खवय्या (झुमरू-साहेब)

Submitted by ऋयाम on 10 March, 2020 - 03:02

झुमरु साहेब अत्यंत डाएट कॉन्शस. बरेच प्रयत्न करून त्यांनी वजन कमी केले, त्याबद्दल आपण बोललोच. शिवाय अ‍ॅमवेमुळे त्यांना विविध प्रकारच्या वायटामिन्स, मिनरल्स बिनरल्सची अगदी खडानखडा माहिती होती. त्यामुळे त्यांच्यासोबत कधी खानपानाच्या गोष्टी होतील असं अजिबात वाटलं नव्हतं. पण हळूहळू तो विषय सुद्धा निघालाच.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल गळाले असेलही, पण समोर हे साहेब असतील, तोपर्यंत कोणी कितीही प्रयत्न केला तरी ह्यांच्याकडून हॅण्डओव्हर मिळणे शक्य नाही हे मला आणि आमच्या वरच्या म्यानेजरसाहेबांना समजले. दरम्यान आमच्याकडे इतरही बरेच काम आले, जे प्रामुख्याने माझ्याकडे आले, आणि झुमरू साहेबांची आमच्या येथून सुटका होणे अशक्यप्राय झाले. शेवटी मग पुलंनी सांगितलेल्या त्या 'शेजारचा रेडिओ...'च्या कथेला स्मरून मी साहेबांना टाळणे थोडे कमी केले. साहेबा सालाबादप्रमाणे जुने काम करीत राहिले, आणि आम्ही हळूहळू कामाव्यतिरिक्तही गप्पा मारू लागलो.

* * *

खानपानाच्या गोष्टींची सुरुवात पुढीलप्रमाणे झाली.

  1. "अरे, तुम्ही डबा आणता? हाहाहाहा.."
  2. "अरे, तुम्ही डेस्कवरच खाता? हाहाहाहा.."
  3. "अरे, आज ही कसली भाजी? हाहाहाहा.."

सुरुवातीला बरेच काम असल्यामुळे डबा खाण्यास कॅन्टीनपर्यंत जायला बरेचदा वेळ मिळत नसे. अशा वेळी १२:३० - १:०० वाजता भूक लागली असता आपण डबा उघडावा, आणि जेवायला सुरुवात करावी. तोंडात पहिला घास घातला रे घातला, की आलाच प्रश्न.

साहेब: "भूक लागली वाटतं!?".
मी: नाही, झोप आलीये, म्हणून जेवतोय.

असा काहीतरी अजागळ प्रश्न विचारून समोरच्याच्या तोंडाकडे आ वासून पहायचे आणि मग समोरच्याची तारांबळा पहायची, हा त्यांचा एक उपछंद असावा की काय अशी शंका येईल इतके नियमितपणे ते मला प्रश्न विचारीत. म्हणजे, 'घास लवकर संपवावा', की हा भाई समजून घेऊन जरा थांबेल आणि थोड्या वेळाने बोलेल ह्याचा अंदाज येत नसे. शेवटी ह्या संकटातून मुक्तता होणार नसेल, तर खुल्या दिलाने त्याला (संकटाला (?!)) आलिंगन का देऊ नये असा विचार केला, आणि मी झुमरू साहेबांसोबत अधून मधून कॅण्टीनमधे जाऊ लागलो. साहेबांचा सुर्य दुपारी बारा वाजता उगवत असल्यामुळे त्यांच्या सोबत जेवायला जायला चांगले अडीच बीडीच वाजून जात.

* * *

साहेबांच्या डाएटबद्दल माझ्या ज्या कल्पना होता, त्यांना पहिला धक्का तर 'सोया चकल्यांमुळे' बसला होताच. पुढची खेप आमच्या कॅन्टीनमधील 'टोनी दा ढाबा' मधे गेलो तेव्हाची. खरं तर आम्ही दोघांनीही डबा आणला होता. ओडीसीमधून बाहेर पडताना "चला, तेव्हढेच चालणे होईल, हाहाहाहा" असे बोलणे झालेले होते. जेवण झाल्यावर एकेक कप चहा पिऊन परत यावे असा माझा विचार होता.

कॅन्टीनला पोहोचलो, आणि तिथेच तळमजल्यावर रिकामे टेबल पाहून मी साहेबांना इशारा केला.
एरवी इथे रिकामे टेबल दिसत नाही.
जेवणाची वाट पाहत बसलेले, जेवण करून झालेले असंख्य तरूणतरूणी कॉलेजमध्ये असल्यागत बागडत असतात. लेटेस्ट फॅशन, नवे चित्रपट, खास दोस्त- दोस्तनी/ लाईफ गोल्स / लाईफ लेसन्स/ मूर्ख मॅनेजर यापैकी कोणत्याही विषयावर गप्पा सुरु असू शकतात. अगदीच काही नसेल, तर कोणाला बाहेर किती पॅकेज मिळाले, आणि इथे कसा कंपनीने त्याला कुजवून ठेवला होता. वगैरे गप्पा जोरात सुरु असतात.

मी झटकन जाऊन आपला डबा तिथे ठेवला. पण साहेब जिन्याच्या दिशेने चालू लागले.
"साहेब!" मी म्हटलं.
तसं, "टोनी दा ढाबा", साहेब बोट दाखवत म्हणाले. चला आपण तिथे बसू...'
'जिस गली मे जाना नही, ... ' हे गाणं म्हणत मी साहेबांना डबा दाखवला, आणि इथेच बसू म्हटले. पण साहेब तर 'टॉम अ‍ॅण्ड जेरी' मधला जेरी जसा चीजचा वास पाहून ट्रान्समधे जातो, तसेच ट्रान्समधे गेले होते.

आम्ही वर जाऊ लागलो. टोनी बाबाचा ढाबा जसा जवळ येऊ लागला, तसे खरेच सुरेख वास येऊ लागला. चारपाच मोठ्ठ्या पराती भरून व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ समोर ठेवले होते. ते पाहता पाहता हळूहळू साहेबांच्या चेहेर्‍यावरचे हावभाव बदलू लागले. मूड 'अपबिट' झाला, आणि 'पार्टी वाइब्स' जागृत होताहेत असे वाटू लागले. आमच्याच कंपनीच्या कॅण्टीनची माहिती मला देऊ लागले. आणि शेवटी, 'अंअंअं, थोडंसं काहीतरी घ्यावंसं वाटतंय. तुम्ही काय घेणार ऋयामशेठ ?', साहेब म्हणाले.

घरून आणलेला डबा दाखवत "हे!" असे म्हटल्यावर "हो. ते तर माझ्याकडेही आहे. पण थोडी भूक लागली आहे, म्हणून इतरही काही बघावे म्हणतो आहे. मी नकारार्थी मान हलवल्यावर साहेब "आर यू श्योअर?" म्हणून ते गेले, ते चांगले पंधरा मिनीटांनंतर परत आले. हातात एक प्लेट चिकन हंडी आणि दोन तंदूरी रोटी! "अजून एक तयार होतीये रोटी. झाली की तो तिकडून हात करेल, मग मी आणतो. हाहाहाहा" साहेब म्हणाले. "कांदा घ्या ना.."

साहेबांनी त्या दिवशी रोजचा डबा अधिक तीन तंदूरी रोट्या व एक चिकन हंडी लिलया खाल्ली. खाताना सतत टकळी सुरू होतीच आणि मला त्या जेवणाची चव पाहण्याचा आग्रह देखिल. चव उत्तम होतीच, पण ती कितीही उत्तम असली तरी दुपारच्या वेळी आणि तेही बरेच काम करायचे असताना एवढे खाणे मला जमले नसते. टोनीचा डबा संपला, आणि साहेबांनी घरून आणलेला डबा काढला. आणि तोही त्याच तालात फस्त करून टाकला.

साहेबांचे जेवण होत आलेले पाहून मी त्यांना चहा बद्दल विचारलं. 'सुवासिनींनी कुकवाला.. ' च्या धर्तीवर साहेब चहाला 'न्हाई म्हननार नाहीत' असं मला वाटलं होतं. पण चहाचा विषय निघाल्यावर साहेबांचा चेहेरा गंभीर झाला. तुम्हाला सांगतो ऋयामशेठ, जेवणानंतरचा चहा एकदम वाईट. खरंतर चहाच वाईट........ त्यांचं प्रवचन संपलं, तसा मी माझ्यापुरता एक कप चहा घेऊन आलो, ते "बरोबर आहे तुमचे. आता कमी करणार आहे", असं म्हणत...

एखाद्याच्या जेवणाबद्दल बोलू नये म्हणतात. तसे मला त्यांच्या जेवणाबद्दल नाही, पण कांदा खाल्ल्यानंतर च्या "जेवण मस्त होतं, तुम्ही अजून खायला हवं होतं, हाहाहाहा!" कांदा ची काळजी होती. पण ही काळजी किती फोल होती, हे तासाभरानंतर समजलं. मी एक मीटींग संपवून जागेवर परत आलो आणि सगळ्यांच्या नाकावर रुमाल दिसले. "शक्तीमानही गंगाधर है", सारखेच "साहेबही सायलेन्सर है" हे समजले आणि मीही नाकावर रुमाल धरून तिथून गायब झालो..

* * * क्रमश: * * *

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol मस्त रे! एकदम खुसखुशीत!

सुवासिनींनी कुंकवाला, साहेबही सायलेन्सर है, शेजारचा रेडिओ आणि ते प्रत्येक प्रश्नानंतरचे हाहाहाहा - सगळे मस्त Happy