सोबतीस माझ्या

Submitted by सदा_भाऊ on 18 February, 2020 - 01:53

माणूस हा समाजप्रिय प्राणी असं म्हणतात. पण हा समाज फक्त माणसांचा नसून त्यामधे अनेक प्राण्यांचा पण समावेश होतो हे तो सोईस्कर विसरतो. त्यातील काही प्राणी माणसाला छान वाटतात, आवडतात तर काही नकोसे वाटतात, घृणा वाटते. तरीसुध्दा सर्व प्राणी, पक्षी व किटके शतकानुशतके माणसा बरोबर समाजात रहात आहेत. स्वत:चं अस्तित्व प्रत्येकाने टिकवून ठेवलेलं आहे.

शहरीकरणाच्या लाटेमधे मनुष्यानं बऱ्याच गरीब बिचाऱ्या प्राण्यांच्या घरावर कुऱ्हाड आणली. आज जर असे प्राणी आपल्या घराच्या छतावर अथवा बाल्कनीमधे उपस्थिती दाखवत असतील तर त्यांचा त्रास व्यक्त करतो. माकडं हा एक असाच प्राणी. पुर्वी आमच्या घरी क्वचित प्रसंगी अशी माकडं यायची. घरामधे काही फळं भाजीपाला वर ठेवलेला दिसला तर तो घेऊन पळून जायची. अचानक समोर उभा ठाकलेल्या पाहुण्याला पाहून पोटात भीतीचा गोळाच यायचा. ती माकडं "हिच हिच" करीत वेडावून दाखवत पळ काढीत. तसा हा प्राणी उगाच कोणाला मुळीच त्रास न देणारा. आपलं आपण झाडावर मस्त मजा करावी, आराम करावा, उड्या माराव्यात एवढाच याचा उद्योग. पण बिचाऱ्याचं घरच गायब होत असेल तर यानी जावं तरी कुठे! माझ्या एका ओळखीच्यानी त्यांच्या बालक्नीत येणाऱ्या माकडांसाठी छोटा झोपाळा, खेळण्यासाठी मोठा बाॅल, खाद्य सामुग्री असा बडेजाव करून ठेवला. तशा त्या यजमाणबाई या काहीशा भित्र्या असल्या तरी त्यानी कुतूहलापोटी व फेसबुकसाठी त्या मर्कटलिला बंद दरवाज्याच्या पलिकडून आपल्या कॅमेऱ्यात पकडल्या. त्यावर त्या क्लिपला तिनशे लाईक्स व "अय्या! सो क्युट!" या प्रकारातल्या दोनशे प्रतिक्रीयासुध्दा मिळवल्या. असतात काही माकडे क्युट व नशिबवान!

मला कुत्री पाळणाऱ्या लोकांचं भलतं कौतुक वाटतं. कसेकाय एवढे कोडकौतुक जमतात बुवा!मी तर या कुत्र्यांचे प्रकार पाहून थक्क होतो. देशोदेशी जिथं मी जातो त्यावेळी तेथील पाळीव कुत्र्यांचे निरीक्षण करीत असतो. उंच, गिड्डे, मांजरासारखं, नाजूक, भले दांडगे, सिंहासारखं, माकडासारखं, टोपलीत बसलेलं, सायकलच्या पुढं पळणारं, मुस्कट बंद केलेलं... नाना प्रकारची कुत्री. ही सगळी कुत्री दिसायला जरी गोंडस किंवा वेगळी असली तरी "भोभोऽऽ" अशीच भुंकतात. सिंगापूर मधे या श्वान मालकांसाठी सरकारने जागोजागी नियम लिहून ठेवले आहेत आणि त्यांच्या लाडक्या श्वान प्राण्याने काल खाल्लेल्याचा हिशोब जर बाहेर कुठे आढळला तर मालकाना कायद्याने कडक शिक्षेची सोय करून ठेवली आहे. जरी विदेशी श्वान असले तरी त्याना झाड दिसल्या शिवाय लघू आणि खड्डा दिसल्याशिवाय दिर्घ होत नाही. त्यामुळे या मालकांना बऱ्याच दिव्यातून जावे लागते. रोज सकाळी आपल्या लाडक्यास घेऊन हे लोक बाहेर पडतात. त्यांच्या एका हातात वर्जीतव्याज गोळा करण्याची पिशवी, एक लांबडा चिमटा, टाॅयलेट पेपरचा एक रोल असा सरंजाम घेतलेला असतो. कुत्र्याला कधी लहर येईल आणि पोट साफ करेल याचा नेम नसल्यामुळे त्याच्याबरोबर एक दोन किलोमीटर निसर्गाच्या सान्निध्यात फेरफटका मारण्याची तयारी ठेवावी लागते. कदाचित स्वकर्माची इतकी उत्कंठतेने वाट बघत नसतील तेवढ्या उत्कंठतेने हे लोक आपले डोळे श्वानाच्या पार्श्वभागाकडं लावून ठेवून असतात. थोडा वेळ ते खट्याळ श्वान उगाचच आविर्भाव करीत हुलकावणी देत राहते. बिचाऱ्या मालकाची मात्र घोर निराशा होत असते. अखेरीस दोन तीन छानशा जागा पाहून कार्यक्रम उरकल्यावर मालकाची खरी कामे सुरू होतात. त्या चिमट्याने कुत्र्याचे पडलेले व्याज उचलून पिशवीत गोळा करावे लागतात. त्यानंतर टाॅयलेट पेपर ने त्या श्वानाचा पार्श्व भाग शक्तीनिशी निरखून स्वच्छ केला जातो. इथं माणसांप्रमाणेच कुत्र्यांना पण कागदावरच समाधान मानावे लागते. सर्वाना समान कायदा.

कुत्र्यांच्या बरोबरीने अजून एका प्राण्याचे समस्त मानवजातीला अतीप्रचंड कौतुक! ते म्हणजे मांजर!! अलीकडच्या काळात काही मांजरांशी माझा परीचय झाल्यानंतर तर माझं स्पष्ट मत झाले आहे की पुर्वीची मांजरे आता राहीली नाहीत. पुर्वी मांजरे कशी चपळाईने उंदीर पकडून खात असंत. पालीना पकडून गट्टम करणे हा तर त्यांचा फावल्या वेळेतला उद्योग असे. मालकीणीने स्वत:हून दूध दिले तर ठिक अन्यथा दुधाचे कपाट तोडून त्यातील दूध दही वसूल करण्याची त्यांची क्षमता होती. आताची मांजरे ही केवळ टाकलेल्या तुकड्यावर जगतात. उंदीर दिसला की स्वसंरक्षणार्थ मालकाच्या मागं लपतात. दूध मिळावं म्हणून मालकीणीस लाडीगोडी लावतात पण समोर दिसत असलेल्या दह्याकडं परवानगी खेरीज ढुंकून पहात नाहीत. या अशा मांजरांना उगाचच सोशल मिडीयावर फोटो टाकून एक्स्ट्रा फुटेज दिले जाते असे माझे ठाम आहे.

मांजराच्या नंतर क्रमांक येतो उंदराचा. शक्यतो कोणी उंदराला पाळत नसावेत असे मी समजतो. तरीपण मी पाळीव उंदराच्या दंतकथा ऐकल्या आहेत. मांजराच्या बरोबरीने उंदराचे पण कौतुक होताना दिसतं. उंदीर हा अतिशय चलाख आणि चपळ प्राणी. घरात कुठेतरी लपून बसलेला असतो जो सहसा पटकन कोणाला सापडू शकत नाही. अन्न पदार्थ हळू हळू गायब व्हायला लागले की समजावे की मामांचे आगमन धाले. एकदा आमच्या घरात एक उंदीर शिरला होता. घरात एखादे भुत शिरावे तसे झाले होते. अस्तित्व जाणवत होते पण दृष्टीस काहीच पडत नव्हते. बऱ्याच युक्त्या केल्या, दबा धरून बसून पाहीलं, तरी नजरेस येईना. त्याला घालवून देणे तर दूरच! हा लपाछपीचा खेळ आठवडाभर चालला. नंतर कदाचित कंटाळून त्या उंदरानेच आम्हाला दर्शन द्यायचे ठरवले. एका रात्री आमच्या बेडवर पायापाशी येऊन बसला. पायाला काहीतरी विचीत्र स्पर्शाची जाणीव झाली. पहातो तर साधारण मांजराच्या पिल्लाच्या आकाराचा गुटगुटीत उंदीर माझ्या कडे हसत बसलेला दिसला. मी चटकन उठताक्षणी त्यानं पळ काढला. तो पुन्हा कुठेतरी गायब झाला आणि सापडणे अशक्य झाले. सौ ने तर ब्रह्म राक्षस पाहील्याच्या अविर्भावात घर सोडण्याचा पवित्रा घेतला. आता रात्रीच्या या बारा वाजता काय करावे काही कळेना. आमच्या शेजारच्या घरात टिव्हीचा आवाज ऐकून सौ ने त्याना फोन लावून त्यांच्या यजमानाना उंदाराची वर्दी दिली. त्या सज्जन गृहस्थाने प्रांजळपणे असमर्थता दर्शवित संदीपनाच काहीतरी करायला सांगा असा सौ ला सल्ला दिला. माझ्या कतृत्वावर ठाम विश्वास असल्याने सौ ने दुसरा फोन सोसायटी वाॅचमन ला लावला. बिचाऱ्याची ड्युटीवरची हक्काची झोप मोडल्याने तो कदाचित त्रस्त झाला असावा. त्यानं स्पष्ट शब्दात उंदीर हाकलण्याचे काम आमच्या ड्युटीत बसत नाही. साप वगैरे आला तर नक्की बोलवा असा आगाऊ सल्ला देऊन फोन आपटला. दरम्यान मी संपूर्ण स्वयंपाकघर जमिनीवर गोळा केले होते. सर्व भांडी, डबे एकावर एक रचून ठेवायचे काम चालू होते. तरी पण तो उंदीर कुठं गेला ते काही कळायला मार्ग नव्हता. जवळ जवळ दोनतास झालेल्या शर्थीच्या प्रयत्नां नंतर मी शस्त्रे टाकली. मुकाट्याने बेडरूम चा दरवाजा घट्ट बंद करून झोपून टाकलो. बाहेरून हालचालींचे आवाज येत होते तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी मी एक पिंजरा घेऊन आलो. कोणीतरी सांगितलं की घरात पिंजऱ्याबद्दल चर्चा करायची नाही नाहीतर उंदराला ते लगेच कळते. आम्ही गुजरात मधे रहात असलो तरी मराठीतून सुध्दा पिंजऱ्याची चर्चा टाळली. कमालीची गुप्तता पाळून मी पिंजऱ्याला अडगळीच्या खोलीत ठेवले. आतमधे खोबऱ्याचा तुकडा सुध्दा मन उदार करून ठेवला. त्या रात्री सुध्दा बऱ्याच प्रकारच्या हालचालींचे आवाज ऐकत आम्ही झोपलो. सकाळी उठल्यावर उंदीरमामांचे दर्शन घेण्यासाठी पिंजऱ्याकडे धाव घेतली. तिथला प्रकार पाहून मी थक्कच झालो. गणपतीने उगाचच उंदराला वाहन म्हणून निवडले नसल्याचा प्रत्यय आला. त्या पिंजऱ्याचा दरवाजा वाकडा होऊन अडकलेला होता आणि खोबऱ्याचा तुकडा गायब होता. आता मात्र माझ्या शौर्यालाच आव्हान दिले होते. अखेरीस मी मनावर दगड ठेवून उंदीर मारण्याचे औषध घेऊन आलो. ते एका कोपऱ्यात ठेऊन आम्ही झोपी गेलो. थोडासा आवाज आला पण नंतर आवाज कायमचा थांबला. दुसऱ्या दिवशी उंदराला शोधण्यासाठी त्या खोलीत गेलो तर कुठेच दिसेना. औषधाची थोडी सांडासांड झालेली दिसत होती. बराच शोध घेतल्यानंतर या बिचाऱ्या उंदराचे मृत शरीर स्वयंपाक घरातील अडगळीत पडलेले दिसले. अश्रूपुर्ण नेत्रानी आम्ही उभयतानी त्या जीवाला अखेरचा निरोप दिला. देवाजवळ दिवा लावून त्याच्या हत्येबद्दल क्षमा मागितली.

पुर्वी प्रत्येकाच्या बालपणी चिमण्यांच्या चिवचिवाटात जेवणाचा कार्यक्रम चालत असे. एक घास चिऊचा एक घास काऊचा करीत सर्व माता आपल्या तान्हुल्याच्या उदरात घास ढकलीत असंत. त्याकाळी छोटा भीम किंवा पोकेमन नसल्यामुळं सर्व माताना नैसर्गिक पात्रांचाच आधार घ्यावा लागत असे. चिऊताई च्या चिवचिवाटात जेवण कधी संपलं पत्ताच लागायचा नाही. थोडेसे मोठे झाल्यावर चंचल आणि भित्री चिमणी कावळ्याला पटकन घरात न घेण्या इतकी निष्ठूर का हे मात्र मला कधी कळलंच नाही. कधी कुठं झाडावर चिमणीचं घरटं दिसलं तर उगाचच आत डोकावून कावळा दिसतोय का पहावं अशी सुप्त इच्छा असायची. कावळा हा पक्षी जरी रंगाने काळा असला तरी मला तो रूबाबदार वाटतो. चिमणीसारखा तो चिमुरडा आणि भेदरट मुळीच नाही. त्याच्या मानेचा राखाडी रंग व डोक्यावरील टोपी त्याला छान शोभून दिसतात. रांजणातील तळात गेलेले पाणी दगड टाकून पिण्याची युक्ती याच कावळ्याला माहीत. ही गोष्ट ऐकल्यापासून तर माझा कावळ्यांबद्दलचा आदर दुणावला. रोज संध्याकाळी शेकडोनी आकाशात उडणाऱ्या कावळ्यांची शाळा सुटली असेच वाटायचे. आपल्या समाजात या काकसंप्रदायाला त्यांच्या रंगावरून जरी दुय्यम वागणूक दिली असली तरी काही खास प्रसंगात हाच कावळा पितरांचा दूत बनून आपल्या मदतीला धावून येतो. सर्व पितर याच पक्षाचा दूत म्हणून का वापर करून घेतात हे काही कळलेलं नाही. कधीतरी बदल म्हणून कबूतर, साळूंखी का पाठवत नाहीत.

घरोघरी आढळणारा अजून एक प्राणी म्हणजे पाल. समस्त महिला वर्गाचा जन्मजात शत्रू. त्याच्या किळसवाण्या रंग रूपाकडे कडे पाहून मला पण तो नकोसाच वाटतो. सर्व भींतीवरून मुक्तपणे संचार करीत या पाली फिरत असतात. त्या कुठून येतात, कशा येतात आणि कधी येतात याचं कोडं मात्र मला उलगडलेलं नाही. अगदी नवीकोरी इमारत असली तरी यांचे आगमन मालकाच्या आधीच झालेले असते. भींतींवर दिसणारे काळ्या रंगांचे उत्सर्जीत डाग हे पालींचे अस्तित्व दर्शवितात. रात्र झाल्यावर या पाली अन्न शोधार्थ बाहेर पडतात. कोणीतरी काही बोलत असताना यांचा चुकचूकाट ऐकून बोलणाऱ्या व्यक्तीने काही चूक तर नाहीना केली अशी शंका मनात येते. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी भल्या मोठ्या पाली पाहील्यात पण सिंगापूरमधे आल्यावर इथल्या पाली या आकाराने बारीक आणि गिड्ड्या आढळतात. त्या पण चायनीज असाव्यात कदाचित! जरी आकाराने मोठ्या व रांगड्या वाटत असल्या तरी मराठी पाली भारतीय संस्कृती प्रमाणे शालीन व सभ्य वाटतात. थोडसं जरी हातानं खुणावलं तर लगेच दूर पळून जातात. सिंगापूरातील पाली मात्र उद्दाम वाटतात. ढिम्म हलत नाहीत. उलट कधीतरी आपल्याच दिशेने येऊ लागतात. पालीच्या बटबटीत डोळ्यांकडे एकटक पहाण्याचा प्रयत्न मी करून पाहीलाय. काही क्षणातच किळस वाटायला लागून दृष्टी हलवावी लागते. मराठी पाली काही धोका ओळखून शेपटी तोडून पोबारा करतात. मांजराचे पिल्लू त्या वळवळत्या शेपटी बरोबर खेळत बसते. सिंगापूरातल्या पालीना तसली गरज नसावी. एकतर इथली मांजरे आळशी, जी मुळीच पालींच्या नादाला लागत नाहीत शिवाय या पाली इतक्या चपळ की शेपटीसह स्वत:चा जीव वाचवू शकतात.

या सर्व प्राण्या व पक्षांच्या बरोबरीने बऱ्याच किटक वर्गाचा सुध्दा आपल्या आयुष्यात फार मोठं स्थान आहे. माशी ही तरी मला बालपणीची मैत्रीण वाटते. मी अभ्यासाला बसलो की ती हमखास माझ्या करमणुकीसाठी समोर येऊन बसायची. तिची ती पंखांची उघडझाप, पुढील दोन पायानी तोंड साफ करण्याची पध्दत आणि सतत गुणगुणत अवती भोवती फिरणं या मुळं ती माशी कुतूहलाचा विषय राही. काही लोक फावल्या वेळेत माशा मारायचा उद्योग करतात. मी तर वेळ काढून माशा मारणे अथवा हुसकून लावण्याचे कर्तव्य बजावित होतो. पुर्वजानी जेवताना फक्त उजव्या हाताचाच का वापर करावा हे सांगण्याचं कारणं हेच असावं की डाव्या हातानं आपण आप्लाय ताटावर बसणाऱ्या माशाना हुसकावून लावू शकू. आजकाल स्वच्छतेच्या नावाखाली घरोघरी विवीध औषधे वापरून खोल्या साफ केल्या जातात. अशा परीस्थितीत या माशांचे जगणे अशक्य झाले आहे. सहज एखादा पदार्थ उघडा राहीला तर दोन मिनटात हजर होणाऱ्या या माशा आजकाल दोन महिने जरी पदार्थ उघडा ठेवला तरी ढुंकून बघत नाहीत. मानव जातीवर रूसून या कुठेतरी दूर आफ्रिकेत गेल्या असतिल असा माझा अंदाज आहे. तिथं तरी अजून माणूसकी शिल्लक असावी ही अपेक्षा.

स्वयंपाकघरात, बाथरूम मधे हमखास आढळणारा किटक प्राणी म्हणजे झुरळ! जगातील समस्त महिला वर्गाचा हा सर्वात मोठा शत्रू! जगातील बरेच संसार निव्वळ व निव्वळ या झुरळाच्या भीतीपोटी स्त्रीयानी टिकवून ठेवलेत असे मला वाटते. गृहीणी व झुरळ या दोघानाही त्या स्वयंपाकघरात राज्य करायचे असते.पण युध्द करावे लागते ते बिचाऱ्या नवरेमंडळीना. या झुरळावर काही औषध मारावे तर ते अधिकच चपळतेने आपल्या अंगावर धाव घेते. खरं सांगायचं तर हा प्राणी अतिशय सज्जन! कधी कोणाला काही त्रास देणार नाही. केवळ मानसिक भीतीपोटी या प्राण्याची हत्या केली जाते. अगदी छोट्या आकारापासून ते चांगले इंचभर लांबीची झुरळं घरावर राज्य करीत असतात. अंधारात अन्न शोधणे आणि जीवनचर्या चालवणे असा सोपा साधू संतासारखा यांचा दिनक्रम. अजून तरी मी झुरळामुळं कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो किंवा झुरळ कोणाला चावलं अशी बातमी वाचलेली नाही. या गरीब बिचाऱ्या किटक प्राण्याला जीवनदोर बळकट लाभो इतकीच माझी इच्छा!

या सर्व जीवांच्या यादीत प्रकर्षाने एखादे नाव घ्यावे ते म्हणजे डास. वास्तविक त्याचं आणि आपलं रक्ताचं नातं! पण गुणगुणत फिरणाऱ्या या जीवाचे कौतुक करावे ते थोडेच. माणूस कितीही प्रगत झाला तरी हा डास समाज दोन पावले पुढेच राहील हे त्यानी सिध्द केले आहे. पुर्वी डासांमुळे फक्त मलेरीया होत असे. त्याची औषधे बाजारात आल्यावर या डासांनी भयानक डेंग्यु आणला. त्याचा उपचार करेपर्यंत माणसाला जेरीस आणले तो पर्यंत चिकनगुन्या आला. आणि आता तर झिका नामक रोग हे डास लिलया पसरवतात. या डासानी आपले आकारसुध्दा बदलले. पुर्वी डोळ्याला दिसणारे टपोरे डास असायचे. आता तो इतका छोटूसा असतो की तो कधी येऊन चाऊन गेला आपल्याला पत्तापण लागत नाही. नक्कीच या डासांकडे काहीतरी अद्यायवत रीसर्च सेंटर असणार असा मला विश्वास वाटतो. डासांच्या बरोबरीने अजून एक त्याचा भाऊ जो आपल्या डोळ्यासमोर सतत नृत्य करण्यासाठी उताविळ असतो. तो म्हणजे चिलटं. दिसणारा अतिसुक्ष्म किटक पण आपले चित्त विचलीत करण्याची याची क्षमता असते.

रामदासस्वामीनी म्हणलेच आहे की हे घर, विश्व सर्वांचेच आहे. माणूस हा कृतघ्नासारखा इतर प्राण्याना मारत सुटलाय जे १००% चुक आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults