आनंदछंद ऐसा- कविन

Submitted by कविन on 24 February, 2020 - 00:59

चंचल आहे हो पोर. एकात धड मन रमेल तर शप्पथ. तशी हुशार आहे पण सगळी हुशारी अशी एकाच कामात लावेल तर ना चीज होईल. हे एक टोक आणि आमच्या ठकीला ना सगळ्यात इंटरेस्ट आहे. सगळ करुन पहायच असतं हे कौतुक भरलं दुसरं टोक यामधे आमचा पेंडूलम झुलत रहाण्यातच लहानपण गेलं. मोठं होताना यालाच Jack of All & Master of none म्हणतात हे समजलं पण या वाक्यात कौतुक भरलय कि उपहास हे आजतागायत कळलं नाहीये. कदाचित दोन्ही असावं असा अंदाज आहे. तर ते असो यावरुन हे कळलं असेलच कि आस्मादिकांना एकापेक्षा जास्त छंद आहेत.

लहानपणी सगळ्यात आवडती गोष्ट होती पुस्तक वाचन. खा खा सुटल्यासारखी पुस्तक वाचत सुटायचे तेव्हा. त्यापुढे तहान भूक अभ्यास असल्या गौण गोष्टी दिसायच्याही नाहीत. ओरडा बसला घरच्यांचा कि मग रात्री सामसूम झाल्यावर पांघरुणाच्या आत डोकं खुपसून टॉर्चच्या रुमालाने कमी केलेल्या प्रकाशात पुढच वाचन सुरु अशा प्रकारे डोळ्याची उत्तमप्रकारे वाट लावत पुस्तक पूर्ण करणं चालायचं. अजूनही आवडत वाचायला पण आता तहान भूक सोडून एका बैठकीत पुस्तक वाचण दूर पण एकूणच वाचन संख्या कमीच झालेय. वेळेच्या वाटणीत काम कर्तव्य आणि इतर छंद हक्क गाजवायला येऊन बसलेत.

तसं लहानपणीही आईने मला कशाही करता नाही म्हंटल नाही. "नाचाच्या क्लासला जाऊ?" मी चारदा एकच प्रश्न विचारल्यावर चौकशा करुन क्लास लावला गेला. मी २-३ महिने गेले असेन नंतर परिक्षेकरता ब्रेक झाला तो कायमचा. त्यानंतर बऱ्याच फेज आल्या गेल्या. गाणं, पेटी, भरतकाम, विणकाम, कोन पेंटिंग, रांगोळी याचे आले वारे गेले वारे. एक पेंटिंग भिंतीवर सजलं ते अगदी भिंतीला ओल येऊन ती ओल पेंटिंगवर पसरेपर्यंत भिंत अडवून बसलं होतं. एक दोन ड्रेसचे गळे स्वहस्ते भरुन झाले. आमच्या आणि नातेवाईकांच्या दारावर विणकामाची तोरणे, ताटावरचे रुमाल विणलेल्या पर्सच्या भेटी अस सगळं कौतुक सोहळ्यात नहाणं झालं. जेव्हा तळमजल्यावर रहात होतो आणि दारापुढे अंगण होते तेव्हा शेणाने अंगण सारवून मग आमच्या दारापुढे शेजाऱ्यांच्या दारापुढे तासंतास रांगोळी काढण्यात घालवले. आणि एकदिवस कंटाळा येऊन सगळे बासनात गुंडाळून माळ्यावर धाडून दिले.

सूर गळ्यात आणि कानात नाहीत आपल्या आणि नाचाशी आपलं गेल्या जन्मीही सख्य जुळलं नव्हतं तर या जन्मी काय जुळणार? हे कळण्यासाठी का होईना त्या दोन चार महिन्यांच्या क्लासचा उपयोग झाला हाच काय तो फायदा. भरतकाम विणकाम जमतय पण ते हि सो सो त्यात झोकून देऊन प्रयोग करत रहावेत इतकी त्यात आवड नाही हे समजल्यामुळे म्हणा किंवा एकच गोष्ट न कंटाळता करत रहाण्याचा स्वभाव नसल्यामुळे म्हणा पण त्या आवडींच पॅशनमधे रूपांतर झाले नाही. पण अजूनही भावासाठी राखी हॅन्डमेड करण्याच्या माझ्या नियमामुळे वर्षातून एकदा तरी विणकामाची सुयी आणि लोकर बाहेर निघते. अजूनही त्या साखळ्या आणि खांबांमधे थोडाकाळ का होईना रमायला होते.

मग आले लेखन. अचानक कविता व्हायला लागल्या. लिहून बघावे वाटू लागले. इथे मायबोलीवरच धडपडत लिहायची सुरुवात झाली. दरवेळी इथे प्रोत्साहनच मिळत गेले. अगदी अनपॉलिश्ड अशा लिखाणालाही प्रोत्साहन मिळाले, नेमक्या सुचना सल्ले मिळाले आणि लिहीत रहायची आवड फुलत गेली. ट्रेनच्या प्रवासात, गर्दीच्या रेटात मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर नोटपॅड आणि वर्ड ॲपवर खरडण्यात प्रवास एकदम पंख लावून विनातक्रार होऊ लागला.

मधेच छोटे सोपे झेपतील असे ट्रेक करुन पहायचं वेड अंगात शिरलं. आपण जाऊन आलेल्या सोप्या ठिकाणी मुलांनाही नेता येऊ शकेल का या विचाराने उचल खाल्ली. त्याला ट्रेकर मित्रमैत्रिणींची साथ मिळाली आणि काही वर्ष लहान मुलांचे दिवाळी आणि उन्हाळी कॅंप नेऊन पहायच्या इच्छेची पूर्ती झाली. महिलामंडळ स्पेशल ट्रेकच आयोजन करायच्या कामात सहभाग नोंदवता आला. या कामात मी एकटी नव्हते. पण या अनुभवांनी मला खूप काही अमूल्य असे क्षण दिले. आता त्या भरतकाम विणकाम आवडीसारखेच सध्या ट्रेकचे वेडही कुठल्यातरी गुंफेत विश्रांती घेतय.

भरतकाम वगैरे बासनात गुंडाळले असले तरी एक दिवस वेगळ्या प्रकारच्या क्राफ्टने दार उघडून घरात प्रवेश केला. लेकीला एका वाढदिवसाला कुणीतरी क्विलिंग सेट भेट दिला होता. बाईसाहेब काही त्याकडे बघायला उत्सूक नव्हत्या. मग 'यूट्यूब नम:' म्हणत त्या पट्ट्या फुकट जाऊ नयेत म्हणून सुरुवात केली आणि त्यातही इतर काही नाही पण कानातले बनवायला मजा येतेय जाणवलं. ते अख्ख वर्ष क्विलिंग इअररिंग्ज मय होतं. बऱ्याच जणींना भेट द्यायला क्विलिंगचे कानातले केले गेले. अगदी मैत्रिणी म्हणाल्या म्हणून त्याची विक्रीही केली. पण तो व्यवसाय म्हणून गांभिर्याने घ्यावा इतपत पॅशन नव्हती, आवड जरूर होती. त्यानंतर कालाघोडा फेस्टिव्हलमधे फॅब्रिकचे कानातले पाहिले. कसे केले असतील? या विचाराचा भुंगा पाठ सोडेना. तस्सेच सेम यूट्यूबवरही मिळेनात. मग त्या बाईंना वर्कशॉप घेता का? कोणी शिकवत का विचारुन झाले पण त्यांनी तर मला चक्क हुर्र केले. मग 'एकलव्य' हा आपला आदर्श म्हणत एक कानातले विकत घेऊन घरी येऊन त्याच डिसेक्षन करुन शिकले स्वत: आणि मग झपाटल्यासारखी कानातले करत राहिले. भेट दिले, विकले, स्वत:साठी केले. त्याकाळात घरात कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात एखादी कडी एखादा मणी एखादा फॅब्रिक पीस जाऊन पडलेला दिसायचा. केरात रोज काही ना काही यातलं दिसायचं. हे अजूनही सुरु असतं अधूनमधून पण खर सांगायच तर जेव्हा विक्रीच मनावर घेतलं तेव्हा ताण यायला लागला अस लक्षात आलं. मग कमिटमेंट पूर्ण करायला वेळ ताकद खर्च व्हायला लागली आणि त्यातला 'फन फॅक्टर' कमी झाला. त्यामुळे काही दिवस पूर्ण बंद केलं काम आणि विक्री हा फोकस बाद केला. हे केल्यावर लक्षात आलं कि आता परत त्यात मजा येतेय करायला. पण तेच एक काम करत रहायला नाही आवडत आहे.

दरवेळी मनात यायचं कि 'एक ना धड भाराभार चिंध्या' असा का आहे आपला स्वभाव? खरच हुशारी एकात का नाही वापरली जात (फार काही नाहीये पण त्यामुळेच लिमिटेड असलेली हुशारी अशी वाटली जाऊन फार काही उरत नाही प्रत्येकाच्या वाटणीत). एकावेळी एक फार तर दोनच गोष्टी सुरु असतात पण कायमच एकाच गोष्टीत मात्र रमायला होत नाही. सुरवातीला याचं वाईट वाटायचं, अपराधी वाटायचं आणि मग स्वत:ला शाब्दीक मार देत हे बदलायचा प्रयत्न व्हायचा. पण मग लक्षात आलं कि अस केल्याने मी एक सुरु असलेली गोष्टही नीट नाही करु शकत आहे. त्यातली मजा गंमतच हरवतेय.

मग म्हंटल कशाला दुष्टपणा करायचा आपणच आपल्यावर? एकदा ॲक्सेप्टच करुन टाकूयाना आपण jack of all & master of none आहोत हे. अस जेव्हा स्वत:चं स्वत:ला स्विकारल ना तेव्हा जरा काम सोपं झालं. master व्हायचा ताण गेला. जे नाही आहे ते होण्याचा ताण गेला. छंद म्हणाल तर अजूनही वाचन, लेखन, विणकाम भरतकाम क्विलिंग फॅब्रिक ज्युलरी त्या त्या वेळी जे करावसं वाटेल ते सुरु असतं. 'नवीन शिकत रहायची आवड' हाच आपला छंद आहे अस मनाशी मी मान्य करुन टाकलय.

एक गोष्ट करताना दुसऱ्या एखाद्या गोष्टीला स्वल्पविराम लागणं हे स्वाभाविक आहे. जेव्हा फुलस्टॉप लावावासा वाटेल तेव्हा तो हि लागेल. जशा सहज सुरु होतात तशा सहज त्या संपतातही गोष्टी. त्या त्या वेळी ती ती गोष्ट मन लावून पूर्ण होतेय आणि त्याची मजाही टिकून रहातेय हे हि सध्या पुरेसं आहे.

कोणी सांगावं कदाचित पॅशन पॅशन म्हणतात अशी एखादी गोष्ट बंद दारामागे योग्य वेळेची वाट बघत थांबली असेल. ती जेव्हा येईल तेव्हा 'एक ना धड भाराभार चिंध्या फेज' संपूनही जाईल. किंवा अशी काही गोष्ट नसेलच माझ्यासाठी. इतका पुढचा विचार करावाच कशाला पण? माझ्यासाठी आज आत्ता जे आहे ते मी प्रामाणिकपणे जगतेय, त्यातून आनंद मिळतोय. पुरेसं आहे हे देखील. शेवटी छंद म्हणजे काय? तर छंद म्हणजे, तुम्हाला आनंद देत समृद्ध करणारी तुम्हाला श्रीमंत करणारी गोष्ट होय. एखाद्याच आयुष्य भरजरी शेल्याने समृद्ध होतं तर एखाद्याच वेगवेगळे तुकडे जोडून केलेल्या क्विल्टने होतं. माझ्या भाराभार चिंध्यांनी माझ्या आयुष्यात असच एक छान क्विल्ट केलय ज्याची ऊब माझ्यासाठी अनमोल आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय! शेवटी छंद म्हणजे काय? तर छंद म्हणजे, तुम्हाला आनंद देत समृद्ध करणारी तुम्हाला श्रीमंत करणारी गोष्ट होय.
आणि सध्याच्या युगात "एक ना धड भाराभर चिंध्या" ला फार महत्व आहे....थोडक्यात सर्वगुण सम्पन्न Happy

किती छान लिहायलायस कविन, वरच्या सगगळ्यांशी सहमत. आणि तुझे सगळं वाचून तू माझी जत्रेत हरवलेली बहिण तर नाहीस असं वाटावं इतकं साम्य आहे आपल्यात Happy

मला माबो चं सगळ्यात काय आवडतं ते म्हणजे इथल्या सगळ्यांच्या मनापासूनच्या प्रतिक्रिया! जेवढा मनापासून लेख लिहीलेला असतो तेवढ्याच मनापासून प्रतिक्रिया दिली जाते इथे. खुप मस्त वाटतं वाचायला. काही तिरकस असलया, तरत-हेच्या असल्या तरी.

मला माबो चं सगळ्यात काय आवडतं ते म्हणजे इथल्या सगळ्यांच्या मनापासूनच्या प्रतिक्रिया! जेवढा मनापासून लेख लिहीलेला असतो तेवढ्याच मनापासून प्रतिक्रिया दिली जाते इथे. खुप मस्त वाटतं वाचायला. काही तिरकस असलया, तरत-हेच्या असल्या तरी.>> अगदी अगदी

पुन्हा एकदा धन्यवाद Happy

तुझे सगळं वाचून तू माझी जत्रेत हरवलेली बहिण तर नाहीस असं वाटावं इतकं साम्य आहे आपल्यात Happy>> Happy

पर्रफेक्ट लिहिले आहे Happy

छंद बदलत जातात. त्यानुसार आपल्याला आपल्या प्रायोरीटीज बदलता आल्या पाहिजेत. जर लिहायचा छंद असेल. पण आपल्याला त्यातून आनंद मिळायचा बंद झाला. किंवा त्यापेक्षा जास्त आनंद देणारा छंद गवसला तर आपल्याच मनाचा कौल घेत पटकन छंद बदलता आला पाहिजे. कोणी म्हटले लिहायचे का सोडलेस, बरा लिहायचास की.. तर त्याला हसून नव्या छंदाकडे वळता आले पाहिजे. शेवटी छंद आपल्या आनंदासाठी असतो हे आपक्याच मनाला समजावता आले पाहिजे Happy

मलाही माझ्या आजवरच्या बदलत्या छंदांचा लेखाजोखा लिहायची ईच्छा होती. अजून महिन्याभराने ईच्छा कायम राहिली आणि लिहून आनंद मिळणार असेल तर लिहेनही Happy

विविध विषयांची आवड असणे हे उत्तमच आहे.
मुद्दा असा आहे कि प्रत्येक गोष्टीत स्वतः निपूण होण्याची इच्छा बाळगणे त्रासदायक होते.
ज्यामधे नैसर्गिक गती आहे त्यात प्रगती होतेच आणि आपण त्यात खोल बुडी घेतोच ! बाकिच्या विषयांत इतरानी केलेल्या कलाक्रुतीचा रसास्वाद घेता येणे हेच आनंददायी असते. आणि सगळीकडे उत्तम श्रोता , प्रेक्षक त्या कलेचा गुण व्रुद्धिंगत करतो. त्याचीही उपस्थिती तितकिच महत्वाची असते.

हल्ली चित्र/फोटो अपलोड च होत नाहीत, हा अशाच एका कार्डाचा फोटो. मधे मला डूडल काढायचा नाद लागला होता, त्या काळातला. Happy

वाह क्या बात है. अगदी corelate केले स्वतला. पण सगळच चाखून पहावं., थोडे तरी सगळे अनुभवावं असे वाटणे ह्यातच सगळे आले की. नाही झालो त्या छंदात एक्स्पर्ट निदान माहिती तर आहे काय असते ते.
असले छंद मुलाच्या शाळेचे प्रकल्प करायला फार उपयोगी पडतात आणि लेकराला बरे वाटते आपली आई कशी हुशार तिला सगळे येते.
विरंगुळा हाच छंदाचा खरा उद्देश पैसे कमावणे गौण..
असे छंद माझ्या पण आयुष्यात आले आणि गेले . मी मोडी भाषा शिकायचं ठरवले पुस्तकं पण आणली १ वर्षात सोडून दिले. चित्रं काढली, हस्तकलेच्या वस्तू बनवल्या, ओढण्या सजवल्या, मऊ खेळणी, मणी काम सगळे सगळे केले.
शिवण शिकायचं मात्र आईने मोडीत काढले शिवणा पेक्षा अभ्यास कर भले होईल असे बोलायची ती. तिचे पण बरोबरच होते.
आता एकच छंद टिकून आहे तो म्हणजे वाचन.
दिसेल ते वाचून काढायचे अधाशा सारखे. पुस्तके नाही मिळाली ठीक आहे ऑनलाईन साईट्स वर भरभरून लिहितात सगळे ते वाचून काढायचे.
मायबोली वर मी आत्ता आत्ता लोग in होते पण मी कित्ती वर्ष असेच वाचून काढत होते.
आत्तशा पण मध्येच काहीतर आठवते अरे किती मन लावून कित्ती तास खर्च करून आपण ती गोष्ट करीत होतो.
शेवटी आनंद मिळणे हीच छंदाची खरी ओळख.

धनुडी डुडलिंग मस्तच.

प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे आभार

संयोजक प्रशस्तिपत्र आवडले. धन्यवाद Happy

Pages