जवळ जवळ २४ वर्षांपूर्वी अमेरीकेत आल्या आल्या पहिल्यांदा नवा पदार्थ चाखला तो म्हणजे नवर्याने टोस्टरमधे गरम केलेला एगोचा वाफल आणि त्यावर ओतलेला मधाच्या रंगाचा पाक. बेताच्या गोडीचा हा पाक मला फारच आवडला. त्या पाकाला मेपल सिरप म्हणतात आणि तो मेपल नावाच्या झाडापासून मिळतो अशी ज्ञानात भरही पडली. त्यानंतर मधला काही काळ फ्रोजन वाफल्सची जागा घरच्या देशी खाण्याने घेतली आणि मेपल सिरपही मागे पडले. पुन्हा वाफल्स, पॅनकेक वगैरे प्रकार आमच्या घरात आले ते लेक शाळेत जावू लागल्यावर. शाळेत मार्केट डे म्हणून फंडरेझरचा प्रकार असे. दर महिन्याला तयार खायच्या पदार्थांची यादी यायची. त्यातून पदार्थ सिलेक्ट करुन ऑर्डर दिली की ठरलेल्या दिवशी शाळेत खाऊचा खोका मिळायचा. आम्ही पण पिटूकले पॅन केक आणि वाफल स्टिक्स ऑर्डर केले. त्या सोबत पिटूकल्या ड्ब्यांतून सिरपही आले. लेक मिटक्या मारत खायचा. एक दिवस मी देखील त्यातलाच खाऊ खाल्ला तर सिरप एकदम गोड मिट्ट! खोक्यावरची माहिती वाचल्यावर कळले की हे नुसतेच पॅनकेक सिरप आहे मेपल सिरप नाही. गावातल्या दुकानातही पॅनकेक सिरपच होते. झाले! खरे मेपल सिरप कुठे मिळेल याचा शोध सुरु झाला. नवर्याने स्थानिक मित्राला विचारले तर तो म्हणाला आता नाही मिळणार, सिझन सुरु होईल तेव्हा मिळेल. वाट बघता बघता एकदाचा मार्च उजाडला आणि आम्हाला मिळालेल्या पत्त्यानुसार दीड-दोन तास ड्राईव करुन जाऊन मेपल सिरप फेस्टिवलला गेलो. तिथे मेपल सिरप फार्मर्सच्या रानात फिरुन , ते कसे तयार होते ते बघून, गॅलनभर सिरप घेवून आम्ही परतलो. लेकाला ती भटकंती खुपच आवडली. पुढे मध, मेपल सिरप या गोष्टी थेट शेतकर्यांकडून स्टेटफेअर मधे विकत मिळतात हे कळल्यावर वर्षाची खरेदी स्टेटफेअरमधेच होवू लागली आणि इतर व्याप वाढल्याने मार्चमधे फेस्टीवलला जाणे आपोआपच मागे पडले.
दोनवर्षांपुर्वी मात्र अचानक मेपल सिरप फेस्टिवलचा योग जुळून आला. या विकेंडला काय करायचे, जवळपास काय इवेंट आहेत म्हणून जालावर शोधताना शेजारच्या स्टेटमधल्या फेस्टिवलची माहिती मिळाली. सव्वातासाची ड्राईव होती आणि रस्ताही ओळखीचा होता तेव्हा शनिवारी लगेच फोन करुन माहिती घेतली आणि रविवारी शेजारच्या ओहायो राज्यातील ह्युस्टनदवुड स्टेट पार्कला जायचे पक्के केले. दुपारी साधारण एकच्या सुमारास पार्कमधे पोहोचलो. मेपल सिरप फेस्टिवलसाठीचे राखीव पार्किंग कुठे आहे ते दर्शवणार्या पाट्यांचा मागोवा घेत योग्य ठिकाणी गाडी पार्क केली. समोर शांत अॅक्टन लेक आणि सभोवताली पानगळ झालेले रान! एका बाजूला खाद्य पदार्थ विकत घ्यायची सोय होती आणि हवेतील गारव्यावर उपाय म्हणून दुसर्या बाजूला चक्क शेकोटी! पार्कच्या ट्र्कबेडसमधे पेंढ्याची बैठक असलेल्या राईड्स - हे राईड्स आम्हाला रानात घेवून जाणार होत्या. त्यासाठी रांगेत उभे राहिल्यावर १५ मिनिटात आमचा नंबर लागला. रानातल्या रेंजरच्या ताब्यात आमच्या ग्रूपला देवून राईड दुसरा ग्रूप आणायला गेली आणि आम्ही रेंजर सोबत ट्रेलवरून माहिती ऐकत चालायला सुरुवात केली.
मेपल सिरप हे शुगर मेपल, रेड मेपल आणि ब्लॅक मेपलच्या सॅप पासून बनवतात. थंड प्रदेशात वाढणारी ही मेपलची झाडे हिवाळ्यात टिकून रहाण्यासाठी हिवाळा सुरु होण्याआधी आपल्या मूळांमधे पिष्टमय पदार्थ(स्टार्च) साठवतात. या स्टार्चचे रुपांतर नंतर साखरेत होते. हे साखर असलेले पाणी म्हणजेच सॅप ही झाडाच्या xylem system मधून वर सरकते. खोडातून वर सरकत झाडांच्या फांद्यांच्या टोकातून खाली ठिबकू लागते. झाडाच्या खोडाला भोक पाडून ही सॅप गोळा करता येते. उत्तर अमेरीका खंडात रहाणारे मुळचे रहीवासी हे मेपलच्या झाडाची सॅप गोळाकरुन ती लाकडी भांड्यात साठवत असत. खालच्या चित्रात लाकडी खोदलेले ट्रे टाईप जे आहे तशा भांड्याचा उपयोग करत.
ही सॅप म्हणजे गोडसर पाणीच असे. त्यातील पाण्याचा अंश कमी करण्यासाठी ही सॅप आटवणे आवश्यक होते. मात्र या लोकांकडे धातूची भांडी नव्हती. त्यामुळे विस्तव पेटवून त्यात दगड गरम करुन ते गरम दगड सॅप असलेल्या लाकडी भांड्यात टाकत आणि पाण्याला उकळी आणत. मात्र या प्रकारे आटवलेली सॅप ही सिरप इतकी गोडही नसे आणि घट्टही नसे. खालच्या चित्रावरुन अंदाज येइल.
पुढे युरोपियन लोकं आले, त्यांच्यासोबत धातूची भांडी आली. मेपलची गोड सॅप गोळा करुन धातुच्या भांड्यात आटवणे सुरु झाले.
उघड्यावर मोठ्या भांड्यात सॅप आटवणे
हळू हळू तंत्र विकसित होत बॅरल स्टोवचा वापर होवू लागला.
बॅरल स्टोवच्या वरचा ट्रे
आजकाल मोठ्या प्रमाणात सॅप आटवायचे काम शुगर शॅकमधे करतात.
शुगर शॅकमधे
सॅपमधील पाण्याच्या अंश आणि साखरेचे प्रमाण यानुसार साधारण ४० गॅलन सॅप पासून १ गॅलन मेपल सिरप तयार होते. पूर्वी सॅप लाकडी बॅरलमधे गोळा करत, मग धातूच्या बादल्या आल्या आणि आता बरेच जण प्लॅस्टिकच्या बॅग्जही वापरतात.
टॅप केलेले झाड - लाकडी बॅरल आनि धातूच्या बादल्या
ओहायो स्टेटमधे शुगरमेपल जास्त प्रमाणात आहेत. शुगर मेपलच्या सॅपमधे साखरेचे प्रमाणही जास्त असते. सॅप गोळा करायला टॅप करायचे झाड साधारणतः ३० पेक्षा जास्त वयाचे असते. सॅप गोळा करायचा एक विशिष्ठ अवधी असतो. रात्रीचे तापमान गोठवणारे हवे आणि दिवसाचे तापमान त्यामानाने उबदार हवे. असे असताना दिवसा सॅप वाहू लागते आनि रात्री हे वाहणे थांबून नव्याने सॅप खोडापर्यंत येवून थांबते. त्यामुळे साधारण हिवाळ्याच्या शेवटच्या ट्प्प्यात, फेब्रुवरीचा शेवट ते मार्च या काळ हा शुगरिंग सिझन असतो. त्यानंतर झाडावर कळ्या येऊ लागल्या की सॅप मधे रासायनिक बदल घडून येतो आणि सॅपची चव बदलते. त्यामुळे ४-६ आठवड्याचा शुगरिंग सिझन असतो. टॅप करायला झाडाला जिथे भोक पाडलेले असते तो भाग झाड स्वतःच दुरुस्त करुन पुन्हा पुढल्या वर्षासाठी अन्न साठवायला तयार होते.
मेपल सिरप ही कॅनडा आणि अमेरीकेच्या उत्तर-पूर्व भागाची खासीयत. इथल्या मूळ रहिवाश्यांनी गोडाची गरज भागवायला गोळा केलेली सॅप ते मिलियन्स ऑफ डॉलरचा कॅनडाचा मेपल सिरप एक्स्पोर्ट असा हा प्रवास. मेपल सिरप बनवणारी आमची सहावी पिढी, आठवी पिढी असे अभिमानाने सांगणारे शेतकरी बघितले की कौतुक वाटते. त्यांनी राखलेले रान आणि जपलेली परंपरा दोन्ही कौतुकास्पद.
सर्व लेख आणि प्रतिसाद खूप
सर्व लेख आणि प्रतिसाद खूप माहितीपूर्ण
एक अवांतर आणि भाबडा प्रश्न: उसाच्या शेतीत इतकी गुलामगिरी वापरून पण अमेरिकेत जास्त कॉर्न सिरप आणि बीट शुगर का वापरतात?(म्हणजे तिथली साखर आपल्या साखरेसारखी छान का लागत नाही चहात घातल्यावर?)
प्रश्न खूप विषयांतर असेल तर सोडून द्या.
अॅमी,
अॅमी,
आम्ही ज्या ओहायो राज्यात हे बघायला गेलो ते राज्य फ्री स्टेट म्हणजे गुलामीवर बंदी असलेले राज्य. त्यामुळे गुलामीचा उल्लेख या टूरमधे येण्याचे काही कारण नव्हते. त्या शिवाय माहिती देणारे फॉरेस्ट रेंजर असल्याने एकूण भर हा बॉटनी, केमिस्ट्री, बदलते हवामान यावर होता. मी जो सिंप्लीफिकेशनचा काळ म्हणत आहे तो फाउंडिंग फादर्सचा काळ आणि नंतर काही प्रमाणात सिविल वॉरचा काळ. याबाबत तिथे बोलणे झाले नाही, तू प्रश्न विचारलास म्हणून त्या बाजूने आत्ता हे लिहिले.
मूळ निवासींबद्द्ल बोलायचे तर त्यांचे बेघर होणे, त्यांच्या संस्कृतीचा नाश, युद्धात संहार हा सगळा इतिहास मान्य आहेच. शेवटी जे झाले ते बदलता येणार नाही. त्यातूनच शिकायचे आणि शक्य तेवढ्या चूका टाळत पुढे चालायचे एवढेच हातात आहे.
विटनी अगदी अंगावर येते. दोन वर्षं झाली तरी अजून लिहायचा धीर होत नाही. त्या अनुभवाला न्याय देण्याची कुवत माझ्या लेखनात नाही. ग्रूपमधे आम्ही दोघं देशी आणि बाकीचे कॉकेशियस. बाहेर पडताना सगळेच खांदे झुकवून मूकपणे डोळे पुसत होते. बरीचजण मुद्दाम लहान मुलांना घेवून आली होती, समजावून सांगत होती. त्यातली एक स्त्री नंतर मला म्हणाली, ' बाहेर मुलांना कुणी चुकीचे शिकवण्याआधी आपणच बोलायला हवेना त्यांच्याशी. '
>>हम स्मॉलस्केल बिझनेस आहे
>>हम स्मॉलस्केल बिझनेस आहे म्हणजे हा. मिलियन्स ऑफ डॉलरस् वरून मला वाटलं मोठी व्यवसायिक लागवड होते.>>
अॅमी,
हा व्यवसाय घरगुती पातळीवर होतो तसेच मोठ्या पातळीवरही होतो. भारताची तुलना केली तर इथे रान हे प्रकरण खूप मोठे असते.
अनु,
अनु,
ऊस शेती गुलामीवर होती तेव्हाही साखर महागच होती. नंतर गुलामीही बंद झाली. सत्तरीत उसाची साखर महाग आणि सबसिडीमुळे कॉर्न आणि पर्यायाने कॉर्न सिरप स्वस्त असे झाले. त्यामुळे प्रोसेस्ड फूड, सरबते, सॉफ्ट ड्रिंक्स यात वापरण्यासाठी कॉर्न सिरप फायदेशीर. इथले साखर प्रकरण आणि राजकारण फार गुंतागुंतीचे आणि अचंबीत करणारे आहे. कॉर्न लॉबी खूप पावरफुल आहे.
इथे ऊसाचे उत्पादन चारच राज्यात होते मात्र साखरवाले बीटाचे पीक ११ राज्यांत घेता येते. एवढा मोठा खंडप्राय देश असल्याने साखरेतही वैविध्य आहे.
वा नेहमीप्रमाणे खुप तपशीलवार,
वा नेहमीप्रमाणे खुप तपशीलवार, मस्त लेख !धन्यवाद, नवीन माहिती मिळाली अगदी
>>>>मेपल सिरप ही कॅनडा आणि
>>>>मेपल सिरप ही कॅनडा आणि अमेरीकेच्या उत्तर-पूर्व भागाची खासीयत.>>>> होय व्हरमाँटमध्ये खूप बनतं.
काय सुरेख लेख आहे. अतिशय रोचक
काय सुरेख लेख आहे. अतिशय रोचक व माहीतीपूर्ण! स्वाती तुमचे प्रतिसाद व लेखनही दोन्ही सकस, माहीतीपूर्ण असतं. या लेखाबद्दल आभार.
सगळेच प्रतिसाद खूप वेगवेगळ्या
सगळेच प्रतिसाद खूप वेगवेगळ्या अँगलने विचार करून दिलेले आणि माहितीपूर्ण आहेत स्वाती _/\_
खूप छान माहिती स्वाती ताई!
खूप छान माहिती स्वाती ताई!
मस्त माहिती आणि प्रतिसाद
मस्त माहिती आणि प्रतिसाद स्वाती
स्वाती ताई, छान लेख आणि
स्वाती ताई, छान लेख आणि प्रतिसादातली माहिती देखील उत्तम!
मी एकदा एका प्रोफेसरांच्या घरी कॅनडाहून आणलेली मेपल सिरप घालून तयार केलेली मेपलच्या पानाच्या आकाराची बिस्किटे खाल्ली होती. फार भारी होती!
माझे आधीचे प्रतिसाद फारच अवांतर झाले!
अवांतर: ॲमी, बहुतेक या विशेषणाची जागा चुकली! तुमचे बहुतेक प्रतिसाद असे म्हणायचे होते. जर पुढे कधी मला तुमचा प्रतिसाद टँजंट आहे असं वाटलं तर मी तुम्हाला विपु मधे कळवेन! तुम्ही माझं मत ज्या सकारात्मक विचाराने स्विकारलंत त्या बद्दल तुमचं कौतुक आणि आभार!
सुरेख लेख.
सुरेख लेख.
अवांतर आणि याबद्दल माझ्याकडून
अवांतर आणि याबद्दल माझ्याकडून शेवटचा प्रतिसाद (तेपण केवळ जिज्ञासा हे बोलतेय म्हणून):
धन्यवाद_/\_. पण > तुमचे बहुतेक प्रतिसाद असे म्हणायचे होते. > हेदेखील अमान्य आहे. मागील पानावर लिहल्याप्रमाणे मी दिवसभरात केवळ ५ ते १० प्रतिसाद देते, त्यातले १-२ ऋण असतात. खरंतर त्या गणपतीच्या गोष्टीच्या धाग्यावर एक महिन्यापूर्वी दिलेल्या प्रतिसादानंतर मी दिलेला irrelevant म्हणता येईल असा एकही प्रतिसाद मला आठवत नाहीय. पण इतके सगळे +१ देणारे आयडी मासडिल्यूजन्ड नसावेत(अशी आशा आहे), म्हणून दिवसाला १-२ म्हणतेय.
> म्हणून जर पुढे कधी मला तुमचा प्रतिसाद टँजंट आहे असं वाटलं तर मी तुम्हाला विपु मधे कळवेन! > भविष्यकाळात विपु वापरण्याऐवजी त्या त्या धाग्यावरच पॉईंटआउट केलं तर बरं पडेल.
भूतकाळाच खोदकाम करायचं असेल तर गेल्या आठवड्यात, पंधरवड्यात, महिनाभरात मी दिलेले टॅजन्ट प्रतिसाद कोणते हे हे विपुत कळवले तर बरं होईल. आगाऊ आभार.
छान.
छान.
भविष्यकाळात विपु वापरण्याऐवजी
भविष्यकाळात विपु वापरण्याऐवजी त्या त्या धाग्यावरच पॉईंटआउट केलं तर बरं पडेल. >> ओके
भूतकाळाच खोदकाम करायचं असेल तर गेल्या आठवड्यात, पंधरवड्यात, महिनाभरात मी दिलेले टॅजन्ट प्रतिसाद कोणते हे हे विपुत कळवले तर बरं होईल. आगाऊ आभार. >> सॉरी, मी इतका वेळ देऊ शकत नाही. या विषयावरचे हेमाशेपो.
स्वाती ताई, सॉरी! तुमच्या धाग्यावर हे अवांतर झाले.
खूप छान माहिती.
खूप छान माहिती.
मलाही pancake with maple syrup हा नाश्ता (जेवण सुद्धा!) आवडतो. पण इतकी डिटेल माहिती नव्हती. आमच्या जवळपास असं काही (maple orchard) असेल का शोधते आता .
Amy ने उपस्थित केलेले मुद्दे व त्याला अनुसरून लेखिकेने दिलेली अधिक माहिती यामुळे लेख भरकटला वगैरे अजिबात नाही उलट अधिकच समृद्ध झाला. त्यासाठी एमी व स्वाती2 दोघींचे कौतुक व आभार.
लेख आवडला. गोडमिट्ट नसलेले
लेख आवडला. मला गोडमिट्ट नसलेले मेपल सिरप आवडते.
छान माहिती आणि लेख! कधीतरी
छान माहिती आणि लेख! कधीतरी जाउन बघायला आवडेल हे.
कॅनडाला गेलो होतो तेव्हा मेपल सिरप वापरून बनवलेल्या कुकीज व इतर पदार्थ आणले होते हे लक्षात आहे.
बाय द वे एकूण चित्रांवरून हे सिरप आणि इतर झाडांपासून रबर बनवण्याची पद्धत सारखीच दिसते. ते "सॅप" वेगळे असावे.
छान लेख. खूप पूर्वी अर्ली
छान लेख. खूप पूर्वी अर्ली स्प्रिंग मध्ये शुगर श्याकला गेलेलो. आता परत जाऊ.
मस्त लेख आणि माहिती, धन्यवाद.
मस्त लेख आणि माहिती, धन्यवाद.
टोरोंटोमध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या सहकर्मचारीचे मेपलचे रान आहे. वडिलोपार्जित मिळालेले रान. एकदा माझ्या मैत्रिणीने ते कुटुंब व मी यांना जेवणास बोलावले होते. तेव्हा त्यांच्याकडून थोडीफार माहिती मिळाली होती. ते राहतात ग्रेटर टोरोंटो भागात. रान आहे उत्तर पूर्वेला ऑटवा शहराच्या जवळ. प्रत्येक वीकेंडला ते सर्व कुटुंब (मुलांबरोबर) तिथे जाते, दोन दिवस सर्वजण त्यात काम करतात व पुन्हा रविवारी संध्याकाळी टोरोंटोला परत. विशेषतः गाळपाच्या हंगामात खूप काम असते (back breraking). तेव्हा काही आठवडे दर वर्षी सुट्टी घेऊन ते आटवायचे वगैरे काम ते करतात.
कसलं मस्त.
कसलं मस्त.
मी कधी त्या एरियात गेले तर चांगलं वालं मेपल सिरप खाईन.
खूप छान मुद्देसूद माहिती
खूप छान मुद्देसूद माहिती दिलीत
सर्व वाचकांचे आणि
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे पुन्हा एकदा आभार!
टवणे सर,
हे असे सर्व कुटुंबाने मिळून परंपरेने मिळालेले जपणे कष्टाचेही आणि बदल्यात खूप काही देणारेही. मला फार हेवा वाटतो अशा लोकांचा.
स्वाती, सुंदर लेख. खूप नवीन
स्वाती, सुंदर लेख. खूप नवीन माहिती मिळाली.
अवांतर म्हणून, तुम्ही लिटील हाऊस सीरीज मधले पहिले पुस्तक वाचले आहे का? Little house in the big woods? त्याच्यामधे पण ह्या शुगरिंग सीझन चे मस्त वर्णन आहे. मेपल शुगर बनवताना लोकांना बोलावून छान डान्स वगैरे पार्टीसारखे करतात त्याच्यात.
मस्त माहिती. लेख आवडला.
मस्त माहिती. लेख आवडला.
तुमचे प्रतिसादही छानच आणि माहितीपूर्ण..
धन्यवाद.
धन्यवाद.
sneha1,
ती सगळी सिरीजच माझी आवडती आहे. त्याकाळी अशी स्वतःसाठी साखर तयार करणे हे खरच उत्साहाने सर्वांना बोलावून साजरे करावे असेच असणार.
छान लेख. प्रतिसादातुन पण
छान लेख. प्रतिसादातुन पण माहिती मिळाली.
अॅमीच्या प्रश्नावर उगीच का घसरले लोक ते कळलं नाही. समजा एखादा प्रश्न, मत नाही पटले तर ते मत बरोबर-चूक सांगता येईल की पण प्रश्नच विचारु नये असे का बरे?
सुंदर, माहितीपूर्ण लेख!
सुंदर, माहितीपूर्ण लेख!
सुंदर लेख, स्वातीताई!
सुंदर लेख, स्वातीताई!
>>अॅमीच्या प्रश्नावर उगीच का
>>अॅमीच्या प्रश्नावर उगीच का घसरले लोक ते कळलं नाही. समजा एखादा प्रश्न, मत नाही पटले तर ते मत बरोबर-चूक सांगता येईल की पण प्रश्नच विचारु नये असे का बरे?>>>> + १०१
Pages