पाणटाक्याची वाट
काही वर्षांपूर्वी उन्हाळ्याचा दिवसांत वशाळा, गुंडा, वेळूक भागात गेलो होतो. फारशी झाडी नसलेला हा भाग त्यावेळी तर खूपच रुक्ष आणि वैराण वाटला. नेमकं यंदाच्या पावसाळ्यात आमचे ज्येष्ठ सह्यमित्र संजय अमृतकर या भागात जाऊन आलेले त्यांच्याशी चर्चा करून एक दिवसाची सवड काढत प्लान फिक्स करून टाकला.
शनिवारी पहाटे सतीश आणि मी त्याच्या ज्युपिटर सोबत नाशिक हायवे धरला. शहापूर खर्डी दरम्यान पावसाने चांगलच झोडपलं. कसारा वशाळा फाट्यावर गरमागरम नाश्ता करून उजवी मारली. लहान मोठे चढ उतार असलेला वळणावळणाचा रस्ता सोबत अनेक ओढे नाले.
सर्वत्र हिरवागार बहरलेला निसर्ग जिथे वाटेल तिथे थांबव गाडी काढ फोटो असेच चालू होते. वशाळाहून डावीकडे फुगाळ आघाणंवाडी रस्त्याला लागलो. एखादं वाहण सोडलं तर अगदी निर्मनुष्य रस्ता. अर्ध्या तासात आघाणंवाडीत दाखल झालो. इथल्या छोटे छोटे पाडे वस्त्या या डोंगराच्या कुशीत त्यामुळे आणखीच दुर्गम. आघाणंवाडी या भागातली शेवटची वाडी. वाडी अलीकडे मोठे डंपर, ट्रक्स, जेसीबी विचारपूस केल्यावर समजले समृध्दी महामार्ग याच भागातून जाणार आहे. पुढे रस्ता तयार करून घाटाने बोगदा पाडून इगतपुरी जवळील नांदगाव तळेगाव या भागाला जोडणार. वाडीत पहिल्याच घराजवळ गाडी लावली. पावसाने आता उघडीप दिली असली तरी घाटमाथा धुक्यात हरवलेला. आजचे आमचे नियोजन आघाणंवाडीतून देशावर वाघ्याच्या वाडीत जाणारी वाट पाहून जमल्यास दुसऱ्या वाटेने खाली परत येणे. वाडीतून समोरच सह्याद्रीच्या मुख्य रांगेत वरच्या बाजूला खिंडीसारखा भाग दिसत होता तीच होती मुख्य वाट. सोबत तर नाही मिळाली पण जिथे गाडी लावली होती त्या घरातील दादांनी वाट समजवून सांगितली. खिंडीजवळ पाण्याची पुरातन टाकी आहेत म्हणून ‘पाणटाक्याची वाट’.
भात शेतीच्या बांधावरून जात वाट चढणीला लागली. इथे एक गोष्ट निरीक्षण केल्यावर जाणवली ती म्हणजे या भागात सह्याद्रीची मुख्य रांग फारच सौम्य, दरडवणारे कडे, घळी नाही. मुळात इथल्या वाड्या आधीच उंचावर वसलेल्या असल्यामुळे इथून घाटाची उंची सुध्दा फार जाणवत नाही. थोड अंतर वर आल्यावर दगड धोंडेवाली बऱ्यापैकी रुंद वाट. कुठेही न वळता फार तीव्र नसली तरी अगदीच सौम्य ही नाही अशी चढाई. दम खात फोटो काढत, आजूबाजूची हिरवाई डोळ्यात साठवत तासभरात खिंडीजवळ आलो. खिंडीच्या अलीकडे खालच्या भागात उजवीकडे कपारीत पाण्याचं छोटे टाक, खालच्या ठमा दादाने दिलेल्या माहितीनुसार यात वर्षभर पाणी असते. इथूनच उजवीकडे आडवी वाट फुगाळं गावात उतरते.
पुढच्या पाचच मिनिटांत माथ्यावरील खिंडीत दाखल झालो. नाणेघाटासारखी दिसणारी पण त्याहून बऱ्यापैकी रुंद असणारी हि खिंड. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खिंडी पलिकडचा कुलंग रेंज, वाघाचीवाडी, भावली धरण असा बराच भाग नजरेत आला.
खिंडीजवळ कातळात खोदलेली पाण्याची जोडटाकी, एक लहान एक मोठे. तर बाजूलाच कड्यावर दगडाला शेंदूर फासलेले देवाचं ठाणं. या सर्व बाबी लक्षात घेता अजूनही सर्रास वापरली जाणारी ही पाणटाक्याची पुरातन वहिवाट यात शंकाच नाही.
तिथेच थांबलो असताना दोघं तिघ जाताना दिसले, त्यांनी सांगितल्या प्रमाणे या वाटेची रुंदी वाढवून हिंदुस्थान पेट्रोलियमने गॅसची पाईप लाईन टाकली आहे. तसेच त्यांच्याकडून उतराईची वाट ध्यानात घेत माथ्याला समांतर उत्तरेकडे जाऊ लागलो. या दिवसात पठारावरील वातावरण भारीच. सर्वत्र ग्रीन कार्पेट त्यात रान फुलांची सुरुवात. अधून मधून येणारे धुक्याचे लोट चकवू पाहत होते, दिशेप्रमाणे चालत उंच टेपाडावर आलो.
काही वेळातच धुक्याचा पडदा हटला खाली डावीकडे कोकण नजरेत आले. दूरवर माळचं पठार, कसारा वशाळा कडील बाजू, सारं पाहत बराच वेळ फोटो काढत राहिलो.
आम्हाला इथूनच खाली उतरणारी वाट हेरायची होती. सरळ पठारावर चालत राहिलो तर कदाचित नांदगाव सदो तळेगाव या भागात जाता येईल.
काही अंतर जाताच कड्यातून खाली जाणारी बारीक पायवाट दिसली. सुरुवातीचा शेवाळ असलेला कातळ टप्पा सावकाश पार करून अरुंद अशी आडवी ट्रेव्हर्सी.
क्वचित एखाद दुसरं तळेगाव बाजूने कुणी उतरणारं सोडलं तर धनगर गुराखी शिवाय कुणीही इथं फिरकत नसावे. पायवाट तर काही ठिकाणी ढोर वाट यांची सांगड घालत पदरात आलो. या भागात उतारावर नागलीची शेती. तसेच बांधावरून जात शेवटचा लहान झाडी भरला टापू पार करून लाल मातीच्या समृध्दी महामार्गवर आलो.
पुढच्या पंधरा मिनिटांत आघाणंवाडीत. वाटेत सकाळी घाट चढताना भेटलेले कुरुंग वाडीतून येणारे आजोबा भेटले त्यांनाही आम्ही जाऊन आलो याचं नवल वाटलं. बोलताना भावली धरणाचा विषय निघाला, या भागा तील बहुतांश धरण विस्थापित लोकांचे पुनर्वसन झालेलं नाहीये.
खरंच विकास कुणाचा ? हा प्रश्न डोक्यात घोळू लागला. आता याच आघाणंवाडीत एस टी गाडीची सोय नाही. जायचं झालं तर आठ ते नऊ किमी चालत वशाळा गाठावे लागते तिथून कसारा. खासगी जीप फक्त शनिवार आणि मंगळवार बाजाराच्या दिवशी. वाडीबाहेर, वाटेत काही जण असेही भेटले त्यांना आम्ही काय बोलतोय हेही नीट समजत नव्हते. मुख्य प्रवाह पासून अजूनही दूर असलेली ही मंडळी. आता महामार्ग प्रोजेक्टचे काम सुरू आहे, त्यामुळे का होईना यांना समृध्दी लाभो हीच सदिच्छा. ..
सुंदर वर्णन
सुंदर वर्णन
हिरवे फोटो पाहून डोळे निवले
छान!
छान!
छान वर्णन.. फोटो अप्रतीम..!
छान वर्णन.. फोटो अप्रतीम..!
छान!
छान!
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
या वाटेने खुप वेळा गेलो आहे.
या वाटेने खुप वेळा गेलो आहे. पावसाळ्यात लावणी च काम झाले की बैल घेऊन याच वाटेने जातो आम्ही. फुगाळ, चिंध्या ची वाडी, वासाळा भागातील वाड्यांवर बैल नेऊन ठेवतो थेट दसरा सण येईपर्यंत. समृद्धी महामार्गामुळे रस्ते आता रुंद होत आहेत. 5 वर्षांपूर्वी तर खुप हाल होते.
छान.
छान.
रूट ट्रेस टाकणार का पुढच्या भटकंतीत?
मस्त. हिरवे फोटो भारीच !
मस्त. हिरवे फोटो भारीच !
मस्तच! फोटोही खास
मस्तच!
फोटोही खास
भारी! फोटोही खासच.
भारी!
फोटोही खासच.
आलास बाळा तू? प्रतिसाद तरी
आलास बाळा तू? प्रतिसाद तरी स्वताचा दे. माझ्याशिवाय चैन पडत नाही का?
तुमचे लेख नेहमी वाचते. हा
तुमचे लेख नेहमी वाचते. हा लेखही छान आहेच. फोटो तर फारच छान.
लिखाण आणि फोटो दोन्ही आवडले.
लिखाण आणि फोटो दोन्ही आवडले.
खुप खुप धन्यवाद !
खुप खुप धन्यवाद !
रूट ट्रेस टाकणार का पुढच्या भटकंतीत? >>> प्रयत्न करतो.