Submitted by निशिकांत on 22 January, 2020 - 09:04
प्राक्तनाने वार केले, घाव अजुनी ओलसर
मीच संसारात सारे रंग भरले आजवर
स्वप्न होते पाहिले मी मृगजळांचे जन्मभर
वेदनांनी आजही पण सोडला नाही पदर
कष्ट करुनी पूर्ण थकते,चैन ना रात्रीसही
वाट बघतो तो तिची अन् देह शैय्येला हजर
सागराशी भेटण्याला वाहती सार्या नद्या
हरवते अस्तित्व, त्यांना ही कुठे असते खबर?
वाकुनी चढता यशाच्या टेकड्या कौतुक किती!
उतरताना ताठ असुनी, सुरकुत्यांची ना कदर
भक्तिभावाचा भुकेला तो नसावा वाटते
विठ्ठलाशी जाहली नाही कधी नजरानजर
सोडताना आपुल्या पाउलखुणा घ्या काळजी
खोडण्या इतिहास नाही या जगी कुठले रबर
एवढे आम्ही उभयता कालचे आहोत की;
आत्मवृत्ताला मुले म्हणतात थेट्टेने बखर
आपले असतात अपुले वाटते "निशिकांत" का?
पोंचण्याआधीच तू, का खोदली त्यांनी कबर?
निशिकांत देशपांडे.मोक्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! सुरेख!!
वाह! सुरेख!!
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख