चौकटींतील रत्ने (उत्तरार्ध)

Submitted by कुमार१ on 22 December, 2019 - 21:18

पूर्वार्ध इथे : https://www.maayboli.com/node/72730
*********************************************************************************
या लेखाच्या पूर्वार्धात लिहिल्याप्रमाणे मराठी कोड्यांवर हुकुमत यायला माझे एक दशक खर्ची पडले होते. आता एक धाडस म्हणून इंग्लीश कोड्यांकडे वळणार होतो. आतापर्यंत इंग्लीश पेपर चाळताना चौकटीयुक्त कोडे दिसले तरी त्याकडे ढुंकून पाहिले नव्हते. याला कारण माझी इंग्लीशबाबतची भाषिक पार्श्वभूमी अशी होती. इयत्ता पाचवीपासून शालेय विषय, आठवीपासून विज्ञान व गणित इंग्लिशमधून आणि पुढे व्यावसायिक शिक्षण इंग्लिशमधून झाले. सामान्य व्यवहारातील बोलणे हे मराठीतूनच. याचा अर्थ इतकाच होतो की ‘पुस्तकी इंग्लीश’ शी आपली घसट झालेली असते. या जोडीला मर्यादित इंग्लीश साहित्यवाचन आणि अधूनमधून इंग्लीश दैनिके व अन्य नियतकालिके चाळणे इतपत तो भाषासंपर्क होता. मात्र ही शिदोरी इंग्लीश शब्दकोडी सोडवायला फार अपुरी असते. याचा प्रत्यय मी जेव्हा ही कोडी नीट वाचू लागलो तेव्हा लगेच आला.

सलग २-३ दिवस या कोड्यांवर नजर टाकता काही गोष्टी ध्यानात आल्या. कोड्यातील जी शोधसूत्रे भूगोल, समाजशास्त्र, विज्ञान आणि आरोग्य यांवर आधारित आहेत, त्यांचीच उत्तरे आपल्याला सामान्यज्ञानावर देता येतील. मात्र कोड्यातील इतर जे प्रांत आहेत त्यात आपण जेमतेम रांगणारे बाळ आहोत !

आता प्रथम आपण दैनिकांतील इंग्लीश कोड्यांचा आकृतीबंध समजून घेऊ. मागच्या भागात लिहिल्याप्रमाणे शब्द्कोड्यांचे २ मूलभूत प्रकार म्हणजे सामान्य आणि गूढ. माझे लक्ष्य फक्त सामान्य कोडी हेच होते पुढील विवेचन हे तेवढ्यापुरतेच आणि केवळ माझ्या दृष्टीकोनातून असेल. या दैनिकांत दर सोमवार ते शुक्रवारच्या कोड्यांच्या कठीणतेची पातळी ‘साधारण’ असते. शनिवारच्या कोड्यात ती त्याहून वरच्या पातळीवर जाते. तर रविवारच्या कोड्याची पातळी ही महाकठीण असते – अगदी मेंदूला झिणझिण्या येतील इतकी.

cross.jpg

आता सोम ते शुक्रवारच्या कोड्यांपासून प्रारंभ केला. कोडेनिर्माते त्यांना ‘easy’ म्हणतात पण मी त्यांना ‘नॉर्मल’ म्हणणे पसंत करेन. (इंग्लीश मातृभाषिकासाठी ती इझी असतील !) एका कोड्यावर सुमारे पाऊण तास घालवल्यावर ते कसेबसे १०% सुटले. हे अपेक्षितच होते. मग एक काम केले. आजच्या कोड्याचे उत्तर उद्याच्या अंकात येत असते. तेव्हा आजचे पान जपून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सरळ उत्तरे बघून ती हातानी त्यात लिहून काढायची. असे करताना इंग्लीश कोड्यांच्या विषयांची व्याप्ती समजू लागली. त्यांचे जे काही खास विषय असतात त्यात सामान्य मराठी माणूस अनभिज्ञ असतो. उदाहरणार्थ काही विषय असे :

१. त्यांच्या बोलीभाषेतील अनौपचारिक शब्द, खास अपशब्द, म्हणी आणि वाक्प्रचार
२. संगीत, कलाविष्कार, संस्कृती आणि आनंदोत्सवांशी संबंधित शब्द.
३. विशेष खाद्य आणि मद्य पदार्थ !
४. अ‍ॅडम, इव्ह, नोहा, बायबल.... हे प्रांत
५. ग्रीक व रोमन संस्कृतीविषयक शब्द.

या निरीक्षणानंतर एक लक्षात आले. ही कोडी सोडवताना आपण हातात पेन्सिल (पेन नव्हे, कारण खोडता आले पाहिजे) घेऊन निव्वळ स्मरण आणि कल्पनाशक्तीवर काही उत्तरे येणार नाहीत. सुरवातीस आपल्याला शब्दकोशाची मदत घ्यावीच लागेल. जशी ती घेऊ लागलो तसे अजून एक समजले. निव्वळ शब्दकोशापेक्षा इथे समानार्थी कोश अधिक उपयुक्त असणार आहे. तसेच गुगलचा वापरही बऱ्यापैकी करावा लागणार आहे. मग गरजेनुसार या सर्व आयुधांची मदत घेऊन हा कोडेप्रवास चालू केला. इंग्लीश कोड्यांत एक महत्वाचा मुद्दा असतो स्पेलिंगचा. काही शब्दांच्या बाबतीत ब्रिटीश व अमेरिकी शब्दांचे स्पेलिंग भिन्न असते. बरेचदा असा अमेरिकी शब्द एका अक्षराने कमी असतो. कोड्यातील रिकाम्या चौकटीची संख्या आणि शब्दाची अक्षरसंख्या तंतोतंत जुळावी लागते. त्यामुळे दर्जेदार कोडेनिर्माते कोडयाखाली महत्वाची तळटीप देतात, की त्यातले शब्द या दोनपैकी कोणत्या शब्द्कोशानुसार निवडले आहेत. तसे न दिल्यास कोडे सोडविणाऱ्याची कधीकधी चिडचिड होऊ शकते. उदा. ‘चित्रपटगृह’ असे शोधसूत्र असल्यास त्याचे उत्तर theatre का theater असा संभ्रम होतो आणि त्या बदलाचा अन्य उभ्या/आडव्या शब्दशोधावर देखील परिणाम होतो.

या शब्द्शोधाचा सुरवातीस एक महत्वाचा फायदा होतो. तो म्हणजे काही प्रसिद्ध विशेषनामांची स्पेलिंग्स आपली पाठ होतात. बऱ्याचदा आपला गैरसमज असतो की आपल्याला ती बरोब्बर माहिती आहेत. पण काही वेळेस तसे नसते आणि इथल्या काटेकोर शब्दसंख्येमुळे आपण गंडतो. स्वानुभावातले उदाहरण देतो. समजा एखादे उत्तर ‘स्वीडन’ हा देश आहे. आपल्या मराठी उच्चार पद्धतीनुसार आपण पटकन ते Sweeden असे करायला जातो आणि चुकतोच. त्या शब्दात ee नसून फक्त एक e आहे हे मला कोडी सोडवितानाच जाणवले. मग मी त्या शब्दाचा उच्चार मनातल्या मनात ‘स्वेडन’ असाच पाठ केला.

इंग्लीश बोलीभाषेतील शब्द शिकणे हा अजून एक फायदा मला झाला. त्यातले काही तर इतके गोड होते की त्यांच्या प्रेमातच पडायला झाले. त्याचे हे एक उदाहरण. शोधसूत्र असे होते:

‘क्रिकेटच्या एका डावात भरपूर झेल सोडलेला खेळाडू’.
उत्तराची अक्षरसंख्या आहे तब्बल १३. आता इथे आपले सामान्यज्ञान किंवा शब्दकोश फारसा कमी येत नाही. लाक्षणिक अर्थाने हा शब्द योजलेला आहे. त्याचे उत्तर आहे ‘butterfingers’ !

लेखात वर या कोड्यांचे खास विषय दिलेले आहेत. त्यातील अनेक प्रांतातले माझे सामान्यज्ञान हळूहळू वाढत गेले. एकंदरीत या कोड्यांतील विहार म्हणजे युरोप-अमेरिकेची बसल्याबसल्या सांस्कृतिक सफर असते. त्यांच्या पौराणिक, ऐतिहासिक, देव-दैत्यविषयक, कलाविष्कार आणि गाजलेले लेखक/ कलाकार अशा अनेकविध प्रांतातील विशेषनामे आपल्याला माहिती होतात. त्यांच्या विशिष्ट नद्या आणि पर्वतांची नावे इथे वारंवार विचारलेली असतात. विविध लांब पायांचे पक्षी इथे भरपूर विहार करतात आणि गेंडा आणि पाणघोड्यासारखे प्राणी तर ठाण मांडून बसतात ! ग्रीक व लॅटिन भाषांतील काही पिटुकले शब्द इथे तोंडी लावण्यासाठी असतात. तर जर्मन, फ्रेंच व स्पॅनिशमधील आदरार्थी संबोधने इथली भाषिक मेजवानी समृद्ध करतात. इंग्लीश भाषेबाबत आपल्याला ब्रिटीश व अमेरिकी वैशिष्ट्ये आणि भेद माहित असतात. पण कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथल्या बोलींतील काही खास शब्दसमूह हे तसे अपरिचित. तेही आपल्याला कोड्यांत भेटतात. जशा आपल्या मराठीच्या विविध बोली तशाच त्यांच्याही हे खरे.

काही कोड्यांतून असे काही खास शब्दसमूह मिळाले की ते माझ्या लेखनाचे विषय ठरले. एका साप्ताहिक कोड्यातील शोधसूत्र होते : “ अपहरणकर्ते आणि ओलीस यांच्यातील प्रेमभावना”. त्याचे उत्तर आहे ‘स्टॉकहोम सिंड्रोम.’ मग उत्सुकतेने या रंजक विषयावर उत्खनन केले आणि लेख लिहीला. (https://www.maayboli.com/node/68894).

अशा प्रकारे दैनिकात नेहमीच्या वारी असणारी सामान्य कोडी मी बराच काळ सोडविली. जेव्हा त्यातले ७०% शब्द सुटू लागले तेव्हा मग हळूच रविवारच्या महाकठीण कोड्यास हात घातला. सुरवातीस पदरी पडले ते फक्त नैराश्य ! अगदी समानार्थी कोश जवळ घेऊन बसले तरी फारसा उपयोग नसायचा. कारण एखाद्या शब्दाचे पन्नासेक पर्यंत समानार्थी शब्द असायचे आणि त्यातला एकच कोड्यातील उभ्या-आडव्या जुळणीत फिट बसणार असायचा. ही दमछाक जबरदस्त असते. कोड्यातील विशेषनामे ओळखायची सूत्रे देखील महाकठीण. कुठल्यातरी अतिप्राचीन ग्रंथांचे लेखक अथवा युरोपीय चित्रकारांची किंवा संगीतकारांची नावे विचारलेली. त्यामुळे पहिले ६ महिने मी साप्ताहिक कोडे अगदी ५% सुटले तरी धन्य मानायचो. काही शब्द तर खूप कठीण आणि अपरिचित असायचे. त्यांची सूत्रे जालावरील ‘क्रॉसवर्ड सॉल्व्हर’ मध्ये पाहिली तरी उत्तर शोधणे अशक्य व्हायचे. मग गुमान आठवडाभर थांबून पुढच्या अंकाची वाट पहावी लागे.

या निमित्ताने एक खूप जुनी आठवण जागी झाली. १९८०च्या दशकांत पेपरात साप्ताहिक कोड्याचे २ भाग करून त्यांच्यामध्ये दोन रेघा मारल्या असत. त्या रेघांच्या मधोमध ‘कॉफी टाईम’ असे लिहिलेले असे ! तेव्हाचे काही दर्दी लोक मी कोड्याचे दरम्यान खरेच चहा पिताना पाहिले आहेत. यावरून त्यातून होणारी मेंदूची थकावट लक्षात यावी.

tea.jpg

आता मला मराठी व इंग्लीश कोड्यांचा बौद्धिक व्यायाम करीत दोन दशके झाली आहेत. तेव्हा मीच माझा परीक्षक बनून गुण द्यायचे ठरवल्यास काय चित्र आहे? मराठी कोड्याचे बाबतीत सरासरी ९५% कोडे सुटणार याची खात्री वाटते. चौकटीवाले दैनिक कोडे मी ७ मिनिटांत तर साप्ताहिक महाकोडे २० मिनिटांत हातावेगळे करू शकतो. हाच आत्मविश्वास इंग्लीश कोड्याचे नाव काढताच काहीसा डळमळीत होतो. इथे दैनिक कोडे ७०% पर्यंत तर साप्ताहिक ३०% पर्यंत अशी ही गुणतालिका आहे. सोडवायचा वेळ अर्थातच मराठीच्या २-३ पट अधिक असतो. ज्या दिवशी दैनिक कोडे पूर्ण सुटते, तो माझ्यासाठी आनंदोत्सव असतो.

यावर थोडे आत्मविश्लेषण केल्यास त्याचे स्पष्टीकरण मिळते. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने आपली ‘आतड्याची’ भाषा असते. आपल्या जन्मापासून ती आपण विविध रूपांत आणि बोलींत सतत ऐकतो आणि हवी तशी फिरवून आणि वाकवून वापरतो. आपली आपणच ती छान शिकत जातो. मग का नाही त्यावर ठराविक प्रभुत्व येणार? मात्र इंग्लिशचे तसे नाही. व्यवहाराची आणि पोटापाण्याच्या उद्योगाची भाषा म्हणून ती आपल्याला ‘शिकवली’ जाते. तिच्या जागतिक बोली तसेच अनेक पैलू हे आपण अंतरातून आत्मसात करण्यात खूप कमी पडतो. मी हे निव्वळ स्व-निरक्षण म्हणून नोंदवले आहे; त्याबद्दल अजिबात खंत नाही. गूढ इंग्लीश कोड्यांना अजून कधी हातही लावलेला नाही आणि तो लावून मेंदूला अतिरिक्त ताण द्याचीही अजिबात इच्छा नाही !

आता चौकटी-कोडी सोडून इंग्लीशमधल्या अन्य एका प्रकाराकडे वळतो. त्याचे नाव आहे ‘Anagram’ (विपर्ययी नवशब्द). हा एक अनोखा आणि मेंदूला वेगळ्या प्रकारची चालना देणारा शब्दखेळ आहे. यात ५ पासून ९ पर्यंत सुटी अक्षरे दिली असतात. आता ती योग्य क्रमाने जुळवून अनेक किमान ४ अक्षरी अर्थपूर्ण शब्द करायचे असतात. तसेच प्रत्येक शब्दात एक ठराविक अक्षर हे सक्तीने घ्यायचे असते. जास्तीत जास्त किती शब्द होऊ शकतात त्याचा आकडा जाहीर केलेला असतो. आपण जितके शब्द करू त्या प्रमाणात आपल्याला उत्कृष्ट/मध्यम/साधारण अशी श्रेणी मिळते.
साधारणपणे एकूण ९ अक्षरांचे कोडे हे प्रमाण मानले जाते. त्यापासून शब्द तयार करताना किमान एक शब्द ९ अक्षरी लागतो आणि बाकीचे अर्थात किमान ४ अक्षरी. कोड्याचे अन्य काही उपनियम असतात. जसे की एखाद्या नामास s किंवा क्रियापदास s /ed असे लावून केलेले शब्द चालत नाहीत. कोडे सोडवायला घेतले की ४ अक्षरी शब्द पटापट जमतात पण अधिक अक्षरी शब्द करताना आपला कस लागतो आणि तो सर्वात जास्त अर्थात ९ अक्षरीच्या बाबतीत. हा मोठा शब्द आपण ऐकलेला आहे की नाही त्यावर आपली अक्षरांशी झटापट किती वेळ होणार हे ठरते. हे कोडे एका बैठकीत हातावेगळे करायचे नसतेच. आरामात दिवसभर पुरवता येते. त्यांनी दिलेला जास्तीतजास्त शब्दांचा आकडा गाठणे हे आव्हान असते. यातले दर्दी लोक त्या आकड्याहून १-२ अधिक शब्द बनवू शकतात ! असेच एके दिवशी मला ९ अक्षरी शब्दाने दिवसभर रडवले होते. जाम जमत नव्हता. दिलेली अक्षरे होती :
a p c d h e y m r
दिवसभर काम करता करता मध्येमध्ये खूप प्रयत्न करून झाला होता. संध्याकाळी फिरून आलो, व्यायाम केला आणि बाजारहाटही झाला. डोक्यात सारखे ते ‘नवग्रह’ फिरत होते पण त्यांचा योग्य क्रम काही सुचेना. एव्हाना जवळपास १२ पाठकोरे कागद खरडून खर्ची पडले होते. रात्रीचे १० वाजले. अखेरचा प्रयत्न म्हणून ती अक्षरे जुळवली आणि हा शब्द तयार झाला:
Pachyderm.

तो मी कधी ऐकला नव्हता पण आता याहून डोळ्यांना बरा वाटेल असा अर्थपूर्ण अक्षरक्रम होणार नाही याची खात्री वाटली. हा शब्द काहीतरी जीवशास्त्रातील आहे असे मनोमन वाटले. मग उघडला शब्दकोश आणि काय ! होय, तो अधिकृत शब्द निघाला. त्याचा अर्थ ‘हत्ती ’(आणि जाड कातडीचे प्राणी) ! हत्ती म्हणजे elephant इतकेच माझे ज्ञान होते. आज त्यात फारच मोलाची भर पडली होती. तेव्हा मी घरी एकटाच होतो. झालेल्या आनंदाने अक्षरशः पागल झालो आणि संगीत लावून १० मिनिटे चक्क नाचलो ! अथक प्रयत्नांती हा शब्द आल्याने झालेला आनंद अवर्णनीय होता हे काय सांगायला पाहिजे? यानंतर गेल्या १० वर्षांत असे अनेक शब्द सुटल्याचा आनंद मी अनेकदा घेतला आहे. असेच एकदा इंग्लीश पेपरात हत्तींच्या फोटोखाली pachyderm शब्द वाचनात आला आणि त्यामुळे पूर्वीचा आनंद द्विगुणीत झाला. अशी कोडी सोडवताना इंग्लिशचा गणिती तत्वाने अभ्यास होत राहतो. म्हणजे, कुठल्या अक्षरानंतर कुठले ‘चालते’ किंवा नाही. sion/ tion /qua/ sh/ th ....इत्यादी अक्षरसमूह वारंवार हाताळले जातात. दिलेल्या ९ अक्षरांत जर स्वरांची संख्या (व्यंजनांपेक्षा) बरीच जास्त असेल, तर ९ अक्षरी शब्द करणे अधिक अवघड असते.

Anagrams चा एक विस्तारित प्रकार म्हणजे एखाद्या शब्दसमूह किंवा वाक्यापासून अक्षरक्रम बदलून नवा समूह तयार करणे. यात मूळचा समूह अर्थपूर्ण असतोच. नवा समूह होईल तो अर्थपूर्ण किंवा बरेचदा विचित्र अर्थाचा तयार केला जातो. दोन मजेदार उदाहरणे देतो:
१. मूळ शब्दसमूह आहे : New York Times
आता त्याचा हा anagram : Monkeys write !

२. मूळ शब्दसमूह : mother in law
त्याचा हा anagram : woman Hitler !!

( सर्व ज्येष्ठ भगिनींनी हलकेच घेणे हेवेसांनल. Bw )

या रोचक विषयावर नंतर जालावर माहिती वाचली. Anagrams हा युरोपीय भाषांतला फार जुना शब्दखेळ आहे. पूर्वीच्या राजांच्या पदरी काही कुशाग्र बुद्धीची माणसे Anagramers म्हणून नेमलेली असत. त्यांनी वरीलप्रमाणे विविध मनोरंजक शब्द राजाकडे सादर करायचे असत. त्याचा त्यांना उच्च मोबदला मिळत असे. आजच्या उद्योग जगतातही असे काही बुद्धिमान लोक कंपनीचे सल्लागार म्हणून काम करतात. एखाद्या उत्पादनाला जरा हटके मुद्रानाम शोधणे हे त्यांचे काम असते. त्यासाठी सामान्य शब्द घेऊन त्यांपासून मजेदार Anagrams ते तयार करतात. एक सोपे उदा. देतो. ‘टोयोटा’ कार्सचे जे ‘Camry’ मॉडेल आहे ते चक्क एक Anagram आहे. त्याचा मूळ जपानी शब्द ‘कानमुरी’ आहे खरा, पण जेव्हा ‘Camry’ इंग्लिशमध्ये लिहीले जाते तेव्हा तो my car चा Anagram आहे ! सहज एकदा विचार केला की मराठीत हा खेळ आणता येईल का? अवघड आहे कारण आपल्या अक्षरांना असलेल्या काना, मात्रा, उकार, वेलांटी इत्यादींमुळे ते फारसे जमणार नाही. करायचेच झाल्यास ‘वरद तळवलकर’ सारखे निव्वळ मूळाक्षर असलेले शब्द घ्यावे लागतील.

इंग्लीश कोड्यांची विविधता मराठीपेक्षा अधिक आहे. त्यांचे जालावर देखील नवनवे शब्दखेळ उपलब्ध असतात. मी या लेखात वर्णन केलेल्या कोड्यांपुरते मला सीमित ठेवलेले आहे. ही पातळी आनंद आणि समाधानाची आहे. याहून अधिक कोड्यांत बागडून ‘कोडे-किडा’ होण्याची इच्छा नाही !

शब्द्कोड्यांचा छंद आपल्याला छान रिझवतो. वेळप्रसंगी आपल्या एकटेपणात तो सुरेख साथ देतो; आपले विचार भरकटण्यापासूनही वाचवतो. कोडे सोडवायला बसताना बाजूस आपले आवडते (शब्दाविण) संगीत मंद आवाजात लावून ठेवायचे, बस्स ! त्याच्या तालावर शब्द पटापट सुटत जाणे हा स्वर्गीय आनंद असतो. जर एखाद्या कुटुंबात एकत्रितपणे कोडे सोडवायला घेतले तरी त्याची सामूहिक मजा काही औरच असते. लांबच्या कौटुंबिक पर्यटनात अंताक्षरीचा कंटाळा आला की मराठी कोडी एकत्रित सोडविणे ही एक धमाल असते.

आजपर्यंतच्या माझ्या या दीर्घ शब्दप्रवासात शिकलेले नवे विशिष्ट शब्द मी वहीत नोंदवून ठेवतो. असे म्हणतात की प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. जेव्हा मी माझी ती शब्दवही कधी उघडून बघतो तेव्हा त्यातील एकेक शब्द माझे सुरेख स्मरणरंजन करतो. कुठल्या शब्दाने तो सुटत नसताना आपले किती डोके खाल्ले होते याच्या आठवणी आता सुखद वाटतात. कुटुंबापासून एकटे राहण्याच्या परिस्थितीत मी हा छंद स्वीकारला. त्यातून गवसलेल्या हजारभर शब्दांची सोबत आता आयुष्यभर पुरणार आहे.
**********************************************
समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक भाषा कशासाठी टिकवायच्या, असा मुद्दा वर उ बो यांनी उपस्थित केला होता.
यासंदर्भात एक लेख आज वाचला. त्यातला गणेश देवी यांचा किस्सा छान आहे.

(https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/academy-awards-in-the-pa...

इंग्लिश कोड्यांत काही रंजक वाक्प्रचार वारंवार येतात. त्यांचे मूळ युरोपच्या इतिहासात आहे. तेव्हा इंग्रजांचे आजूबाजूच्या देशांशी वैर होते; त्यातल्या काहींशी तर त्यांची युद्धे झाली.

त्यामुळे इंग्लिश माणूस टीका करताना किंवा नकारात्मक / कुत्सित बोलताना त्या देशांची नावे असलेले वाक्प्रचार वापरतो. अशा काहींचा परिचय करून देत आहे.
आता Dutch चा वापर असलेले २ बघू.

१. Go Dutch : जेव्हा एखाद्या समूहाने केलेला खर्च सर्वांनी वाटून घ्यायचा असतो तेव्हा असे म्हणतात.

२. double Dutch : जेव्हा एखादा मूर्खासारखी बडबड करत असतो, तेव्हा
He just speaks “double Dutch“ !

डॉक, रोचक
येउद्यात अजून
वाचतोय

आता फ्रेंचांना उद्देशून असलेले वाक्प्रचार पाहू:

१. French leave : याचा मूळ अर्थ असा. जेव्हा समारंभाला आलेला एखादा पाहुणा यजमानांचा निरोप न घेताच निघून जातो तेव्हा असे म्हणतात.
पुढे कालौघात असा अर्थ झाला. 'विना परवानगी कामावर सुटी घेणे" = दांडी मारणे !

२. French shower: स्वच्छ अंघोळ करण्याऐवजी अंगावर सुगंधी फवारा मारून काम भागवणे.

जाई, धन्यवाद.
………...

आज एक स्पॅनिश व एक ग्रीक संदर्भात बघू.

१. walked Spanish : एखाद्याला जबरदस्तीने हाकलून लावले तर असे म्हणतात.

२. That's Greek to me : जी गोष्ट आपल्याला समजायला कठीण असते, तिच्याबद्दल असे म्हणतात.

इंग्लीश शब्दगंमत

एकच शब्द लागोपाठ लिहून तयार झालेले हे काही मजेदार शब्द:

hush-hush = अत्यंत गुप्त
boo-boo = घोडचूक
chop-chop = घाईने
bling-bling = महागडे दागिने.

ज्या भाषा आता नष्ट होणार आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचा अभ्यास का केला जातो?

संस्कृत किंवा पाली किंवा अर्धमागधी इ. भाषा शिकण्यापुळे आपला उज्ज्वल इतिहास, संस्कृती, शिल्पकला, स्थापत्यकला किंवा परंपरेने आलेले शहाणपण याची महिती मिळू शकते.

कोणतीही परदेशी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येत असेल तर लष्करात अधिक प्राधान्य दिले जाते.

दरी, पुश्तू, पामिरी, अरबी, नुरिस्तानि उझबेक,तुर्कमेन इ भाषा येत असलेले अधिकारी हे काश्मीर मध्ये पकडलेल्या अनेक देशातील (परदेशी) इस्लामी अतिरेक्यांशी संबंध प्रस्थापित करण्यास फार उपयुक्त ठरले.

कारण स्वभाषेत संभाषण करणारा अधिकारी पाहून त्या अतिरेक्यांनी आपले मन उघडे केले आणि त्यातून त्यांनी पुरवलेलॆ माहिती हि अतिशय अनमोल अशी होती.

आफ्रिकेतील भाषा किंवा असंख्य छोटी बेटे असलेले देश येथील अधिकृत आणि बोली भाषेत काम करणारे अधिकारी हे तेथे होणाऱ्या व्यापारात फार मोलाचे सहकार्य करू शकतात.

किकोंगो स्वाहिली शिलूबा आणि लिंगाला या चार पैकी एखादी भाषा येणारे सैनिक माझ्या मित्राला गोमा या कॉंगो( DRC Democratic Republic of the Congo) (अधिकृत भाषा फ्रेंच) या आफ्रिकेतील देशात युनो तर्फे चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयात फार मोलाचे ठरले. हे रुग्णालय भारतीय लष्कराच्या वैद्यकीय विभागातर्फे चालवले जाते आणि तेथे भारतीय लष्करी डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय सहाय्यक काम करतात शिवाय तेथील वैद्यकीय सहाय्यक आणि इतर मदतनीस असतातच.

बऱ्याच वेळेस मृत समजल्या जाणाऱ्या भाषा या काही बोलीभाषांच्या अतिशय जवळच्या असतात त्यामुळे अशा भाषांचे ज्ञान हे काही वेळेस फार मोलाचे ठरू शकते.

@ डॉ कुमार ,
शब्दजोड्या छान आहेत. तसे बालकांसाठीचे pee-pee आणि poo-poo हे शू व शीचे शब्दही कॉमन आहेत.

@ सुबोध खरे , +११
>>>>>कोणतीही परदेशी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येत असेल तर लष्करात अधिक प्राधान्य दिले जाते. >>>>
रोचक !

सध्या छापील पेपर बंद आहेत. सक्तीच्या स्थानबद्धतेमुळे कोड्यांची गरज अजूनच वाढली आहे. म्हणून मग जालावरच्या क्रॉसवर्ड्सकडे वळलो. टिचकी मारून सोडवायची पद्धत छान असते, पण सतत पडद्याकडे पहावे लागल्याने डोळ्यांना ताण येतो.

एका कोड्यात एक छान इंग्लीश वाक्प्रचार मिळाला.

शोधसूत्र होते : प्रेमपत्रातील खास शब्द. उत्तरासाठी तब्बल १५ जागा सोडलेल्या. चांगले आव्हान होते. प्रयत्न करता आधी शेवटची ४ अक्षरे जमली ‘kiss’. मग एकदम उत्साह संचारला ! इतर शब्द जुळवत शेवटी उत्तर गावले :

Sealed with a kiss
.

मस्तच ! प्रथमच ऐकला. इंग्लीश जगतात याला SWAK असे लघुरूप आहे. काही वेळेस अशा पत्रावर बाहेरून लिपस्टिकची खूण उमटवली जाते !

काही खेळांच्या सामन्यांत जेव्हा एखादा खेळाडू असामान्य कामगिरी करतो, त्याचे वर्णन करण्यासाठी काही खास वाक्प्रचार आहेत. ते कोड्यातून समजले. ते मनोरंजक वाटले.
हे पाहा नमुने :

१. बॉक्सिंग : punched the clock

२. व्हॉलीबॉल : Spiked a drink

३. बेसबॉल : pitched a tent

४. फुटबॉल : Passed the butter

दोन मजेदार शोधसूत्रे :

१. ‘current problem?’ हे सूत्र होते. मी आपला करोना, कोविड, आर्थिक मंदी असे उत्तर शोधत बसलो. पण शेवटी सोडवताना उत्तर आले ‘short circuit’ !

२. ‘food processor’ साठी मी mixer, blender वगैरे शोधत बसलो. पण उत्तर आले ‘stomach’ !

.....यातूनच निखळ आनंद मिळतो.

इंग्लीश क्रॉसवर्ड्सच्या उगमाबद्दलचा एक रोचक लेख इथे:

https://time.com/5811396/crossword-history/

मुळातील त्या खेळाचे नाव होते “FUN’s Word-Cross Puzzle.” पण नंतर छपाईतील चुकीने क्रॉसवर्ड् असे झाले. पुढे तेच नाव कायम राहिले !

थोडी गंमत आणि विरंगुळा:
सर्वात लांब असलेला इंग्लिश शब्द असा आहे. या मूळ ग्रीक शब्दात 175 अक्षरे असून त्याच्या इंग्लिश रूपांतरात 183 अक्षरे आहेत:

Lopado­temacho­selacho­galeo­kranio­leipsano­drim­hypo­trimmato­silphio­karabo­melito­katakechy­meno­kichl­epi­kossypho­phatto­perister­alektryon­opte­kephallio­kigklo­peleio­lagoio­siraio­baphe­tragano­pterygon

पण याचा अर्थ काय?
तर हा एक खाद्यपदार्थ आहे , जो सोळा विविध घटक वापरून तयार केला जातो !
असा हा चित्रविचित्र शब्द सर्वात लांब म्हणून गिनिज बुकात नोंदलेला आहे.

https://en.m.wikipedia.org/wiki/Lopado%C2%ADtemacho%C2%ADselacho%C2%ADga...

सध्या इंग्लिश शब्द खेळांच्या ऑनलाईन विश्वात Wordle हा खेळ जोरात आहे. आज पर्यंत त्याचे 215 भाग झालेले आहेत. या खेळावर व्यत्यय यांचा स्वतंत्र धागा चालू आहेच.
............
प्रस्तुत धाग्यामध्ये पूरक माहितीची भर म्हणून या खेळाची नोंद करून ठेवत आहे. तीन ठिकाणी हा खेळ खेळता येईल :
१. मर्यादित : यात दर 24 तासांनी फक्त एक शब्द सोडवायला मिळतो . https://www.powerlanguage.co.uk/wordle/

२. आतापर्यंत जे भाग झाले आहेत त्यांचा सर्व इतिहास व जुने शब्द खेळण्यासाठी इथे https://www.devangthakkar.com/wordle_archive/

३. खेळाचे व्यसन लागल्यास Happy अमर्यादित खेळाचे अजून एक ठिकाण : https://www.wordleunlimited.com/

2021 हे वर्ष जागतिक स्तरावर कोविडमय होते. त्या काळात अमेरिकी संगणक अभियंता Josh Wardle आणि त्याची शब्दप्रेमी प्रेमिका पलक शाह यांनी मिळून Wordle हा खेळ विकसित केला. पुढे तो जालावर उपलब्ध झाला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. या खेळाची एक पुढची पायरी म्हणून या द्वयीने Absurdle या खेळाची निर्मिती केली. या दोन्ही खेळांची लोकप्रियता बघून अन्य लोकांनी त्या खेळासारखी काही प्रारूपे तयार केली. ती सुद्धा जालावर खेळण्यास उपलब्ध आहेत.

ऑनलाइन इंग्लिश शब्दखेळांच्या विश्वातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यानिमित्ताने या सर्व खेळांची एकत्रित यादी इथे करून ठेवणे महत्त्वाचे वाटते.

१. Wordle याची माहिती वरील प्रतिसादात आलीच आहे. (https://www.maayboli.com/node/80915)

२. Absurdle याची सर्व माहिती इथे मिळेल : https://www.maayboli.com/node/80954

३. Primel : हा अंकप्रेमींसाठी असून त्यात पाच अंकी मूळ संख्या तयार करायची असते. (https://converged.yt/primel/)

४. Sweardle : हे चार अक्षरी Wordle असून इथे फक्त बोलीभाषेतील उद्धट शब्दांचा वापर केला जातो.

५. Lewdle : या खेळात बोलीभाषेतील लैंगिक शब्दांचा वापर केला जातो.

अशा तर्‍हेने एका सूत्रावर आधारित वरील प्रकारचे विविध खेळ जालावर उपलब्ध आहेत. प्रत्येकाला आपापल्या आवडीप्रमाणे हवा तो खेळ निवडता येईल.
धन्यवाद !

Penne wiki.png
या खाद्यपदार्थाचे नाव शब्दकोड्यातून समजले.
..
..
..
..
penne
हा पास्ताचा एक प्रकार आहे. त्याचे टोक पेनाच्या टोकासारखे दिसते म्हणून तसे नाव.

अद्याप शब्दकोशांमध्ये दाखल न झालेला एक झकास नवा इंग्लिश शब्द :
contraduction = the act of inverting reality

या नावाचे एक पुस्तक आहे : https://contraduction.com/

या संकल्पनेचे एक उत्तम उदाहरण :
समजा, रेल्वे स्थानकावर दोन गाड्या लगतच्या फलाटांवर उभ्या आहेत. त्यातील एकात आपण बसलेले आहोत. आपली गाडी स्थिर असताना जर शेजारची गाडी धावायला सुरुवात झाली तर खिडकीतून बघताना आपल्याला असे वाटते की जणू काही आपलीच गाडी हलती आहे.

Pages