साधारण चारपाच वर्षांपूर्वीचा किस्सा. मित्रासोबत एका बॅंकेत गेलो होतो. मित्राचेच काम होते. मला त्यातले कळते, असे त्याला उगाचच वाटत असल्याने मला सोबत म्हणून नेले होते. पण माझे आपले अवांतर निरीक्षण चालू होते. सहज नजर एका मुलीवर पडली. अडकली. ओळखीची वाटली. नजरानजर होताच तिच्याही चेहरयावर ओळखीचे भाव आले. पण नेमके कुठली ओळख ते आठवेनासे झाले. अश्यात अनोळखी मुलीकडे बघून हसायचे तरी कसे. कसेबसे चेहरयावर आलेले ओळखीचे भाव आवरले आणि वोह कौन थी? हे आठवू लागलो. अगदी बालवाडीपासून शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, मित्र, नातेवाईक, शेजारपाजार, ऑर्कुट, फेसबूक ते व्हॉटसपग्रूप ईतक्या ठिकाणी आपण ओळखी बनवत वावरलो असतो की यातून एखादा ओळखीचा चेहरा नेमका कुठला हे आठवणे अवघडच. पण चेहरा गोड होता, त्यामुळे डोक्याला ताण द्यायचा नाद सुटतही नव्हता. ती मुलगीही बहुधा याच प्रयत्नात होती. पुन्हा पुन्हा माझ्याकडे बघून अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होती. पण माझे बॅडलक ईतके खराब की तिलाही मी कोण हे आठवत नव्हते.
ईतक्यात मित्राचे नाव पुकारले गेले. त्याने माझ्या हातात एक कागद आणि पेन कोंबले. रुनम्या हे एवढे अॅप्लिकेशन लिही जरा, मी आलोच तेवढ्यात, असे म्हणून स्वत: पळाला. झाली बोंब. ती सुद्धा दुहेरी. एकीकडे ईंग्लिश दुसरीकडे हस्ताक्षर. तिसरीकडे ती मुलगी, जिचा विचार आता बॅकफूटला गेला होता. डीअर सर मॅडम रिस्पेक्टेड पर्सन टू हूमसोएवर ईट मे कन्सर्रन.. मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव चालू होती. जे वाक्य चांगले तयार होत होते ते विसरायच्या आधी पटापट लिहीत होतो. ईतक्यात कोणीतरी पाठीमागून डोकावतेय असे वाटले. मागे वळून पाहणार तोच पाठीवर थाप पडली..,
"अरे ऋन्मेऽऽष गधड्या ओळखलेस का?.."
तीच मुलगी. आता बहुधा तिला माझी ओळख पटली होती. पण कशी?
तसे तिने मी लिहीत असलेल्या कागदाच्या चिटोरयाकडे बोट दाखवले. मी गोंधळून गेलो, त्यावर मी माझे नावही लिहीले नव्हते, मुळात ते लेटरच मी मित्राच्या वतीने लिहीत होतो. त्यावरून कसे ओळखले??
तर अक्षर...!
"अक्षर गधड्या, आजही तसेच आहे. मेल्या माझा सोमवार बुडला तुझे हे कोंबडीचे पाय बघून.. (फिदीफिदी)"
"आठवतेय तुला, बाई तुझी वही वर्गात फिरवायच्या, ‘अक्षर कसे नसावे’ हे आम्हाला दाखवायला. त्यामुळेच ते पक्के लक्षात राहिले. आणि मग आमच्याकडे वही आली की आम्हीही तुझी फिरकी घ्यायला मुद्दाम ते वेडेवाकडे वाचायचो. कसली धम्माल होती ती.."
आता मलाही ती आठवली. ती माझी ईयत्ता चौथीतली मैत्रीण होती. फेसबूकवर अॅड होती, पण ती फेसबूक फारसे वापरायची नाही. त्यामुळे प्रत्यक्षात पाहिल्यावर चेहरयाने ओळखणे दोघांनाही अवघड गेले. आज मात्र ईतक्या वर्षांनीही माझे अक्षर पाहून तिला माझी खात्रीपूर्वक ओळख पटली होती.
नुकतेच काही दिवसांपूर्वी जागतिक हस्ताक्षरदिन होता. सुंदर हस्ताक्षर जमणारे फेसबूक व्हॉटसपवर आपले स्वलिखित काहीबाही मिरवत होते. त्यात आपले चिकन तंदूरीचे फोटो कुठे टाकायचे म्हणून मी शांतच होतो. पण आज एके ठिकाणी वाचनात आले की ज्या लोकांच्या मेंदूचा विचार करायचा वेग अफाट असतो, त्यांच्या लिहित्या हातांना तो वेग झेपत नसल्याने त्यांचे अक्षर खराब येते. उदाहरण म्हणून स्वत:कडेच पाहिले आणि हे लॉजिक एकदम पटले. त्यानिमित्ताने हा किस्सा आठवला. तो न लाजता शेअर करायची हिंमतही आली. आणि आता विषय निघालाच आहे तर चार मुक्ताफळे आणखीही उधळावी म्हणतो.
तर आम्ही कोंबडीचे पाय म्हणून हिणवले जाणारे नॉस्टॅल्जिक नाईटीज पिढीतल्या त्या गटाचे प्रतिनिधीत्व करतो ज्यांनी द्रष्टेपणा दाखवत हे आधीच ओळखले होते की काही वर्षातच हाताने लिहीण्याचा काळ संपणार आहे. कॉम्पुटर आणि मोबाईलचे युग येणार आहे. सारे काही टकटक बोटांचा खेळ असणार आहे. ज्याचा टायपिंग स्पीड जास्त, त्याचा लिहायचा वेग जास्त. आणि ज्याच्याकडे छान छान फॉंट असणार, त्यानेच टाईपलेले अक्षर छान दिसणार. आज लोकांच्या घरात मोबाईलचे चार्जर चटकन हाताला लागतील अश्या जागी सापडतील. पण काही लिहायची वेळ आल्यास पटकन पेनपेन्सिल सापडणे अवघडच. आजच्या तारखेला शब्दकोडी आणि सुडोकूही ऑनलाईनच सोडवणारी लोकं काही लिहीत असतील तर ते म्हणजे फक्त स्वाक्षरी. आणि ती देखील हळूहळू डिजिटल होतेय. तसेही ज्याचे अक्षर घाण, त्याचीच स्वाक्षरी महान. कारण ज्याची स्वाक्षरी गिचमिड, त्याचीच कॉपी करणे अवघड. सुंदर अक्षर असणार्यांचा एक जागतिक हस्ताक्षर दिवस असतो. पण ऊरलेले तीनशे चौसष्ट दिवस आमचेच असतात.
अक्षरावरून स्वभाव समजतो असे म्हणतात. स्वभावाला औषध नसते असेही म्हणतात. मग अक्षराला तरी कसे असावे? पण तरीही आयुष्यातील उमेदीची खेळायची मौजमजा करायची वर्षे या अक्षर सुधारायच्या नादात फुकट गेली. रोज उठा, दात घासा, आंघोळ करा, आणि अक्षर सुधारायला पाच पाने लिहून काढा. हा दर उन्हाळी सुट्टीचा ठरलेला उपक्रम. त्याशिवाय क्रिकेट खेळायला सोडायचेच नाहीत. एवढी मेहनत जर ईंग्लिश सुधारायला घेतली असती तर ऑक्सफॉर्डची आख्खी डिक्शनरी पाठ झाली असती. आज लाईफ बनली असती. पण सरावानेही अक्षर सुधारायचे नव्हतेच. कारण वहीपुरते चांगले लिहीले जायचे. पण परीक्षेची वेळ आली की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. दर उत्तरपत्रिकेवर अक्षर सुधारावे हा ठरलेला शेरा.
लिहायचा स्पीड मात्र माझा अफाट होता. बाई जे बोलायच्या ते रेकॉर्ड केल्यासारखे कागदावर ऊतरवून काढायचो. गणिताच्या बाईंनी फळ्यावर गणिते लिहून शिकवली आणि नंतर ती मुलांना वहीत कॉपी करायला सांगितली की ती सर्वात पहिले संपवून मी मुद्दाम शीळ वाजवत बसणार हे नेहमीचेच. मग फळा पुसायचे मानाचे कामही माझ्यावरच सोपवले जायचे. माझ्या अक्षराची किर्ती सर्वदूर पसरली होती. स्टाफरूममध्येही चर्चा व्हायची. एकदा मधल्या सुट्टीत मला स्टाफरूममधून बोलावणे आलो. भितभीतच गेलो. त्याकाळी स्टाफरूममध्ये तशीच जायची पद्धत होती. ईतिहासाच्या बाई पेपर तपासत होत्या. पण मी लिहिलेला ईतिहास त्यांना वाचता येत नव्हता. कुठलाही चष्मा चढवून त्या ईतिहासाचा अर्थ लागत नव्हता. तेव्हा आमच्या गणिताच्या क्लासटीचर बाईंनी त्यांना सल्ला दिला की त्यालाच बोलाव आणि त्याच्याकडूनच वाचून घे. तेवढे माझे एक चांगले होते. माझे अक्षर मला वाचता यायचे. चटचट वाचून दाखवले. भले स्वत:चेच का असेना, एवढे घाणेरडे अक्षर हा पोरगा पटपट कसे वाचतोय या कौतुकाने सारे शिक्षक माझ्याकडे बघत होते. जणू मी संस्कृतचे श्लोकच धडाधडा म्हणत होतो.
शालेय जीवनात अक्षराने प्रसिद्धी, मनस्ताप, सुखद दुखद आठवणी सारे काही दिले. तोच वारसा घेऊन कॉलेजला गेलो. आपले ईंग्लिशचे अक्षर आणखी गचाळ आहे हा शोध तिथे लागला. परकीयच भाषा ती. मातृभाषा लिहू न शकणारा मुलगा ती कशी आत्मसात करणार. वाईट गोष्ट म्हणजे ईंग्लिशमध्ये लिहीलेले माझे मलाच काही दिवसांनी वाचता यायचे नाही. पण कॉलेजमध्ये कधी स्टाफरूममधून बोलावणे आले नाही. त्यांचे ते वाचायचे अर्थ लावायचे आणि मार्क्स द्यायचे. जोपर्यंत अपेक्षित मार्क्स मिळत होते. प्रसंगी टॉपरही येत होतो, तोपर्यंत मलाही अक्षराचे मग काही पडले नव्हते.
वालचंदला असताना मात्र एका परीक्षेच्या वेळी एका सुपरवायझरने माझी ईज्जतच काढली होती. लिहीता लिहीता माझ्या हातातून पेपर खेचून घेतला आणि म्हणाला की हे काय लिहिले आहे, कोण वाचणारे हे, काय चेक करणार, तुला तरी वाचता येतेय का? नसेल काही येत तर नको लिहू, उगाच का टाईमपास करतोय??... मला पेपर चालू असताना वाद घालायचा नव्हता. मी पेपर परत घेतला आणि शांतपण एवढेच म्हणालो की सर मी असेच अक्षर काढून गेल्यावेळी टॉपर आलेलो. विचारा ईथे कोणालाही... आणि त्याच्या चेहरयावरचे भाव न टिपता पुन्हा झरझर पेपर लिहू लागलो. सोबतचे मित्र मात्र नंतर खुश झाले होते. तो सुपरवायझर हॉस्टेलमधील एक हलकट मुलगा होता आणि मी छान अॅटीट्यूड दाखवत त्याला ऊलटे उत्तर दिले असे मित्रांना वाटत होते.
मला नक्की आठवत नाही की मी त्याला नक्की कोणत्या टोनमध्ये प्रत्युत्तर दिलेले. पण येस्स, कसेही असले तरी ते आपले अक्षर असते, एक आपुलकी जिव्हाळा त्याबद्दल असतोच. तोच जिव्हाळा जो आपल्या कुरुप पोराबद्दलही आईबापांना असतो. त्यामुळे मस्करी होत राहते आम्हा कोंबडीचे पायवाल्यांची, आम्हीही ती एंजॉयच करतो.पण त्या पलीकडे जात जर कोणी त्यावरून अवहेलना करायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला सडेतोड प्रत्त्युत्तर दिले जाऊ शकतेच
तुमचे कोंबडीचे पाय डकवाल का
तुमचे कोंबडीचे पाय डकवाल का इथे?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लेखाचा शेवट मात्र अगदी चपखल आणि पटण्याजोगा केलाय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाहाहा! मीही तुझ्याच होडीत!
हाहाहा! मीही तुझ्याच होडीत! मराठी अक्षर अजिबात चांगलं नाही माझं. इंग्लिशही चांगलं नाहीच, पण मराठीपेक्षा जरा बरं आहे. याचं श्रेय दहावीत भेटलेल्या एका सरांना, ज्यांनी तंत्र दाखवलं चांगलं इंग्रजी अक्षर लिहिण्याचं. आता सवय गेली लिहिण्याची. पण मनात आणलं तर मी (सावकाश लिहून) इंग्रजी अक्षर तरी बरं काढू शकते. कोंबडीचे पाय, वाळत घातलेले कपडे, असे अनेक अपशब्द माझ्याही अक्षराने सहन केले आहेत.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त लेख!
मस्त लेख!
मधे आमचे रियुनियन झाले, त्यावेळी एकामुलाने सांगितलेला किस्सा आठवला.तो मुलगा ज्या मुलाच्या पेपरवरून कॉपी करायचा,त्यालाच दम द्यायचा अरे काय तुझं अक्षर,नीट लिहायला शीक की!
>>> ज्या लोकांच्या मेंदूचा
>>> ज्या लोकांच्या मेंदूचा विचार करायचा वेग अफाट असतो, त्यांच्या लिहित्या हातांना तो वेग झेपत नसल्याने त्यांचे अक्षर खराब येते. <<
काहीही हां..
अक्षरांबाबतीत.. ‘चिखलात माखलेले बदकाचे पाय‘ असा किताब आमचे मास्तर काहींना..
पूर्वी बऱ्याच पत्रांचा शेवट "
पूर्वी बऱ्याच पत्रांचा शेवट " चहात पडली कॉफी, अक्षरात असावी माफी" या वाक्याने होत असे. लेख आवड्या.
छान.
> तुमचे कोंबडीचे पाय डकवाल का इथे? > + १.
बाकीच्यांनीपण डकवा इथे सॅम्पल.
माझे अक्षर चांगले असल्याने
माझे अक्षर चांगले असल्याने शाळेत वर्गशिक्षक सुचनाफलकावरच्या सूचनांपासून फळ्यावरच्या सुवचनांपर्यंत सगळंच मला लिहायला लावायचे. दुसऱ्या टोकाच्या भावना आज समजल्या , धन्यवाद..
मात्र,
ज्या लोकांच्या मेंदूचा विचार करायचा वेग अफाट असतो, त्यांच्या लिहित्या हातांना तो वेग झेपत नसल्याने त्यांचे अक्षर खराब येते.
या वाक्याशी मी सहमत नाही... चांगले अक्षर किंवा वाईट अक्षर तुमच्या मेंदूत व बोटांमध्ये किती समन्वय आहे यावर अवलंबून असते असं माझं मत आहे..
अक्षरास हसू नये
आक्षरास हसू नये
श्री श्री किंकवडीकर
तुमचे कोंबडीचे पाय डकवाल का
तुमचे कोंबडीचे पाय डकवाल का इथे? > + १.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाकीच्यांनीपण डकवा इथे सॅम्पल. >> कशाला ते? सुंदर हस्ताक्षराच्या धाग्यावर ' किती सुरेख अक्षर आहे!' असे प्रतिसाद आले, तसे इथे ' किती वाईट अक्षर आहे!' असे प्रतिसाद येतील
सुंदर अक्षर हाच खोटा दागिना !
सुंदर अक्षर हाच खोटा दागिना !
कोणी ही हसू नका.
कोणी ही हसू नका.
पण मला 5 वी ला असताना ख आणि ळा लीहताच यायचा नाही
अजूनही र्फार असूद्ध लिवता
अजूनही र्फार असूद्ध लिवता राज्येस राव तूमी.
तुम्ही आला का
तुम्ही आला का
परत .
कितवी वेळ आहे इथे हाकलून दिल्यावर परत येण्याची .
काही आठवत आहे का.
तुमची भ्येट घ्येतली नाही तर
तुमची भ्येट घ्येतली नाही तर च्यैन पडत नाही राव्व. पाचवीच्या पुढे शिकले नाहीत का? शंका आली म्हणून इच्यारलं.
वावे, येऊद्या कितीही वाईट
वावे, येऊद्या कितीही वाईट प्रतिक्रिया. आता त्या मनावर घ्यायचे दिवस गेले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
. उद्या ऑफिस डायरीत काही किडूकमिडूक बिनकॉन्फिडेन्शिअल लिहिलेले असेल त्याचे फोटो काढून डकवतो.
आणि तसेही मला माझ्या रेप्युटेशनला जागायला फोटो टाकावेच लागणार
देवकी
पण त्या पोराला राग येणे स्वाभाविकच आहे. एवढ्या मोठ्या मुश्कीलीने कॉपी करायला मिळतेय. ईजी मार्क्सची सोय होतेय. आणि ती संधी अशी वाईट अक्षरापोटी खराब होणार.. जीवाला त्रास तर होणारच
तुमची भ्येट घ्येतली नाही तर
तुमची भ्येट घ्येतली नाही तर च्यैन पडत नाही राव्व.
आता तुम्हाला माझ्या कडून क्रॉस होणार नाही.
कशाला विनाकारण शाब्दिक वार.
आता तुमची बाजू तुम्ही ठरवा .
लोकशाही मध्ये तो तुमचा अधिकार आहे.
पण त्या पोराला राग येणे
पण त्या पोराला राग येणे स्वाभाविकच आहे.... . हो ना. नक्कीच!
सुंदर अक्षर हाच खोटा दागिना !
सुंदर अक्षर हाच खोटा दागिना !>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शिर्षक वाचुन वाटलं ऋन्म्याने
शिर्षक वाचुन वाटलं ऋन्म्याने पाककृतीत हात घातला कि काय, आज सुपरबोलच्या निमित्ताने. तर ते असो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अक्षर गिचमीड (इन्कंसिस्टंट) असेल तर त्याचा संबंध मानसिक स्वास्थ्याशी लावला जातो. (फोरेंसिक सायन्स मध्ये अक्षरतज्ञांचं मत विचारात घेतलं जातं) शालेय जीवनांत मुलांवर विविध प्रकारचं दडपण असल्याने त्याचा इफेक्ट अक्षरावर होतो असं म्हणतात. पण ते प्रयत्नाने निश्चित सुधारता येतं. सुवाच्य अक्षर मोत्यासारखं असणंहि आवश्यक नाहि, अक्षरांची ठेवण कंसिस्टंट असणं हे महत्वाचं...
माझं अक्षर ऋ पेक्षा नक्कीच
माझं अक्षर ऋ पेक्षा नक्कीच वाईट आहे पण वाचन खूप असल्याने शुध्द लेखनाच्या चुका कमीत कमी व्हायच्या. राज यांच्याशी सहमत.
शालेय जीवनांत मुलांवर विविध
शालेय जीवनांत मुलांवर विविध प्रकारचं दडपण असल्याने त्याचा इफेक्ट अक्षरावर होतो असं म्हणतात
>>>>
अंशत: असहमत ...
कसलेही टेंशन न घेता जगाची पर्वा न करता स्वच्छंदी आयुष्य जगणारयांचेही अक्षरही त्यांच्या "हू केअर्स" ॲटीट्यूडमुळे खराब असू शकते.
दुसरी गोष्ट म्हणजे सौण्दर्य हे सापेक्ष असते, बघणारयांच्या नजरेत असते वगैरे वगीरे... कोणाचे अक्षर चांगले वा कोणाचे वाईट हे कोण ठरवते...
मी असेही लोकं पाहिले आहेत जे छान अक्षरासाठी गौरवले जातात पण ईतके आर्टिस्टीक अन वेलबुट्ट्यावाले लिहीतात की चटचट वाचता येत नाही. सुण्दर अक्षराच्या नावाखाली हे खपवून घ्यावे का?
लिपी बनवताना अक्षराची काही स्टॅण्डर्ड प्रपोर्शनेट साईज आणि आकार ऊकार बनवला आहे का? असल्यास त्याच्या जवळ जाणारे अक्षर सुंदर म्हणावे की नक्षीदार आकर्षक अक्षराला सुंदर म्हणावे?
हे माझे अक्षर... याहून काही
हे माझे अक्षर... याहून काही वाईट असेल तर बोला. (एक अपूर्ण गझल)![s.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u57054/s.jpg)
आम्हाला भाग्य लाभेल का
आम्हाला भाग्य लाभेल का कोंबडीचे पाय बघण्याचं.
मला वाटलं काय रेस्पी असेल पिंट्याला हाताशी घेउन बनवलेली. मग आठवलं सगळ्यावरुन पडदा उठला तर पिंट्या पण काल्पनिक असेल.
<<<ज्या लोकांच्या मेंदूचा विचार करायचा वेग अफाट असतो, त्यांच्या लिहित्या हातांना तो वेग झेपत नसल्याने त्यांचे अक्षर खराब येते.>>> हे काहीही आहे. असं काही नसतं.
अजिंक्य राव
अजिंक्य राव
एवढी अवतरण चिन्ह का दिलेत
ते माझे तंत्र आहे गझल
ते माझे तंत्र आहे गझल लिहीतानाचे. इतर काही लिहिताना नसतात ते.
(No subject)
हे माझं अक्षर .......
@मी-माझा
@मी-माझा
ज्या लोकांच्या मेंदूचा विचार करायचा वेग अफाट असतो, त्यांच्या लिहित्या हातांना तो वेग झेपत नसल्याने त्यांचे अक्षर खराब येते.
या वाक्याशी मी सहमत नाही... चांगले अक्षर किंवा वाईट अक्षर तुमच्या मेंदूत व बोटांमध्ये किती समन्वय आहे यावर अवलंबून असते असं माझं मत आहे..
अगदी बरोबर.
ज्या लोकांच्या मेंदूचा विचार करायचा वेग अफाट असतो, त्यांच्या लिहित्या हातांना तो वेग झेपत नसल्याने त्यांचे अक्षर खराब येते.
जर हाताने लिहिण्याचा वेग बाइट्स पर सेकंद असेल तर मेंदूचा विचार करायचा वेग हा टेरा बाइट्स पर सेकंद असतो.
आणि विचाराच्या वेगाचा हुशारीशी काहीही संबंध नाही. ऑटिझम असलेले किंवा स्किझोफ्रेनियाचे रुग्ण सुद्धा फार मोठ्या प्रमाणात विचार करत असतात परंतु त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे ताळतंत्र बिघडलेले असते.
बायका पुरुषांपेक्षा तिप्पट विचार करतात (आणि आपले डोकेही पिकवून घेतात)
बाकी आपण हुशार आहोत म्हणून आपले हस्ताक्षर चांगले नाही हि एक लंगडी सबब / पळवाट आहे.
हस्ताक्षर आणि चित्रकला हि कौशल्ये आहेत, जी बऱ्याच प्रमाणात उपजत असतात आणि काही प्रमाणात कष्टसाध्य आहेत.
हस्ताक्षर आणि चित्रकला हि
हस्ताक्षर आणि चित्रकला हि कौशल्ये आहेत, जी बऱ्याच प्रमाणात उपजत असतात आणि काही प्रमाणात कष्टसाध्य आहेत.>> सहमत. पण प्रयत्न न करण्याचा चॉईस असू शकतो. मुळाक्षरे शिकताना सर्वांचे अक्षर चांगलेच असावे. पण लिहिण्यापेक्षा वाचण्यावर जास्त भर असल्याने किंवा लिहिण्याचाच कंटाळा असल्यामुळे कदाचित पुढे जाऊन अक्षर वाईट होत जात असेल.
बायका पुरुषांपेक्षा तिप्पट
बायका पुरुषांपेक्षा तिप्पट विचार करतात (आणि आपले डोकेही पिकवून घेतात)
>>>>>
सर हा विनोद होता की याला शास्त्रीय आधार आहे?
पण लिहिण्यापेक्षा वाचण्यावर
पण लिहिण्यापेक्षा वाचण्यावर जास्त भर असल्याने किंवा लिहिण्याचाच कंटाळा असल्यामुळे कदाचित पुढे जाऊन अक्षर वाईट होत जात असेल.
बरोबर
या कौशल्याची तुलना कॅरम खेळणाऱ्याबरोबर करून पहा.
पूर्वी उत्तम कॅरम खेळणारा माणूस सवय गेली कि हात थरथरतात आणि सोंगटी नीट घेता येत नाही तसेच आहे.
किंवा रियाझ बंद झाल्यावर बऱ्याच दिवसांनी वाद्य वाजवायला गेलात तर हात तेवढा सफाईने फिरत नाही.
Pages