पक्षी निरीक्षण - काही टिप्स

Submitted by हरिहर. on 27 December, 2019 - 19:54

2019-10-11 00.13.10.jpg
(हा लेख मिसळपाव दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झाला असुन माझे लेखन एकाच ठिकाणी असावे म्हणून येथे जसा आहे तसा घेतला आहे. यात बदल करण्याचा व अधिक माहिती वाढवण्याचा मोह टाळला आहे. वाचला असल्यास दुर्लक्ष करावे.)

असे म्हणतात की काही विशिष्ट झाडांखालून गेल्यावर, ठरावीक जागा ओलांडल्यावर भूतबाधा होते. आता यात खरे-खोटे काय आहे ते माहीत नाही, पण आमच्या सोसायटीची भिंत ओलांडून एक दिवस मी प्रचंड पसारा असलेल्या लिंबाच्या झाडाखालून गेलो आणि कदाचित त्याच दिवशी हे पक्षिनिरिक्षणाचे भूत माझ्या मानेवर बसले. बरे, इतर भुतांसारखे या भुताला ना कोणता उतारा आहे, ना कोणत्या मांत्रिकाचे मंत्र त्याच्यावर परिणाम करतात. ते एकदा तुमच्या मानेवर बसले की मग काही केल्या ते उतरत नाही. मग तुम्ही फक्त त्याच्याच सत्तेखाली असता. ते तुम्हाला हवे तसे फिरवते. जी ठिकाणे तुम्ही कधी पाहिलीही नाहीत, अशा ठिकाणी ते तुम्हाला तासनतास बसायला लावते. दहा मिनिटांपेक्षा जास्त भूक सहन न करणाऱ्याला दिवसदिवसभर भुकेची जाणीव होऊ देत नाही. आणि गम्मत म्हणजे हळूहळू या भुताच्या संगतीशिवाय मन रमतही नाही.

आमच्या सोसायटीच्या आवारामध्ये एक देवराई राखलेली आहे. तेथील झाडे कुणी तोडत नाहीत किंवा तेथे कसल्याही प्रकारचे बांधकामही केले जात नाही. देवराईमधून पलीकडे जायला अगदी लहानशी पायवाट आहे. त्यामुळे तेथे बाइक, कार वगैरेंचा अजिबात प्रवेश होत नाही. देवराईच्या मधोमध एक जुनी व भरपूर पाणी असलेली विहीर आहे. एकूण पक्ष्यांना आवश्यक असलेले वातावरण सगळ्या देवराईत आहे. या सगळ्या वातावरणामुळे येथे अनेक लहान-मोठ्या पक्ष्यांची खूप वर्दळ असते. एक दिवस विरंगुळा म्हणून मी या देवराईतील मोठ्या व जुन्या लिंबाच्या झाडाखाली बसलो होतो. थोड्या वेळातच माझ्यापासुन काही फुटांवर दोन अतिशय लहान पक्षी उतरले. एकमेकांशी खेळायच्या नादात कदाचित त्यांचे माझ्याकडे लक्ष नसावे. सुरुवातीला गम्मत म्हणून आणि नंतर उत्सुकता म्हणून मी त्यांचे निरीक्षण करायला लागलो. हीच माझ्या पक्षिनिरिक्षणाची सुरुवात होती. गमतीत सुरू झालेले हे वेड पुढील महिनाभरात बरेच वाढले. या महिनाभरात मी जवळजवळ साठ पक्ष्यांची नोंद केली. फोटो काढले. टिपणे काढली. पण या छंदाचा खरा त्रास पुढेच होता. आता माझ्या लक्षात आले की मी रोज सकाळी एक तास व संध्याकाळी एक तास देवराईत घालवूनही आता तेच तेच पक्षी दिसायला लागले आहेत. चाळीस ते पन्नास पक्षी मी सोसायटीच्या गेटच्या आतमध्येच पाहिले होते. पण आता मला नवीन काहीतरी दिसायला हवे होते. त्यासाठी बाहेर पडणे गरजेचे होते. थंडीलाही नुकतीच सुरुवात होत होती. थंडीच्या मोसमातील पक्षी कुठे कुठे यायला सुरुवात झाली होती. या छंदामुळे महिनाभरात अनेक पक्षिप्रेमींबरोबर मैत्री झाली होती. त्यांचे कुठले कुठले फोटो आता टेलेग्राम-व्हॉट्स अ‍ॅपवर यायला लागले होते. शेवटी मित्रांचे सल्ले, आंतरजालावरील माहिती यांच्या आधारे मी एके दिवशी भल्या पहाटे गाडी सोसायटीबाहेर काढली. मी प्रथमच बाहेरचे पक्षी पाहाणार होतो. उत्सुकता होती. जेथे चाललो होतो, तेथे नक्की काय पाहायला मिळेल याची माहिती मी दोन दिवस अगोदर नेटवरून काढली होती. आता फक्त भाग्य, सूर्य आणि पक्षी कशी साथ देतात यावर सगळे काही अवलंबून होते. कारण या वर्षी परतीचा पाऊस लांबला होता व ढग कधीही भरून येत होते. तर ही पहील्या पक्षीनिरिक्षण सहलीची कहाणी पुन्हा केंव्हा तरी.

साधारण पक्षीनिरिक्षणाची सुरवात कशी करावी ते माझ्या अल्पानुभवावरुन पाहू. सर्वात प्रथम एक उत्तम दुर्बीण, स्थानिक पक्ष्यांचे फील्ड गाइड आणि सरावाचा असलेला कॅमेरा तुमच्याजवळ असायला हवे. फील्ड गाईडबरोबर तुम्ही मोबाइल अ‍ॅपदेखील वापरू शकता. (मी India Birds, vannya आणि eBird ही iOS ऍप्स वापरतो.)
महत्त्वाचे आहे ती बर्डिंगसाठी जाण्याची वेळ. शक्यतो सूर्योदयाच्या अगोदर बर्ड वॉचिंगसाठी उत्तम वेळ असते. त्यानंतर संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर. या दोन्ही वेळेस पक्षी जास्त अ‍ॅक्टिव्ह असतात. तसेच सूर्यप्रकाश योग्य कोनात असल्याने पक्षी दिसतातही व्यवस्थित आणि ही किरणे फोटो काढण्यासाठी उत्तम असतात. हा झाला दिवसाचा वेळ. पण वर्षातील कोणता काळ या पक्ष्यांचा विणीचा असतो, घरटी बांधण्याचा असतो, याची माहितीही पक्षिनिरीक्षणासाठी महत्त्वाची ठरते.

पक्षिनिरीक्षण करताना होणारी पहिली चूक म्हणजे अतिउत्साह. या उत्साहामुळे मी आणि माझी बायको आपापसात फार गोंधळ करायचो. हातवारे करून “अरे, हा बघ” “अरे, कित्ती गोड आहे तो” “तू वेळेवर का नाही पाहिले?” वगैरे आरडाओरडा सुरू असायचा. (त्यात नवरा-बायको म्हटल्यावर तर जास्तच गोंधळ. “मी सांगितलेले तू कधी ऐकलय का आजवर?” यासारखी वाक्ये तर विचारू नका.) नजर तर कुठेही स्थिर नसायची. दिसलेल्या एखाद्या पक्ष्यावरच लक्ष ठेवावे, हे लक्षात घेतलेच नव्हते आम्ही. समोरून काहीही उडाले की नजर त्याच्याच मागे. त्यामुळे सरुवातीला अनेक पक्षी दिसूनही आम्हाला एकही पक्षी व्यवस्थित पाहता आला नाही. पक्षी आवाजाला आणि हालचालीला फार लवकर घाबरतात. त्यामुळे शक्यतो जितके शांत राहता येईल तेवढे राहावे. हालचाली अगदी सावकाश आणि सहज असाव्यात. आणि तुमचे लक्ष शक्यतो एकाच प्रकारच्या पक्ष्याकडे असावे. (सशाची शिकार करायला बाहेर पडलो व समोरून रानडुक्कर जरी आडवे गेले, तरी तुमचे लक्ष सशाकडेच हवे. नाहीतर रानडुक्करही मिळत नाही आणि ससाही.) बरेचदा वेडा राघू, खंड्या यासारखे पक्षी शिकार करताना त्याच ठरलेल्या जागेवर पुन्हा पुन्हा येवून बसतात. हालचाली, मग त्या कोणत्याही असो, खूप सावकाश व सहज असाव्यात. अगदी हातातली दुर्बीण डोळ्याला लावतानाही एखादा पक्षी घाबरून उडून जातो. मला सुरुवातीला वाटायचे की आपल्या नशिबाचा दोष आहे हा. इतका वेळ हा पक्षी येथे बसला होता आणि नेमकी क्लिक करायच्या वेळीच उडाला. दोष नशिबाचा नाही, तुमच्या हालचालींचा आहे. बोलताना हळू बोलावेच, पण कॅमेऱ्याचे जे काही आवाज असतील - बीप, शटर वगैरे, ते आठवणीने म्यूट करावेत.

बरेचदा काय होते की वातावरण छान असते. सूर्यप्रकाश योग्य असतो. सूर्य तुमच्या पाठीमागील दिशेला असतो. पक्षीही शांत असतात, पण नेमकी तुम्ही आणि पक्षी यामध्ये एखादी फांदी असते. किंवा पक्षी जरा आतील बाजूला असतो व त्याचा काहीच भाग तुम्हाला दिसतो. अशा वेळी हालचालही करता येत नाही. या परिस्थितीमध्ये वापरायची एक युक्ती माझ्या पक्षिनिरीक्षक मित्राने मला सांगितली. हाताची मूठ करून तिच्या पाठीमागील भागावर हलकेच ओठ ठेवावेत. (होळीला बोंब मारताना जशी मूठ धरतो तशी, पण बोंब नाही मारायची हां!) आणि हळूहळू मुठीचे मुके (चुंबन) घेत नाजूक आवाज काढावेत. (लहान मुलांचे मुके घेतो तसे. नाही तरी पक्षिनिरीक्षण बाजूला राहायचे.) या आवाजाची लय कशी असावी याचा तुम्हाला पक्ष्यांच्या सान्निध्यात राहून अंदाज येतो सरावाने. किंवा ओठ आणि टाळूचा वापर करून नुसते चुकचुकल्यासारखे करावे. अनेक पक्ष्यांचा स्वभाव चिकित्सक असल्याने ते उत्सुकतेने बाहेर येऊन पहाणी करतात व तुम्हाला त्याचे दर्शन होते. ही युक्ती मी जरा शंकेनेच वापरली, पण ती नक्की काम करते. पण आवाज साधारण किलबिलणाऱ्या पक्ष्याच्या लयीत असावा, शिकारी पक्ष्यासारखा नको. म्हणजे शिक्रा, घार यांची विशिष्ट लयीमध्ये किलकारी असते. तसे नको. मुनीया, चिमणी या सारखे पक्षी जसा चिवचिवाट करतात ती लय असावी. या युक्तीला Pishing Trick म्हणतात. कारण हा आवाज काढताना दातावर दात घट्ट दाबून शीळ घालताना करतो तसे ओठ करायचे व नाजूक आवाजात pish हा शब्द उच्चारत राहायचा. हे नक्की करून पाहा.

याला शास्त्रीय आधार आहे की नाही माहीत नाही, पण तु्म्ही काही पक्ष्यांचा विश्वास संपादन करू शकता. देवराईमध्ये असलेल्या झाडाखाली एक चिरकची (Indian Robin) जोडी राहते. मी जेव्हा जेव्हा तेथे माझी गाडी पार्क करून झाडाखाली बसतो, तेव्हा हा चिरक अगदी हक्काने माझ्या गाडीच्या छतावर येऊन रुबाबात बसतो. तेथेच राहणारा सातभाईचा कळप सुरुवातीला गाडीच्या आरशात दिसणाऱ्या त्यांच्या प्रतिबिंबावर एकत्र हल्ला करायचे. आता ते आपापसात भांडायला माझ्या गाडीच्या छताचा उपयोग करतात. गांधारी (Long tailed Shrike)देखील मला चांगले ओळखतो आता, कारण मी जेव्हा त्याच्या हद्दीत जाऊन बसतो, तेव्हा तो माझी फारशी दखल घेत नाही. तो त्याची शिकार करत असतो व मी इतर काही दिसले तर फोटो काढत असतो. आम्ही आपापली कामे करत राहतो. असो. विषयांतर झाले.

सुरुवात आपल्या आजूबाजूच्या पक्ष्यांपासून करावी. गाइडचा उपयोग करून किंवा नेटवरुन त्या पक्ष्यांची अगोदर माहिती घ्यावी. त्यांचे आवडते खाद्य, झाडे, फुले यांची माहिती झाली की मग कोणत्या पक्ष्याला कुठे शोधायचे किंवा कुठे कोण दिसेल याचा अंदाज यायला लागतो. आणि हा अंदाज शक्यतो चुकत नाही. त्या त्या पक्ष्यांचा स्वभाव कसा आहे हे अगोदर जाणून घ्यावे. त्याचाही फार उपयोग होतो. अर्थात एकदा तुम्ही पक्षिनिरीक्षण सुरू केले की काही काळातच तुम्हाला त्या पक्ष्याचा स्वभाव लक्षात यायला सुरुवात होते. माझ्या ओळखीच्या झालेल्या सातभाईंच्या (लार्ज ग्रे बॅबलर) थव्यातील कोण जास्त भांडकुदळ आहे, कोण शांत असतो हे आता मला समजायला लागले आहे. काही पक्ष्यांना मी वैयक्तिक ओळखू शकतो. म्हणजे कोणताही रॉबिन दिसला तर बायकोसाठी तो फक्त रॉबिन असतो, मात्र मी सांगू शकतो की हा आपल्या बांबूच्या बनातला रॉबिन आहे किंवा हा विहिरीकाठी राहणारा रॉबिन आहे. आणि अशी ओळख झाली की खूप छानही वाटते. काहींना मंत्री-आमदारांबरोबर किंवा मोठ्या लोकांबरोबर असलेल्या ओळखीचा जेवढा अभिमान किंवा कौतुक वाटते, त्यापेक्षा हजारपटींनी मला “हा ‘अमुक रॉबिन’ आहे” किंवा “ही वेगळीच टिबुकली आहे, आपली नाही” असे म्हणताना वाटते.

एकदा आजूबाजूचे पक्षी पाहायची सवय झाली, हवा तो संयम बाळगता यायला लागला की मग आजूबाजूला एखादे पार्क किंवा टेकडी आहे का ते शोधावे. शहरातली निगा राखलेली बागही चालेल किंवा जवळपास एखादे तळे असेल तर अगदी उत्तमच. पहाटे अशा ठिकाणी एखादी जागा शोधून पक्ष्यांची वाट पाहावी. (पक्षी शोधत फिरण्यापेक्षा त्यांची वाट पहात एका ठिकाणी स्वस्थ बसणे मला तरी फायदेशीर ठरले.) एव्हाना साधारण अंदाज आला असतो की मस्त फुललेला शंकासुर असेल तर सूर्यपक्षी (Sunbird) हमखास दिसणार. जवळपास शेत असेल किंवा गवताळ प्रदेश असेल तर मुनियांचे प्रकार दिसणार. आजूबाजूला असलेल्या विजेच्या तारांवर कोतवाल (Black Drongo) दिसणारच. तळे किंवा नाला असेल तर खंड्याचे (Kingfisher) दर्शन होणारच. या पक्षिनिरीक्षणाची गम्मत अशी आहे की आजवर कधी तुम्हाला चिमणी-कावळा सोडून पक्षी दिसलेला नसतो, पण एकदा हे वेड लागले एकेक पक्षी अगदी खास तुमच्या भेटीला यावा तसे दर्शन द्यायला लागतो. खरे तर शहर असो वा शेत, पक्षी प्रत्येक ठिकाणी असतातच, फक्त आजवर आपले दुर्लक्ष झालेले असते. अगदी बाहेर न जाताही टेरेसमध्ये धान्य ठेवायची व पक्ष्यांना बसता येईल अशी एखादी रचना करून ठेवली, तर काही दिवसांतच पक्ष्यांची वर्दळ सुरू होते आणि घरबसल्या तुम्हाला पक्षिनिरीक्षणाचा आनंद घेता येतो. टेरेसमध्ये किंवा खिडकीत विचारपूर्वक फूलझाडे लावली, तर सूर्यपक्षी हमखास चक्कर टाकून जाणारच.

पक्षी रंगांना घाबरतात का, हे मला सांगता येणार नाही. पण बर्डिंगच्या वेळी आकाशी रंगाचे टीशर्ट आणि खाकी पँट हा माझा ड्रेस असतो. मला वाटते पक्षी रंगांना घाबरत नसले, तरी ब्राइट कलरमुळे नक्की दचकत असावेत. उदा. पांढरा शुभ्र किंवा भडक पिवळा वगैरे. अर्थात मला नक्की सांगता येणार नाही. तुम्ही तुमच्या अनुभवाप्रमाणे कपडे घाला. पण शक्यतो फुल पँट, पायात बूट आणि डोक्यावर समरकॅप असावीच. मोबाइल सायलेंट मोडवर असावा. मला उन्हाचा, तहानेचा आणि भुकेचा सर्वात जास्त त्रास झाला. त्यामुळे बर्डिंगला जाताना सोबत पाण्याची बाटली (जी संपल्यावर पुन्हा घरी आणायची आहे) आणि एखाद-दोन फळे नक्की असावीत. हे सामान शक्यतो पाठीवर अडकवता येईल अशा बॅगमध्ये असले, तर दोन्ही हात मोकळे राहतात. अंगात एखादा कॉमोफ्लॉज टी-शर्ट, पाठीवर सॅक, डोक्यावर खाकी समर कॅप, पायात लेदर बुट व हातात अगदी स्टर्डी असलेला मोनोपॉड अशी साधारण तयारी असावी. या मोनोपॉडचा उपयोग वॉकींग स्टिक म्हणूनही होतो व झुम करताना कॅमेरा किंवा दुर्बिनीला सपोर्टही घेता येतो. या पक्ष्यांच्या मागे भटकताना भान राहत नाही, त्यामुळे सर्वप्रथम स्वतःची काळजी आणि मग निसर्गाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेव्हा पक्षिनिरीक्षणाला जाता, तेव्हा दिवसभरात काय पाहिले याची बारीकसारीक नोंद करावी. यात प्रथम पक्ष्याचा आकार, रंग, त्याचे तुम्हाला जाणवलेले वैशिष्ट्य, माहीत असेल तर नर का मादी हे टिपून ठेवावे. कुठे दिसला, किती वाजता दिसला, काय करताना दिसला, एकटा होता, जोडी होती की थवा होता याची नोंद करावी. जर त्या पक्ष्याचा आवाज तुम्ही ऐकला असेल तर तो शब्दात लिहायचा प्रयत्न करावा. घरटे पाहिले असेल तर ते बांधण्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्यात याची बारकाईने नोंद करावी. आजकाल डायरी अ‍ॅप भरपूर मिळत असल्याने शक्यतो एखादा फोटो डकवून त्याखाली वरील सर्व माहिती एका चार्टमध्ये भरावी. मी Day One व Dyrii ही macOS अ‍ॅप्स वापरतो. नंतर या नोंदी पाहून तुम्हाला बरेच अंदाज यायला सुरुवात होते.

जाता जाता काही गोष्टी - पक्षी पाहाताना खूप गोंधळ व्हायची शक्यता असते. म्हणजे एकाच जातीच्या पक्ष्यांच्या अनेक उपजाती असतात, ज्या अगदी सारख्या दिसतात. Long tailed Shrike व Bay backed Shrike समोरुन पाहिले, तर अगदी सारखे दिसतात. काही पक्ष्यांचे नर व मादी खूप वेगळे दिसतात. कोकीळ अगदी काळाकुट्ट असून कोकिळा मात्र अंगावर पांढरे ठिपके असलेली असते. तिचा रंग पाहून ससाणा आहे की काय असे वाटते. तसेच काही पक्षी विणीच्या हंगामात आपले रंग (Plumage) बदलतात, तर काहींच्या रंगात ठरावीकच बदल होतो. सूर्यपक्ष्याच्या छातीवर काळी रेषा उमटू शकते. असा सूर्यपक्षी पाहिला की असे वाटते की आपण वेगळाच कोणतातरी पक्षी पाहिला आहे. तसेच अनेक पक्षी आपली पिसे साफ (Preening) करताना अगदी मजेशीर दिसतात. अशा वेळी त्यांचा आकार आहे त्यापेक्षा दीडपट मोठा दिसू शकतो. अर्थात एकदा तुम्हाला सगळ्यांची ओळख झाली की या गोष्टी चटकन लक्षात यायला लागतात. पण तोपर्यंत या साध्या गोष्टी खुप गोंधळात टाकतात. (सुरवातीला मी एका पक्ष्याचा नर, मादी व पिल्लू या तिघांची तिन वेगवेगळे पक्षी म्हणून नोंद केली होती.)

टीप : कधी एखादे पक्ष्याचे घरटे दिसले, पिल्ले दिसली तर निकडीची गरज असल्याशिवाय त्यांना हात लावू नका. फोटो मिळवण्याच्या नादात पक्ष्यांना विचलित करू नका. कारण एक-दोनदा असा प्रकार झाला तर पक्षी घरटे सोडून निघून जातात. जर भाग्याने एखाद्या पक्ष्याला शिकार करताना तुम्हाला पाहायला मिळाले, तर फक्त त्या घटनेचे साक्षीदार व्हा. ज्या पक्ष्याची किंवा लहान प्राण्याची शिकार होत आहे, त्याला वाचवायचा प्रयत्न चुकूनही करू नका. ते त्यांचे जग आहे. पक्षिनिरीक्षण करताना नेहमी निसर्गाची व अर्थात स्वतःचीही काळजी घ्या.

--- हरिहर (शाली)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणे सुंदर लेख!

आमच्या सोसायटीच्या आवारामध्ये एक देवराई राखलेली आहे. तेथील झाडे कुणी तोडत नाहीत किंवा तेथे कसल्याही प्रकारचे बांधकामही केले जात नाही. देवराईमधून पलीकडे जायला अगदी लहानशी पायवाट आहे. त्यामुळे तेथे बाइक, कार वगैरेंचा अजिबात प्रवेश होत नाही. देवराईच्या मधोमध एक जुनी व भरपूर पाणी असलेली विहीर आहे. >>>>>>> स्वप्ननगरीत रहाता तुम्ही.हेवा वाटतो बघा.

हरिहर, लेख आवडला.
मलाही आहे हा नाद. पण तुमच्याइतका त्याचा पाठपुरावा करणे सध्या तरी शक्य नाही आणि तुम्ही आणि तुमच्या पत्नीने काढलेल्या फोटोंची तर बातच नको! घरामागच्या अंगणात ठेवलेले दाणापाणी खाण्यासाठी जे अनेक पक्षी येतात ते नावांनिशी ओळखू शकते. कधी एखादं वेगळं पाखरू किंवा जोडपं आलंच तर हाताशी ठेवलेल्या दुर्बिणीतून त्यांना निरखणं आणि मग जालावरून त्यांची ओळख पटवणं आलंच. ती खात्रीशीरपणे पटेपर्यंत चैन पडत नाही. (हेच फुलपाखरांबाबतीतही)

एकाच जातीच्या पक्ष्यांच्या अनेक उपजाती असतात, ज्या अगदी सारख्या दिसतात. >> हेही लक्षात आले आहे. इथल्या चिमण्यांच्या अनेक जाती दिसतात. दुरून मात्र सगळ्या चिमण्या सारख्याच भासतात.
पक्षी निरीक्षणाविषयी टीपा आहेत म्हणून ही अजून एक.
पक्षी निरीक्षणाला जाताना कुत्रा/ मांजर इ. पाळीव प्राणी सोबत घेऊ नयेत. काॅमन सेन्स आहे पण नोंद करावी असं वाटलं Happy

सशाची शिकार करायला बाहेर पडलो व समोरून रानडुक्कर जरी आडवे गेले, तरी तुमचे लक्ष सशाकडेच हवे. नाहीतर रानडुक्करही मिळत नाही आणि ससाही.
>>>>>
आयुष्याचं रहस्य आहे हे!