सुखी झोपेचा साथी

Submitted by कुमार१ on 19 January, 2020 - 10:51

शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. त्यापैकी थायरॉइड, इन्सुलिन, अ‍ॅड्रिनल आणि जननेन्द्रीयांची हॉर्मोन्स ही सर्वपरिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही हॉर्मोन्स शरीरात अल्प प्रमाणात तयार होतात आणि त्यांचेही कार्य महत्वाचे असते. अशाच एका तुलनेने अपरिचित हॉर्मोनचा परिचय या लेखात करून देत आहे. त्याचे नाव आहे मेलाटोनिन (melatonin).

मेलाटोनिनचे उत्पादन
आपल्या मेंदूत ‘पिनिअल’ नावाची एक ग्रंथी असते. (चित्र पाहा).

pineal wiki.png

डोळ्यातील दृष्टीपटलातून निघालेले काही विशिष्ट चेतातंतू या ग्रंथीत पोचतात. हे तंतू उद्दीपित झाले की त्याच्या प्रतिसादातून ही ग्रंथी एका अमिनो आम्लापासून मेलाटोनिन तयार करते. ही सर्व प्रक्रिया वातावरणातील प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. दिवसाचा उजेड संपून जसा अंधार पडू लागतो तसे मेलाटोनिनचे उत्पादन वाढू लागते. मग रात्री ते अत्युच्च पातळी गाठते. जसा पुढचा दिवस उगवतो तसे त्या ग्रंथीचे उद्दीपन थांबते आणि मेलाटोनिनचा नाश होतो. अशी ही या हॉर्मोनच्या स्त्रवण्याची तालबद्धता (rhythm) आहे. मात्र माणसाचे वय आणि सवयी यांनुसार या तालबद्धतेत काही बदल होत असतात ते आता पाहू.

मेलाटोनिन आणि झोपेच्या सवयी

sleep.jpg

“लवकर निजे, लवकर उठे, तयास उत्तम आरोग्य लाभे”, हे आहे पूर्वापार चालत आलेले सुवचन. एकेकाळच्या कृषीप्रधान संस्कृतीत ते पाळले जात होते. पुढे शहरीकरण, औद्योगिकीकरण वगैरे बदलांमुळे आपली जीवनशैली अर्थातच बदलली. जसा कृत्रिम प्रकाश मुबलक उपलब्ध होऊ लागला, तसे आपल्या रात्री उशीरापर्यंत जागण्याचे प्रमाण वाढत गेले. एकंदरीत समाजावर नजर टाकता आपल्याला लोकांच्या झोपण्याच्या वेळेच्या भिन्न सवयी दिसतात.

• जे लोक पहाटे उठतात, त्यांच्या शरीरात रोज मेलाटोनिनचे उत्पादन संध्याकाळी लवकर सुरु होते. या उलट जे रात्री उशिरापर्यंत जागतात, त्यांच्यात ते तुलनेने उशीराच सुरु होते. तसेच ज्यांची झोप जास्तकाळ असते त्यांच्यात मेलाटोनिन अधिक काळ स्त्रवत असते.

• आता माणसाचे वय आणि मेलाटोनिनचे प्रमाण यांचा संबंध पाहू. बाल्यावस्थेत आपली झोप खूप असते आणि त्याचा शरीरवाढीशी संबंध असतो. जसे मूल किशोरवयीन अवस्थेत जाते तसे रोज संध्याकाळची मेलाटोनिनची स्त्रवण्याची वेळ लांबत जाते. त्यामुळे या वयात रात्री अपरात्री जागण्याची प्रवृत्ती वाढीस लागते.

• मध्यमवयीन माणूस जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा मेलाटोनिनचे स्त्रवणे निसर्गतः कमी होत जाते. परिणामी झोप कमी होते. भल्या पहाटे उठून घरात चुळबूळ करणारे म्हातारे तरुणांसाठी त्रासदायक असतात !

प्रकाशाचा प्रकार आणि मेलाटोनिनचे प्रमाण
पृथ्वीवर जिथे उत्तम सूर्यप्रकाश ठराविक काळ उपलब्ध असतो तिथे मेलाटोनिनचे नैसर्गिक दैनंदिन चक्र व्यवस्थित काम करते. कृत्रिम प्रकाश आणि मेलाटोनिन उत्पादन यांचे नाते जरा गुंतागुंतीचे आहे. कुठल्याही ‘प्रकाशाचे’ अंतर्गत घटक असतात आणि त्यांच्या विशिष्ट तरंगलांबी असतात. त्यापैकी ४६०-४८० nm या पट्ट्यातील लांबी असलेला ‘नीलप्रकाश’ शरीरातील मेलाटोनिनचे उत्पादन दाबून टाकतो. त्यादृष्टीने आपल्या वापरातील कृत्रिम प्रकाशाचे प्रकार गेल्या शतकभरात कसे बदलत गेले ते पाहणे रंजक ठरेल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरात बहुतांश लोक पिवळा प्रकाश देणारे बल्ब (incandescent ) वापरत. त्याच्या प्रकाशात ‘नीलप्रकाशाचे’ प्रमाण खूप कमी होते. आता अलीकडील काही वर्षांतील चित्र पाहा. पिवळ्या बल्ब्सचा वापर झपाट्याने कमी होत गेला आणि LED-बल्ब्सचा वापर वाढता राहिला. या आधुनिक बल्ब्सच्या प्रकाशात नीलप्रकाशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जर आपण रात्री अशा प्रकाशात – त्यातही झगमगाटात- अधिक काळ वावरलो, तर त्यामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. परिणामी निद्रानाश होऊ लागतो. गेल्या दोन दशकांत तर आपला विविध इ-साधनांचाही वापर खूप वाढला. या सर्व उपकरणांकडे बघत राहिल्याने डोळ्यात नीलप्रकाशाच्या लहरी मोठ्या प्रमाणात जातात.

मेलाटोनिनची अन्य कार्ये

झोपेच्या प्रक्रियेव्यतिरिक्त हे हॉर्मोन शरीरातील अन्य काही यंत्रणांवरही सकारात्मक परिणाम करते. त्या यंत्रणा अशा आहेत:
१. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य
२. श्वसनयंत्रणा
३. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे
४. पेशींतील ऊर्जानिर्मिती आणि antioxidant कार्य
५. अन्य हॉर्मोन्सवर प्रभाव : विशेषतः जननेन्द्रीयांशी संबंधित हॉर्मोन्स

वरील सर्व कार्ये बघता मेलाटोनिनचा काही आजारांत औषधी उपयोग होऊ शकेल का ही उत्सुकता निर्माण होते. त्या अनुषंगाने वैद्यकात काही संशोधन झालेले आहे. त्यापैकी बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत. त्या तुलनेत मानवी अभ्यास अद्याप पुरेसे झालेले नाहीत. संशोधनाचा मुख्य रोख अर्थात मेलाटोनिन हे निद्रानाशावर उपयुक्त आहे का, यावर आहे. या मुद्द्याचा आता आढावा घेतो.

melat tabs bott (2).jpgनिद्रानाश आणि मेलाटोनिनचा औषधी उपयोग
समाजातील अनेकांना झोपेच्या समस्यांनी ग्रासलेले असते. त्यामध्ये रात्री उशीरापर्यंत झोप न लागणे, अपुरी झोप इत्यादी समस्या आढळतात. त्यावर उपाय म्हणून जीवनशैलीतील बदल आणि काही पारंपारिक घरगुती तसेच वैद्यकीय औषधे उपलब्ध आहेत. गेल्या दोन दशकांत त्यांत मेलाटोनिनची भर पडू पाहत आहे. प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने तयार केलेले हे हॉर्मोन आता गोळ्या आणि द्रवाच्या रूपांत उपलब्ध आहे. अनेक देशांत ते डॉक्टरांच्या चिठ्ठीविना दुकानांतून सर्रास विकले जात आहे. त्याच्या पुरस्कर्त्यांनी या औषधाला अगदी प्रचारकी स्वरूप आणले आहे. पण निद्रानाशासाठी ते खरंच उपयुक्त आहे का, हा वादाचा मुद्दा आहे. तज्ञांची मतेही काहीशी उलटसुलट आहेत. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार काही मुद्दे असे आहेत:

१. खूप लांब पल्ल्याच्या विमानप्रवासानंतर काही काळ लोकांना ‘जेट- लॅग’ जाणवतो. त्यामुळे संबंधित माणूस अवेळी झोपू लागतो. त्यातून त्याचे नैसर्गिक झोप-जाग हे चक्र बिघडते. अशा प्रसंगी मेलाटोनिनच्या वापराचे काही प्रयोग झाले आहेत. पण या समस्येला मुळात ते द्यावे का, हाच मूळ मुद्दा आहे.
२. निद्रानाश या समस्येसाठी रोज झोपेच्या वेळेआधी ४५ मिनिटे मेलाटोनिन घ्यावे असा एक मतप्रवाह आहे. पण हा उपाय प्रत्येकाला लागू पडतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो.

३. झोप व्यवस्थित लागण्यासाठी औषधापेक्षाही रोज संध्याकाळ नंतर प्रकाश-नियंत्रणाचे उपाय सुचवले गेले आहेत :
a) सध्या लोकांचा मोबाईल आणि संगणकाचा वापर खूप आहे. ही उपकरणे रात्री ८ नंतर वापरताना त्यांच्या पटलावरील प्रकाश हा मंद करण्यात यावा. काही उपकरणांत तो नारिंगी रंगछटेकडे झुकवता येतो.
b) काही लोकांना रात्री ८ नंतर भव्य दुकानांत जाण्याची सवय असते. अशा ठिकाणी LED दिव्यांचा अक्षरशः झगमगाट असतो. लेखात वर दिल्याप्रमाणे या प्रकाशझोतात नीलप्रकाशाचा मोठा वाटा असतो. निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांनी अशा ठिकाणी वावरताना डोळ्यांवर नीलप्रकाशाला अवरोध करणारे गॉगल्स वापरावेत.

c) एक महत्वाची सूचना तर दखलपात्र आहे. ती म्हणजे आपल्या झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा !

४. मेलाटोनिन हे औषध म्हणून उपयुक्त ठरण्यासाठी शरीरातील अनेक घटकांचा विचार करावा लागतो. रुग्णाचे वय आणि शारीरिक अवस्था हे प्राथमिक घटक आहेत. त्याच्या पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. तसेच एखादा दीर्घकालीन आजार असल्यास मेलाटोनिनच्या उपयुक्ततेवर परिणाम होतो. रुग्ण जर अन्य काही औषधे रोज घेत असेल, तर मेलाटोनिन दिल्यानंतर त्या औषधांचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो.

५. वरील सर्व मुद्दे बघता मेलाटोनिनच्या औषधी उपयुक्ततेबद्दल बऱ्याच शंका उपस्थित होतात. एक औषध म्हणून प्रमाणित मात्रेत ते प्रौढासाठी सुरक्षित आहे. मुलांत आणि किशोरावस्थेत मात्र त्याचा वापर टाळलेला बरा. मुळात त्याची गरज आणि उपयुक्तता वादग्रस्त आहे. सध्या तरी निद्रानाशाच्या रुग्णासाठी पारंपरिक औषधांचाच वापर करावा. सर्व नेहमीचे उपाय थकले असतील तरच मेलाटोनिनच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे तज्ञ सांगतात. मुळात ते झोप ‘आणणारे’ औषध नसून झोपेचे एक नियंत्रक आहे.

मेलाटोनिनचे अन्य औषधी उपयोग
काही प्रकारच्या डोकेदुखींत त्याचा उपयोग होऊ शकतो. मेलाटोनिनच्या antioxidant गुणधर्माचा एका क्षेत्रात चांगला वापर करता येतो. ज्या लोकांना किरणोत्सर्गाला जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते, त्यांच्यात किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी मेलाटोनिनचा वापर गरजेनुसार करता येतो.

याव्यतिरिक्त अन्य काही आजारांत मेलाटोनिन उपयुक्त असल्याचे जे काही दावे केले आहेत त्यात मात्र तथ्य नाही. असे काही आजार म्हणजे कर्करोग, फिट्सचा विकार, मासिक पाळीतील वेदना आणि काही मनोविकार. यासंदर्भात अजून भरपूर संशोधनाची गरज आहे.
गेल्या १० वर्षांत प्रगत देशांत मनःशांतीसाठी (!) उठसूठ मेलाटोनिन घ्यायची लाट आलेली दिसते. हे हॉर्मोन अधिकृत औषधाव्यतिरिक्त खुल्या बाजारात देखील ‘’वनस्पतीजन्य’ वगैरे लेबले लावून विकले जाते. ते जीवनसत्व असल्याचा अपप्रचार देखील होत असतो. त्यामुळेच त्याचा गैरवापर वाढत गेला. बिगर औषधी स्वरूपातल्या मेलाटोनिनच्या गोळ्यांमधील शुद्ध मेलाटोनिनचे प्रमाण नियंत्रित नाही. त्यामध्ये अन्य हॉर्मोन्स वा रसायनांची भेसळ आढळली आहे.

शालेय वयातील मुलांनी त्याचा अनियंत्रित वापर केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यातून त्यांना डोकेदुखी, वर्तणुकीतील बदल, प्रमाणाबाहेर झोपणे आणि झोपेत अंथरुणात लघवी होणे असे दुष्परिणाम झाल्याचे दिसते.
सरतेशेवटी एक महत्वाचा मुद्दा. आपली रोजची झोप लागण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अनेक चेतातन्तूंची कार्ये आणि बरीच रसायने भाग घेतात. त्या सर्वांच्या समन्वयातून आपले नैसर्गिक ‘झोप-जाग’ चक्र कार्यरत असते. मेलाटोनिन हा या मोठ्या प्रक्रियेतील फक्त एक घटक आहे. तेव्हा विविध निद्राविकारांवर तो काही एकमेव रामबाण उपाय होऊ शकत नाही. किंबहुना त्याच्यावरील मानवी संशोधन अजूनही अपुरे आहे. सामान्यजनांनी त्यासंबंधीची प्रसारमाध्यमांतील अर्धवट आणि प्रचारकी माहिती वाचून वैद्यकीय सल्ल्याविना त्याचा औषध म्हणून स्व-वापर करू नये हे उत्तम.
*************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रम,
* कॉलेजमधे असताना तर एसटीत खाली वर्तमानपत्रावर झोपलो आहे. >>>
लढ बाप्पू ! कुठेही झोप यासारखे सुख नाही !

** खाण्या पिण्याच्या कुठल्या सवयी पिनियल ग्लँडच्या कार्यावर परिणाम करतात. >>>

ही ग्रंथी ही प्रकाशाला संवेदनशील आहे. खाण्यापिण्याच्या सवयींशी तिचा संबंध नाही. तो भाग अन्य काही ग्रंथी बघतात.

डॉ. कुमार तुमचे लेख हे नेहमीच माहितीप्रद असतात, त्याच सारखा हा अजून एक, खूप आवडला. झोप हा खर तर फार जिव्हाळ्याचा विषय. मला झोपेचा कधीही कुठेही प्रॉब्लेम येत नाही. अगदी १५-२० तासाच्या विमान प्रवासात सुद्धा जास्तीत जास्त वेळ मी झोपेतच घालवतो. एखादा सिनेमा बघावा म्हटलं तरी त्याच्या कडचे सिनेमे मला झोपच आणतात, आणि मी मस्त ताणून देतो.
असो, तर आत्ता मुद्द्याकडे वळतो आणि माझंही काही प्रश्न विचारतो..
१. साधारण मी १०:३० - ११:०० च्या दरम्यान झोपतो आणि सकाळी ५:३० ला उठतो, म्हणजे साधारण ७ तास झोप पुरेशी होते. पण समजा एखाद दिवस थोडा जास्त झोपलो तर मात्र दिवसभर आळसावलेला जातो. असे का?
२.साखरझोप म्हणजे काय आणि त्याला काही शास्त्रीय आधार आहे का?
३.एखाद दिवशी खूप कंटाळवाणा दिवस जातो आणि कशातच मन लागत नाही याचा मेलॅटोनीन शी काही संबंध आहे का?
४.आपल्यालाला सकाळी जाग आणण्या साठी कॉर्टिसॉल हे हार्मोन जबाबदार आहे पण त्याचा अतिस्त्राव हा स्ट्रेस ला करणीभूत ठरतो त्याबद्दल हि कृपया लिहाल का, धन्यवाद

बुन्नु,
धन्यवाद.
कॉर्टिसॉल हे हार्मोन >>>

यावर माझा एक स्वतंत्र लेख इथे: https://www.maayboli.com/node/70934
बाकी प्रश्न सवडीने घेतो. Bw

असंख्य लेखांत वाचून पकले होते की दुपारी झोपू नका, आरोग्य बिघडतं इ. इ.

हॅ हॅ हॅ

लवकर निजे लवकर उठे
तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे

अशी पण म्हण आहे.

दूधवाले पेपरवाले इ लोक काही ज्ञानी श्रीमंत आणि निरोगी झालेले मी तरी पाहिलेले नाहीत.

लवकर निजे लवकर उठे अशी पण म्हण आहे.
दूधवाले पेपरवाले इ लोक काही ज्ञानी श्रीमंत आणि निरोगी झालेले मी तरी पाहिलेले नाहीत.

आमचे आजोबा दुपारी झोपत असत ते सुखाने ८१ वर्षे जगले

आमचे वडील पण दुपारी झोपतात. ते ८५ वर्षाचे आहेत आणि त्या वयाला चांगले हिंडते फिरते आहेत. परवाच (रविवारी) तलासरीला वरिष्ठ नागरिकांच्या बरोबर ट्रीपला जाऊन आले आणि मागच्या वर्षी दुबईला पण जाऊन आले.

दुपारी झोपणे प्रकृतीला चांगले नाही याला कोणताही शास्त्राधार मला तरी आजतागायत सापडलेला नाही.

आणि समजा तो सापडला तरी मी खुशाल दुपारी झोपणारच

श्रावण महिना पाळल्यामुळे ( अपेयपान बंद) झोप जरा जास्तच यायची. ( Both quality and quantity was improved.

दारू मुळे येणारी झोप हि खरी झोप नाही तर मज्जा संस्थेची ग्लानी असते (CNS depression). यामुळे मेंदूला संगणक जसा defragment करतो (गोष्टी/ स्मरणशक्ती व्यवस्थित लावणे) तसे करायला संधी मिळत नाही यामुळेच दारू प्यायल्यावर केलेल्या बऱ्यचशा गोष्टी लोकांना आठवत नाहीत हि स्मरणशक्ती झोपेत मेंदूत साठवली जाते ते कार्य नीट होत नाही.

यामुळे दारू सोडल्यावर येणारी तुमची नैसर्गिक झोप हि जास्त चांगली आणि लाभदायी असते.

शक्य असेल तर दारू सोडून द्या. तुमच्या मेंदूला दूरगामी दृष्टीने बराच फायदा होईल.( क्वचित कधीतरी महिन्यातून एखादे वेळेस घेणे अलाहिदा)

दम्याच्या रुग्णांना जर आडवे झोपून दम लागत असेल तर त्यांनी आडवे होऊ नये

पंरतु जर आडवे झाल्याने फरक पडत नसेल तर सरळ आडवे होऊन झोपणे हेच श्रेयस्कर आहे.

कारण आडव्या स्थितीत शरीराच्या सर्व स्नायूंना शिथिलता जास्त चांगली येते आणि उठल्यावर जास्त ताजेतवाने वाटते.

याच कारणासाठी रातराणी बस मध्ये रात्री घेतलेल्या झोपेनंतर दिवसा "अंग मोडून' येते आणि "ताजेतवाने वाटत नाही".

एक गंमतशीर वास्तव -

पाईनीअल ग्रंथी ( हि पाईन फळाच्या आकाराची असते म्हणून हे नाव पडले आहे) हि तिसरा डोळा आहे असे मानले जाते
याचे कारण

१) पाईनीअल ग्रंथीत जसे मेलॅटोनीन असते तसेच डोळ्याच्या रेटिना मध्ये हि असते.

२) प्रकाशाच्या संवेदनेत आणि दिवस रात्र यांच्या तालात दोन्ही अवयव काम करतात
https://sites.psu.edu/siowfa15/2015/09/10/could-the-pineal-gland-really-...

३) रेटिना मध्ये होणार कर्करोग (रेटिनोब्लास्टोमा) हा पाईनीअल ग्रंथीमध्ये सुद्धा आढळतो. हा कर्करोग एकाच वेळेस दोन्ही डोळ्यात आणि पाईनीअल ग्रंथीत असा तीन ठिकाणी आढळतो.

https://en.wikipedia.org/wiki/Trilateral_retinoblastoma

यामुळेच पाईनीअल ग्रंथी हि तिसरा नेत्र मानली जाते.

ता क.-- भगवान शंकरांचा तिसरा नेत्र हि आख्यायिका सत्याच्या कितपत जवळ आहे ते मला माहिती नाही.

बुन्नू,

१. एखाद दिवस थोडा जास्त झोपलो तर मात्र दिवसभर आळसावलेला जातो. असे का? >>>

रोजच्या झोपेच्या वेळापत्रकानुसार आपल्या झोप-जाग चक्राचे मेंदूत ‘सेटिंग’ झालेले असते. हे एक जैविक घड्याळ समजा. जास्त झोपल्याने ते सेटिंग काहीसे बिघडते. या प्रक्रियेत अनेक रसायनांचा सहभाग असतो. अर्थात काही काळात सेटिंग पूर्ववत होते.
.........

२. साखरझोप म्हणजे काय >
>>>

पहाटेच्या वेळीस लागणारी ही झोप. त्यात स्वप्ने बरीच पडतात. अजून काही वैशिष्ट्ये:
१. बहुतेक स्नायू निश्चल व शिथिल असतात, पण...
२. डोळ्याचे स्नायू व श्वासपटल चांगलेच कार्यरत.

३. श्वसन अनियमित असते.
४. या झोपेने उत्तम शारीरिक व मानसिक विश्रांती मिळते.
.......
3. कशातच मन लागत नाही याचा मेलॅटोनीनशी काही संबंध आहे का?
>>>> नाही. हे वेगळे प्रांत आहेत !

चांगली झोप येण्यासाठी "वेटेड ब्लॅन्केट" चा खूप उपयोग होतो असे ऐकिवात आहे.
कोणास या ब्लॅन्केटचा अनुभव आहे का?

कुमार सर , सुबोध सर , माहितीसाठी अनेक धन्यवाद
>>>> साखरझोप >>>>
या झोपेत गोड गुलाबी स्वप्ने पडतात एवढेच माहित होते !

मी रोज रात्री 9:30 ते 10 दरम्यान झोपते आणि सकाळी 5:30 ते 5:45 च्या मध्ये उठते. पण दिवसभरात काही वादविवाद, किंवा क्लेशकारक गोष्टी घडल्या असतील तर मग कधी रात्री 2:30 वाजता, 3 वाजता अशी जाग येते आणि काही केल्या झोप लागत नाही आणि पुढचा सबंध दिवस फ्रेश जातं नाही.
ह्यावर काही उपाय आहे का?
माझ्या आईला झोप न येण्याचा खूप जुना प्रॉब्लेम आहे.
तिला 12, 12:30 ला झोप लागते आणि सकाळी 4:30 लाच जाग येते.

रुचा,
काही केल्या झोप लागत नाही आणि पुढचा सबंध दिवस फ्रेश जातं नाही.
ह्यावर काही उपाय आहे का? >>

यासाठी शक्यतो औषधे घेऊ नये असे माझे मत. व्यायाम, ध्यान, योग, सुखसंवाद आणि गरज भासल्यास समुपदेशन हे मार्ग मी सुचवेन.

येथे अनेकांनी शंका विचारली आहे, मी माझीही विचारतो. गेले पंधरा वर्षे मी साडेचार तास झोपतो. रात्री अकराला झोपतो व पहाटे साडेतिनला आपोआप जाग येते. झोप अगदी शांत असते. दिवस छान जातो. दुपारी झोप येत नाही. जवळच्या व्यक्तीने ही झोप कमी आहे व आरोग्याला चांगली नाही असे सांगीतले. मग मी अडीचचा गजर लावून उठायला सुरवात केली. असे मधेच उठून पुन्हा झोपलो की माझी झोप दिड तासाने वाढते. असे मी आठ दिवस झोपेचे सहा तास रोज पुर्ण केले. पण दिवसभर अगदी आळसावल्यासारखे वाटायचे. भुक मंदावली. उत्साह जाणवेल इतका कमी झाला. मग पुन्हा नेहमीचे रुटीन सुरु केले व सगळे ठिक झाले. मला ही झोप अगदी पुरेशी वाटते. पण पुढे जावून काही त्रास व्हायची शक्यता आहे का?
मी या प्रश्नाचे उत्तर आजवर शोधले नाही कारण मिळणाऱ्या उत्तरांनीच झोप उडायची शक्यता जास्त वाटली. कारण बहुतेकजण धिर येईल अशी उत्तरे न देता धिर खचेल अशीच उत्तरे देतात आजकाल. ‘बिंधास्त झोपा’ म्हणनारे सुबोध खरे विरळाच. Happy

हरिहर ,
रात्री अकराला झोपतो व पहाटे साडेतिनला आपोआप जाग येते. झोप अगदी शांत असते. दिवस छान जातो. >>>
अहो, मग उत्तम ना . हे तर जगातील बहुतेक राष्ट्रप्रमुखांचे लक्षण आहे !
......
आमच्या शालेय पुस्तकात अनंत कणेकरांचा 'यथेच्छ झोपा' हा धडा असल्याने आम्ही तो सल्ला कायम आचरणात आणलेला आहे. तारुण्यात तर अगदी 'वसूल' केल्यासारखे झोपलो आहोत.

वाढते वय हा मात्र झोपेचा शत्रू असून तो आपल्या या सुखाच्या फार आड येतो. Bw

यासाठी शक्यतो औषधे घेऊ नये असे माझे मत. व्यायाम, ध्यान, योग, सुखसंवाद आणि गरज भासल्यास समुपदेशन हे मार्ग मी सुचवेन>>हम्म.. खूप धन्यवाद डॉक्टर.

मी झोपेत घोरतो. अर्थात मला ते कळतच नाही. माझी बायकोची झोप त्यामुळे खराब होते. मी शेजारच्या खोलीत झोपलो व खोली बंद केली तरि तिची झोप व लक्ष विचलित होते. प्रत्येकाचे संवेदनशीलतेचे मुद्दे वेगळे असतात. मूळात तिला झोप व्यवस्थित लागत नाही त्यात हे माझे घोरणे. या घोरण्यावर काही उपाय आहे का?

दिवसभरात काही वादविवाद, किंवा क्लेशकारक गोष्टी घडल्या असतील ...काही केल्या झोप लागत नाही आणि पुढचा सबंध दिवस फ्रेश जातं नाही.

अशा वेळेस कानाला हेड फोन लावून शांत असे संगीत ऐका. कारण मनातील विचारांचा कल्लोळ हा आपल्या मेंदूला जागृत ठेवतो.

माझे कोणाशी भांडण झाले कि एखादे वेळेस झोप लागायला वेळ लागतो ( किंवा कोणाच्या आग्रहामुळे कॉफी प्यायली तर) अशा वेळेस मी एकतर असे शांत संगीत लावतो( मला नाट्य संगीत आवडते किंवा जुनी हिंदी मराठी भावगीते आवडतात. ती ऐकत अर्धा पाऊण तासात झोप लागते किंवा दुसऱ्या खोलीत जाऊन माझ्या वैद्यकीय विषयाचा एखादा लेख वाचतो.

या दोन्ही मुळे मन शांत होऊन आपोआप झोप लागते.

प्रकाश,
मी झोपेत घोरतो. अर्थात मला ते कळतच नाही >>>

जगातील जवळपास निम्म्या जोडप्यांची ही समस्या आहे ! त्यातही जोडीतील एकच व्यक्ती घोरणारी असते. जेव्हा तसे नसणारा जोडीदार यावर कुरकुरतो, तेव्हा घोरणारी व्यक्ती नेहमी नाकबूल करते !!

दोघेही घोरणाऱ्या (किंवा न घोरणाऱ्या) जोड्या खरेच भाग्यवान.
..........
आता विनोद नाही, पण वास्तव असे आहे. 'घोरणे आणि नवराबायकोतील विसंवाद (काडीमोड)' हा संशोधनाचा आणि न्यायालयांचा विषय होऊन राहिलेला आहे. जालावर अशी बरीच माहिती मिळेल. उदा. ही पाहा

https://www.sciencedaily.com/releases/2006/02/060202075139.htm

मी झोपेत घोरतो. अर्थात मला ते कळतच नाही. माझी बायकोची झोप त्यामुळे खराब होते.

मी ( आणि कधीकधी बायको सुद्धा) पण आताशा कधी कधी घोरतो. परंतु अशा वेळेस आम्ही एकमेकांना तू घोरतो आहेस हे उठवून सांगतो आणि कुशीवर झोपायला सांगतो. यामुळे घोरणे बंद होते आणि दोघांना झोप लागते.

नवरा बायकोने एकमेकांना "दुसऱ्याचे" दोष सांगितले तर त्यात "इगो" आड येऊ देऊ नये हि एक फार महत्त्वाची गोष्ट आहे.

कुमारजी घोरणे या समस्येवर एकदा लिहा. त्याला काही वैद्यकीय उपाय आहे का? अगोदर मी घोरत नव्हतो. जसजसे वय वाढत जाते तसतसे घोरण्य़ाची समस्या (इतरांसाठी) वाढत जाते. आपल्या घोरण्यामुळे इतरांना त्रास होते हे आम्हाला क्ळत नसते. मी झोप मस्त एन्जॊय करतो.

गेले पंधरा वर्षे मी साडेचार तास झोपतो

पुढे जावून काही त्रास व्हायची शक्यता आहे का?

मला तरी तसे वाटत नाही.

काही तर्हेच्या जीन्स उत्परिवर्तनामुळे काही लोक अतिशय कमी झोपतात आणि त्यांना ४ तास झोप पुरते आणि ते ताजेतवाने होतात त्याचा त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आपण या गटात असू शकाल.

याउलट काही लोक मुद्दाम करियर किंवा पैशाच्या मागे लागून अतिशय कमी झोपतात हे त्यांच्या प्रकृतीला अजिबात चांगले नाही.

https://blog.sleepnumber.com/can-4-hours-of-sleep-a-night-be-healthy/

https://www.nih.gov/news-events/nih-research-matters/gene-identified-peo...

हे वाचून घ्या

The family members who felt well-rested after 4 hours of sleep all shared a mutation of the gene DEC2.

“There are actually people who train themselves to become short sleepers,” says Fu, “and that is a totally different beast.”

In Fu’s experience, natural short sleepers are energetic and rarely get sick.

Trained short sleepers, on the other hand, are much more likely to suffer adverse health effects since they need to be getting more sleep and are choosing to go without.

मित्रहो,

मेलाटोनिनची ओळख करून देण्यासाठी हा लेख लिहिला. आता ही सुरेख चर्चा घोरण्यावर येऊन ठेपली आहे. अनेकांच्या झोपेच्या समस्याही दिसून आल्या आहेत. यासंबंधी काही लेख लिहावेत अशाही सूचना वर आल्यात.
बुननु यांच्या ‘साखरझोप’ या प्रश्नाचे उत्तर मी एका सहकारी संबंधित तज्ञाशी चर्चा करूनच दिले आहे.

म्हणून काही खुलासा आवश्यक आहे.

झोपेचे शरीरक्रियाशास्त्र, निद्राविकार, झोप आणि मनोविश्लेषण हे सर्व आता वैद्यकातील स्वतंत्र तज्ञशाखेचे विषय आहेत. त्याचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवल्यास बऱ्याच रात्रींचे दिवस करून वाचन करावे लागेल. प्रयत्न जरूर करेन, पण कुठलेही आश्वासन आता देत नाही !

सर्वांना धन्यवाद.

अशा वेळेस कानाला हेड फोन लावून शांत असे संगीत ऐका. कारण मनातील विचारांचा कल्लोळ हा आपल्या मेंदूला जागृत ठेवतो>>मी हल्ली हल्ली झोपायच्या आधी डीप ब्रीदिंग करून झोपते .कारण असे काही (भांडण किंवा असं काही ) तर माझे हार्ट बिट फास्ट होतात म्हणून मी तसे करते.
तुमचाही उपाय करून पाहीन.
खरेकाका, खूप धन्यवाद.

कधी मुंबई ते चेन्नई हा ट्रेन प्रवास रात्री करून बघा. पोटे सुटलेल्या मंडळींचा भरणा असतो.
घोरण्याचे इतके ताल, सूर, आरोह, अवरोह आपली सोबत करतात. अक्षरशः या आवाजांचा कोलाहल असतो.

आपण घोरणारे असलो तर बरे असते - निदान त्या सुरात सूर तरी मिसळता येतो. Bw
आपण तसे नसलो तर मात्र आपल्याला मिनिटभर सुद्धा झोप न लागण्याची ग्यारंटी .

शंका समाधान केल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब. इतर प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांमुळे पण बरीच माहिती मिळाली.

या झोपेने उत्तम शारीरिक व मानसिक विश्रांती मिळते >> हे मान्य आणि अशी झोप हि पहाटेच्या वेळी येते हे पण खर, पण मग आपण लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपत्ती लाभे असे जेव्हा म्हणतो, याचा अर्थ झोपेच्या इतक्या फायदेशीर टप्प्याला बलिदान द्या असे पण म्हणतो. हा विरोधाभास वाटतो.

हरिहर यांच्या म्हणण्यानुसार त्यांना साडेतीन ला जाग येते, म्हणजे साधारण चार साडेचार तासाची झोप त्यांना पुरेशी आहे हा पण एक अपवादच म्हणायला हवे

हॅ हॅ हॅ
लवकर निजे लवकर उठे

तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे

अशी पण म्हण आहे.

दूधवाले पेपरवाले इ लोक काही ज्ञानी श्रीमंत आणि निरोगी झालेले मी तरी पाहिलेले नाहीत.

दूधवाले पेपरवाले इ लोक काही ज्ञानी श्रीमंत आणि निरोगी झालेले मी तरी पाहिलेले नाहीत. >> सर माफ करा, पण तुम्ही सकाळी उठून काय करता हे पण महत्वाचे नाही का? तुम्ही जसे पेपर वाले दूध वाले यांचा उदाहरण देताय तसे मी पण अक्षय कुमार, टीम कुक यांचे उदाहरण देऊ शकतो. आणि हा माझा स्वतः चा पण अनुभव आहे.

बुन्नु,
सहमत. लवकर उठण्याचे काही फायदे जरूर आहेत.

*याचा अर्थ झोपेच्या इतक्या फायदेशीर टप्प्याला बलिदान द्या असे पण म्हणतो. >>>

पूर्ण बलिदान नसते हे. कारण संपूर्ण झोपेच्या कालावधीत दोन प्रकारच्या झोपेची चक्रे आलटून पालटून चालू असतात. त्यामुळे मध्यरात्री कधीतरी तशा फायद्याची झोप मिळते.

लिंक्ससाठी धन्यवाद डॉक्टर!

मी बुन्नु यांच्याशी सहमत आहे. लवकर उठून काय करता हे महत्वाचेच.
लवकर झोपल्याने जागरणाचा त्रास होत नसावा व पहाटेच्या वेळी शरीर व मन जास्त उत्साही असल्याने (पुर्ण झोप झाली असल्यास) कामात एकाग्रता येते. निदान माझा तरी तसा अनुभव आहे. काम नसेल तर या वेळी फक्त मांडी घालून नुसते स्तब्ध बसायलाही खुप छान वाटते.

पुरेशी झोप घेऊन बिन गजर लावता लवकर उठणे हे नक्की फायदेशीर. आता पहाटे उठून एखादा लादलेले काम त्रासिकपणे करणार असेल तर मग नाय काय फायदा.

पण एखादा सूर्योदयापूर्वी व्यायामास बाहेर पडला, तर तेव्हा हवेत ओझोनचे प्रमाण (त्यातल्या त्यात) चांगले असते. असे नियमाने अनेक दशके व्यायाम करणारे लोक अतितंदुरुस्त आणि दीर्घायुषी आहेत. माझ्याही पाहण्यात आहेत.

आवडीने पहाटे उठणाऱ्या माणसाला नाउमेद करू नये असे माझे मत.

Pages