गूळपोळी

Submitted by मंजूडी on 17 January, 2014 - 04:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मायबोलीवर गूळपोळीच्या दोन उत्तम पाककृती आहेत - १. मनःस्विनीने लिहिलेली गूळपोळी २. सिंडीची खुसखुशीत करायला गेले गूळपोळी

आमचा गूळपोळी करण्याचा उत्साह बघून या दोन पाककृतींमधे लिहिलेल्या आणि चर्चिल्यापेक्षा वेगळं प्रमाण आमच्या सुगरणपणाच्या कमाल आणि किमान मर्यादा ओळखणार्‍या (कॉरा - सिंडी) आमच्या जन्मदात्रीने आम्हांस दिले आणि आम्ही यशस्वी झालो.
आम्हांला गूळपोळी करण्यास प्रेरीत करणार्‍या पूनम आणि सिंडीचे खास आभार! त्यांनी प्रेरणा दिली नसती तर आमची जन्मदात्री आम्हांस प्रमाण आणि पाककृती देण्यास कधीच धजावली नसती.

गेल्या वर्षी आणि यंदाही माझ्या हातून ह्या कृतीने पोळ्या उत्तम घडल्या. प्रमाण वेगळे आहे म्हणून फक्त इथे पाककृती लिहिली आहे.

गुळासाठी:
चार वाट्या शीगोशीग भरून चांगला गूळ - व्यवस्थित बारीक चिरलेला
एक वाटी बेसन
अर्धी वाटी तेल
अर्धी वाटी खमंग भाजलेल्या तीळाचं कूट
दोन चमचे भाजलेली खसखस
जायफळ, वेलची स्वादासाठी

पारीसाठी:
४ वाट्या मैदा
४ वाट्या कणीक
अर्धी वाटी बारीक रवा
१ वाटी तेल
चवीपुरतं मीठ
कणीक भिजवायला पाणी
पोळी लाटताना लावण्यासाठी तांदुळाचे पीठ

क्रमवार पाककृती: 

१. तीळ कढईत घालून बारीक गॅसवर खमंग भाजून कूट तयार करा. खसखसही बारीक गॅसवरच भाजा. त्याच कढईत आता अर्धी वाटी तेल गरम करून त्यात बेसन चांगलं खमंग भाजा.
२. चिरलेला गूळ झाकणाच्या डब्यात ठेवून झाकण लावून कूकरमधे ठेवा. गॅस चालू करून कूकरच्या दोन शिट्या झाल्या की गॅस बंद करा.
३. कूकरचं प्रेशर पडलं की ताबडतोब डब्यातल्या गूळात भाजलेलं बेसन, तीळाचं कूट, खसखस मिसळा. आपल्या आवडीप्रमाणे जायफळ, वेलचीपावडर घाला. हे मिश्रण कोमट झालं की हाताने चांगलं मळून घ्या. हा पोळीचा गूळ तयार झाला.
४. पारीसाठी कणीक, बारीक रवा आणि मैदा मिसळून घ्या. त्यात चवीपुरतं मीठ घालून अगदी कडकडीत गरम तेल घाला. चमच्याने ढवळत सगळ्या पीठाला ते गरम तेल लागेल असं पहा. मग लागेल तसं पाणी घालत आपण नेहमी पोळ्यासाठी कणीक भिजवतो तेवढी नरम कणीक भिजवून घ्या.
५. भिजवलेल्या कणकेचा लाडवाएवढा गोळा घेऊन त्याची पारी करा. त्यात गोळ्याच्या साधारण दुप्पट गूळ भरून पारी बंद करून पोळी लाटा. पोळी लाटताना चिकटू नये म्हणून तांदूळाची पिठी भुरभुरवा.
६. चांगल्या तापलेल्या तव्यावर पोळी खमंग भाजा. ही पोळी एका बाजूने एकदाच भाजावी.
७. गरम पोळी खाऊ नका. जीभेला फोड येईल. पोळी गार झाली की त्यावर तुपाचा गोळा टाकून चवीचवीने खा.

वाढणी/प्रमाण: 
साधारण १२-१५ पोळ्या होतात.
अधिक टिपा: 

पारीसाठी हे प्रमाण घेतल्यामुळे पोळी मस्त खुसखुशीत होते, मऊ पडत नाही. लाटायला सोपी आणि भाजतानाही गूळ शक्यतो पोळीबाहेर येत नाही, आला तरी संकटपरिस्थिती निर्माण होत नाही.

हा फोटो गेल्या वर्षीचा आहे, यंदा पुन्हा पोळ्या करेन तेव्हा हा फोटो बदलेन.

gulpolya.jpg

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडे... माझ्या नं नाही होत चांगल्या मग.. केल्याच नाहीत तेन्-चार वर्ष. आज मैत्रिणीने दिल्या... अन तुझी रेसिपी वाचताना वाटतय की, जमेल... करणारय.
(धन्यवाद... हा आवडीचा वाद)

मस्त! Happy

सेम रेसिपीनेच करते, फक्त कणकेच्या दोन पार्‍या आणि गुळाची एक पारी (कणकेपेक्षा किंचीत लहान) असं सँडविच बनवून त्याच्या कडा अलगद बंद करुन लाटते.

अश्विनी के - मी सुद्धा तुझ्यासारख्याच सँडविच पोळ्या करते. कध्धी नाही फुटत हो Wink

मंजूडी - मी कधी गूळ कुकरमधे गरम करून नाही केला, ह्यावेळी करून पाहीन. मस्त आहे आयडिया.

वा! पोळ्या भारी दिसत आहेत. कणकेत मैदा घालायची कल्पना चांगली आहे.

माबो गुळपोळीमय झाली आहे. माझा गुळाची पोळी न करण्याचा निश्चय विरघळतोय Wink

गूळ कूकरमधून विरघळवून घेतला, की लगेच पोळ्या कराव्या लागतात असा माझा अनुभव आहे.
पारंपरिक पद्धतीने किसून घेतलेल्या गूळाच्या नंतर दोन दिवसांनी पोळ्या केल्या तरी चालतात.

गूळ कूकरमधून विरघळवून घेतला, की लगेच पोळ्या कराव्या लागतात असा माझा अनुभव आहे.>>>

असं काही नाही गं. मी करते २-४ दिवसांनीसुद्ध पोळ्या.

कूकरखालचा गॅस बंद केला की मी प्रेशर पडायचीही वाट न बघता गावी/सांडशी/चिमट्याने शिट्टी वर थोडी उचलून वाफ काढून टाकते आणि झाकण उघडून डबा बाहेर काढते. त्या गरम पातळ गुळातच बाकीचे मिस्चर घालून चमच्याने ढवळून घेते आणि गार झाल्यावर मळून घेते.

खूप छान दिसताहेत पोळ्या. टेम्प्टींग.
आणि रेसिपी पाहून कराव्याशा वाटत आहेत. रेसिपीबद्दल धन्यवाद

ठाण्याला एका दुकानात खास पोळ्यांकरताचा गूळ मिळतो. तो एकदम मऊ असतो. त्यात फक्त बाकीचे जिन्नस मिसळायचे आणि पोळ्या करायच्या. असे ज्ञान मला यावर्षी मिळाले.

बाकी, पोळ्या पारंपारीक पद्धतीने केल्या की आधुनीक त्याची मला कल्पना नाही.

वा वा! सही दिस्तात. पुढची बॅच खसखस घालून करेन.

आईची टिपः कुठलंही सारण भरून केलेली पोळी-पराठा फाटू नये म्हणून पारीच्या गोळ्याची हातानं पणती करायची. पणती, मधे जाड आणि टोकांना थोडी पातळ करायची. आत सारण भरून त्याची पुरचुंडी वळायची. बारकी चपाती लाटून त्यात सारण भरायचं नाही.

वा वा! छान आहे रेसिपी ..

आमच्या माँसाहेब कधी गूळ वाफवून घेत नाहीत बहुतेक .. आणि त्या दोन लाट्या घेऊन मध्ये गुळाचा पेढा ठेवून करतात पोळी, लाटून झाली की मग काततातही (;)) ..

फोटो छान आहे .. माँ, मुझे तेरी बहुत याद आ रही है .. Wink

कव्हरला टेक्स्चर/सबस्टन्स येण्यासाठी? कारण नुसतीच कणिक किंवा मैदा असेल तर फार मऊ होईल ते प्रकरण असं वाटतंय .. आणि अनलाईक पुरण, पोळीचा गूळ तसा "हार्ड" मट्रेल आहे स्टफ करण्यासाठी? Happy

बेसनानेही तो इफेक्ट येत असावा .. माझी आई बहुतेक रवा घालत नाही , फक्त बेसन घालते .. आणि बेसनाने चवही "बेटर" येत असावी .. नुसत्याच कणिक + मैदा कॉम्बिनेशन पेक्षा असा अंदाज आहे ..

(आम्ही ह्यातले जाणकार नाही .. :))

म्हणजे कोण? Proud

मी रवा आणि मैदा दोन्ही घालत नाही पारीत. कणीक आणि थोडंसं बेसन.
सारणात तीळ, सुकं खोबरं, खसखस आणि गूळ.

मी रवा आणि मैदा दोन्ही घालत नाही पारीत. कणीक आणि थोडंसं बेसन.
सारणात तीळ, सुकं खोबरं, खसखस आणि गूळ.
>> माझी आई असंच करते असं मला वाटतय.

जाणकार म्हणजे वर्षानुवर्षे गूळपोळ्या करणारे आणि सर्व व्हेरिएशन्स वापरून त्यातले रिझल्टवाइज फरक नमूद केलेले बल्लाव/बल्लवीज म्हणजे बहुतेक आपल्या सगळ्यांच्या आयाच ... Happy

>> बल्लाव/बल्लवीज

Lol

हे असलं काही आईला म्हंटलं तर तिला अजिबात आवडणार नाही ह्याची ग्यॅरन्टी .. Happy

वाह! मस्तच झाल्यात गुपो... तोंपासु Happy
इतके दिवस भलमोठं वाटणारं शिवधनुष्य मलाही आता उचलावसं वाटतयं!!! थोडक्यात मी ही करणारच गुपो.... आईने सांगितलेली रेस्पी थोडी वेगळी आहे...करुन बघेन.

सगळीकडे गुपो बघून आता मलाही कराव्याश्या, मुख्य म्हणजे खाव्याश्या, वाटत आहेत. फोटो कातिल आहे. तिकडे ही एकसे बढकर एक फोटो आहेत, फार छळता तुम्ही सुगरणी.

Pages