठी घरात फडकी शोधताना, तिने प्रेमाने दोघांच्या नावाची इनिशियल्स विणलेला रूमाल सापडतो, मोठ्या प्रयत्नाने भरलेल्या जखमेवरची खपली खर्रकन निघून जाते, आणि तिच्या अाठवणित कातरवेळ सरुन जाते

वाह! क्या बात है!

बोकलत, भुताखेतांचा उल्लेख न करता सुद्धा मस्त जमलंय लिखाण..
असेच लिहीत राहा.. आवडेल वाचायला.. Happy

छान लिहिलेय बोकलत.

रविवारी हि कातरवेळ अनुभवावी लगली तर फार त्रास देते.
अश्यावेळी आपली मायबोलीच आधार देते Happy

छान लिहलंय.
माहेरची, लहानपणीची आठवण करून दिलीत.

छान लिहीलय. जरा घाबरत घाबरत वाचलं. असं वाटलं अता ट्विस्ट आता ट्विस्ट, पण सरळ साधीच आहे, हुरहूर लावणारी कातर वेळ!

मस्त आहे कविता. फक्त प्रत्येक ओळ स्वतंत्र लिहुन पॅराच्या शेवटि "..., तेंव्हा बघ माझी आठवण येते का?" असं लिहिलंत तर इंपॅक्टफुल होईल... Light 1

बोकलत - मजा नाही आली राव... हडळ नाही, मुंजा नाही, वेताळ नाही, भूत नाही...पार्ट 2 मध्ये नक्की येऊ द्या...