गहू
जुन्या मायबोलीवरचे लेखन इकडे हलवताना लक्षात आले की आता पारंपारीक पद्धतीने केल्या जाणार्या प्रकारात बरेच बदल झालेत. खरतर त्यामुळे कुरड्या करणं आणखी सोईस्कर झालय.
ग्रामिण भागात उन्हाळा आला की ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी बायकांची तारंबळ उडायची, आताही उडतेच पण आता बर्याच ठिकाणी कुरड्या तयार करून मिळतात. गहू दळण्यासाठीचे यंत्र आता आकाराने मोठे झालेत तसेच ते आता मोटरचलित झालेत. तुमचे भिजवलेले गहू घेवून गेलात की तुम्हाला प्रति किलो दराने ते दळून मिळतात.
खेडेगावात १० - १२ घरांच्या छोटछोट्या वस्त्या असतात. ह्या सगळ्या बायका एकत्र येवुन मग कुरड्या करायचा कार्यक्रम पार पाडत. कुणाचे गहू कधी भिजत घालायचे इथपासुन सुरुवात होते.अगदी टपोर्या म्हणजे चांगल्या प्रतिच्या गव्हाचे दळण केले जाते. एखादीकडे जर चांगले गहू नसले तर गव्हाची उसणवारी होते. गहू भिजत घालण्यासाठी ठेवणीतले माठ निघत, हा माठ किमान २ वर्ष जुना असावा लागतो. बुडाला सिमेंट लावलेला माठ वापरत नाहीत.तुम्हाला कळलेच असेल की गावी प्रत्येक घरी एका खोलीत नेहमी माठांची चळत लावुन का ठेवत ते. ह्या माठांचीही देवाणघेवाण चालायची. आता घरोघरी माठाऐवजी स्टीलचे पिंप वापरतात
एका दिवशी साधारण २ ते ३ पायल्या गहू भिजत घातले जातात.(१ पायली= २ आधुल्या. माझ्या माहेरी एका पायलीत साधारण ५ की. तर सासरी एका पायलीत ७ की धान्य मावते).
दुसर्या दिवशी पुन्हा दुसरा हप्ता भिजत घातला जातो माठ कमी पडत असतील तर मग स्टिलच्या टिपेत पण गहू भिजत घालतात. हे गहू तीन दिवस भिजू द्यावे लागतात. चौथ्या दिवशी हे वाटले जातात. पुर्वी हे पाट्यावर वाटले जात. मग घरोघरी गहु दळण्याचे यंत्र आले. एका पाटाला हे यंत्र धुवुन लावले जात. हा पाट साधारण दोन तिन विटांवर ठेवला जातो, जेणेकरुन त्याचे हॅंडल फिरवता येईल एवढ्या उंचीवर ठेवले जाते. टोपलीत किंवा चाळणीत भिजलेले गहू काढले जातात आणि ते धुवुन निथळवले जातात. मग ते यंत्राच्या सहाय्याने हे दळतात. गहू दळायचे काम साधारण दुपारीच केले जायचे. ह्या कामात मुलांची मदत व्हायची, यंत्र फिरवायला. आता हे भिजवलेले गहू मोटरचलित यंत्रातून वाटून आणतात. इथे महत्वाचे काम असते ते हे दळलेले गहू पिळायचे. त्यासाठी दोन मोठे पातेले घेतात. पहिल्या पिळणीनंतरचा कोंडा दुसर्या पातेल्यात टाकतात आणि तो पुन्हा एकदा पिळला जातो. हे गहू पिळण्याचे काम फारच किचकट असते. त्यात गावी पुर्वी हातातल्या बांगड्या इतक्या घट्ट चढवलेल्या असायच्या की त्या उतरवायला कासार हवा असायचा, त्यामुळे गहू पिळायला सुरवात करण्यापुर्वी हाताला आणि बांगड्यांना तेल लावले जायचे. एव्हाना एक एक माठ ज्यात गहु भिजत घातले होते ते रिकामे होतात. ते पुन्हा धुवुन विसळुन व्यस्थित ठेवले जातात. पडणार, लवंडणार नाही याची खात्री करुन घेतली की मग गहू पिळताना सोबत ते गाळण्याचे ही काम करावे लागते. ते आधी पिठ चाळायच्या चाळणीने गाळले जाते. पुन्हा ते माठावर एक पातळ कापड बांधुन ( ह्यासाठी शक्यतो पांढरे धोतर कींवा उपरणे वापरतात ) त्यातुन गाळले जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे हे गहू पिळण्यासाठी शक्य तितके कमी पाणी वापरावे लागते.
हा सगळा गोंधळ आटोपला की मग वापरात आलेले सर्व भांड्यांची रवानगी विहिरिजवळ होते. मोकळ्या वाहत्या पाण्यात भांडे धुण्याचे काम आटोपते. मग एकदा चहापाणी होतो. दुसर्या दिवशी सकाळी कोण ४.०० वा. तर कोण साडेचारला येणार हे ठरते. आणि जमलेल्या बायकांची पांगापांग होते.
जिच्या घरी कुरड्या होणार आहेत तिला बाकिचे साहित्य गोळा कारायचे असते.
(१) कुरड्या सुकवायला किमान ४ पलंग (लोखंडी पट्ट्यांचे) वापरत. ते कमी पडत असतील तर मग बाजांना मान मिळतो.
(२) दुसरी लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे कुरड्या सुकवायला गव्हाचे काड वापरत. ज्यांचे कुणाचे गहू आगस असतिल ते सोंगणीला लवकर येतात. ह्यात मग हे गहू मळणीयंत्रात घालण्यापुर्वी २० - २५ पेंढ्यांच्या ओंब्या हाताने खुडून हे काड बाजुला ठेवले जात आणि हेच काड सर्वांच्या घरी कुरड्या सुकवायला वापरले जात. वस्तीवरच्या सर्वांच्या कुरड्या होईस्तोवर ह्यांना जीवापाड जपले जात. आता गहू सोंगणीसाठी हार्वेस्टरचा वापर होतो. तसेच फारसे कोणी कुरड्यासाठी म्हणून काड काढत नाहीत मग आता कुरड्या सुकवण्यासाठी प्लास्टीक कागदाचा वापर केला जातो. कागदावर सुकवलेल्या कुरड्या एका बाजूने जरा चपट्या होतात.
(३) कुरड्या करायचा सोर्या. हा सोर्या लोखंडी असतो तिन किंवा चार पायांचा. उंचीला साधारण अडीच ते तिन फुट असतो त्याला १४ ते १५ सें.मी. ची एक खोलगट भाग असतो त्यात चिक भरतात. एक लोखंडी दांडी असते आणि त्यालाच एक लाकडी किंवा लोखंडी ताटली जोडलेली असते की जेणे करुन ह्याने चिक दाबला जातो. किलो -दोन किलो गहू असतिल तर हातसोर्याचा वापर करतात.
(४) चिक हाटायला पितळेची मोठी डेगी (तपेलं), ह्यला मात्र आतुन कल्हई केलेली असावी लागते नाहीतर चिकाला हिरवा रंग येतो.
(५) चिक हाटण्यासाठी मोठा लाकडी चाटू वापरतात तो साधारण साडे तिन फुट उंच असतो.
(६)पितळी चरवी. पाणी हिनेच मोजतात. आताशा ह्या पितळेच्या चरव्या गायबच झाल्यात. त्यांची जागा कळश्यांनी घेतलिय. किती पायल्या गव्हाला किती चरव्या हा अंदाज ठरलेला असतो, चिक शिजत असताना तिच्यात पाणी भरुन ती डेगीवर ठेवली जाते. पाणी कमी पडतेय असा अंदाज आला कि ह्यातलेच थोडे पाणी घालता येते.
(७) तिन दगडांची चुल मांडावी लागते. जमिन थोडिशी खोदुन हे दगड मांडले जातात. चुलीसाठी लागणारे सरपण तयार ठेवले जाते.
ह्या सर्व सामानाची जमवाजमव करुन बाई निवांत होते.
दुसर्या दिवशी सकाळीच उठुन चुल पेटवतात. मग डेगीला माती लावतात. ती चुलिवर ठेवून तित चरवीने पाणी मोजुन टाकतात. ह्यात मिठ व तुरटी टाकतात व वर एक चरवी पाण्याने भरुन ठेवतात.
घरची एखादी पुरुष मंड्ळी जर चिक हाटणार असेल तर ठिक नाहीतर चिक हाटणार्या काका / तात्यांना बोलावुन आणायचे. बायकाही चिक हाटतात. परंतु प्रत्येक वस्तीवर एक तरी पारंगत पुरुष असतोच. चिक हाटणे हे काम तसे ताकदीचे आणि स्किलचेपण.
पाण्याला आधण येईपर्यंत चिक फोडला जातो. आधल्या दिवशी गाळुन ठेवलेला चिक एव्हाना तळाशी घट्ट होऊन बसलेला असतो. वरती अगदी नितळ पाणी तरंगत असते. हा माठ तिरका करुन काळजीपुर्वक ते ओततात. खाली जमलेला चिक / सत्व हे एका भांड्यात काढतात. पाण्याला उकळी आली की मग बांगड्या किंवा बाह्या आणि चाटू सरसावला जातो. एकीकडे हातात चाटु गरगर फिरायला लागतो तर दुसरीकडे एकजण चिकाची धार डेगित सोडत असते. चाटू फिरवताना तो विशिष्ठ पध्दतिनेच फिरवला जातो. सुरुवातिला नवशिक्यांना संधी मिळते. मी हा मान आत्तापर्यंत दोनदा पटकवलाय. चुलीतले सरपण जरा आतबाहेर होते. मग हा चाटू काकुकडे किंवा आजीकडे जातो. माझी आई, चुलत आजी ह्यांचा नंबर इथे लागतो मग शेवटी (अर्जुन)तात्या आपल्या बाह्या सावरतात आणि चाटू आपल्या ताब्यात घेतात. मी मात्र बघतच बसते की ह्यावेळी जर मी हाटत असते तर चाटू ईंचभर सुध्दा हलला नसता इथे तर तो चक्क नाचतोय...
आजुबाजुला असलेल्या तज्ञ आजी डोकावत असतात, त्यांनी पुरे म्हटले की चाटू जागीच थांबतो. पलंग, बाजांवर काड पसरवले जातात.
चिक हाटणारे अर्जुनतात्या आता म्हातारे झालेत. काही आज्ज्या देवाघरी गेल्यात काही जाण्याची वाट बघतायेत. मात्र नव्या पिढीत नवे लोक तयार झालेले असतात.
डेगी उतरते आणि सोरे मांडलेत तिथे स्थानापण्ण होते. एवढ्यावेळात उशिरा येणार्या एक दोघी जनता)चिल्लेपिल्ले) पाठीशी घेउन येतात. गायीच ताजं दुध निघालेलं असतं (प्युअर) दुधाचा चहा होतो, तात्या आपल्या कामाला निघुन जातात आणि सोरे सरसावले जातात. ह्या सोर्यावर कुरड्या करायच्या म्हणजे दोन व्यक्ती लागतात. एक कुरडई चाळायला आणि दुसरी सोर्या दाबायला. तिसरी व्यक्ति कुरडई काडावर टाकायला. ह्या सगळ्या प्रकारात माझी घाई वेगळीच असायची. साखरेचा डबा, जरा जास्तच खोलगट ताटली घेऊन मी तयारच असायचे. कुरड्या ह्या ताटलिच्या उलट्या बाजुने चाळल्या जातात माझी ताटली मात्र सुलट जात. सोर्यात आहे तेवढा चिक दबला गेल्याशिवाय माझी ताटली हलत नसायची. एकदा गरम गरम चिक पोटात गेला की मग कितीही वेळ सोर्या दाबायला मी सिद्ध.
आमच्या शेजारच्या एका आजींना सोर्या दाबण्यासाठी मदत नको असायची, सोर्या फिरवुन उलटा ठेवत म्हणजे उजव्या हाताने दाबायचे आणी डाव्या हाताने चाळायचे. मला तर जाम कौतुक वाटायचे. हे असे करणे फारच अवघड असेन असे वाटायचे पण मीही ह्याच पद्धतीने कुरड्या चाळायला शिकले.
चिक गरम आहे तोपर्यंत छान कुरड्या येतात, एकदा का तो थंड झाला की मग एकदा सोर्यातुन संपुर्ण दाबुन काढावा लागतो आणि पुन्हा टाकुन एक एक करुन चाळावी लागते.
पहिल्या दिवशीच्या कुरड्या ईतर दिवसांपेक्षा कमी होतात कारण पहिल्या दिवशीचा चिक हा घरोघरी वाटला जातो. काकुंसोबत आलेल्या जनतेला दुध साखरेसह दिला जातो. हि जनता ही काम करते बरंका! सोर्या दाबण्याचे, कुरड्या टाकण्याचे. दुसर्यांच्या घरी कुरड्या असतील तर मग आमचा समावेश जनतेत असायचा.
जेमतेम सकाळचे ८.३० किंवा ९.०० वाजलेले असतात, पुन्हा एकदा चहा होतो. भांडे धुवायला विहिरीवर जातात. दिवसभराचे कामे दुपारपर्यंत आटोपली जातात आणि दुसरा हप्ता वाटायला घेतला जातो.
दुपारच्या जेवणात अर्धवट वाळलेली कुरडई खाताना तसेच संध्याकाळी सुकलेल्या कुरड्या पाट्यांमध्ये भरुन ठेवताना गळुन पडलेल्या कुरकुरीत काड्या खाताना येणारी मजाच वेगळी. सगळे हप्ते करून झाल्यावर सर्व कुरड्या कडकडीत उन्हात पुन्हा एकदा सुकवल्या जातात आणि मग पत्र्याच्या किंवा स्टीलच्या मोठमोठ्या डब्यांत बंद होतात.
आता कुटूंब विभक्त होऊ लागलीत तसेच छोटी पण होऊ लागलीत त्यामुळे २ पायल्यांचा एकच हप्ताही काही घरांमधे पुरतो.
झाल्या तयार वर्षभराच्या सणासुदीच्या, लग्नकार्यासाठीच्या कुरड्या तयार. लग्नात रुखवद म्हणुन लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाच्या केल्या जातात.
दमला असाल ना एवढ सगळं एका दमात वाचून तर मग तुम्ही खा आता मनमुराद, हव्या तेवढ्या कुरड्या.
गावी कुरड्या करतानाचे फोटो काढून ह्या लेखात समावेश करायचा विचार होता पण करतेवेळी माझे जाणेच झाले नाही. आयत्या तयार, मस्त सुकवून मला निघतेवेळी कुरड्या घरपोहोच मिळाल्या त्यामुळे फोटो पुन्हा कधीतरी.
जुन्या मायबोलीतले लिखाण संपादित करताना जुनी पद्धत तसेच नव्याने होणारे बदल लिहिताना, लिहिण्यापेक्षा आठवणीतच जास्तवेळ रमल्यामुळे लिखाणात काही चुका राहण्याची शक्यता आहे.
आरती, खास तुझ्या आग्रहामुळेच हे लिखाण इकडे स्थलांतरीत झाले. धन्यवाद!
मस्त लिहिलय नलु. कित्येक
मस्त लिहिलय नलु. कित्येक वर्षात कुरड्या सोहळ्याला माझी उपस्थिती नाही. आताशा तर मम्मीने पण करणे सोडुन दिले.
एवढा खटाटोप होत नाही आणि पूर्वीसारखे आता आपण , आपली पिढी तळण तेवढे खात नाही.
पण तुझ्या या लेखाने खूप जुन्या आठवणींची मनात गर्दी झाली.
मस्त लेख !
मस्त लेख !
नलिनी, नॉस्टॅलजिक केलस तू
नलिनी, नॉस्टॅलजिक केलस तू अगदी.
लहानपणी आजोळी लोणीला(प्रवरानगरला) जायचो आम्ही सुट्ट्यांमध्ये. आजी मळ्यात रहायची माझी, त्यामूळे मळ्यातल्या १२-१५ घरांच्या बाया (पोर-टोर) एकत्र मिळुन आळीपाळीने सगळ्यांच्या कुरड्या,शेवया करायच्या.सगळ्या आठवणी जाग्या केल्यास तू. कित्ती दिवसांत नेमकी ती वेळ साधुन जाताच आल नाहीये गावी. अन तळण खाण पण जवळजवळ बंदच झालय. तरी सार - कटाची आमटी- आणि कुरड्या मला आणि घरात सगळ्यांनाच फार आवडतात. आजही आजी कुरड्या आणि शेवया पाठवून देतेच आल्यागेल्याबरोबर.
आता गावाकडच्या सगळ्याच आठवणी पिंगा घालत रहाणार मनात बराच काळ......
सर्वांना धन्यवाद! दिनेशदादा,
सर्वांना धन्यवाद!
दिनेशदादा, अरे त्याय सॉरी काय? आम्हाला पण माहिती होतेच की ह्या अवांतर चर्चेतून.
ह्यासगळ्या कार्यक्रमात कोंड्याच्या पापड्या पण होतात. एकाच पाण्यात पिळलेला कोंडा एक दिवस बाजूला काढून ठेवतात. कुरडया करून झाल्या की मग ह्या पापड्या करायला घेतात. ओला कोंडा, ज्वारीच्या कण्या, लसूण, लाल तिखट, मिठ हे हे सगळे एकत्र शिजवतात व कागदावर किंवा साडीवर थापून सुकवतात. आहारावर भाजलेल्या पापड्या अतिशय चवदार लागतात.
आम्च्या शेजारच्या काकुनी
आम्च्या शेजारच्या काकुनी कुरडया केल्या होत्या.खुप छान झाल्या होत्या.
वा मस्त लेख !! आमच्या घरी
वा मस्त लेख !!
आमच्या घरी दरवर्षी उन्हाळ्यात गव्हाचा चिक करतात.. पण आम्ही कुरड्या वगैरे करत नाही.. फक्त खाण्यापुरता चिक.. कुरड्या विकतच्या..
मला पूर्वी तेल तिखट घालून चिक खायला आवडायचं.. पण गेल्या काही वर्षांपासून दुध साखर घालूनही आवडायला लागला आहे.. .
छान लेख नलिनी. गव्हाच्या
छान लेख नलिनी.
गव्हाच्या कुरड्या म्हणजे जीव कि प्राण
होळीच्या दिवशीचा पुरणपोळी, कटाची आमटी, भात आणि कुरडया हा अतिशय आवडता मेन्यु. तळलेल्या कुरडया नुसत्याच खायलादेखील आवडतात. पण सोबत तुरीच्या डाळीचे वरण, मेथीची दाण्याचा कुट (किंवा मुगाची डाळ) घालुन केलेली भाजी, ज्वारीची भाकर, भात असेल तर दोन घास जास्त जातात.;-) यावर्षी साबांनी गव्हाच्या कुरडया, साबुदाणा पापड आणि तांदळाचे पापड पाठवलेत.
शनिवारच्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत बेसनाच्या कुरडयाचा उल्लेख होता.
हि लिंकः
विदर्भीय झटका, चवीचा ठसका
आमच्याकडे गव्हाच्या कुरडया
आमच्याकडे गव्हाच्या कुरडया फारशा केल्या जात नाहीत. तांदळाच्या आणि साबुदाण्याच्या पापड्या मात्र दरवर्षी होतातच.
लेख आवडला. फोटो पण असते तर सोनेपे सुहागा.
फोटो पण असते तर सोनेपे
फोटो पण असते तर सोनेपे सुहागा.>>>>>+१
अरे वाह. मस्त वाटले ऑथेंटीक
अरे वाह. मस्त वाटले ऑथेंटीक प्रोसेस वाचुन.
मी घरीच गव्हाचा चीक करते व वाळवलेला चीक विकतेही.
मागच्या महिन्यात ताज्या चीकाचे पळी पापड करायला घेतले पण मधेच काहीतरी काम निघाले त्या गडबडीत तो शिजत ठेवलेला चीक घट्ट झाला. मग काय सोर्या काढला नी कुरडई केल्या.
पण त्या स्वच्छ पांढर्या दिसत नाहियेत व मस्त फुलत पण नाहियेत. तुरटी न टाकल्याने झाले असेल का असे? पण चव अगदी मस्त आलीये.
पळी पापड करायला घेतले
पळी पापड करायला घेतले ......म्हणजे काय ते सांगाल का?
पळी पापड करायला घेतले
पळी पापड करायला घेतले ......म्हणजे काय ते सांगाल का?>> सेमी सॉलीड असे शिजवलेले पीठ चमच्याने नाहीतर पळीने वाळत घालतो ते. जसे साबुदाण्याच्या चिकवड्या. तसेच कोणतेही पीठ शिजवुन चमच्याने वाळत घालता येते. थोडक्यात कुरडयांचा घोळ नको म्हणुन मी शोधलेला हा सोपा ऑप्शन आहे
ekhada kurdyancha photo asta
ekhada kurdyancha photo asta tar changle jhale aste.
मोनाली, सुकवलेल्या पांढर्या
मोनाली, सुकवलेल्या पांढर्या दिसत नाहीत की तळलेल्या?
तुरटी घातलेली असेल तरी सुकवलेल्या जराश्या पिवळसरच दिसतात पण तळल्या की पांढर्या शुभ्र होतात.
सुकवलेल्या पांढर्या दिसत
सुकवलेल्या पांढर्या दिसत नाहीत की तळलेल्या?>> दोन्ही.
जाऊदे झाल उन्हात काळवंडल्या असतील बिचार्या
फार सुरेख लिहिलय नलिनी.
फार सुरेख लिहिलय नलिनी. आमच्याघरी हातावरच्या शेवया, सांडगे पापद करताना असचं वातावरण असायच. अगदी आठवण झाली तुझ्या लेखामुळं.
नलिनी, छान लेख!परत एकदा वाचला
नलिनी, छान लेख!परत एकदा वाचला.
यावेळी मीही कुरडया केल्या.यू ट्यूबवर १-२ व्हिडियो पाहिले आणि जवळ्जवळ १/२ किलोच्या कुरडया केल्या.सध्या वाळत आहेत. अजून १/२ किलोच्या करायच्या आहेत.पण तो चिक हाटणे प्रकारात हाताची वाट लागते खरी.
रच्याकने,उरलेला कोंडा शिजवून मग सांडगे करायचे की नुसतेच करायचे?
1/2 किलोच्या किती झाल्या?
1/2 किलोच्या किती झाल्या?
माझी शेजारीण/मैत्रीण सोसायटी मध्ये विकते आहे.. 400rs ला शेकडा.
मी 100rs च्या घेतल्या 25+ 5 दिल्या तिने. आकार खास नाही परंतु तळल्यावर फुलल्या छान.
नवऱ्याची भुणभुण चालूये, एवढ्या सगळ्या रेसिपीस करतेस कुरडया पण कर ना. पण मी अजून एकदाही केल्या नाहीत. आईला पाहिलं आहे करताना, तसेच 2-4 विडिओ पाहिलेत youtube ला. पण माझी लहान मुलगी असल्याने कुरडई ची उस्तवार नको वाटतेय. तरी मूड बनलाच तर करेल अर्धा किलोच्या.
@ देवकी फोटो टाका ना
शीतल, रव्याच्या कर ना मी
शीतल, रव्याच्या कर ना मी टाकलाय अर्धा कि.भिजत
अनारश्या नंतर कुरडई उद्योग करू वाटायला....
शीतल,
शीतल,
माझाही पहिलाच प्रयत्न होता.याआधी कधीही कुरडया करताना पाहिल्या नाहीत.
तुझी लेक लहान आहे तर कशाला ही उठाठेव करतेस? पण एकंदरीत तुझा उत्साह पहाता तू सहज करुही शकशील.
१/२ किलोच्या आसपास गव्हाच्या ५५-६० छोट्या आकाराच्या कुरडया झाल्या.मुद्दाम छोटा आकार ठेवला.
मंजूताई, देवकी बघते कसं काय
मंजूताई, देवकी बघते कसं काय जमते ते...
सांडगे, कुरडई, तांदूळ चकली, आणि साबुदाणा पापडी एवढेच उन्हाळी पदार्थ नवरोबाला आवडतात ते आतापर्यंत आईच देत आलीये. यंदा तिला जमणार नाहीये.
मला सुरुवात करायची आहे थोडा थोडा करून पाहीन पावशेर अर्धा किलो चा..
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली.
करून बघा कुरडया, नाहीतर आहे चीक.
नवऱ्याची भुणभुण चालूये,
नवऱ्याची भुणभुण चालूये, एवढ्या सगळ्या रेसिपीस करतेस कुरडया पण कर ना>> चिक हाटायची आणि सोर्या भरायची तयारी आहे का विचारा नवर्याला आणि टाका बिनधास्त गहु पाण्यात.
पाफा +१
करून बघा कुरडया, नाहीतर आहे
करून बघा कुरडया, नाहीतर आहे चीक.........
अजिबात नाही ग.आरामात होतात.फक्त चीक hatne माझ्यासाठी भारी गेले.
एकदम खूप करायचं नाही. थोडं
एकदम खूप करायचं नाही. थोडं थोडं करायचं म्हणजे बिघडलं तर खूप वाया जाणार नाही. ते सतत हटवत राहणे कमी कष्टाचे होते.. गहू भिजत घालून करणे कष्टाचे व वेळखाऊ प्रकरण आहे. दोन्हीच्या चवीत गव्हाच्या व रव्याच्या फारसा फरक पडत नाही.
आज केल्या दोन ग्लास /अर्धा
आज केल्या दोन ग्लास /अर्धा किलो सत्तर कुरडया झाल्या. 8-10 कुरडयांचा चिक खायला ठेवला.
वाह.. सुरेख दिसताहेत.
वाह.. सुरेख दिसताहेत.
किती मस्त दिसत आहेत, कुरडया
किती मस्त दिसत आहेत, कुरडया
मला पण काहीतरी वाळवण करण्याची खुमखुमी आली आहे. आयुष्यात कधी वाळवण केले नाही. माझ्याकडे मस्त open to sky terrace पण आहे. तासाभरात कपडे वाळतात इतक्या रणरणत्या उन्हात. मला राखणीला बसावं लागेल कबुतरं खूपच येतात.
तर परत एकदा चिकपुराण...
तर परत एकदा चिकपुराण...
गुरुवारी सकाळी 1 पेला गहू भिजत घालायचा विचार करत होते पण 1 पेला खूपच कमी होईल असे इथे वाचून त्या 1 पेल्याचे 4 पेले केले. शुक्रवार शनिवार सक्काळी उठल्यावर पहिले काम म्हणजे वास मारणारे गहू स्वच्छ धुवून परत पाण्यात घालून ठेवले.
3 दिवस गहू ठेवा म्हणजे गुरुवारी सकाळी ठेवलेले गहू रविवारी सकाळी वाटायचे की शनिवारी रात्री याबद्दल नक्की माहिती माबो व तुनळीवरच्या सगळ्या रेसिप्या चाळूनही मिळाली नाही. ह्या सुगरण बायकांचं असंच असतं. त्यांना ज्या गोष्टी सामान्य वाटतात आणि म्हणून अनुल्लेखाने मारतात नेमकी तिथेच आमच्या सारख्यांची गाडी येऊन अडते.
तर असो. तुनळीवर दिसत होते तसे माझे गहूही टच्च गोरेपान, दाबले तर चीक बाहेर असे शनिवारी संध्याकाळी दिसायला लागल्याने मी तेव्हाच चीक काढायचा निर्णय घेतला. तसेही सोमवारी ऑफिस असल्यामुळे रविवारी चीक काढून सोमवारी तो हाटने जमले नसतेच. Wfh असले तरी आम्ही अगदी मानेवर काटा ठेऊन काम करतो.
शनीवारी संध्याकाळी गहू माझ्या वेट ग्राइंडरवर वाटले. हे गहू प्रकरण भयंकर चिकट आहे हे तेव्हा कळले. मिक्सर साफ करायला खूप त्रास झाला असता.
वाटताना एकूण प्रकरण वाढता वाढता वाढे, भेदीले सुर्यमंडल व्हायला लागल्यावर पोटात गोळा यायला लागला. इतका चीक भरून ठेवण्याइतके मोठे भांडेच माझ्याकडे नाही Happy शेवटी तीन भांड्यात चीक भरून ठेवला. उरलेल्या भूस्याच्या वड्या वगैरे करायचे बेत आधी केलेले पण चिकाकडे बघून ते बेत कचऱ्याच्या टोपल्यात ढकलले.
एका चॅनेलवरच्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे पाणी दोनदा बदलले, त्यासाठी रात्री 12 पर्यंत जागत बसले.
सकाळी मात्र सगळे झटपट झाले. पाणी ओतून टाकल्यावर चीक थोडा कमी झाला. हाटायला मात्र भक्कम माणूस हवा. हात भरून येतात. चिकाची स्थिती अतिशय वेगाने बदलत असताना हातही तितक्या वेगाने हलणे आवश्यक आहे.
थोड्या कुरडया केल्या, थोडासा चीक खाल्ला. नोस्टॉजिया नसल्यामुळे ठीकठाक लागला. माझा सोऱ्या पितळी असल्यामुळे गरम चीक भरल्यावर हाताला चटके बसणे वगैरे प्रॉडक्शन इसयुज आले थोडेफार पण ते तेवढेच. बाकी फारसा त्रास काही झाला नाही.
परत हा प्रकार नक्की करेन. चिकाची पावडर करून ठेवलेली बरी असे वाटले.
कुरडया केल्या खऱ्या पण करताना
कुरडया केल्या खऱ्या पण करताना माझ्या वर मंजुताईच्या दिसताहेत तशा सुबक गोल झाल्या नाहीत. एकतर प्रकरण चिकट असल्यामुळे सोऱ्याला वळवून गोल कुर्डी पाडणे थोडे जड गेले, आणि सोऱ्या थोडा वर उचलून कुर्डी तोडणे सुरवातीला तितकेसे जमले नाही. पुनःप्रयत्नात जमेल.
माझ्या सोऱ्याला एक बारीक व एक जाड जाळी आहे. माझ्या कर्तृत्वावर विश्वास असल्यामुळे आईने 'तू जाड जाळीनेच कुरडई पाड' म्हणून सल्ला दिला. जाडने कुरडई भराभर पडली पण ती खूपच जाड दिसत होती. म्हणून मी दुसऱ्या घाण्याला बारीक जाळी लावली. त्याने सुंदर बारीक कुरडई पडली पण पाडणे जरा जड गेले. आणि आत सोऱ्याच्या दाब्यांमागे परत चीक गोळा होत गेला. मग तो काढून परत सोऱ्यात घाला वगैरे जास्तीची कामे गळ्यात पडली.
आता वाळत घातलेली कुरडई घरात आणली, बारीक कुरडई छान वाळलीय, फक्त मध्ये अजून कच्ची आहे. जाड मात्र वाळायला अजून 2 दिवस घेईल.
मी जो विडिओ बघितलेला त्यात कुरडई होईपर्यंत चीक बारीक गॅसवर ठेऊन दिलेला. तसे करणे गरजेचे आहे का? चीक लगेच घट्ट होईल असे मला तरी वाटले नाही.
रव्याच्या कुरडया करताना वाटण नसेल पण हाटण असणार ना? की तेही गव्हाइतके कठीण नाही?
ही सगळी कामे करताना आधीची पिढी एकदम पाच पाच किलोचे वाळवण करायची तेव्हा त्यांचा मनोनिग्रह किती मोठा असणार याची जाणीव झाली. लहानपणापासूनचे ट्रेनिंग व अमुक गोष्ट अमुक वेळेला करायचीच ही स्वयंशिस्त त्यांच्याकडून ही कामे करून घेत असावीत. आज माझ्यात व पुढच्या पिढीत या दोन्ही गोष्टींची वानवा आहे.
पण तरी सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे ही पिढी परत एकदा जुन्या पदार्थांकडे वळतेय ही एक जमेची बाजू.
Pages