१.
काही काही क्षण ना उगीचंच लक्षात राहतात. दुसर्या कोणाच्या दृष्टीने बघायला गेलं तर त्यात फार काही विशेष असं नसतं, पण तरी त्यातले काही मनात रुतून बसतात, लपून बसतात. नंतर कधीतरी अचानक मनाच्या कोपर्यातून ऊफाळून वर येतात. ओठांवर हलकंसं स्मित घेऊन येतात.
कॉलेजला असताना माझी एक जिवलग मैत्रिण होती. ना माझ्या कॉलेजला होती ना घराच्या जवळपास रहायची. परिषदेच्या एका अधिवेशनात झालेली ओळख, आठवड्यातून एक दोनदा तासंतास चालणारे फोन आणि महिन्यातून एक दोन वेळा होणारी भेट यातून ती मैत्री बहरत गेली. आम्हा दोघांचं एकमेकांच्या घरी येणंजाणं असल्याने सगळ्यांची ओळख होतीच. दुपारी तिचे वडील, भाऊ घरी नसताना, तिच्या आईने दिलेल्या सटर फटर खाण्याच्या डिश फस्त करत आम्ही हॉल मधे निवांत गप्पा मारत बसायचो. तिचं गाव पुण्याच्या जवळंचंच. तिथलाच एक लांबचा भाऊ त्यांच्याकडे त्यावेळेस शिकायला रहात होता. पाच कि सहा वर्षाचा असेल. आम्ही गप्पा मरत बसलो कि जागा असेपर्यंत आजुबाजुला अभ्यास करत, टाईमपास करत घुटमळत असायचा.
एके दिवशी असाच मी निवांत दुपारी तिच्या घरी गप्पा मारायला गेलो. दुपारी पार दोन पासुन ते चार साडे चार पर्यंत गप्पा चालू होत्या. मला आता ईतक्या वर्षांनी कायम प्रश्न पडतो कि आम्ही असे नेमके काय गप्पा मारायचो? नक्की विषय तरी काय असायचे? ती कॉमर्सला मी सायन्सला, ना आम्ही एकाच कॉलेजला ना आम्हाला कॉमन मित्र मैत्रिणी. मग ईतका वेळ बोलायचो तरी काय? तिच्या आईची दुपारची झोप होऊन तिने चहा टाकला तरी आमच्या गप्पा चालूच. शेवटी तिच्या वडीलांच्या येण्याची वेळ झाल्यावर मी निघालो. नेहमीप्रमाणे ती आणि तिचा भाऊ मला सोडवायला खाली आले आणि आम्ही दोघे निघायचं निघायचं म्हणत पार्किंगमधे गप्पा मारत बसलो. तिचा भाऊ असाच माझ्या बाजूला रेंगाळला होता. पावसाळ्याचे दिवस होते, चांगलंच भरुन आलं होतं तरी आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या आणि माझा पाय काही तिथून निघत नव्हता. घरी तिच्या आई समोर मोजून मापून बोलण्याचा निर्बंध ईथे नव्हता. चेष्टा मस्करीला, खिदळण्याला ऊत आला होता. तितक्यात जोरदार पावसाला आणि ढगांच्या गडगडाटाला सुरुवात झाली. तिचा भाऊ अचानक टाळ्या पिटत जोरात चित्कारला आणि येऊन माझ्या पायाला त्याने घट्ट मिठी मारली. तो पाउस बघून ईतका खुष झाला कि त्याच्या चेहर्यावर आनंद मावत नव्हता. माझ्या पायाला घट्ट मिठी मारुन तो अनिमिष नेत्रांनी त्या पावसाकडे बघत होता.
तो सुंदर क्षण असाच मनात कुठेतरी लपलेला आहे. कधीही कुठेही आठवतो. मला नक्की खात्री आहे कि त्या आठवणीत असताना कोणी अचानक माझा फोटो काढला, तर तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि निरागस स्माईल असलेला फोटो असेल.
२.
चार दिवस झाले होते पावसाने जोर धरुन... त्यात पुण्यात ठिकठिकाणी मेट्रोचे काम चालू. घरातून बाहेर पडलं की पहिल्या चौकापासून चार ते पाच किलोमीटर पर्यंत भयानक ट्रॅफिक. दुसर्या गिअरच्या वर गाडी न्यायची सोय नाही, क्लच दाबून दाबून वैताग यायचा. रोजच्या ट्रॅफिक जामने, साध्या साध्या कामांना लागणार्या दुप्पट वेळेने पावसाचा कंटाळा यायला लागला होता. तसं म्हणलं तर सगळं जरा अंगवळणी पडंलच होतं. पण एखादा दिवस येतोच असा की ज्या दिवशी डोकं सटकतंच...
त्या दिवशी नेमकं तसंच झालं. एकाच दिवसात दोन साईट व्हिजिट करायच्या होत्या. त्यातला एक ४० किमी लांब. गूगल दिड तास लागेल दाखवत होतं. म्हणून चांगले अडीच तास ठेवून निघालो. पण पावसाने आज रुद्रावतार धारण केला होता. अगदी मुसळधार पाऊस. सगळी कडे पाण्याचे पाट, सखल भागात भरपूर पाणी साचलेलं, वाहनांच्या लांबच लांब रांगा. पहिले चार पाच किमी जायलाच पाऊण तास लागला. त्यात दोन्ही क्लायंटचे तीन वेळा फोन, आज काम व्हायलाच पाहिजे, किती वाजता येणार, किती वेळ लागेल. नुस्ता वैताग. मला आजचे वेळापत्रक साफ कोलमडणार हे दिसायला लागले होते. मी सणसवाडीला पोचणार कधी, तिथले काम संपवणार कधी, तिथून मग चाकणला पोचणार कधी, त्यांचे काम संपवणार कधी, तिथून ईतक्या भयानक ट्रॅफिक मधे घरी पोचणार कधी...... माझी चिडचिड व्हायला लागली होती. लेन डिसिप्लिन सोडून मी जिथे चान्स मिळेल तिकडे गाडी घुसवत होतो. कधी गरजे शिवाय हॉर्न न वाजवणारा मी, प्रत्येक मधे येणार्या/ स्लो गाडी चालवणार्याला दोन दोन वेळा हॉर्न देत होतो. कसाबसा सव्वा तासाने नगर रोडला पोचलो तेव्हा कुठे मोकळा रस्ता मिळाला. परत जिकडे लेन रिकामी दिसेल तिकडे गाडी घुसवत समोरच्या गाड्यांना ओव्हर टेक करत निघालो होतो. असं करत करत एका ठिकाणी पाणी साचलं होतं म्हणून लेन बदलली आणि नेमका एका सिग्नलला चुकिच्या लेन मधे घुसलो. मला सरळ जायचे होते तो सिग्नल ग्रीन होता पण मी उजवी कडे वळणार्या लेन मधे अडकुन पडलो. चडफडत डावीकडून जाणार्या वाहनांकडे बघत बसलो.
तितक्यात तिकडून नखशिखांत भिजलेली, स्काय ब्लू शर्ट आणि नेव्ही ब्लू प्लँट्स युनिफॉर्म मधली मुलं दोन अॅक्टीव्हा वरुन ट्रिपल सीट आपल्याच मस्तीत खिदळत जोरात गाडी घेतल्यावर उडणार्या पाण्याची मजा घेत निघून गेली. अगदी मोजून दोन तीन सेकंदात. पण त्या तितक्याश्या वेळात माझा मूड चेंज झाला. वैतागाची जागा प्रसन्नतेने घेतली. एकदम कॉलेजचे दिवस, पावसाळ्यात हिरवागार असणारा कॉलेजचा परिसर आठवला. मला बिजायला खुप आवडायचं. रेनकोट या प्रकारचे मला जरा वावडेच. सुंदर पाऊस कोसळत असताना काय ते स्वतःला डोक्यापासून पायापर्यंत प्लॅस्टिकने झाकून फिरायचे? कधीतरी एकदा मित्राचे नवीन पावसाळी जॅकेट घातलेले असताना एक मैत्रिण मस्त दिसतंय म्हणाली, तेव्हा पासून एक जॅकेट अंगावर आलं पण फक्त नावाला. डोक्यावर काही नसल्याने प्रत्येक पाऊस मला पुर्ण भिजवून जायचाच. मी तसाच ओले कपडे अंगावर ठेवून सगळीकडे फिरायचो, लेक्चरला बसायचो, खेळायचो. कपडे अंगावरच वाळायचे आणि बाहेर पडल्यावर पाऊस असेल तर मी परत भिजायचो. फक्त निबंधात लिहिण्यापुरता पावसाळा हा माझा आवडता ऋतु नव्हता. मला पावसाळा भयानक आवडतो आणि मी तो अगदी मनापासून एंजॉय करतो. त्या मुलांना पाहून कॉलेजचे पावसाळे, पावसाळ्यातल्या छोट्या छोट्या सहली, सिंहगडावरची कांदाभजी, अनेक किल्ल्यांवर, घाटांवर अनुभवलेलं अप्रतिम वातावरण एका मागून एक डोळ्यासमोरुन तरळून गेलं. निघाल्यापासून वैतागामूळे ताणून ठेवलेले स्नायू शिथिल झाले. चेहर्यावरचा ताण आणि आठ्या कमी होऊन हलकंसं स्मित आलं.
सिग्नल सुटल्यावर जागा शोधून गाडी बाजूला घेतली. क्लायंटला ट्रॅफिक मुळे उशीर होईल असा मेसेज केला, पेन ड्राईव मधलं कधी काळी बनवलेलं पावसाच्या गाण्यांचं फोल्डर प्ले केलं आणि परत पहिला गिअर टाकला.
निव्वळ अप्रतिम.. सच्चे आणि
निव्वळ अप्रतिम.. सच्चे आणि प्रामाणिक लिखाण.. मनाच्या खास कोपऱ्यातून आलेले
निव्वळ अप्रतिम.. सच्चे आणि
निव्वळ अप्रतिम.. सच्चे आणि प्रामाणिक लिखाण.. मनाच्या खास कोपऱ्यातून आलेले Happy>>>>> + १
'हे जीवन सुंदर आहे' हे गाणे
'हे जीवन सुंदर आहे' हे गाणे आठवले एकदम !
https://www.youtube.com/watch?v=VKmpSCdnWww
छान.
छान.
आवडलेच!
आवडलेच!
मस्तच!
मस्तच!
खुप छान लिहिलयं..
खुप छान लिहिलयं..
Chan
Chan
सुरेख
सुरेख
मन प्रसन्न करणारे लेखन..
मन प्रसन्न करणारे लेखन..
सगळ्यांचे मनापासून आभार.
सगळ्यांचे मनापासून आभार.