आकाशवाणी : फिरूनी नवी जन्मेन मी

Submitted by DJ.. on 14 February, 2020 - 02:20

मागील आठवड्यात विकेंडला गावी जाऊन यावे म्हणुन शुक्रवारी भल्या पहाटे उठुन आवरुन बॅग भरुन ८ वाजताच ऑफिसमधे आलो. येताना ऑफीसच्या बसमधे ड्रायव्हरने मोठ्याने रेडिओ लावलेला होता. अगदी नव्या सळसळत-फेसाळत-उसळणार्‍या गाण्यांनी आणि निवेदकाच्या आरडा-ओरडा करीत कानावर आदळणार्‍या गोंगाटाने जीव मेटाकुटीस आला होता. अधेमधे जाहिरातींचा भडिमार सुरू होताच. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त शब्द कानावर आदळत एकामागोमाग एक जाहिराती येऊन फेर धरत होत्या. त्यातली एक कसलीशी इंशुरन्स गाठ पॉलिसीची जाहिरात एका ब्रेकमधे ३-४ दा येत होती आणि ती सतत ऐकुन पोटात गोळा उठत होता. कसेबसे ऑफिस गाठल्यावर त्या रेडिओ वाहिनीच्या मार्‍यातुन एकदाचा मुक्त झालो. संध्याकाळी ऑफिसशेजारीच येणार्‍या ४.४५ च्या एसटीने थेट गावी जाता यावे म्हणुन हातातली कामे पटापटा आवरुन वेळेत एसटी स्टॉपवर पोहोचलो. एसटीही वेळेत आली आणि मजल-दरमजल करीत रात्री नऊला मुक्कामी पोचली.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठुन मूळगावी जाऊन शेतीची आणि घरगुती कामे हातावेगळी करावीत या हेतुने आईसोबत कारने गावी निघालो. सकाळी सकाळी कारमधे रेडिओ लावला तर आधिच आकाशवाणी ट्युन केलेली. कार सांगली जिल्ह्याकडे धावत होती आणि रेडिओवर ट्युन झालेले एफ.एम. सातारा केंद्र खरखरत होतं म्हणुन मग मी सरळ ए.एम. फ्रिक्वेंसीवर सांगली केंद्र सुरु केलं. कितीतरी दिवसांनी नव्हे तर कितीतरी वर्षांनी मी आकाशवाणी ऐकत होतो. मराठी गाणी सुरु होती. गाणं संपलं की एक पॉज घेत मंजुळ आवाजात निवेदिका पुढच्या गाण्याची माहिती द्यायची. कार्यक्रम संपला तेव्हा व्हायोलिनवर एका मराठी गाण्याची आक्खीच्या आक्खी धून वाजली. ते ऐकुन मला फार बरे वाटले.

गाडी रस्ता कापत होती आणि ड्रायव्हिंग करत मी आणि आई रेडिओवर आकाशवाणी ऐकत होतो. आता रेडिओवर जाहिराती लागल्या. "झुळझुळवाणी खेळवा पाणी.. आणायचं कुणी..? सांगतो राणी.. ढिंगटिंग ढिंगटिंग ढिंगटिंग ढिंगटिंग .. फिनोलेक्सनं आणलं पाणी शेतं पिकली सोन्यावाणी.. फिनोलेक्स..!" ही जाहिरात कानावर पडली आणि चेहर्‍यावर अचानक हसु उमटलं Bw . किती छान जाहिरात होती ती. खूप वर्षांपुर्वीपासुन ही जाहिरात ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. त्या लहानपणीच्या आठवणी आपसुक तोंडातुन बाहेर पडु लागल्या आणि आईसोबत आज त्या पुन्हा अनुभवता आल्या. त्याकाळी सांगली आकाशवाणीवर 'अनिल माचिस' आणि 'जी.एस. चहा' च्या बहारदार जाहिराती रोज न चुकता लागायच्या. त्या जाहिरातींचीही नक्कल करुन झाली आणि आपोआप मन प्रफुल्लीत झालं.

"मध्यम लहरी दोनशे एकोणचाळीस अंश आठ एक मीटर्स अर्थात बाराशे एक्कावन्न किलोहर्ट्झवर आपण आकाशवाणीचं सांगली केंद्र ऐकत आहात." अशी मंजुळ उद्घोषणा झाली आणि पुढील बातमीपत्र मुंबई केंद्रावरुन प्रसारीत होईल असं सांगण्यात आलं. मुंबई केंद्रावरील बातम्या प्रसारीत झाल्यावर विविधभारतीवरुन हिंदी गाण्यांचा कार्यक्रम प्रसारीत होईल असं निवेदन आलं. "ये है... विविधभारती......!" अशी माझ्या विस्मरणात गेलेली धुन वाजत कार्यक्रम सुरु झाला. विविधभारतीच्या निवेदकांचं हिंदी निव्वळ लाजवाब कॅटेगरीतलं. त्यानंतर विविधभारतीवरुन फोन इन कार्यक्रम प्रसारीत झाला तोही अफलातुन होता.

गावाकडची कामे आटोपून पुन्हा कारमधे बसलो आणि परतीचा प्रवास करता करता मधेच रेडिओची रेंज गेली म्हणुन पुढचं मागचं कोणतं स्टेशन लागतंय का हे पाहिलं. कुठलंतरी कन्नड स्टेशन लागलं. बहुतेक बेळगाव असावं असा माझा कयास. मग ए.एम. बँडचा नाद सोडुन मी एफ.एम. बँड वर आलो तेव्हा खाजगी वाहिन्यांना ओलांडुन पुढे गेल्यावर १०२ अंश ७ मीटर्स वर आकाशवाणीचं कोल्हापुर केंद्र लागलं. तिथं नाट्यसंगीत सुरु होतं. ४-५ नाटकांतील नाट्यगीतं ऐकवुन झाल्यावर निवेदिकेनं पुढील कार्यक्रम 'पालातील माणसं' या पुस्तकाचं क्रमशः वाचन असं सांगुन पुस्तकवाचन कार्यक्रम सुरु केला. एकेक ओळ वाचताना अधुनमधुन येणारे संवाद त्या-त्या पात्राच्या तोंडुन आलेत की काय असा भास होत होता इतके ते पुस्तकवाचन प्रभावीपणे ऐकवलं जात होतं. कोल्हाट्यांच्या पालावरील तो संवाद संपुच नये असं वाटत होतं परंतु ठरावीक वेळ होताच तो संवाद अलगद संपवुन निवेदिकेनं पुस्तकाच्या लेखक आणि सादरकर्त्यांचं नाव सांगितलं. सादरकर्त्या 'नीना मेस्त्री-नाईक' हे नाव तिच्या तोंडुन ऐकलं तसं मला फार आश्चर्य वाटलं. नीना मेस्त्री-नाईक नामक बाई फार फार वर्षांपुर्वी सांगली आकाशवाणीवर 'प्रभातीचे रंग' हा कार्यक्रम सादर करायच्या. अजुनही त्या तिथे कर्यक्रम करत देखिल असतील पण काळाच्या ओघात माझा आकाशवाणीशी संबंध तुटला असल्याने म्हणा किंवा मी आता सांगली आकाशवाणीच्या परिघात येत नसल्याने म्हणा आता कित्त्येक वर्षांत त्यांचे कार्यक्रम अथवा नाव कधीही ऐकले नव्हते. आज या प्रवासाच्या दरम्यान त्यांचे नाव ऐकताच 'प्रभातीचे रंग' या कार्यक्रमाची आठवण झाली.

त्याकाळी आकाशवाणी सांगली केंद्रावर रोज सकाळी पुणे केंद्रावरच्या प्रादेशीक बातम्या संपल्यावर ७ वाजुन १५ मिनिटांनी प्रभातीचे रंग हा कार्यक्रम सुरु व्हायचा. त्या कार्यक्रमाचे लेखक (बहुदा बापु जाधव की कायसे होते.. आता पुसटसं आठवतं.. किंवा आठवतही नाही..) आणि सादरकर्त्या (ज्या नीना मेस्त्री-नाईकच असायच्या) यांची नावं सांगुन प्रायोजकांचं नाव सांगितलं जायचं जे मला आजही लख्खपणे आठवतंय. त्या प्रायोजकांचं नाव एका दमात घेणार्‍या मेस्त्री-नाईक बाईंचं भारी कौतुक वाटायचं Proud त्या आवाजाला उंची+खोली देत असं म्हणायच्या - "प्रभाssतीचे रंssग ... प्रायोजक - कडक, लज्जतदार आणि उत्साहवर्धक जी.एस. चहाचे वितरक मेसर्स गोविंदराम शोभाराम आणि कंपनी... गणपती पेठ... सांगली..!" आवाजाच्या हिंदोळ्यावर श्रोत्यांना असं झुलवुन त्या प्रास्तावीक करुन कार्यक्रम सुरु करायच्या आणि रोजच्या रोज नवीन आशयावर बेतलेल्या विषयाला धरुन गाणी प्रसारीत करायच्या. कार्यक्रम कधी संपला हे कळायचंही नाही. ते वय कार्यक्रम मन लाऊन ऐकण्याचं नव्हतंच मुळी. तिसरी-चौथीच्या मुलात असलेला अफाटपणा मिरवताना जी काही ४-५ वाक्यं कानावर पडायची तेवढीच पण मनावर आपसुक कोरलेली. सकाळी अंथरुणातुन न उठण्याची इच्छा + त्यामुळे होत असलेला उशीर आणि रागावलेली आई + चिडलेले वडील + आंघोळ + नाश्ता ही सर्व धांदल आकाशवाणी सांगली केंद्राच्या श्रवणीय प्रसारणाच्या पार्श्वभुमीवर आमच्याच काय त्याकाळच्या बहुतेक सर्वच शाळकरी मुलांच्या घरी रोजच्या रोज घडायची Biggrin आकाशवाणी सांगली केंद्राशी नाळ जुळली ती ही अशी.

त्यानंतर रोजचं न संपणारं हे जीवनचक्र अव्याहतपणे फिरतच राहिलं. दिवसांमागुन दिवस सरले, महिन्यांमागुन महिने आणि वर्षांमागुन वर्षंही सरली. शाळेतुन हायस्कुल, हायस्कुल मधुन कॉलेज आणि कॉलेजमधुन नोकरीधंद्यानिमित्त मोठं शहर अशी स्थित्यंतरं होत गेली. ह्या सर्वात मी आकाशवाणी सांगलीच्या परिघाबाहेर गेल्यामुळे आकाशवाणी सांगलीशी आणि पर्यायाने सहक्षेपीत कार्यक्रमांमुळे ऐकण्यापुरता का होईना संबंध येणारी पुणे, मुंबई, दिल्ली अशी केंद्रेपण जीवनातुन हद्दपार झाली. कधीकधी गावी जाणं होतं तेव्हा माझ्या चुलत्यांना रोज सकाळी न चुकता ७ च्या बातम्या रेडिओवरच ऐकायच्या असतात. तेव्हा सकाळी ७ च्या ठोक्याला सुरु होणार्‍या आणि बातमीपत्र संपताच बंद होणार्‍या रेडिओमुळं जो काही १-२ मिनिटांचा सहवास सांगली आकाशवाणीशी यायचा तेवढाच. ती १-२ मिनिटं का होईना पण सांगली आकाशवाणीच्या निवेदकांचा आवाज कानी पडायचा आणि खाजगी रेडिओ केंद्रांच्या गराड्यात आकाशवाणी अजूनही तग धरुन आहे याची जाणीव व्हायची.

मोठ्या शहरात आल्यावर पहिल्यांदाच खाजगी रेडिओ केंद्रं ऐकली. मला एकदम भारी वाटलं. नवीन नवीन हिंदी गाण्यांची खैरात, हिंदी+इंग्लिश्+मराठी ची भेळमिसळ करत अतिशय वेगवान आणि उच्छॄंकल शैलीत सादरीकरण करणारे रेडिओ जॉकी जाम खुश करायचे. जोडीला कसलेसे विनोद, फोनवर घेतलेल्या फिरक्या, शेरो-शायरी आणि कसलाच धरबंद नसलेल्या जाहिरातींचा भडीमार अशी साधारणत: सर्वच खाजगी वाहिन्यांची तर्‍हा. त्या तर्‍हेला अंगीकारत आणि कामाचा व्याप सांभाळत मधे एवढी वर्षं लोटली.

ऑफिसला जाताना बसमधे एका रेडिओ स्टेशनवर जाहिरातींचा भडीमार सुरु झाला की लगेच दुसरीकडे फ्रीक्वेन्सी ट्युन करणार्‍या हजरजबाबी ड्रायव्हरची तारीफ कराविशी वाटते. पण बदललेल्या स्टेशनवरही तीच तर्‍हा Uhoh . मग तिसरं.. मग चौथं.. पाचवं.. असं करत पुन्हा परत येरे माझ्या मागल्या पहिलंच स्टेशन येतं. कितीही गाणी व आर.जें.ची बडबड ऐकली तरी मन काही रमत नाही अशी अवस्था होते. अशा वेळेस मला आकाशवाणीची आठवण यायची. कधीतरी हे असह्य होऊन इथल्या आकाशवाणी केंद्राची फ्रेक्वेंसी ट्युन केली तरी का कुणास ठाऊक पण इथल्या केंद्राशी नातं कधी जुळंतच नाही. आकाशवाणी सांगली, सातारा, कोल्हापुरशी असलेला आपलेपणा इथे जाणवत नाही. आपल्या मातीची ओढ स्वस्थ बसु देत नाही. पण आता या सर्वांवर उपायदेखील अलगद सापडला... तोही आकाशवाणीवरच बरं का..! Bw .

गेल्या आठवड्यात गावाला जाताना मी आकाशवाणी सांगली ट्युन केली नसती तर मी अजुनही तिच्यापासुन दूरच राहिलो असतो. त्या दिवशी मी रेंजच्या उपलब्धतेनुसार सांगली, कोल्हापुर आणि सातारा केंद्रांचं प्रसारण ऐकलं तेव्हा प्रत्येक वेळेस निवेदक अधुन-मधुन आकाशवाणीच्या अ‍ॅपची माहिती देत होते. newsonair असं त्या अ‍ॅपचं नाव.

गावाहुन पुन्हा इथे आल्यावर मी सहज म्हणुन newsonair अ‍ॅप प्ले स्टोअरवर सर्च केलं, ते माझ्या फोनवर डाऊनलोड केलं आणि काय आश्चर्य! आता मी भारतातल्या कोणत्याही आकाशवाणी केंद्राचं प्रसारण बसल्या जागी सुस्पष्ट आवाजात ऐकु शकत होतो. मला क्षणभर विश्वासच बसेना. आकाशवाणी सांगली लावलं तर स्पष्ट आवाजात ते तात्काळ सुरु झालं. सातारा केंद्र लावलं तर तेही त्याच क्षमतेनं आणि स्पष्टतेनं सुरु झालं मग मी कोल्हापुर आकाशवाणी ट्युन केलं तर 'पालातील माणसं'चं वाचन सुरु होतं. मी तिथल्या तिथे कार्यक्रमाशी कनेक्ट झालो. Bw

आकाशवाणीनं कात टाकली म्हणुन त्यांचं अभिनंदन करावसं तर वाटतंच पण सांगली आकाशवाणीनं महापुराने झालेल्या नुकसानाची झळ जाणवु दिली नाही याचंही कौतुक वाटतं.
https://www.loksatta.com/maharashtra-news/akashwani-sangli-radio-station...

आता आमच्या घरातली रोजची सकाळ पुन्हा एकदा आकाशवाणी सांगलीच्या पार्श्वभुमीवर सुरु होते याचा आनंद फार मोठा आहे. सगळं कसं जसंच्या तसं... तीच अंथरुणातुन न उठण्याची इच्छा + त्यामुळे होत असलेला उशीर आणि रागावलेली आई + चिडलेले वडील + आंघोळ + नाश्ता ही सर्व धांदल सुरु आहेच फक्त एक पिढी पुढे सरकली इतकाच काय तो फरक...! Bw

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह क्या बात! एकदम नॉस्टॅलजिक लेख. छान लिहिलंय.
हवामहल म्युझिक, ये हे आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम, बोलणं थोडी मागे खरखर. किती मस्त आठवणी आहेत रेडीओबरोबरच्या.
संस्कृत बातम्या लागल्या की बलदेवानंद सागरः पण आठवतात आणि शाळेत जायची गडबड.
टारझन , फिनोलेक्स, रामण्णा ऐकल्याशिवाय बालपण गेलेच नाही.

बलदेवानंद सागर: , वार्तापि श्रुयताम्, इति वार्ता: , सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ही वाक्यं जशीच्या तशी कानात अजूनही ऐकू येतात. सकाळी शाळेला जात असताना घराघरात सुधा नरवणे यांच्या बातम्या रेडीओवर मोठ्यानं ठळक, खणखणीत आवाजात ऐकायला मिळायच्या. जसं जसं पुढे चाललं की पुढच्या घरात पुढची बातमी ऐकायला मिळायची.

> निवेदिकेनं पुढील कार्यक्रम 'पालातील माणसं' या पुस्तकाचं क्रमशः वाचन असं सांगुन पुस्तकवाचन कार्यक्रम सुरु केला. एकेक ओळ वाचताना अधुनमधुन येणारे संवाद त्या-त्या पात्राच्या तोंडुन आलेत की काय असा भास होत होता इतके ते पुस्तकवाचन प्रभावीपणे ऐकवलं जात होतं. कोल्हाट्यांच्या पालावरील तो संवाद संपुच नये असं वाटत होतं परंतु ठरावीक वेळ होताच तो संवाद अलगद संपवुन निवेदिकेनं पुस्तकाच्या लेखक आणि सादरकर्त्यांचं नाव सांगितलं. > हे रोचक आहे!!

फारच छान वर्णन आहे.
अगदी लहानपणा पासून च्या आठवणी जागृत झाल्या. आकाशवाणी मुंबई ब वर सकाळी अकरा ते साडे अकरा कामगारांसाठी (रात्रपाळीच्या) कार्यक्रम असे. तेंव्हा दुपारच्या शाळेत जाण्यापूर्वी आम्ही जेवायला बसायचो आणि आई पोळ्या करत असे त्याची आठवण झाली.
बाकी प्रकाशचे माक्याचे तेल, रामय्या आणि चारमिनार पत्रे, फिनोलेक्सनं आणलं पाणी शेतं पिकली सोन्यावाणि अशा अनेक जाहिराती बद्दल वाचन लहानपण एकदम जागृत झालं.
आई गं वैतागले मी या केसांना या वर मी एकदा म्हटलं कि "मग ते कापून का टाकत नाहीस" हे ऐकून आमचे वडील खो खो हसले होते. आमच्या आईचे केस प्रकाशचे माक्याचे तेल न लावताही लांब सडक आणि काळे भोर होते याची हि आठवण झाली.
धन्यवाद.

मस्त लेख.
newsonair अ‍ॅप डाऊनलोड केले Happy

त्याचे नक्की शब्द कोणाला माहीत आहेत का?
या या या गम्मत जम्मत, या या या गम्मत जम्मत, या या या झिंच्याक झिंक, झिंच्याक झिंच्याक झिंक..
आई ग ! वैतागले मी ह्या केसांना. माझा थोरला भाऊ म्हणायचा, मग बायरचे बेगॉन का घेत नाही? त्याने केस गळायचे तर थांबतातच व झोपही कायमची लागते.
रविवारचा दिवस, क्रिकेट वुईथ विजय मर्चंट, बॉर्नविटा क्विझ काँटेस्ट, कोहिनूर गीत गुंजन ऐकण्यात जायचा. दुपारी १५ मिनिटे नवीन सिनेमाचे ऑडियो ट्रेलर असायचे.

दुपारी १५ मिनिटे नवीन सिनेमाचे ऑडियो ट्रेलर असायचे>>>

विविधभारतीवर हे रविवारी असायचे. सकाळी 11 नंतर, 15 -15 मिनिटांचे ट्रेलर्स असायचे. दुपारनंतर चित्रपटांचे ऑडिओ गाणी वजा करून ऐकवायचे. शोले पडद्यावर पाहायच्या आधी मी रेडीओवर ऐकला होता Happy
टीव्हीवर ट्रेलर यायला लागल्यावर रेडिओवरचे बंद झाले. आत युट्युबच्या जमान्यात टीव्हीवर दाखवतात की नाही माहीत नाही.

खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
लहानपणी आमची सकाळ "आकाशवाणी मुंबई आणि पणजी, ज्योएल गोम्स कोंकणी.... खबरों देतां " याने व्हायची. .....च्या जागीचा शब्द नक्की आठवत नाही.
बाकी विविध भारती , बिनाका गीत माला , फौजी भाईयोंके लिये , बेला के फूल मग साडे अकरानंतर झोप , चेंडूफळीचे धावते समालोचन, यासंगती बालपण गेले.
खूप खूप आभार

आर्यन, ते थोडं वेगळं आहे -
इयम् आकाशवाणी। संप्रति वार्ताः श्रुयन्ताम्। प्रवाचकः बलदेवानन्दसागरः।

@ननि, आभारी आहे Bw

माबोच्या सन्माननिय सदस्य @मोहना मॅडमनी हा लेख वाचल्यामुळे त्यांची मैत्रीण असणार्‍या नीना मेस्त्री-नाईक यांच्यापर्यंत हा लेख पोहोचला आणि त्यांच्याशी माझा काँटॅक्ट होऊ शकला. आम्ही फोन वर बोललो देखिल. सदर लेख आकाशवाणी सांगली केंद्रापर्यंत पोहोचल्याने माझ्या लेखाचा काही भाग परवा रात्री साडेनऊ वाजता सांगली केंद्रावर प्रसारित झाला.

लेख वाचुन कामानिमित्त जगाच्या पाठीवर कुठेही काम करणार्‍या भारतीयांना आपल्या लहाणपणी ऐकलेल्या आकाशवाणी केंद्राची आठवण झाली. त्या आठवणींना पुन्हा जागवण्यासाठी newsonair हे अ‍ॅप बर्‍याच जणांनी डाउनलोड करुन आपल्या आवडीचे आकाशवाणी केंद्र ऐकले आणि तशी प्रतिक्रियाही कळवली. मायबोलीमुळे मला माझ्या भावना व्यक्त करता आल्या आणि त्या सर्वांपर्यंत पोहोचल्या याचं खुप समाधान वाटलं. Bw

खूपच छान लेख. त्या नाईक बाईंचा परिच य लिहा मायबोलीवर. मी लंच करताना लेख व प्रतिसाद वाचून काढले आता अ‍ॅप डाउन लोड करते.
माझ्याकडे लहान पणी होता ट्रान्जिस्टर. बेला के फूल ऐकून संपले की झोप लागायची मग एकदम रात्रीत उठून दॉइश वेले. काही अफगाणी इराणी असे संगीत असे काय काय चाक फिरवत ऐकत बसत असे. धन्यवाद.

सांगली आमचे सासर. अजून गावभागात दुकान आहे. बंदुक वाले खाडीलकर ते आम्ही. एक कार्यालय पण आहे. त्या वहिनींशी बरेच वर्शात बोलणे नाही. ( लागू कार्यालय) बेस्ट जागा

सदर लेख आकाशवाणी सांगली केंद्रापर्यंत पोहोचल्याने माझ्या लेखाचा काही भाग परवा रात्री साडेनऊ वाजता सांगली केंद्रावर प्रसारित झाला. >>
अरे वा! हार्दिक अभिनंदन Dj..

अमा आणि वावे धन्यवाद..!

@ अमा, त्या नीना मेस्त्री-नाईक मॅडम आता आकाशवाणीच्या कोल्हापुर केंद्रावर कार्यरत आहेत. गेली ३० वर्षं त्या आकाशवाणीच्या सेवेत आहेत.

सदर लेख आकाशवाणी सांगली केंद्रापर्यंत पोहोचल्याने माझ्या लेखाचा काही भाग परवा रात्री साडेनऊ वाजता सांगली केंद्रावर प्रसारित झाला. >>
हार्दिक अभिनंदन Dj..

Pages