हल्ली पोलीस विनाकारण मॉर्निग वॉकसाठी वगैरे काहीतरी निमित्त शोधून बाहेर भटकणाऱ्या लोकांना उठाबश्या, कोंबडा किंवा किंवा त्यांना पायांचे अंगठे धरायला लावणे अश्या स्वरूपाच्या कठोर शिक्षा देत असतांना टी.व्ही. वर पाहिलं आणि चटकन विचार आला , अरे हे पोलीस लोक अश्या ‘कल्पक’ शिक्षा त्यांच्या ह्या गुन्हेगारांना(?) देण्यापूर्वी आमच्या शाळेतल्या (आता सेवानिवृत्त झालेल्या) गुरुजनांना त्यांच्या हक्काचे मानधन (रॉयल्टी) किती द्यायचे? हे तरी फोन करून विचारत आहेत का? कारण अश्या शिक्षांचा आमची शाळा सोडून हे पोलीस लोक इतरत्र वापर कसा करू शकतात? कारण 'सर्व हक्क आमच्या ‘विद्या मंदिर’ मधील शिक्षकांच्या स्वाधीन' असा काहीसा हा प्रकार आहे. आमच्या शालेय वयात, आमच्या वर्ग शिक्षकांनी अश्या अनेक नाविन्यपूर्ण शारीरिक 'शिक्षां'चे प्रकार शोधून काढले होते. पुढे जाऊन त्याच शारीरिक अवस्था रामदेव बाबांनी आणि कै. अय्यंगार ह्यांनी 'योग क्रिया' नावाने त्याचं पद्धतशीर मार्केटिंग करून त्या जगभर प्रचलित केल्या. पण त्या विविध शारीरिक आणि स्नायूंच्या भौमितिक त्राटकांचे मूळ आद्य रचनाकार हे आमच्या शाळेतील गणित, भूगोल, पि.टी. आणि संस्कृत चे शिक्षक च होत! शाळेत असताना आम्हाला ह्या विषयांच्या अभ्यासाची गोडी ‘न’ लागण्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या शाळेतील शिक्षकांना ‘ह्या व्रात्य विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या’ शिक्षांचे प्रकार शोधून काढण्याचीच नंतर नंतर एवढी ‘गोडी’ लागली होती की आम्हा काही विद्यार्थ्यांना मराठीत व्याकरणाच्या नियमा प्रमाणे, 'भक्षण' करणारा तो 'भक्षक' तसा 'शिक्षण' देणारा तो 'शिक्षक' ह्या पेक्षा, 'रक्षा' करणारा तो 'रक्षक' प्रमाणे 'शिक्षा' करणारा तो 'शिक्षक' असं हे क्रियापद आणि नाम होत असावं असं काहीसं वाटायचं.
मुळांतच आमचं शालेय जीवन हे अत्यंत खडतर. दक्षिण आफ्रिकेच्या घनघोर जंगलात आमच्या पूर्वजांचे आणि वाडवडिलांचे मूळ गांव असावे. आमच्या वर्ग शिक्षकांना असा काहीतरी गैर समज झाला असावा. एव्हढंच नव्हे, तर आम्ही मागील बाकावर बसणारे काही विद्यार्थी म्हणजे एखाद्या दोनशेवर्षे जुन्या चिंचेच्या किंवा वडाच्या झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या डार्विनच्या सिद्धांतातील 'माकडा'चे वंशजच आहोत. 'गोरिला', 'चिंपांझी' किंवा 'ओरांग-उत्तांग' एवढाच बुध्यांक आमच्या ह्या विद्यार्थ्यांच्या आदिम जमातीला लाभलेला असावा. तसेच आमची ही जमात आम्हाला वंश परंपरागत मिळालेला हा तुरळक बुध्यांक फक्त आणि फक्त विध्वंसक कृत्यांसाठी वापरू शकतो. आणि त्यामुळे शिक्षक होण्यासाठी असलेल्या बी.एड. च्या अभ्यासक्रमात विध्यार्थ्यांच्या जडण घडणी करता आणि शैक्षणिक वाढी साठी शिकवलेले कोणतेच पर्याय जणू काही आम्हाला लागूच पडणार नाहीत. त्यामुळे डी.एड. / बी.एड. मध्ये शिकवलेल्या मुळमुळीत शिक्षण पद्धतीपेक्षा, सरळ सर्कशीत रींग मास्टर रानटी पशूंना ज्या सोप्या साध्या आणि सुटसुटीत (चाबकाने फटके देणे वगैरे) शिक्षण पद्धती वापरून ‘सर्कशीत खेळ’ करायला शिकवतात “त्या शिक्षण पद्धती (थोड्या) कठोर आणि (किंचित) निष्ठुर जरी असल्या तरी जास्त चांगल्या तर्हेने लागू पडतात” असा आमच्या गुरुजनांचा एकंदर अनुभव होता. कारण ह्युमन राईट्स वाल्यांचे सुद्धा त्या काळी 'कुत्रं' सुद्धा हाल खात नसे, पेटा बीटा वगैरे ऍनिमल राईट्स वाले तर दूरंच राहिले.
मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर नेमकं शरीर सुस्तावलं असताना, दुपारी डीड ते दोन च्या दरम्यान ग्रीष्मात पडावं तश्या रणरणत्या उन्हात, दोन्ही गुडघ्याच्या मागून, डोके खाली जमिनीकडे वाकवून हाताने पंधरा मिनिटे स्वतः चे कान स्वतः पकडल्यावर कानाची पाळी लाल बुंद होते पण सतरा आणि एकोणीस चा पाढा लगेच पाठ होतो. 'पृथ्वी वर पडणाऱ्या सूर्य आणि चंद्र ग्रहणाच्या सावल्यांची चित्रं काढा' ह्या विषयावर दिलेला गृहपाठ न केल्या बद्दल भूगोलाचे सर लाकडी बाकावर तळहात खाली चिटकवून वर लाकडी पट्टीने उभे वार करून बोटांच्या पेरांचे छोटे छोटे सांधे दुखेस्तोवर झेललेले आघात आणि नंतर तीन दिवस माझ्या सकट इतर चार विद्यार्थ्यांची सुजलेली अर्थो'पिडीत' बोटं, शाळेतील शिक्षण सोडाच पण पुढील संबंध आयुष्यभर 'अभ्यासाची' आवड ह्या विषयाला कायमची ग्रहण लावून गेली.
बऱ्याच वेळेस तर आम्हाला, आम्हाला म्हणजे आमच्या सारख्या सरासरी पासष्ट टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विध्यार्थ्यांना , आपली एकंदर शाळेतील उपस्थिती ही शाळेचा 'पट' भरलेला असला पाहिजे , त्या शिवाय शासनाकडून मिळणारी 'ग्रॅण्ट' मिळणार नाही ह्या करीता आहे की काय असं वाटायचं , एवढं आमच्या ह्या एकंदर पासष्ट टक्क्यांच्या पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे केलं जायचं.
हुशार विद्यार्थ्यांना जेंव्हा वर्गात शिक्षक लोक सहामाहीचे पेपर वाटप करत असंत आणि जोरात…
'प्रद्युन्म पुसाsssळकर...गणिsssत १०० पैकी ९९'... अरे! एSsss ट्टाळ्या वाजवा रे जोराsत…”
आमच्या कडे काहीही कारण नसताना रागाने रागा डोळे वटारून होनमोरे सर ज्या पद्धतीने पाहत आणि ओरडून ओरडून प्रद्युन्म साठी टाळ्या वाजवायला सांगत, ते पाहून एकंदर अत्यंत अभ्यासू , एकाग्र आणि एकपाठी तसेच एकलव्याचा सावत्र भाऊ शोभणाऱ्या अश्या ह्यां प्रद्युन्म पुसाळकर नावाच्या आमच्या सहअध्यायांस गणितात पुढील वर्षी १०० पैकी १०० मार्क पाडण्याचं प्रोत्साहन जोरजोरात टाळ्या वाजवून देण्यासाठी कुणीतरी वर्गात असावं म्हणून आम्हाला शाळेत यावं लागत असावं अशीच आमची एकंदर धारणा झाली होती. प्रद्युन्म पुसाळकर अभ्यासात हुशार होता ह्यात काही शंका नाही, कारण त्याला एकट्या गणितात जेवढे गुण पाचवी ते दहावी ह्या पाच वर्षांत पडले तेवढे मला गणित व भूमिती दोन्ही मिळून एकदाही पडले नव्हते. पण म्हणून माझं ह्या पृथ्वी तलावरील चिमुकलं अस्तित्व फक्त प्रद्युन्म च्या यशाप्रीत्यर्थ टाळ्या वाजवण्यापुरतं सीमित असावं? पण संस्कृतच्या तासाला सुभाषित पाठ नाही म्हणून कोंबडा होणे आणि इतिहासाच्या तासाला अभ्यासक्रमाचं अक्ख वर्षं संपत आलं तरीही अजूनही सनावळ्या पाठ होत नाहीत म्हणून पस्तीस मिनिटं बाकावर उभा राहणे ह्या शिक्षां भोगतांना मी एवढा व्यग्र होऊन जाई की 'प्रद्युन्म पुसाळकर' ह्या वयाच्या मानाने चक्क दहा वर्षे अधिक पोक्त वागणाऱ्या अकाली प्रौढत्व आलेल्या विद्यार्थ्यांची वर्षा गणिक होत असलेली असलेली शैक्षणिक प्रगती आणि त्याला प्रोत्साहन पर म्हणून टाळया वाजवण्या पुरतं आमचं शालेय अस्तित्व हे आपलं नक्की यश? की अपयश? ह्या असल्या शुल्लक विचारांकरिता मला वेळच नसायचा.
नाही म्हणायला मला शाळेत आपटे बाई मात्र होत्या, मराठी शिकवायला सुंदर, त्यांनी कधी मार्क नाही दिले 'देता देशील किती दो कराने' असं म्हणत, पण भाषेची आवड मात्र लागली...आणि ती मात्र कायमचीच. मराठीत आम्हाला बालकवींची कविता आवडायची...पु.भा. भावेंची लघुकथा होती एक सुंदर सातवीला ती आवडायची, शंकर पाटलांचा 'खेळखंडोबा' हा माकडांच्या शिरगणतीवरचा एक धमाल लेख होता आम्हाला धडा म्हणून पाचवीत की सहावीत तो आवडायचा, शांताबाई शेळक्यांच्या आणि सरोजिनी बाबर ह्यांच्या कविता असायच्या गोड, नाजूक पानं , फुलं , पक्षी आणि पक्षांची घरटी असलेल्या त्या आवडायच्या. रानवनातले मारुती चितमपल्ली होते, पु.लं. तर हमखास! शिरीष पैंचा कोणता तरी लेख होता सुंदर आता विषय आठवत नाही. बाबा आमट्यांचा आनंदवन वरचा एक धडा होता त्या वयातही जाणिवांचे अंकुर फोडणारा. अहो एवढंच काय त्या वयात आम्हाला ग्रेस आणि आरती प्रभू होते...काय भाग्य आमचं!
पण आमचं दुर्दैव काय आणि किती पहा ! केंद्रीय किंवा राज्य मंत्रिमंडळात जसं परराष्ट्र, संरक्षण आणि अर्थ खात्या पुढं , सामाजिक सलोखा आणि प्रौढ शिक्षण खातं जसं कोपऱ्यात बसून फक्त त्यांचं अस्तित्व जपण्याची धडपड करत असतं तसे आमचे हे आवडीचे, लाघवी आणि भाषेचा कुठला तरी जुना ऋणानुबंध असलेले विषय पण गुणांच्या शर्यतीत कुठेच पुरेसे न पडणारे! आम्हाला चांगली कविता वाचता येते म्हणून कधी टाळ्या मिळाल्या नाहीत की 'बखर' तोंडपाठ झाली म्हणून कधी आमची टक्केवारी वधारली नाही. आमच्या प्रोत्साहना साठी आम्हीच आम्हीच आमच्या आवडीची कविता खिडकीत बसून एकट्यानं पण मोठ्यानं म्हणायची आणि आम्हीच टाळ्या वाजवायच्या.
आता इतकी वर्षं उलटली. शाळा सुटली, कॉलेज संपलं , नोकरी लागली, “सप्तपदी” होऊन लग्न पार पडलं , पण इतकं होऊन सुद्धा अजून सुद्धा ( हल्ली हल्ली ह्या पोलिसांनी कोंबडा केल्याच्या स्टार माझा वरच्या बातम्या बघून जरा जास्तंच ) मध्यरात्री किंवा पहाटे अचानक कुठलं तरी भकास स्वप्न पडून जाग येते - 'कुमठेकर सरांनी' अंकगणितातली पाठ करून घेतलेली “बहुपदी” पाठ करून परत लिहायला चुकली म्हणून आणि मग सर फळ्या पासून तरातरा चालत मागे येत मागून दुसऱ्या बाकावरून मला कान धरत उठवून वर्गा बाहेर काढत एका 'पाया'वर उभं राहायची शिक्षा दिलीये दरवाज्यापाशी उन्हांत ! असं काहीसं स्वप्नं !
चारुदत्त रामतीर्थकर
२५ एप्रिल २०२०, पुणे
सहीच, एकदम वर्गात नेऊन बसविले
सहीच, एकदम वर्गात नेऊन बसविले
धन्यवाद निलूदा !
धन्यवाद निलूदा !
हाहाहा! पाचवी नंतर शाळेतला
हाहाहा! पाचवी नंतर शाळेतला सर्वाधिक वेळ वर्गाबाहेर घालवलेला आठवला. कारणं चालू तासाला कथा, कादंबऱ्या वाचणे. आमच्या बॅच मधून सर्वाधिक पुस्तकांची नोंद माझ्याच नावावर असावी. पाणी प्यायला सांगून संपूर्ण शाळा पालथी घालणे हा आवडता कार्यक्रम!