लॉकडाऊन मुळे घराबाजूच्या छोट्याशा अंगणात आणि त्यातल्या चार सहा झाडांमध्ये जीव रमवते आहे. कोथिंबीर ,मेथी,पालक लहान लहान कुंड्या मध्ये लावला आहे. जमिनिआच्या छोट्याशा तुकड्यात मुळे लावले आहेत .चार दोन टप्पोरे टोमॅटो पण झाडाच्या कुशीत लपून डोकावत आहेत.गुलाबाला असंख्य कळ्या आल्या आहेत. वाटा ण्याचे वेल एका ग्रोबॅगेत लडिवाळ लोळत आहेत .मिरची ,वांगे,ढोबळी मिरची पण आपापल्या जागी सुखाने वाढत आहेत.
मला मात्र माझ्या माहेरच्या बागेची आठवण येते आहे. खूप मस्त होती बाग आमची. आता झाडावर एखादी कळी उमलली कि मी फोटो घेऊन ठेवते. त्यावेळी बाग प्रचंड बहरायची पण फोटो घ्यावेत हे कधी लक्षातच नाही आले. गेटच्या भिंतीकडेला पांढऱ्या रंगाची तगर अंगावर शेकडो फुले मिरवत सकाळी उठायची. त्याला लागूनच लाल भडक जास्वदींचे झाड. तेही लाल मशाली घेऊन शुभ प्रभात म्हणायचे.मग विविध रंगाची गुलबक्षी होती,मदन बाण फुलायचा....चांदण्यांचं जणू! ,गेटच्या दुसऱ्या बाजूला रात राणी फुलायचे.असा घमघमाटाचा सुगंध असायचा! या शिवाय राय आवळ्याचं झाड, पेरूची झाडे ,जांभळाची झाडे,शेवग्याचे झाड ,कोरांटी,मिरचीची फुले,अबोलीच्या केशरी माळा, जुईचे घरच्या फुलांचे गजरे,मस्त गोड पाणी आणि चवदार मलाई असणाऱ्या नारळाची झाडे ....
सकाळी सडा रांगोळी करताना तगारीच्या फुलांचा असा काही मस्त सुगंध यायचा कि बस्स .....! मग डबल मोगरा,चाफा,कण्हेर,दुपारी,बदामाची झाडे,मोगरा,शेवंती,खूप सारा पुदिना,कधी लावलेल्या भाज्या कसल्या सुंदर आठवणी आहेत ... करदळ ,केळी ,आळू ,आणि ते तीन मोठ्या पांढऱ्या पाकळ्यांचे फुल खूप सुगंधी असते ,गोव्यातही बरेच पाहिलेले ,नाव आठवेना आता .... आणि हो तुळशी वृन्दावनातली सुंदर तुळस !
पावसाळयात गौरीची फुले असायची,आघाडा यायचा,निशिगंध पण !
आणि हो ,द फेमस अनंताचे झाड ! फेमस अशा साठी कि आज्जी येणाऱ्या जाणाऱ्याकडे अनंताचे एखादे रोपटे मिळेल का ते विचारायची .... ते एकदाचे मिळाले आणि कालांतराने मस्त बहरू आले. तेंव्हा कळले आज्जीचा एव्हढा आटापिटा का बर असावा!
हि सगळी फुले काही अपवाद वगळता मला खूप खूप मिस होतात.त्यांचे सुगंध मिस होतात .माझी घराच्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीत आवडती जागा होती,पुस्तक घेऊन बसायची.तिथून अक्खी बाग दिसे आणि पावसाळ्यात सगळी बाग भिजताना पाहून खूप मस्त वाटे.आम्ही मुले पत्री गोळा करायचो ते हि आठवलं पूजेसाठी, बहुतेक मंगला गौरीसाठी लागायच्या पत्री! आणि वडाच्या झाडाचे मुलांना तारा गुंडाळून एका कुंडीत बोन्साय केलेले! ते चक्क वटपूजेला पूजा करायला उपयोगी पडायचे!
डोक्यावरच्या वाढत्या पांढऱ्या छटेची किमया म्हणा किंवा हे निसर्गाने कधी काळी दिलेले फळ फुलांचे आणि हिरवाईचे वाण अजून मनात घर करून आहे म्हणा पण खरंच हि सगळी झाडे ,फुले,पाने आणि माझी सोयरी मंडळी पुन्हा कधी भेटणार असा वाटते ... घरातला प्रत्येकजण आता विस्थापित आहे पण झाडे अजूनही तशीच आहेत. कुणी सांगावे मला भेटायला तीही उत्सुक असतील..... ! या नुसत्या विचारानेच माझा जीव टप्पोर्या फुलासारखा फुलून आला आहे!!
आता लॉकडाऊन लौकर संपो आणि जग करोनामुक्त होवो ,मग मी माझ्या फुलझाडांना भेटायला ,त्यांना कुरवाळायला,त्यांच्याशी बोलायला जाऊ शकेन!
नक्कीच जाऊ शकाल त्यांना
नक्की लवकरच जाऊ शकाल त्यांना भेटायला
(No subject)
नक्कीच भेटाल
नक्कीच भेटाल
तीन मोठ्या पांढऱ्या
तीन मोठ्या पांढऱ्या पाकळ्यांचे फुल खूप सुगंधी असते > सोनटक्का.
छान लिहिलंय! झाडांची पण
छान लिहिलंय! झाडांची पण माणसांइतकीच आठवण येते आपल्याला. लवकरच भेट होईल तुमची तुमच्या बागेशी!
Thanks all.
Thanks all.