तुम्ही तुमच्या मुलांची नावे कशी ठेवली?

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2020 - 16:21

मायबोली असो वा जगातले कुठलेही संकेतस्थळ साधारण महिन्याभराने तिथे "मुलासाठी / मुलीसाठी नाव सुचवा" असा एखादा धागा निघतोच. विशेष म्हणजे अश्या धाग्यांवर कोणीही टिंगलटवाळी करत नाही. कारण सर्वांना माहीत असते की हा धागाकर्त्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांना ते माहीत असते कारण तो त्यांच्याही जिव्हाळ्याचा विषय असतो. आपण सर्वांनीच पोरांची नावे ठेवताना फार विचार केला असेल. जसे घर घेणे हे वन टाईम ईन्वेस्टमेंट असते तसे पोरांची नावे हे देखील एक वनटाईम डिसीजन असते. निदान मुलींना लग्नानंतर नाव बदलायचा एक चान्स तरी मिळतो, बिचारया मुलांच्या जातीला तो ही नाही. त्यामुळे उद्या आपल्या पोरांनी असे कसे रे माझे नाव ठेवले बाबा बोलू नये म्हणून आपण छान सुंदर नाव हुडकून काढतो. किमान अर्धा मराठी शब्दकोष पिंजून काढतो. पण पोरांना एक मस्त अर्थपुर्ण नाव देतो. बस्स तेच नाव तुम्ही कसे शोधले याचे अनुभव ईथे शेअर करूया.

थोडक्यात अन पाल्हाळ न लावता मीच सुरुवात करतो.

१) पहिलीच पोरगी झाली. तिच्या जन्माची कहाणी ईथे शेअर केलेली. आज नावाची करतो. तशी काही विशेष नाहीये. पण मुलगीच पाहिजे आहे आणि मुलगीच होणार याची निन्याण्णवे टक्के खात्री असूनही मुलगी होऊनही बारश्याच्या मुहुर्तापर्यंत तिचे नाव काय ठेवावे हे ठरत नव्हते. म्हणजे सुचत होते पण माझे आणि बायकोचे एकमत होत नव्हते.

अखेर बारश्याच्या दिवशी पाळण्यात ठेवलेल्या पोरीच्या कानात नाव सांगायची वेळ झाली आणि तिच्या कानात नुसतीच फुंकर मारायची वेळ येतेय का असे वाटले. ईतक्यात अचानक माझे वडील म्हणाले परी नाव ठेवा. पोरगी परीसारखीच आहे दिसायला. सगळे हो हो म्हणाले. मी सुद्धा म्हणालो हो, पोरगी परीसारखीच आहे दिसायला. बस्स यालाच माझा होकार समजून घरच्या लोकांनी हेच नाव फायनल केले आणि दोन महिन्याच्या मासूम चेहरयामागे लपलेल्या एका शैतान मुलीचे नाव परी ठेवले गेले Happy

पुढे मात्र परी हे घरचे नाव म्हणून ठिक आहे पण कागदोपत्री नाव दुसरे ठेऊया असा किडा घरच्यांच्या डोक्यात वळवळला होता. पण तोपर्यंत मी तिचे परी हे नाव स्विकारले होते. ज्या नावाने तिला हाक मारायला आवडते ते सोडून उगाच कश्याला गहन अर्थाचे नाव निव्वळ आपले भाषाज्ञान सिद्ध करायला ठेवा असे घरच्यांना सुनावून मी त्यांच्या डोक्यातला किडा ठेचून मारला.

आजच्या तारखेला मी तिला परी, परया, परू किंवा नुसतेच पss अशी हाक मारून तिच्या साध्यासोप्या सुटसुटीत नावाचा निखळ निर्मळ आनंद ऊचलतो Happy

२) दुसरा पोरगा ऋन्मेष ... नाम तो सुना ही होगा Happy

मला या नावाचा अर्थ माहीत नाही. कदाचित या नावाला अर्थ नसेलही. कदाचित असा शब्दच अस्तित्वात नसेल. मला फक्त मायबोलीवर डुआयडी काढायला एखादे कॅची नाव हवे होते. आणि तो शब्द मराठी शब्दकोषातला हवा असा हट्टही नव्हता. त्यामुळे जे सुचले ते ठेवले.

मुलाचा जन्म झाला, नावाची शोधाशोध सुरू झाली. हे नावही आलेले माझ्या डोक्यात. पण ज्या नावाचा अर्थही माहीत नाही ते बायकोला कसे सुचवायचे असा बाळबोध विचार करून मनातच ठेवले.

पण एकदा बायकोच सहज म्हणाली, मला तर ते ऋन्मेष नावही खूप आवडते... खर्रंच, मी सुद्धा ते ऐकून उत्साहीत झालो. आणि जराही वेळ न दडवता तिच्याकडून या नावावर शिक्कामोर्तब करून घेतले.

दुसरया दिवशी बायकोने आपल्या बहिणींना हे नाव सांगितले. तसे त्यांनी नाके मुरडत भुवया तिरप्या केल्या. हे कसले नाव? म्हणत स्वत: शोधून आणलेली नावे पुढे दामटली. बायकोच ती, माहेरचा आहेर पहिला स्विकारणार. त्यात तिच्या आईनेही नावाला अर्थ हवाच ! असं ठासून म्हटले. मग तर मी नाक घासूनही ती माझे ऐकणार नव्हती.

पण तरीही मी ठाम राहिलो. प्रकल्प मी तडीस नेणार आणि उद्घाटन सोहळा दुसरयांच्या हस्ते. असे कसे चालणार. अखेर सासुरवाडी नमली आणि ऋन्मेषच नाव फायनल झाले. सध्या रुनू, रुंट्या, रुंटूपुंटू अश्या नावांचा ते लोकं मनसोक्त आनंद घेतात. पण ऋन्मेष नावाला मात्र Runमेष म्हणजे मेंढ्या हाकणारा मेंढपाळ असे चिडवतात.....

आता आपलेही किस्से येऊ द्या Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिदीतचा अर्थ मलाही माहीत नव्हता. छान आहे अर्थ. बोले तो अर्थ पॉप्युलर. जगप्रसिद्ध. मलाही नेहमी माझ्यापुरता असलेल्या जगात प्रसिद्ध व्हायला आवडते Happy

सहसा मला लोकांना त्यांच्या मुलांच्या नावाचा अर्थ विचारायला भिती वाटते. दोन कारणाने. पहिले म्हणजे अर्थ सोपा असेल तर समोरच्याला वाटू शकते श्या याला एवढं साधं माहीत नाही. याऊलट अर्थ गहन असेल तर समोरच्याचा असा गैरसमज होऊ शकतो की मी मुद्दाम काय विचित्र नाव ठेवलेय असे दर्शवायला अर्थ विचारत आहे Happy

सहसा लोकं आपल्या मुलांच्या नावाबद्दल भावनिक असतात. त्यामुळे काळजीही घ्यावी लागते. एखादे नाव खरेच विचित्र असेल आणि अर्थही भलताच असेल तरीही तो समजताच उगाचच अरे व्वा छान आहे नाव असे म्हणावे लागते.

बाकी मला माझ्या दोन्ही पोरांचे नाव कोणालाही सांगताना दोनदा सांगावे लागते.
१) मुलीचे नाव परी आहे हे एकदा सांगितल्यावर परी हेच नाव आहे आणि ते टोपणनाव नाही म्हणत पुन्हा एकदा सांगावे लागते.
२) ऋन्मेष हे नाव सांगितल्यावर समोरचा हमखास एकदा त्याचा ऊच्चार करून ते कन्फर्म करतो. आणि मग ते कन्फर्मेशन द्यायला पुन्हा एकदा ते नाव ऊच्चारायला लागते.

ऋन्मेष या नावाचा अर्थही ९० टक्के लोकं विचारतात. त्याला अर्थ नाही हे सांगतानाच या नावामागची कहाणी सांगायलाही मला मजा येते. आपण एखाद्या वेबसाईटवर एखादे टोपणनाव लाऊन लिहितो वगैरे चारचौघांमध्ये जाहीरातही होते Happy

दहापैकी साडेसात जणांच्या घराण्यात एखादी तरी परी असते आणि लोकं हे आवर्जून सांगतात की आमच्याकडेही एक परी आहे. पण आमची परी ऑफिशिअल आहे हे त्यांना हसत हसत सांगायलाही मला मजा येते.

बाई दवे,
धागा छान चालू आहे. वावे यांचे विशेष आभार !

लिटलबिट अवांतर - पोरांची नावे ठेवताना पुढे जाऊन त्यांचे मित्र त्या नावाचा काय काय अपभ्रंश करू शकतात याचाही नक्की विचार करावा !

बाकी मला माझ्या दोन्ही पोरांचे नाव कोणालाही सांगताना दोनदा सांगावे लागते. + १२३४५६७८९ अगदी सेम.

मुलाचं नाव अगदी शेवट पर्यंत मल्हार हेच final होतं. पण नंतर कबीर जास्त आवडायला लागलं.. आणि delivery date पर्यंत पुन्हा शोधाशोध केली आणि अयांश हे नाव मिळालं. मग अर्थ खूप आवडला आणि हेच आहे आता नाव.
मुलगी झाली तर पक्कं ठरवलं होतं नाव .. अनाहिता !
दुसऱ्या delivery च्या वेळी मात्र नावं शोधायला च लागली नाहीत.. आता कबीर final केलं होत, आणि मुलगी झाली तर अनाहिता च!
आणि मुलगीच झाली. Happy
दोन्ही नावं अजिबात अवघड नाहीत, पण ऐकणारे परत / २दा विचारतातच.. Happy
अयांश आणि अनाहिता..

आजोबा गेल्यावर जन्मलेल्या पहिल्या नातवाला त्यांचं नाव ठेवायची पद्धत नाही का कुणाकडे? किंवा तसं नाव ठेवायची वेळ कुणावर आली का?
या पद्धतीमुळे माझ्या भाच्याचं नाव महादेव आणि माझ्यापेक्षा बर्‍याच लहान चुलतभावाचं नाव सदाशिव आहे. आता वडिलांच्या, सासर्‍याच्या नावाने हाक कशी मारायची? म्हणून भाच्याला घरगुती वेगळं नाव आहे. पण कागदोपत्री महादेवच. चुलतभावाला आजोबांना म्हणायचे तसे आबा म्हणतात.
आज्यांची नावं नातींना ठेवतात का?

अयांश - first ray of light आणि part of parents . २रा अर्थ जास्त आवडला आम्हाला.

आमच्या एका मित्राने त्याच्या बायकोचे नाव ऐश्वर्या ठेवले. त्याला दुसरं अमित्र म्हणाला आता मुलगा झाला कि नाव ऐरावत ठेव.

असेच माझ्या मैत्रिणीने मुलीचे नाव "अवनि" ठेवले. ती गेल्यावर मी बायकोला म्हणालो "अवनि" हे नाव मला आवडत नाही कारण त्याचे विस्तारित रूप "अन्न वस्त्र निवारा" होते. यावर बायको खळखळून हसली.

असेच माझ्या मैत्रिणीने मुलीचे नाव "अवनि" ठेवले. ती गेल्यावर मी बायकोला म्हणालो "अवनि" हे नाव मला आवडत नाही कारण त्याचे विस्तारित रूप "अन्न वस्त्र निवारा" होते. >>> चालायचंच नाही आवडत काही जणांना सु ख देखील. Happy

चालायचंच, नाही आवडत काही जणांना सु ख देखील

त्यात काय बऱ्याच जणांना माझा चेहराही आवडत नाही.

चालायचंच

Anvit चा अर्थ पण मस्त आहे. (दोन गोष्टी)जोडणारा. म्हणजे 2 माणसं, नाती, घरं काहीही...
ते नाव तेंव्हा फार apt पण होतं कारण तो झाला तेंव्हा बरीच नाती एकत्र आली.
त्याच्या पहिल्या वादीला माझ्या आईचे 2 मामा एकत्र आले. ते अनेक वर्षांपासून बोलत नव्हते एकमेकांशी. त्याच्या वादीला भेटले आणि सगळे गैरसमज दूर झाले वगैरे..

फक्त समहाऊ anvit म्हणलं की एक गोड शहाणा मुलगा येतो डोळ्यासमोर आणि रिदीत म्हणलं की गोड पण आगाव. सो आमचा दुसऱ्या प्रकारात मोडतो त्यामुळे हे ही नाव बरंच apt Lol

नाव आवडलेल्याना धन्स Happy

रीया Lol

अवनी म्हणजे पृथ्वीना.

मी ठेवलंय माझ्या भाचीच्या पाच नावांपैकी एक हे. कागदोपत्री बहिणीने अन्नदा ठेवलं, माझ्या आजीचे नाव अन्नपुर्णा होतं, तिची आठवण म्हणून, हाक त्याच नावाने मारतात, भाची अन्नदाचा उच्चार पण लहानपणापासून अगदी बरोबर करते, इतर चुकतात तेव्हा ठासून सांगते, हे नाव आहे. भरत यांनी वर विचारल्याप्रमाणे काहीजण ठेवतात आजी आजोबांच्या नावावरून थोडा बदल करून, पण आता प्रमाण कमी झालंय. पूर्वी सर्रास पद्धत होती. अर्थात माझी आजी जाऊन बरीच वर्ष झाली, त्यामुळे ती गेल्यावरची ही पहिली नात नाही, पुढच्या पिढीतले पण हिच्यापेक्षा मोठे आहेत, आजी गेल्यावर झालेले.

लेकीच्या वेळेला "ह" अक्षर आले होते. तिच्या काकाने सुचवले होलिका ठेवा. माझी बहीण म्हणाली "नको, मुलं चिडवतील होली का रंगपंचमी" Lol Lol Lol

माझ्या मुलाच्या बारश्याच्या दिवसापर्यंत त्याच नाव आदिश ठेवायचं असं ठरलं होत आमचं सगळ्यांचं ..आयत्यावेळी मात्र मी कसं कोण जाणे आदित्य नाव सांगितलं आणि तेच फायनल झालं.
स्वभावाने तापट आहे.....आई नेहमी म्हणायची सूर्याचं नाव ठेवलंस ना म्हणून ......
मुलीच्या वेळेस मात्र आधीपासूनच नंदिनी नाव ठेवायचं ठरलं होत आणि तेच ठेवलं...
माझ्या धाकट्या जावेच्या मुलाचं नाव रेवांश आहे..म्हणजे विष्णूचा अंश...

इतक्या नावांचे अर्थ जि इथे सांगितले आहेत ते कुठे मिळतात?

उदा. रेवांश याची कशी फोड करायची की त्याचा अर्थ विष्णूचा अंश असा होतो? मला रेवाचा (नर्मदा) अंश असा अर्थ समजू शकतो. पण विष्णू? (हे फक्त एक उदाहरण झाले)

इतक्या नावांचे अर्थ जि इथे सांगितले आहेत ते कुठे मिळतात?>> गूगलवर मिळतात. अनेक साईट्सवर नावांची यादी अर्थासहित असते.

गूगलवर मिळतात. >>>> तात्या हे शंकराचे नाव गुगलवर पहिल्याच दावा एकीने अशा जोशात केला होता की साक्षात शंकर पण होय म्हणाले असते .

रेवा = विष्णू हे कसं ते कळलं नाही. मग जशी लक्ष्मी - अलक्ष्मी असतात, तसं रेवा - अरेवा पण असतात का? अरे वा!

लिंक म्हणजे कहर झाला Biggrin

तात्या Lol
तथ्य च तत्य असेल त्याचं तात्या वाचलं असेल.

मी बऱ्याचदा एखाद्या नावाचा अर्थ काळाला की तो तिथपर्यंत कसा पोहचला असेल याचा विचार करते. म्हणजे फोड करून किंवा कुठल्या श्लोकात सापडतो आहे का वगैरे.

माझं नाव लग्नानंतर रेवा ठेवलंय सो आमच्या 10 च्या लिस्ट मध्ये रेवांश हे ही नाव होतं तेंव्हा ते कृष्णाचं नाव कशा अर्थाने असेल तिथपर्यंत पोहचले होते मी. आता विसरले

Pages