वर्णद्वेष कोळून प्यायलेलं बालपण (पुस्तक परिचय : बॉर्न अ क्राइम, लेखक : ट्रेवर नोआ)

Submitted by ललिता-प्रीति on 13 January, 2020 - 22:20

trevor noah book cover.jpeg

ढोबळमानाने आपल्यासाठी दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष गांधीजींना ट्रेनमधून ढकलून देण्यापासून सुरू होतो आणि नेल्सन मंडेलांच्या सुटकेपाशी संपतो. मंडेला सुटले, त्या देशात लोकशाही सरकार आलं, द.आफ्रिकेची क्रिकेट टीम कलकत्त्यात वन-डे खेळली, इथले क्रिकेट-प्रेमी द.आफ्रिकेच्या खेळाडूंचे फॅन झाले... बस्स! आणखी काय हवं होतं!
या सोयिस्कर समजुतीला अगदी सहज जाताजाता, गमतीजमतीत गप्पा मारतामारता जोरदार धक्का देतं Born a Crime : Stories from a South African childhood हे पुस्तक आणि त्याचा लेखक ट्रेवर नोआ. द.आफ्रिकेतल्या वर्णद्वेषावर लोकशाहीनं विजय मिळवलेल्या क्रांतीला ‘ब्लडलेस रेव्हल्युशन’ असं म्हटलं जातं. ट्रेवर नोआ लिहितो- It is called that because very little white blood was spilled. Black blood ran in the streets...
पहिल्या काही पानांमध्ये लहान मुलाच्या खोड्या, त्याची हैराण झालेली आई, मायलेकाची झकाझकी असं चित्र उभं करणारं हे पुस्तक कधी या chilling statement पाशी येऊन पोहोचतं कळतच नाही. पहिली काही पानंच वाचून झालेली असतात आणि आपल्याला प्रथमच जाणवतं, की हलक्याफुलक्या भाषेत, खुसखुशीत पद्धतीने लिहिलेलं हे पुस्तक पचवायला तितकं सहजसोपं नाही.

मुळात माझी सुरूवात ‘कोण हा ट्रेवर नोआ?’ इथपासून होती. हा एक तरुण स्टँड-अप कॉमेडिअन आहे आणि अमेरिकेतल्या ‘द डेली शो’ या टीव्ही कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. (अमेरिकेत हा कार्यक्रम बराच लोकप्रिय असावा असं दिसतं. कारण यूट्यूबवर त्याचे खंडीभर व्हिडिओज आहेत. नेटवरच्या या पुस्तकावरच्या प्रतिक्रियांमध्येही अनेक ठिकाणी ’द डेली शो च्या होस्टचं पुस्तक म्हणून मी वाचलं’ या प्रकारची वाक्यं दिसतात.) त्या कार्यक्रमाचा आधीचा सूत्रसंचालक वेगळा होता, पण काही काळापूर्वी ते काम ट्रेवर नोआकडे आलं. या निवडीचं अनेकांना आश्चर्य वाटलं. तो मांडत असलेल्या अनेक विचारांशी अनेक प्रेक्षक सहमत नसत. पण हळूहळू त्याचं सूत्रसंचालन लोकांना आवडायला लागलं. बघता बघता ट्रेवर नोआ हा तिथे एक famous young personality बनला... ही सगळी अर्थात इंटरनेटवरून मला मिळालेली माहिती.
पण त्याच्याही आधीपासून ट्रेवर नोआची एक वेगळी ओळख आहे. तो द.आफ्रिकेतला एक colored/mixed मुलगा आहे. त्याची आई कृष्णवर्णीय आणि वडील गोरे. अशी जोडी आणि अशा जोडीला झालेलं मूल हे द.आफ्रिकेतल्या वर्णद्वेषी कायद्यानं अवैध ठरवलेलं होतं; या पापाला तुरुंगवासाची शिक्षा होती. अशा काळात colored ट्रेवरचा जन्म झाला. He was born a crime.
तो लिहितो, वर्णभेदावर आधारलेल्या समाजात दोन विरोधी वर्णजातींनी असं एकत्र येणे ही गोष्ट त्या व्यवस्थेला केवळ अन्यायकारक ठरवत नाही, तर ती त्या व्यवस्थेचं अपुरेपण उघडं पाडते. त्यामुळे हे सिद्ध होतं, की दोन परस्पर विरुद्ध मानल्या गेलेल्या वर्णजाती अशा एकत्र येऊ शकतात, किंबहुना अनेकदा त्यांना एकत्र येण्याची इच्छा असते. अशा मिश्र वर्णजातीच्या व्यक्ती त्या व्यवस्थेच्या तर्काला इतकी सणसणीत चपराक देतात की त्यांचं अस्तित्वात येणे म्हणजे देशद्रोहापेक्षाही गंभीर गुन्हा ठरतो.

ट्रेवरच्या आईलाही आपण केवढा मोठा गुन्हा करतो आहोत याची पुरेपूर कल्पना होती. तरी तिने त्याला जन्म देण्याचं ठरवलं. मुळात त्याच्या आई-वडिलांची ही जोडी जमली कशी याचे पुस्तकातले तपशील अवाक करणारे आहेत. द.आफ्रिकेतल्या तेव्हाच्या तरुणाईचं ते प्रातिनिधिक चित्र आहे आणि त्यात स्वैराचार नावालाही नाही. असलीच तर ती त्यांची जगण्याची मूल्यंच म्हटली पाहिजेत. त्यात प्रतिकूल परिस्थितीत तगून राहण्याची धडपड आहे, मानवाच्या मूलभूत भावनांचा आदर आहे, कणखर तरीही ऋजू व्यक्तिमत्वांचे दाखले आहेत. ते सगळं वाचलं की आधी ट्रेवरच्या आईला (Patricia Nombuyiselo Noah) आदरानं साक्षात लोटांगण घालावंसं वाटतं. ही फार विलक्षण स्त्री आहे! पुस्तकभर वेळोवेळी त्याचे प्रत्यय येतात... खमकी, जबरदस्त आत्मविश्वास असलेली, आपल्या मर्यादांची आणि ताकदीची पुरेपूर जाणीव असणारी, देवभोळी, कोणत्याही प्रसंगाने अजिबात डगमगून न जाणारी... Oprah Winfrey ला दिलेल्या एका मुलाखतीत तो आपल्या आईबद्दल म्हणतो- ’She is one of the most gangster human beings. प्रस्थापितांविरोधात उभं ठाकणार्‍यांकडे घोषणाफलक वगैरे असतात; माझ्या आईकडे मी होतो!’
ट्रेवरचे आणि त्याच्या आईचे अनेक प्रसंग, आठवणी पुस्तकभर विखुरलेल्या आहेत. मात्र त्यात माझी आई किती भारी, आज मी जो काही आहे तो माझ्या आईमुळेच, ती नसती तर माझं काय झालं असतं, या प्रकारचं एकही वाक्य नाही. तरीही हे पुस्तक म्हणजे ट्रेवरच्या आणि त्याच्या आईच्या एकत्रित आयुष्याची, त्यांच्यातल्या generation gap ची, गरिबीशी त्यांनी दिलेल्या झगड्याची कथा आहे. आपल्या देशातलं, समाजातलं आपलं स्थान काय आहे हे दोघांनाही पुरेपूर ठाऊक होतं. जोहान्सबर्गसारख्या शहरात राहूनही त्यांनी (आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी) अनन्वित हालअपेष्टांना, उपासमारीला तोंड दिलं; गरिबीचे खूप चटके सोसले. तरीही व्यवस्थेतल्या फटी, पळवाटा हेरून ते झगडत, पुढे जात राहिले.

सुरूवातीची काही वर्षं ट्रेवर घरातल्या घरातच वाढला; बाहेर सार्वजनिक ठिकाणी त्याला नेणं धोक्याचं होतं; पोलिसांना त्याचा आणि त्याच्या आईचा त्वचेचा रंग दिसता तर त्यांनी तत्क्षणी त्याला त्याच्या कुटुंबापासून हिरावून नेलं असतं. तो पाच-सहा वर्षांचा असताना द.आफ्रिकेतला वर्णद्वेष अधिकृतपणे संपुष्टात आला. मात्र आता आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि इंकाथा फ्रीडम पार्टीच्या समर्थकांमध्ये भीषण संघर्ष सुरू झाला. त्यात हजारो माणसं मेली. ट्रेवर लिहितो, ‘अशी जाळपोळ, कापाकापी सुरू झाली की आमचे शेजारीपाजारी घरांची दारं बंद करून घेऊन गुपचूप बसून राहायचे, पण माझी आई नाही. ती कामावर जायची, मला शाळेत पिटाळायची.’

ट्रेवरच्या आईनं सुरूवातीपासूनच त्याच्या शिक्षणाकडे बारकाईनं लक्ष पुरवलं होतं. तो लहानपणापासून इंग्रजी माध्यमाच्या चांगल्या शाळांमध्ये शिकला. शाळांमधला वर्णभेद, मुलांनाही त्याची सवय असणे, colored ट्रेवरनं गोर्‍या मुलांच्याच तुकडीत शिकावं नाहीतर त्याच्या आयुष्याचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही, असं शिक्षकांचं उघडपणे बोलणे, अशा परिस्थितीत टिकाव लागून राहण्यासाठी ट्रेवरनं केलेल्या खटपटी, हे सारंच निवेदन खुसखुशीत शैलीमुळे अतिशय रोचक होतं. पण कोवळ्या वयाच्या मुलांनी या सार्‍याला कसं तोंड दिलं असेल हा विचारही मनाला सतत छळत राहतो.
ट्रेवरचे शाळेतले अनुभव, त्याचे सवंगडी, तो राहायचा त्या परिसराचं वर्णन, शेजारपाजार्‍यांचं दैनंदिन आयुष्य यांतून ’कृष्णवर्णीय’ या एका जमातीतले आजवर न ऐकलेले अंतर्गत उपप्रकार, त्यांचे तुलनात्मक वेगवेगळे सामाजिक स्तर, श्रद्धा, बोलीभाषा यांचे अगणित पदर दिसतात. एकेका कथेतून, त्यांतल्या प्रसंगातून त्या समाजाची वीण अशा प्रकारे समोर येत जाते की ते वाचताना हेलपाटून जायला होतं. ते लिहिण्यासाठी नर्मविनोदाचा वापर केलेला असल्यानं ते अनुभव अधिकच भेदक होतात. या वर्णनात जोहान्सबर्गमधल्या ‘सोवेटो’ या मोठ्या वस्तीचं वर्णन येतं. ते वाचताना पदोपदी धारावीची आठवण होते.
सोवेटोसारख्या ठिकाणी तगून राहताना ट्रेवरच्या साथीला त्याचा रंग आणि त्याची इंग्रजी भाषा होती. शिवाय तो इतरही अनेक स्थानिक जमातींच्या भाषा बोलू शकत होता. या गोष्टी ढालीसारख्या त्याच्या मदतीला आल्या; आणि तलवारीसारख्याही. त्याच्या शालेय वयातलं त्या काळातलं भावविश्व पुस्तकात जबरदस्त उतरलं आहे. एक-एक अनुभव आपण अवाक होऊन वाचत जातो; एक-एक कथा वाचून संपली की ‘What did I just read?’ असं वाटतं. इतक्या लहान, संस्कारक्षम वयात या मुलानं इतकं पाहिलं आणि तरीही त्याची विनोदबुद्धी टिकून राहिली, विचारांमध्ये कुठेही कडवटपणा राहिला नाही, ही खरंच कमाल वाटते.

ट्रेवरचं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय हा मोठा प्रश्न उभा होता. त्या वयाला अनुसरून त्याने पैसा कमावण्यासाठी केलेल्या खटपटीही विलक्षण आहेत. त्या त्याने प्रांजळपणे लिहिल्या आहेत. (सोवेटो-धारावी हा धागा मनात नसला तर त्या अविश्वसनीय वाटू शकतात.) त्याच सुमाराला त्याच्या आईनं दुसरं लग्न केलं. ट्रेवर स्वखुशीनं आणि आईच्या संमतीनं वेगळा राहायला लागला. आणि मग एक दिवस त्याच्या सावत्र बापामुळे त्या कुटुंबावर एक विदारक प्रसंग ओढवला. तो प्रसंग कोणता, ते कुटुंब त्यातून कसं बाहेर पडलं हे इथे सांगणे म्हणजे spoiler ठरेल. शिवाय तो प्रसंग विदारक असूनही पुस्तकात जी उंची गाठतो, त्यामागे आधीच्या संपूर्ण निवेदनाचा पाया आहे, पुण्याई आहे; ते अनुभव वाचल्याशिवाय या शेवटच्या प्रसंगाकडे जाणे म्हणजे या पुस्तकावर अन्याय केल्यासारखं आहे.

‘शेवटचा’ म्हणजे या पुस्तकातला शेवटचा प्रसंग. ज्या note वर तो प्रसंग आणि पुस्तक संपतं, त्यामुळेच पुढे कित्येक दिवस वाचणार्‍याच्या मनात ते घोळत राहतं. आणि त्या note वरच पुस्तकाचं सुरूवातीला पाहिलेलं (आणि नंतर विस्मरणात गेलेलं) मुखपृष्ठ पुन्हा आठवतं. मुखपृष्ठावर एका जुन्यापान्या, मोडकळीला आलेल्या भिंतीवर रंगवलेलं ट्रेवरचं चित्र दिसतं. चित्रात त्याच्या चेहर्‍यावर खट्याळपणा आहे. तिथून निघालेली एक कृष्णवर्णीय स्त्री मान वर करून त्या चित्राकडे बघताना दिसते. ती पाठमोरी आहे, पण ती ट्रेवरच्या आईशिवाय दुसरी कुणी असूच शकत नाही. तो तिचं आयुष्य व्यापून राहिला आहे; तरीही तिनं स्वतःची स्वतंत्र वाट चालण्याचं आजही सोडलेलं नाही, हे त्यातून इतकं सहज आणि सुंदर प्रकारे दिसतं, की आपण त्यांच्यातल्या नात्याच्या प्रेमात पडतो.

... आणि परत एकदा, ज्या वर्णद्वेषी वातावरणात ते नातं फुललं त्याचा चरा मनावर उठतो!

----------

या पुस्तकावर एक सिनेमा येऊ घातलाय असं नेटवर वाचलं. भारतात तो पाहायला मिळेल न मिळेल; पण तो पुस्तकाइतकाच हेलपाटून टाकणारा असू देत अशी इच्छा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी किंडलवर वाचलेलं हे पहिलंवहिलं पुस्तक... (ही जाताजाता आणखी एक सांगायची गोष्ट.) Happy

ट्रेवोर नोवा ची आर्ट आणि पॉलिटिक्स पाहिल्यावर एकंदरीत कृष्णवर्णीय संस्कृती आणि भारतातली दलित चळवळ यातली तफावत प्रकर्षाने दिसते.

पुस्तक वाचायच्या यादीत आहे त्यामुळे लेख वाचला नाही.
पण तू लिहायला सुरवात केलीस हे मस्तच!!

> ट्रेवोर नोवा ची आर्ट आणि पॉलिटिक्स पाहिल्यावर एकंदरीत कृष्णवर्णीय संस्कृती आणि भारतातली दलित चळवळ यातली तफावत प्रकर्षाने दिसते. > याबद्दल वेगळा लेख लिहू शकाल का?

सुंदर परिचय!

वर्णद्वेषावर आधारीत पाहिलेला The Butler चित्रपट आठवला..
त्यात देखील त्याकाळी काळा वर्ण असलेल्या अफ्रिकन लोकांना अमेरिकन लोक आधी कशाप्रकारे त्रास द्यायचे. ते बराक ओबामा प्रेसिडंट होईपर्यतचा कथानायकाचा प्रवास दाखवला आहे.

मला पण ट्रे नो फार आव्डतो. आय जी टीव्ही व इतरत्र बघते. खळ्या गोड आहेत त्याच्या. एकुण च क्युटी पाय. पिक्चर येतोए ना तोच बघु.

हे पुस्तक खूप दिवसापासुन वाचायच्या यादीत आहे. नक्की वाचणार.
ललिता किंडल बद्दल अभिनंदन.
ट्रेवर नोआ खूप आवडतो. त्याने द डेली शो वर जॉन स्टूअर्टची जागा घेतली तेव्हापासुन आवडतो.
Amazon prime वर त्याचा सन ऑफ पट्रीशिया नावानी एकदम मस्त standup आहे .

छान पुस्तक परिचय! हे पुस्तक अनेक पातळ्यांवर आपल्याला जागे करते, आणि त्याच वेळी ज्या आत्मीक बळाने ट्रेवर नोवा कथन करतो ते फार देखणे आहे.

मी हे ऑडिओ बुक स्वरुपात ऐकलं. नॅरेटर खुद्द ट्रेवर नोआ असल्याने त्याने अगदी ४ चांद लावले हे ओघाने आलच. फार सुरेख पुस्तक आहे. तुझा परिचय/परिक्षण पण मस्त.

सुंदर परीचय.

तुझ्या लेखात मुळात माझी सुरूवात ‘कोण हा ट्रेवर नोआ?’ इथपासून होती. हे आहे म्हणून मला धीर आला, नाही तर इथले प्रतिसाद वाचून दडपण आले असते Happy

प्रतिसादांबद्दल आभार.

ट्रेवोर नोवा ची आर्ट आणि पॉलिटिक्स पाहिल्यावर एकंदरीत कृष्णवर्णीय संस्कृती आणि भारतातली दलित चळवळ यातली तफावत प्रकर्षाने दिसते >>> यावर काहीतरी वाचायला खरंच आवडेल.

माधव Lol मी पुस्तकाचा नेटवरचा सिनॉप्सिस वाचून तत्काळ पुस्तक विकत घेतलं. आणि मग वाचता वाचता एकीकडे कोण हा ट्रेवर नोआ याचा इंटरनेटवर शोध घेतला.