अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
अनुक्रमाणिका ३ >https://www.maayboli.com/node/74455
28 फेब्रुवारी 2019
माझ्या बाळा,
तू आता मोठी झाली असं तुला वाटत असेल कारण बालपणी सारखं अंगाई गीत म्हणून मी तुला झोपवत नाही. तुझी वेणी फणी करायला, तुझं जेवणखाण पहायला, तुझ्या अभ्यासात मदत करायला, तुला माझी गरज लागत नाही. पण माझ्यासाठी तू अजूनही माझं बाळच आहेस.
जशी माझ्या सावलीत पुरेनाशी झालीस तशी, माझ्याशी जोडलेली नाळ कायमची कापून
एक एक पाऊल पुढे टाकताना, तुला दुरूनच बघते मी आणि बघतो तुझा बाबा!
तू कशी भुलते आहेस, झुलते आहेस, कशी तू तुझी स्वप्न बांधते आहेस,
जगाबद्दल, आयुष्याबद्दल मनात अनेक प्रश्न येतात ना? आणि एकही उत्तर मात्र सापडत नाही.
कळत आम्हाला, की खडतर वाटेवर तुझी वाटचाल चालू आहे आणि सोबत कोणाचीच नाही.
कधी पडते आहेस, सावरते आहेस, असे तू तुझे आयुष्य सांधते आहेस.
अंधारात गोलगोल फिरून वाट सहजी गावणार नाही, पण आईवडिलांनी दिशा दाखवली तर ते ही आता भावणार नाही.
चुकायला होईल, “होऊ दे”. फसायला होईल, “होऊ दे”
“मला माझ आयुष्य जगू दे”.
घराचा आधार हवाय, पण बंधन नको. आईवडीलांच प्रेम हवय, पण लुडबूड नको.
तुझ्याकडे इकडच जग तिकडे करायची हिम्मत आणि बळ आहे; आणि तुझ्या या वाटचालीसाठी आईबाबांचा पूर्ण विश्वास, पाठींबा, आशीर्वाद आहे.
नवीन नवीन स्वातंत्र्य मिळालेल असलं की ते चुकीच्या गोष्टींवर खर्च होत; ते होऊ देत. आपल्याच निर्णयासाठी आपल्याला धक्के खावे लागले की स्वातंत्र्याची खरी किंमत कळते. मग आयुष्याच्या सर्वात मोठ्या गरजा सांधण्यासाठी आपण आपले स्वातंत्र्य तोलामोलाने वापरायला शिकतो.
एक जमाना झाला, मी ही कधी या साऱ्यातून गेले होते, ते आठवले; तसेच लिहिले.
याआधी तुला पत्र लिहायला कधी सुचले नाही. आज पत्र लिहायला बसले तर हेच सारे सुचले.
पण मुद्दाम तुलाच पत्र लिहायचे कारण की,
डोंगर, जंगल, नद्या, धबधबे ह्यांच्या कुशीत दडलेले हे मेघालय, जिथे सरळ रस्ते नाहीतच, वरखाली, नागमोडी वळणातच चालायचे पण या वाटांवर चालणारी मनाने साधी सरळ आहेत. तुझी या मेघालयाशी खास गट्टी जमेल. डोंगर जिला हाक देउन बोलावतात, जिला निसर्गाच्या कुशीतली भटकंती आवडते, उन वारा पाउस बघत नाही, चालायला थकत नाही. निर्मळ मनाच्या माणसांचे नाते, निर्मळ मनाच्या लोकांशी पटकन जमते, म्हणून जी पहाडी लोकात सहज सामावून जाते. तू माझं असं बाळ आहेस. म्हणून क्षणोक्षणी मला तुझी आठवण येते आहे. एरव्ही तुझ्या डोंगरातल्या ट्रिप्स ना जाऊन आल्यावर पुढचे कित्येक दिवस भारावून त्त्या गोष्टी मला सांगत रहातेस. आज ही 'गुडबाय मेघालय'ची ची गोष्ट, मी तुला सांगायची ठरवली.
स्वत:ची काळजी घे. आनंदी रहा. गुणी बाळ आहेस. तशीच रहा.
तुझी मम्मा
गुडबाय मेघालय १ - https://youtu.be/pzeFQUn7y24
गुडबाय मेघालय २ - https://youtu.be/sWMWH4xg4O8
गुडबाय मेघालय ३ - https://youtu.be/YiqGAlIk9Q8
सुंदर पत्र. खूप आवडले. माझी
सुंदर पत्र. खूप आवडले. माझी मुलगीही नुकतीच स्वतंत्र झाली असल्यामुळे प्रत्येक वाक्याला 'अगदी...अगदी...' असे झाले.
साधना धन्यवाद
साधना धन्यवाद
आजच मेघालय चा तिसरा व्हिडीओ
आजच मेघालय चा तिसरा व्हिडीओ एडीट करून अपलोड केलाय. जरूर बघा.