गूळपोळी

Submitted by मंजूडी on 17 January, 2014 - 04:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मायबोलीवर गूळपोळीच्या दोन उत्तम पाककृती आहेत - १. मनःस्विनीने लिहिलेली गूळपोळी २. सिंडीची खुसखुशीत करायला गेले गूळपोळी

आमचा गूळपोळी करण्याचा उत्साह बघून या दोन पाककृतींमधे लिहिलेल्या आणि चर्चिल्यापेक्षा वेगळं प्रमाण आमच्या सुगरणपणाच्या कमाल आणि किमान मर्यादा ओळखणार्‍या (कॉरा - सिंडी) आमच्या जन्मदात्रीने आम्हांस दिले आणि आम्ही यशस्वी झालो.
आम्हांला गूळपोळी करण्यास प्रेरीत करणार्‍या पूनम आणि सिंडीचे खास आभार! त्यांनी प्रेरणा दिली नसती तर आमची जन्मदात्री आम्हांस प्रमाण आणि पाककृती देण्यास कधीच धजावली नसती.

गेल्या वर्षी आणि यंदाही माझ्या हातून ह्या कृतीने पोळ्या उत्तम घडल्या. प्रमाण वेगळे आहे म्हणून फक्त इथे पाककृती लिहिली आहे.

गुळासाठी:
चार वाट्या शीगोशीग भरून चांगला गूळ - व्यवस्थित बारीक चिरलेला
एक वाटी बेसन
अर्धी वाटी तेल
अर्धी वाटी खमंग भाजलेल्या तीळाचं कूट
दोन चमचे भाजलेली खसखस
जायफळ, वेलची स्वादासाठी

पारीसाठी:
४ वाट्या मैदा
४ वाट्या कणीक
अर्धी वाटी बारीक रवा
१ वाटी तेल
चवीपुरतं मीठ
कणीक भिजवायला पाणी
पोळी लाटताना लावण्यासाठी तांदुळाचे पीठ

क्रमवार पाककृती: 

१. तीळ कढईत घालून बारीक गॅसवर खमंग भाजून कूट तयार करा. खसखसही बारीक गॅसवरच भाजा. त्याच कढईत आता अर्धी वाटी तेल गरम करून त्यात बेसन चांगलं खमंग भाजा.
२. चिरलेला गूळ झाकणाच्या डब्यात ठेवून झाकण लावून कूकरमधे ठेवा. गॅस चालू करून कूकरच्या दोन शिट्या झाल्या की गॅस बंद करा.
३. कूकरचं प्रेशर पडलं की ताबडतोब डब्यातल्या गूळात भाजलेलं बेसन, तीळाचं कूट, खसखस मिसळा. आपल्या आवडीप्रमाणे जायफळ, वेलचीपावडर घाला. हे मिश्रण कोमट झालं की हाताने चांगलं मळून घ्या. हा पोळीचा गूळ तयार झाला.
४. पारीसाठी कणीक, बारीक रवा आणि मैदा मिसळून घ्या. त्यात चवीपुरतं मीठ घालून अगदी कडकडीत गरम तेल घाला. चमच्याने ढवळत सगळ्या पीठाला ते गरम तेल लागेल असं पहा. मग लागेल तसं पाणी घालत आपण नेहमी पोळ्यासाठी कणीक भिजवतो तेवढी नरम कणीक भिजवून घ्या.
५. भिजवलेल्या कणकेचा लाडवाएवढा गोळा घेऊन त्याची पारी करा. त्यात गोळ्याच्या साधारण दुप्पट गूळ भरून पारी बंद करून पोळी लाटा. पोळी लाटताना चिकटू नये म्हणून तांदूळाची पिठी भुरभुरवा.
६. चांगल्या तापलेल्या तव्यावर पोळी खमंग भाजा. ही पोळी एका बाजूने एकदाच भाजावी.
७. गरम पोळी खाऊ नका. जीभेला फोड येईल. पोळी गार झाली की त्यावर तुपाचा गोळा टाकून चवीचवीने खा.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२-१५ पोळ्या होतात.
अधिक टिपा: 

पारीसाठी हे प्रमाण घेतल्यामुळे पोळी मस्त खुसखुशीत होते, मऊ पडत नाही. लाटायला सोपी आणि भाजतानाही गूळ शक्यतो पोळीबाहेर येत नाही, आला तरी संकटपरिस्थिती निर्माण होत नाही.

हा फोटो गेल्या वर्षीचा आहे, यंदा पुन्हा पोळ्या करेन तेव्हा हा फोटो बदलेन.

gulpolya.jpg

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक शन्का आहे, सिन्डाक्काच्या क्रुतीत लिहलय की गरम बेसनात गुळ घालु नका नाहितर सगळ चिक्कट्ट होइल पण मन्जुडीच्या क्रुतीत मात्र कुकरमधुन काढलेल्या गरम गुळात सगळ लगेच मिक्स करा अस लिहलय

फक्त चणा दाळ नाहि चालत. >>> मग शेंगदाण्याचं कूट किंवा तिळाचं कूट वाढवा. बेसनामुळे खुटखुटीतपणा येतो पोळीला. कणीक वापरलीत तर पोळी तशी खुटखुटीत होणार नाही.

आज या रेसिपीने केल्या गुळाच्या पोळ्या. एकदम फुल्ल प्रूफ रेसिपी आहे. उत्तम पोळ्या झाल्या आहेत. पोळी लाटणेही सोप्पे वाटले. गुळ पोळित अगदी कडेपर्यंत नीट पसरला.
पोळ्या भाजणे थोडे ट्रिकी आहे. सरावाने जमले.
धन्यवाद मन्जुडी.

मनस्विनी, सिंडी आणि मंजूडी तिघींच्या पाककृती आणि टीपा वाचून आज फायनली गुळपोळीचे धाडस केले.
तिघींचेही मनापासून आभार.

नेहमीच्या पोळ्या प्रायोगिक तत्वावर होत असताना फक्त पहिली गुळपोळी तव्याला चिकटली आणि बाकीच्या छान झाल्यामुळे डायरेक्ट सुगरण झाल्यासारखे वाटतेय.

आज या रेसीपीने बर्‍याच वर्षांनी गुळपोळ्या केल्या. निम्मे प्रमाण वापरले, परफेक्ट झाल्यात.

गुळ घालून पुरणपोळ्या नेहमी केल्या जातात पण गुळपोळी कधी खाल्ली नाहीये पण सॉलिड हेवी दिसतेय छानच लागत असणार.मस्त फोटो सगळ्यांचे आणि रेसिपी.

Pages