हतबुद्ध

Submitted by सुबोध खरे on 29 February, 2020 - 02:53

या २०१६ मधील सत्यकथा आहेत

गेल्या दोन दिवसात असे वीर भेटले कि ज्याचे नाव ते.

परवा एक गरोदर रुग्ण स्त्री रक्तस्त्राव होत होता म्हणून सोनोग्राफी साठी आली होती. ती अतिशय भयभीत होती आणि तिची सासू आणि नवरा तिला धीर देत होते. तिच्या लग्नाला सात वर्षे झाली होती आणि बर्याच उपचारानंतर ती पहिल्यांदाच गरोदर होती. माझी स्वागत सहायिका तिला आत घेत असताना तिचा नवरा मला "टेचात" म्हणाला डॉक्टर काहीतरी "रिझनेबल" रेट लावा. हे ऐकून माझं डोकं सणकलं.

मी त्याला रठ्ठ शब्दात विचारलं म्हणजे माझे रेट "अन रिझनेबल आहेत" असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला पाहिजे तेथे तुम्ही जाऊ शकता किंवा के ई एम किंवा सायन रुग्णालयात जा. सोनोग्राफी "फुकट" करून मिळेल. त्यावर त्याचा आवाज एकदम खाली आला. तो म्हणाला तसं नाही डॉक्टर काही कन्सेशन मिळेल काय? मी पण जरा नरमून म्हणालो हो देऊ कन्सेशन.

मग त्या रुग्ण स्त्रीला सोनोग्राफी च्या खोलीत घेतले आणि सोनोग्राफी चालू केली. सर्वात पहिल्यांदा मी मुलाच्या हृदयाचे ठोके दाखवले आणि ऐकवले. ते पाहून ती थोडीशी शांत झाली. सोनोग्राफी करताना तिच्या वारेच्या ( placenta) मागे रक्त साकळलेले दिसत होतं ते तिला दाखवलं आणि सांगितलं तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. खरं तर बेड रेस्ट्च घ्यायला पाहिजे. प्रवास करायचा नाही आणि वजन उचलायचे नाही. त्यावर ती स्त्री म्हणाली आजच सकाळी आम्ही मालवण हून आलो.
मी तिच्या सासूबाईना विचारले कि अहो एवढ्या वर्षांनी गरोदर असताना तिला मालवणला न्यायची काय गरज होती? त्यावर त्या म्हणाल्या गावच्या सगळ्यांना "दाखवायला" पहिजे कि नको आमच्या कडे पण "बातमी" आहे.
मी त्यांना विचारले अहो पण एवढा लांबचा प्रवास गरोदरपणात करण्याची काय गरज आहे . एकदा बाळंत झाल्यावर मुल दोन महिन्यांचे झाले कि मुलालाही घेऊन जायचं आणि काय गाववाल्याना "दाखवायचं" ते दाखवा. तिथे जाऊन रक्तस्त्राव सुरु झाला मग उगाच धावपळ करण्याऐवजी असे करायला पहिजे होते.
त्यावर तिचा नवरा परत टेचात म्हणाला कि डॉक्टर आम्ही स्पेशल "क्वालीस" गाडी करून गेलो होतो. आता मात्र मला संताप आला. याला मुंबईतून मालवणला गाववाल्याना "दाखवायला" जायला स्पेशल गाडी करता येते पण डॉक्टरला पैसे द्यायचे म्हटले कि यांच्या जीवावर येतं. पण तरी हि मी काही बोललो नाही.
या दीड शहाण्या माणसाने बाळ व्यवस्थित आहे असे सांगितल्यावर विचारले कि मुलगा आहे कि मुलगी. मी आता मात्र त्याला स्पष्ट शब्दात सांगितले कि मी ते पाहत नाही आणि सहज दिसले तरी सांगणार नाही.
त्या गरोदर स्त्रीला धीर दिला, सर्व काही ठीक आहे सांगितलं आणि काळजी घ्यायला सांगितली. हे लोक गेले. नंतर दवाखाना बंद करताना माझ्या स्वागत सहायिकेने पैशाचा हिशेब दिला तर तिने या माणसाला एक पैसा हि सवलत दिली नव्हती. मी तिला विचारलं कि त्याने काही सवलत मागितली नाही का यावर ती सरळ म्हणाली कि सर एक तर याच्या कडे खास गाडीने मालवणला जाण्यासाठी पैसे आहेत शिवाय आज काल जो कोणी "मुलगा किंवा मुलगी" विचारतो त्याला "सर" सवलत देत नाहीत असे सांगते.

मी तिला हसत म्हणालो हे म्हणजे माझ्या खांद्यावरून तू तीर चालवतेस. त्यावर ती म्हणाली सर तुम्ही फार साधे आहात. हे लोक डांबरट आहेत आणि तुमचा गैर फायदा घ्यायचा प्रयत्न करतात.

माझी हि स्वागत सहायिका चटपटीत आहे. आगरी आहे आणि जवळच राहते. ती दवाखान्याची पूर्ण काळजी स्वतःच्या घरासारखी घेते.

त्याच दिवशी एका माणसाने हिला कन्सेशन मागितले तर हिने त्याला विचारले तुम्हाला कन्सेशन का द्यायचे तुम्ही गरीब नाही. त्यावर तो माणूस म्हणाला आपण इंडियन आहोत प्रत्येक ठिकाणी कन्सेशन मागणे हा आपला स्वभाव असतो. यावर ती म्हणाली बियर बार मध्ये कन्सेशन मागता का?त्या माणसाने काही न बोलता पैसे काढून दिले. मी हे आतून ऐकत होतो.

काही वेळाने मी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा तिला म्हणालो कि तू धडक पणे त्या माणसाला "बियर बार मध्ये कन्सेशन मागता का?" असं कसं विचारलंस.माझी सुद्धा हिम्मत होणार नाही "असे" विचारायला
ती म्हणाली सर हा माणूस आमच्या जवळच राहतो आगरी आहे आणि पैसेवाला आहे. गाड्या उडवत असतो आणि आठवड्यात तीन चारवेळा तरी बियर बार मध्ये जातो. याला कशाला कन्सेशन द्यायचे?

काल सकाळी असाच एक रिक्षावाला "वीर" आला होता. याची २० वर्षाची बायको गरोदर होती आणि तिला पण रक्तस्त्राव होत होता. तिचा चार महिने अगोदर एक गर्भपात झाला होता म्हणून त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाने सोनोग्राफी साठी पाठवले होते. वरचीच कहाणी परत चालू होती. वारेच्या मागे रक्तस्त्राव झाला होता. मी त्या मुलीला सांगत होतो कि तुम्हाला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. रक्तस्त्राव पूर्ण बंद होईस्तोवर वजन उचलायचे नाही रिक्षात बसायचे नाही कारण पोटाला हादरा बसतो इ इ.त्यावर ती स्त्री म्हणाली कि आम्ही आताच सोलापूरहून आलो.

मी तिच्या नवऱ्याला विचारलं कि अहो आताच चार महिने अगोदर त्यांचा गर्भपात झाला होता मग तुम्हाला सोलापूरला त्यांना न्यायचा काही अडलं होतं का? त्या वर तो म्हणाला कि आम्ही घरच्याच गाडीने गेलो होतो. मी आश्चर्याने विचारले तुम्ही मोटारीने सोलापूरला गेला होतात? त्यावर
यावर हे वीर महाशय म्हणाले कि पण डॉक्टर आम्ही रिक्षाने सोलापूरला गेलो

मी त्याला अविश्वासाने विचारले तुम्ही सोलापूरला "रिक्षाने" गेलात ?
तो त्यावर हो म्हणाला. मी त्याला म्हणालो कि अहो रिक्षाने जायची काय गरज होती त्यावर तो म्हणाला या सिझनमध्ये गाडीला "गर्दी" असते ना? त्यापेक्षा ठरवलं "आपलीच" गाडी आहे जाऊ आरामात.

वर हे वीर म्हणाले कि सोलापूरला गेलो तोपर्यंत "काही झाले नाही" तीन दिवसांनी रक्तस्त्राव झाला म्हणून आम्ही परत आलो.

मी विचारले परत कसे आलात तर तो म्हणाला रेल्वेने. ती स्त्री म्हणाली सासर्यांनी "रिक्षाने न्यायला मनाई केली म्हणून"

मी हतबुद्ध झालो आणि त्याला म्हणालो "अहो आम्ही इथे दोन किमी रिक्षाने जाऊ नका म्हणून सांगतो आणि तुम्ही तब्बल ४०० किमी त्यांना रिक्षाने घेऊन गेलात? ते सुद्धा त्या गरोदर असतान??. धड धाकट माणसाला सुद्धा रिक्षाने इतके अंतर जाऊ नका असेच मी सांगेन " रिक्षाला स्पीडब्रेकर लागतात, खड्डे लागतात यात स्त्रीच्या कंबरेला "हिसका" बसतो. गचकन ब्रेक मारून तुम्ही रिक्षा थांबवता. भसकन वळणं घेता.

रेल्वे मध्ये खड्डा लागत नाही कि स्पीडब्रेकर. शिवाय गचकन ब्रेकही लागत नाहीआणि जोरात सुरु पण होत नाही. ते सोडून तुम्ही त्यांना रिक्षाने सोलापूर पर्यंत घेऊन गेलात ते सुद्धा चार महिन्यापूर्वीच त्यांचा गर्भपात झालेला असताना? रिक्षाने तुम्ही सोलापूरला गेलात तेंव्हा आत मध्ये रक्तस्त्राव झाला होता आणि तो तुम्हाला तीन दिवसांनंतर "दिसायला" लागला. अजूनही आत मध्ये रक्त साकळले आहे. तेंव्हा त्यांना पूर्ण विश्रांती देणे सक्तीचे आहे. परत काही होऊ नये म्हणून काळजी घ्या.

हा वीर बेदरकारपणे आपले पैसे देऊन तेथून गेला.

मुंबई ते सोलापूर रिक्षाने जायच्या "विचारानेच" मला पाठदुखी होते आहे असा भास झाला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

व्यक्ति अन वल्ली अशी लेखनमालीका येवुदेत... प्रसंग अन गांभिर्य यांची ओळख होईल लोकांना यातुन... छान लिहिलय. Happy

हा हा हा... डॉक्टर. मस्त आहेत किस्से. सोलापूरवाला किस्सा तर प्रत्याक्षातच ऐकायला मिळाला होता तुमच्याकडून.

बरोबर आहे. गरोदर बाईच्या अवस्थेची जराही पर्वा न करता घरचेच लग्न आहे, बारसे आहे, पूजा आहे, लोक काय म्हणतील नाही गेले तर अशा क्षुल्लक कारणांसाठी घरातील जेष्ठ लोक कधीकधी कितीही लांबचा प्रवास करण्यासाठी बाईवर दबाव आणतात. आणि नवरेमंडळी अशावेळी अगदी मूग गिळून गप्प बसतात. पाहिलीत अशी बरीच उदाहरणे.

मुंबईवरून सोलापुरला रिक्षाने जायचे हा विचार सुध्दा मी करू शकत नाही. आणि हे महाशय गरोदर स्त्रीला घेऊन गेले.
तुमच्या मुळे अशी माणसे या जगात आहेत हे कळले.

आमचा एक आयटीवाला कलिग बायपास सर्जरीनंतर एक की दोन महिन्यातच आईला गणपतीसाठी कोकणात बसने घेऊन गेला. परत येताना सगळ्यांचा निरोप घेऊन, दारातून बाहेर पडले आणि अंगणातच ती बाई कोसळली आणि मेली.
परत आल्यावर मी म्हणलं "ऐकत नाहीत रे बायका, घरात बस, विश्रांती घे सांगितलं तर. यांना गावी जायचंच असतं".
तर म्हणतो "ती नको म्हणत होती. आम्हीच बळजबरी घेऊन गेलो."
मी ऑ करून बघतेय तर म्हणाला "बरं झालं पण देवाचं सगळं करून मग गेली!"
धन्य आहात म्हणलं मनातल्या मनात.

पुर्वी वाचलंय रिक्षावाल्याची कहाणी कुठेतरी. आमच्या ग्रामीण भागात सोनोग्राफी करायला गेले की डॉक्टर हमखास विचारतात कुणी पाठवलं म्हणून.

धन्य लोक आहेत हे.
तुमची रिसेप्शनिस्ट खरंच खूप हुशार आहे.