आंतरजालावर राजकीय विषयांवर चर्चा करुन फायदा काय?

Submitted by केअशु on 18 March, 2020 - 03:51

व्हॉटसअॅप,फेसबुक,ट्विटर,मिपा आणि अशी अनेक आंतरजालीय समाजमाध्यमे जिथे चर्चा करता येते; ती बहुतांशी वेळा देशाच्या,राज्याच्या राजकारणावरील चर्चेने अोसंडून वाहत असतात.अगदी काही वेळा वैताग येईल इतका इतका वेळ अशा चर्चांवर दिला जातो.आपला आवडता पक्ष,आवडता नेता हाच आख्ख्या भारतात किंवा राज्यात कसा चांगला आहे.तोच कसा जनतेला सर्वाधिक चांगला न्याय देऊ शकतो यावर अटीतटीने मुद्दे मांडणं सुरु असतं.समोरचा आपला मुद्दा मान्य करत नाही हे बघून काहीजणांचा तोल ढळतो; मग नको त्या शब्दांत किंवा वैयक्तिक जीवनातील गोष्टींचा उद्धार करुन नामोहरम करण्याचाही प्रयत्न होतो.आवडता पक्ष,नेता हरला की राग,संताप होतो.यावरुन कोणी बोलले तर वाद ठरलेलेच.विशेषत: शहरी,शिकलेला मतदार या अशा आंजावरील राजकीय प्रचारात फार पुढे असतो.
बरं कुठल्यातरी एकाच ग्रुपात राजकारणावर बोललं तर समजण्यासारखं आहे पण प्रत्येक ग्रुपात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आवडता नेता,पक्ष,विचारधारा यांचं प्रमोशन करण्याची संधी साधली जातेच.हे करुन काय मिळत असावं? म्हणजे बघा की समजा तुम्ही बर्‍यापैकी शिकलेले आणि शहरी नोकरदार आहात.तुमचा आवडता पक्ष,नेता याची जमेल तितकी जाहिरात तुम्ही आंजावरील चर्चेतून करता आहात.आता तुमचा समज झाला की मी छानपैकी विश्लेषण मांडले आहे माझा आवडता राजकीय पक्ष हाच सर्वात चांगला का आहे.आता माझी ही पोस्ट फॉरवर्ड होत जाणार आणि निदान काही लोकांचा तरी दृष्टीकोन बदलून मी त्यांना माझ्या पक्षाला मतदान करायला भाग पाडणार.पण प्रत्यक्षात तसं होत असतं का?

आपल्या देशातील बहुसंख्य जनता ही किमान गरजा भागवण्यातच गुंग असते.त्यांच्या अपेक्षाही माफक असतात.यात कोण कोण आलं?अशिक्षित किंवा अल्पशिक्षित शेतमजूर,अल्पभूधारक शेतकरी,उद्योग,व्यवसाय आणि दुकानांमधले कामगार,कंत्राटी कामगार,धुणीभांडी अशी घरकामे करणार्‍या स्त्रिया, फिरते व्यवसायिक असा बराच मोठा वर्ग आहे.हे सगळे व्हॉटसअॅप,फेबुवरच्या चर्चा आणि विश्लेषणं वाचून मग सारासार विचार करुन मतदान करत असतील का? चर्चा वाचाव्यात इतका वेळ असतो का या लोकांकडे? कुटूंबाच्या किमान गरजा भागवता याव्यात निदान इतपत तरी पैसे मिळवणे हेच काम त्यांच्यासाठी मुख्य असते.मग हे भागेल इतपत पैसे जो पक्ष देईल,किंबहूना जो पक्ष जास्त पैसे देईल त्याच पक्षाला मतदान हे लोक मतदान करतात; नव्हे पैसे देणारे पक्ष कार्यकर्ते ते करवून घेतात.मतदानासाठी दारु,मटण,पैसे वाटप हे काही या देशाला नवीन नाही.हा झाला मतदारांमधला एक घटक.
अजून एक घटक म्हणजे अशिक्षित,अल्पशिक्षित गृहिणी.ज्यांना फक्त स्वयंपाक,धुणीभांडी,मुले सांभाळणे एवढेच काम असते.यातल्या बहुसंख्य स्त्रिया उरलेल्या वेळात टिव्हीवर मालिका बघण्यात वेळ घालवतात.त्यांना देशात,राज्यात काय चाललंय यात स्वारस्य नसते किंवा राज्यीय,देशीय राजकीय घडामोडींचा अर्थ लावणे जमत नाही.त्या तितका ताप डोक्याला करुन घेतच नाहीत.या राजकारण्यांचं रोज काही ना काही सुरुच असतं.मरु देत तिकडे.आम्हाला काय करायचंय असा विचार करुन आपल्या कामात,मनोरंजनात रमून जातात.

अजून तिसरा गट म्हणजे कुठेही कामाला जात नसलेले अशिक्षित,अल्पशिक्षित वृद्ध व्यक्ती.हे लोक आंजावरील चर्चा वाचत असतील किंवा सारासार विचार करुन मतदान करत असतील का? काहीजणांना विस्मरणाचाही थोडाफार त्रास असू शकतो.मग हे लोक मतदान कसं करतात तर घरातला कोणीतरी जे बटण दाबायला सांगेल ते दाबून येतात.पण प्रत्यक्ष मतदान करताना समजा चुकीचं बटण दाबलं गेलं तरी कोणतं बटण दाबायचं हे सांगणार्‍याला समजत नाही.ते मतदान करणार्‍या वृद्धालाही समजलं नाही तर? अनेकदा आपण वर्तमानपत्रात वाचतो अमुक खेड्यातल्या ९०/१०० वर्षाच्या वृद्धाचे मतदान.हे इतके जख्खड मतदार जे मतदान करतात ते खरच त्यांचं स्वत:चं मत असतं का?

म्हणजे आंजावर कितीही चर्चा झाली तरी विधानसभा, लोकसभेचा मतदानाचा कल ठरवतात ते हेच तीन प्रमुख घटक.

हे लोक खूप विचार करु सरकार निवडत नाहीत.किंबहूना गुणवत्ता पाहून सुयोग्य उमेदवार या लोकांकडून निवडला जाईलच याची शक्यता तशी कमीच.पण गंमत म्हणजे हे सगळे लोक मतदार मात्र आहेत बरं का! म्हणजे त्यांना व्यवस्थित विचार करुन कोणाला निवडायचं याचा निर्णय करता आला नाही तरीही हे लोक मतदान करु शकतात. कारण यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत. : )

शिवाय मतदानात नेहमी टक्केवारी चांगली असते ती ग्रामीण भागातल्या मतदारांची.७०/७५/८५% अशी.शहरी,महानगरी मतदार यात मागे असतो.मध्यंतरी पुण्यात फक्त ४०% मतदान झाले होते.

मग असं असताना राजकारणावर या ज्या आंतरजालीय चर्चा होतात त्या नक्की कोणासाठी असतात हा प्रश्न पडतो.खरंच काय फायदा होतो या अशा चर्चांचा?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी गावातली माणसं पारावर बसून अशा चकाट्या पिटायची त्या पाराची जागा आता सोशल मीडियाने घेतले. बाकी हेतू सेमच.

आपण एखादी गाडी घेतली किंवा साडी घेतली किंवा घर घेतलं तर लोकांना का दाखवतो?
तर आपण किती हुशार आहोत आणि आपलं कसे छान चाललंय किंवा आपली अभिरूची किती उच्च आहे हे लोकांना दाखवणे हा हेतू आहे. यातूनच लोकांना स्वतुष्टीकरणाचे समाधान मिळत असते.
अशीच स्थिती मी कोणत्या पक्षाला पाठिंबा देतो त्या बद्दल आहे.
याउलट एखाद्या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आपले नुकसान झाले तर त्या सरकारला / पक्षाला उच्चरवाने दोष दिल्यावर मनाचे समाधान हिते आणि मन:शांती मिळते.
उदा- निश्चलनिकरण झाल्यावर ज्यांचा काळा पैसा बुडाला ते श्री मोदींना आणि निश्चलनिकरणाला शिव्या देत असतात.
निष्पन्न काहीही होत नाही पण मनाला थोडा दिलासा मिळतो एवढंच.

निश्चलनिकरण झाल्यावर ज्यांचा काळा पैसा बुडाला
ह्या आशा पिंका टाकायच्या. कोणी त्या बद्दल शंका उपस्थित केली की त्याला पुरोगामी, नक्षलवादी म्हणायचं. जिथे सरकार पण ह्याचे पुरावे देऊ शकले नाहीत तिथे हे भक्त छातीठोक पणे defend करणार. धागा कोणताही असो ह्याचा agenda एकच - नामोगुनगाण

फारतर मोठ्या नेत्यांच्या कर्तबगारींचा आढावा घ्यावा. काय साध्य झाले काय नाही.
बाजू घेऊन विरोधकांना श्या घालण्यात वेळ दवडणे निरुपयोगी. हे मोठे नेते कधी एकमेकांशी सलगी करतील, खारे काजू प्लेट संपवत आपल्याला पालथे पाडतील सांगता येत नाही.

धागा कोणताही असो ह्याचा agenda एकच - नामोगुनगाण
Submitted by झम्प्या दामले on 18 March, 2020 - 06:06
>> धागा कोणताही असो, भक्त काही बोलले की चमच्यांच्या बुडातून जाळ आणि धुर संगटच बाहेर पडतात.

धागा कोणताही असो, भक्त काही बोलले की चमच्यांच्या बुडातून जाळ आणि धुर संगटच बाहेर पडतात.
माणूस मेल्यावर पण जाळ आणि धूर संगटच बाहेर पडतो ( मरणारा हिंदू असेल तर)

निश्चलनिकरण झाल्यावर ज्यांचा काळा पैसा बुडाला ते श्री मोदींना आणि निश्चलनिकरणाला शिव्या देत असतात.
बघा -- अजूनही जळजळ होतेच आहे.
ROFL

@केअशु
अगदी माझ्या मनातले विचार.

<< पूर्वी गावातली माणसं पारावर बसून अशा चकाट्या पिटायची त्या पाराची जागा आता सोशल मीडियाने घेतले. बाकी हेतू सेमच. >> +१

जे लोक एखादा सामाजिक मुद्दा उचलून लढतात त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे - उदा - स्त्रीमुक्ती, विज्ञान सजगता, पर्यावरण, 'मैत्री' सारखे उपक्रम, स्वच्छता, वैद्यकिय सजगता, पुस्तक वाचन, जातीपाती विरुद्ध मते.
उपलब्ध असलेल्या सामाजिक प्लॅटफॉर्मचा अर्थात माबोचा हे लोक फार प्रभावी उपयोग करुन घेतात असे माझे मत आहे. मला आदर आहे.
पण राजकीय मुद्दे मला फारसे रोचक वाटत नाहीत.