पाथरा आणि गुयरी

Submitted by योगेश आहिरराव on 16 December, 2019 - 03:08

पाथरा आणि गुयरी

गेली अनेक वर्षे बकेट लिस्ट मध्ये असलेला बऱ्याच वेळा हुलकावणी दिलेला पाथरा घाटाचा ट्रेक यंदाच्या मोसमात जुळून आला. ‘आजोबा’ उर्फ ‘आजा पर्वत’ याच्या वाल्मिकी आश्रम, पाण्याचं कुंड व सीतामाईचा पाळणा इथं सुरुवातीच्या काळात भरपूर चकरा मारल्या तो गर्द झाडीत असलेला शांत रमणीय आश्रम परिसर तिथले मुक्काम नेहमीच स्मरणात राहतील.
मुख्य रांगेतील साडेचार हजार फूट पेक्षा अधिक उंचीच्या याच आजोबाच्या उत्तरेला आणि दक्षिणेला अनुक्रमे ‘गुयरीचं दार’ आणि ‘पाथरा घाट’ या दोन्ही मोठ्या खडतर वाटा. कोकणातल्या ठाणे जिल्ह्यातील ‘डोळखांब’ परिसरातील ‘डेहणे’, ‘गुंडा’, ‘साकुर्ली’, ‘तळेगाव’ भागातील अनेक लहान वाड्या वस्त्यातून घाटावर नगर जिल्ह्यातील ‘अकोले’ ‘राजूर’ भागातील दुर्गम अशा ‘कुमशेत’ भागात जाण्यासाठी पूर्वापार वापरात असलेल्या या दोन वाटा.
ajoba.jpg
पाथरा घाटाने चढाई करून वेळ आणि स्थितीनुसार जमलंच तर आजोबा टॉप मग कुमशेत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गुयरीच्या दाराने खाली डेहण्यात परत असे नियोजन होते.
‘सुनिल’ आणि पुण्याहून ‘राजेश मास्तर’ व ‘संदीप’ कल्याण मध्ये ठरलेल्या वेळेत दाखल झाले. आता चौकडी निघाली थेट डेहणे. रात्री एक वाजता पाटेकर मामांच्या अंगणात गाडी लावली. मामा जागेच होते कोरा चहा घेत उद्याची तयारीचा आढावा घेऊन फार वेळ न घालवता झोपी गेलो. सकाळी पाचच्या सुमारास उठून तयारीला लागलो, मामांनी सोबतीला पुढच्या वाडीतील देवा मामांना सांगून ठेवलं होतं. आणखी एकाची सोबत कशाला हवी ? असं माझे मत पडलं. पण मामा म्हणाले, 'गवत वाढलेलं असणार, बहुतेक ठिकाणी वाट झोडपत जावं लागणार. दरवेळी मी देवाला सोबत घेतो. कधी असेही होतं ग्रुप मधले एखाद दोघे मध्येच अर्ध्यावर खाली यायचं म्हणतात मग अश्यावेळी त्यांना खाली आणायला व बाकीच्यांना नीट वर घेऊन जायला दोघं नको' आता असं काही ऐकल्यावर मी तर चाट पडलो... दुर्गम भाग, अवघड घाट कधीकाळी असं झाले ही असेल आणि जबाबदारीचा भाग म्हणून एकाला एक जोड असावी असो. आता आम्ही सहा प्लस वन पाटेकर मामांचा बारावीत शिकणारा मुलगा ‘वैभव’ हा सुध्दा आमच्या सोबत पहिल्यांदा पाथरा घाटाच्या चढाईसाठी सॅक घेऊन तयार.
सहाच्या सुमारास जीप मधून ‘गुंडा’ ‘वालशेत’ करत ‘भितारवाडी’ पोहचलो तेव्हा नुकतच तांबड फुटू लागलं होतं. डावीकडे पुराणपुरुष आजोबा पासून निघालेली मुख्य धार पाथराच्या दिशेला पसरलेली. दोन दिवसाचा मुक्कामी ट्रेक, कितीही कमी आवश्यक तेवढेच घेतले तरी सॅक त्यानुसार थोडीफार वजनदार झालीच.
a1.jpg
सुरूवातीस भितारवाडीतून ओढ्याला चिकटून अशी चाल. ओढा पार करून विरळ रानातून आडवं जाऊ लागलो. थोडक्यात आजा पर्वताला डावीकडे मागे टाकून सह्यधारेला समांतर. काही अंतर जाताच दक्षिणेला दूरवर पाथरा घाटात जिथे देवीचे ठाणं आहे ती खिंड नजरेत आली.
a2.jpg
फार चढ उतार नसणाऱ्या गवताळ पठारावरून खिंडीच्या दिशेने चालत तासाभरात मोठ्या ओढ्याजवळ आलो. या जागेला जुना पाणी म्हणतात, असे पाटेकर मामांनी सांगितले, या ओढ्याच्या वरच्या भागात अगदी उन्हाळ्यात पाणी असते.
सकाळी लवकर निघालो तेव्हा फक्त कोरा चहा घेतलेला, नाश्ता करायला या पेक्षा चांगली जागा मिळाली नसती. पाऊण तासाचा ब्रेक घेतला. ओढा पार करून वाट चढणीला लागली. पुढे कोटाची वाडी कडून येणारी वाट मिळाली. आणखी एक ओढा पार करून डाव्या बाजूला जात वळसा घेत मोठ्या गवताळ सोंडेवर आलो, इथं खालच्या बाजूला कुंडाची वाडी कडून येणारी वाट मिळते.
a3.jpg
आता उजवीकडे खिंड एकदम दृष्टिक्षेपात, मळलेली मिश्र स्वरूपाची चाल थेट खिंडीच्या पायथ्याला घेऊन आली. काटेरी झुडुपे, कुठे कारवी तर खाली बारीक दगडांचा खच अगदी पहिल्या गिअर मध्ये घामाच्या धारांनी न्हाऊन नाळेतील अस्ते कदम चढाई करत खिंडीतले देवीचे ठाणं गाठलं. सकाळी पावणे सातच्या सुमारास सुरुवात करून इथवर पोहचायला आम्हाला साडेनऊ वाजले. लहान गुहेसारख्या जागेत. एक कोरड गाळ मातीने बुजलेलं पाण्याचं टाकं, भगवा झेंडा, हळद कुंकूच्या पुड्या, नवी जुनी पैशांची नाणी आणि देवीला अर्पण केलेली अनेक मडकी.
आजूबाजूच्या अनेक वाड्या वस्तीतील आदिवासी, ठाकरं, गावातील मंडळी दर्शनासाठी येऊन नवीन मडकी देवीला वाहून जुनी आपल्या घरी घेऊन जातात, अशी माहिती मामांनी पुरवली.
a4.jpg
सुनीलने नारळ आणले होते, देवा मामांनी अंघोळ केली असल्यामुळे त्यांना नारळ फोडू दिले. पूर्ण ट्रेक सुखरूप होऊ दे यासाठी देवीकडे प्रार्थना केली. इथून पुढे फारसं थांबता येणार नव्हते म्हणून लिंबू सरबत तयार करून थोडा सुका खाऊ तोंडात टाकला. नाही म्हणता देवीच्या ठाण्याजवळ पाऊण तासाचा ब्रेक झाला. झाडीतून दहा मिनिटांची चढाई संपवत खिंडीच्या माथ्यावर आलो. आता खरा खेळ सुरू होणार होता, गेल्या अनेक वर्षांपासून राहिलेली इच्छा आता पूर्ण होणार. पूर्वी शाळा कॉलेज मध्ये परीक्षेच्या वेळी धडधड वाटायची अगदी थोड्याफार प्रमाणात
तशीच अवस्था. थोडं कुतूहल.. थोडं दडपण..
a5.JPG
चढाईची धार अंदाजे चाळीस पंचेचाळीस अंश असावी. काठीचा आधार घेत तर प्रसंगी दोन्ही हात जमिनीला टेकवत माकडासारखं पुढे सरकायचं.
खिंडीचा डोंगर आता खाली जाऊ लागला, वर पाहत उजवी डावी दोन्ही बाजूला नजर फिरवली तर सह्यकड्याचं रौद्र रूप खऱ्या अर्थाने जाणवत होतं. खाली सरळ रेषेत कुंडाची वाडी, उजव्या बाजूला नाफ्ताची जोडी, साधडे घाटातून दिसतात ते सुळके, दूरवर रोहिदास, सह्यधार थेट माळशेज पर्यंत दिसते.
a6.jpg
एक नंबर नजारा. जेमतेम पाऊल मावेल एवढी वाट, लहान मोठे कातळ टप्पे पार करत सावधगिरीने सावकाश चढाई. मी आणि वैभव, देवा मामा सोबत पुढे होतो एव्हाना व्यवस्थित लय सापडून वाटेची मजा अनुभवू लागलो.
a7.jpg
मागे राहिलेलं मंडळ आणि आमच्यात थोडफार अंतर पडू लागलं, तर काही जणं एकदमच सिरीयस वाटू लागली, अति दडपण किंवा फार ताण घेऊन चाललं तर आणखीनच डगमगायला होणार. काहीही करून हा मोड बदलायला हवा असा विचार करत असतानाच मागे राहिलेल्या पाटेकर मामांनी काळजीपोटी वैभवला आवाज दिला. "वैभव सांभाळून रे" त्यांचा आवाज द्यायचा हा टोन मला 'मजनू तेरी भाभी को संभाल' या पठडीतील वाटला. मग काय... मजनूभाई, उदयभाई, आरडीएक्स नंतर भानगडे पाटील, कडू आण्णा, आंघोळ्या, जिलेबी बत्ताश्या सारे आले. मोड फुल टू चेंज पूर्ण पाथरा घाटाच्या दरीत हशा पिकला. जो तो एकदम आत्मविश्वासानं आणि उत्साहात पावलं टाकू लागला. पण याचा अर्थ असा नाही की फक्त दात काढत टिवल्या बावल्या या मध्येच राहीलो.
a8.jpg
खिंडीतून निघाल्यापासून अर्ध्या तासात घाटाच्या पंधरा फुटी रॉक पॅच समोर आलो. देवा मामा, वैभव पाठोपाठ सुनील, संदिप वर गेले तर राजेश मास्तरची अश्या अवघड जागी कॅमेरा गळ्यात अडकवून फोटूग्राफी चालू होती. हा रॉक पॅच सॅक सोबत चढण थोडं अडचणीचं वाटतं होते. त्यामुळे अवजड सॅक वर पास केल्या. पॅच चढत असता मोठी ढांग टाकताना नेमकी माझ्या उजव्या पायात क्रॅम्प आली. अर्धा मिनिट तसाच शांत उभा राहून पुन्हा खाली आलो. खालच्या बाजूला तीन चार जण आरामात बसू शकतात इतपत जागा आहे. तिथेच बसून दोन काकड्या, अर्धा लिटर पाणी आणि वीस मिनिटांची विश्रांती घेतली. एकदम तरतरीत वाटू लागलं.
a9.jpg
वर गेलेल्या मंडळींचा हास्य कल्लोळ सुरु होताच ते एन्जॉय करत झटकन वर गेलो.
a10.jpg
पॅच चढून आल्यावर डावीकडे अगदी छोटीशी ट्रेव्हर्सी आहे पण कातळाला असलेले होल्ड्स घेऊन ती अति अरुंद ट्रेव्हर्सी व्यवस्थित पार करता येते.
a11.jpg
जसजसे वर जाऊ लागलो तशी खालची खिंड आणि दरी भयाण वाटू लागली थोडक्यात पूर्ण वाटेला दृष्टिभय आहेच. थोडाफार घसारा, अरुंद पावठ्यांची जागा एका पाठोपाठ एक असे कातळ टप्पे थ्रील वुईथ एन्जॉय असा मामला. नियमित ट्रेकर साठी योग्य ती सावधगिरी बाळगत फार अवघड मुळीच नाही.
a12.jpga13.jpg
माथा समीप दिसता जेमतेम वीतभर आडवी पाऊल वाट उजवीकडे वळली ते वळण पण असे की जवळ जाई पर्यंत पुढची वाट लक्षातच येत नाही. याच आडव्या वाटेवर काही पावलांवर साधारण दहा बारा फुटी कातळ टप्पा, इथं मात्र चुकीला माफी नाही. एकदम फुल्लटॉस असा.
a14.jpg
उंची आणि दृष्टीभय आहेच. (जसा मदनगडाचा ट्रेव्हर्स) पुन्हा तेच नियमित अनुभवी ट्रेकरसाठी मुळीच अवघड नाही. तो टप्पा पार करून वाट मस्त पैकी वळण घेत लहानसा चढ चढून माथ्यावर आली. बऱ्याच वर्षांची ईच्छा पूर्ण झाली. मनातल्या भावना व आनंद वर्णनापलिकडे. घड्याळात पाहिलं तर बारा वाजून आठ मिनिटे.
a15.jpg
पुढच्या दहा पंधरा मिनिटांत मागचं मंडळ हल्लाबोल करत वर आलं. मग काय एकच जल्लोष. नाफ्ताच्या दिशेला पठारावर कड्यालगत रेलिंग लावलेले तिथेच वनखात्याने उभा केलेला वॉच टॉवर जो घाट चढताना सुध्दा स्पष्ट दिसतो.
तिकडे जायचा विचार केला पण उन्हामुळे आधी पाणवठा गाठून जेवण करायचे ठरवले. पठारावरील लहानसा ओढा पार करून वाट रानात शिरली, घाटावरील हवेचा गारवा त्या रानात सुखावून गेला. पुढची चाल माळरानातून अजूनही काही ठिकाणी घाणेरी, सोनकी तर जांभळी मंजिरीचे पसरलेले गालिचे.
a16.jpg
अर्ध्या पाऊण तासात शेतीचे बांध लागले कुमशेत गावठाण कडील गावकरी झोडणीच्या कामात व्यस्त त्यांना राम राम शाम शाम करत जवळपास पंधरा मिनिटांत ओढ्याजवळ पोहचलो.
a17.jpg
दुपारचे जेवण अर्थातच घरून आणलेले भाजी चपाती गुळ पोळी तिखट आणि गोड दशम्या, पाटेकर मामांचा शनिवारचा उपवास असल्याने त्यांना खजूर देण्यात आले.ओढ्या जवळ गोल पंगत बसली. जेवण होई पर्यंत दीड वाजून गेले. आता आजोबा टॉप बद्दल निर्णय घ्यायचा होता. मामांच्या मते आम्ही होतो तिथून वर जाऊन पुन्हा खाली यायला किमान चार तास तरी सहज हवे. वेळेचं गणित पाहता मोठ्या सॅक खाली ठेवून पिट्टू घेत जमवलं तरी खाली येई पर्यंत सहा साडेसहा होतील आणि या दिवसात अंधार लवकर पडतो. हा एकदम कट टू कट मामला होता, वरकरणी यात फक्त जाऊन भोज्जा करून येणं एवढंच दिसत होतं. बाकीच्या मंडळींना विचारलं त्यांना ही नुसतीच धावपळ नको होती. सुनील आणि संदीप तर स्पष्ट नाही म्हणाले. आता पर्यंत निवांत ट्रेक झाला पुढेही तसाच होऊ दे असं म्हणणं पडलं. तसेही वाटाड्या घेतला आहे काहीही करून जे ठरवलं ते झालंच पाहिजे असं मी तरी कधी धरून चालत नाही, वेळेनुसार योग्य काय तो निर्णय घेता यायला हवा. शेवटी ट्रेक यादगार होणं महत्वाचं. मामा तरीही जोर लावून सांगत होते, ‘होऊन जाईल इथवर चांगलं चाललो आपण अंधार पडायच्या आत खाली येऊन लागू’. मामांना सांगितले, ‘तुम्ही नका मनाला लावून घेऊ आजोबासाठी पुन्हा निवांतपणे येऊ’. आता कसली घाई नाही की चिंता नाही. वामकुक्षी अंघोळ मग कुमशेत मध्ये फेरफटका. गावात मुक्काम टाळून शिदोबा अलीकडे दूरवर रानात असलेल्या एकाकी भांबळे मामांच्या अंगणात करायचं ठरवलं.
सुर्यास्ताच्या छटा पाहत त्यांच्या दारी पोहचलो, स्वच्छ सारवलेले आंगण तिन्ही बाजूंनी सावली धरतील इतपत झाडांची दाटी. मला तर हे पाहून केवणीतील ढेहबे मामांचे घर आठवले. म्हाताऱ्या मामी एकट्याच कोंबड्या, बकऱ्या शेळ्यांची पिल्लं यांची रवानगी त्यांच्या ठरलेल्या जागी करण्यात दंग होत्या. आम्हाला पाहून हातातलं काम सोडून घरातून चटई अंगणात व जोडीला पिण्याच्या पाण्याचा लोटा, खरंच डोंगरातली माणुसकी दुसरं काय. थोड्या वेळातच भांबळे मामा आले, पाटेकर मामांनी जुनी ओळख सांगितली. सॅक अनलोड करत सोबत आणलेला शिधा बाहेर काढला. लहानशा फोल्डिंग स्टॉव्ह त्यात वडी टाकून संदिपने मस्त चहा तयार केला.
a18.JPG
चहा झाल्यावर फ्रेश होऊन रात्रीच्या जेवणाची तयारी, अंगणातच चूल मांडली मामांनी थोडीफार लाकडं दिली. मसाले भात आणि अंडा भुर्जी हा मेनू, संदीप सुनील तयारीला लागले. मामांना बोलतं केल्यावर तेव्हाची स्थिती कोकणात कुठे कार्य असेल अथवा वेळी अवेळी कुणाला काही झाले तर याच दोन्ही वाटांनी ये जा ठरलेली. अगदी आत्ताही कधी कुणाला काही कारणास्तव गुरं खाली कोकणात न्यावी लागली तर पेठेची वाडी पाचनई टोलार खिंडीमार्गे जुण्या माळशेजने उतराई ठरलेली. याला कारण कुमशेत मध्ये येणाऱ्या या ‘पाथरा’ व ‘गुयरी’ दोन्ही वाटांनी तसेच बाजूला पेठेच्या वाडीतून ‘करपदरा’ किंवा ‘सादडे घाट’ पण अवघडच मग दूरचा माळशेज त्यात सोयीचा. बाकी इतर किस्से गप्पा टप्पा नंतर क्लासिकल गाणी मग सर्वात महत्त्वाचं पोटभर जेवण. रात्री पाठ टेकताच झोप लागली हे सांगायला नको. सकाळी थोडं आरामात उठायचं पण सवयीनुसार जाग लवकरच आली. निवांत चहा नाश्ता. मामांनी घरातून गावठी अंडी दिली, बॉईल करून वाटेत खायला बांधून घेतली. आवरते घेत सॅक पाठीवर घेऊन भांबळे मामा मामींचा निरोप घेतला.
a19.JPG
बाहेर पडताच शेत पार करत दहा मिनिटांत शिदोबा जवळ आलो. सकाळच्या सौम्य उन्हात जोडीला मंद गार वारा कुठंतरी झाडांच्या गर्दीत तांबट आवाज देतोय प्रसन्न असा माहौल. विटांचे बांधकाम करून वर पत्रे टाकलेले, आत शेंदूर फासलेला शिदोबा.
a20.jpg
लहानशा मंदिराच्या बाजूला अजुनही वाहता झरा तर पाठीमागे भव्य आजोबा सुरेख असं चित्र. खरंतर पाय निघत नव्हता, थोडा वेळ रेंगाळलो. मामांनी आवाज देत पुढच्या पल्ल्याची आठवण करून दिली. ओढ्यातून पाण्याच्या बाटल्या भरून आजोबा आणि करोंदा यांच्या मधील खिंडीच्या दिशेने चालू लागलो. तिथेच होतं गुयरीचं दार ! डावीकडे आजोबा त्याच्या माथ्यावर जाणारा रूट पाहून घेतला, यासाठी पुन्हा येणं होणारच आहे.
a21.jpg
तुरळक रान पार करत पुन्हा एक ओढा आडवा आला हि पण जागा फार आवडून गेली. दहा मिनिटांची दाट झाडीतून चढाई थेट गुयरी. घड्याळात पाहिलं तर साडेनऊ वाजलेले. गुयरीच्या दारात उभे राहिल्यावर उलगडला चिंचवाडी वोरपडी भागातील कोकण प्रांत.
a22.jpg
आता होती भल्या मोठ्या नाळेतून उतराई.. त्यापूर्वी घरी फोन करून खुशाली कळवली, दुपारच्या जेवणासाठी वैभवने कुणाला तरी फोन वर सांगून चिकनची सेटिंग लावली. दमदार ट्रेक नंतर चवदार चिकन मिळणार म्हणून मंडळ फार खुश होतं. असो..
सुरुवातीला नाळेच अरुंद रुप दिसायला जरी भयानक वाटलं तरी प्रत्यक्षात अवघड मुळीच नाही. एक एक जण ठराविक अंतर ठेवून उतरू लागला. उतार तीव्र पाठीवर सॅक सांभाळत काठीच्या आधाराने तोल सावरायचा. वीस एक मिनिटांत गुयरीचा प्रसिद्ध पंधरा फुटी पॅच आला. उजवीकडे कड्याला बिलगून पलिकडे जात खाली उतरायचं. सॅक घेऊन उतरणं जमेल का क्षणभर विचार आला. पाटेकर मामा झटपट पुढे गेले त्याचं निरीक्षण केलं अगदी तसाच जात व्यवस्थित उतरलो.
a23.jpg
जसे खाली उतरू लागलो तसा उतार थोडा सौम्य व नाळ रुंद होऊ लागली. समोर अगदी सरळ रेषेत शुपनाक डोंगर घाटघरची क्रेस्ट लाईन त्यामागे पुसटसा कुलंग कडील भाग. नाळेतून डाव्या बाजूला आभाळाला भिडलेले आजोबाचे कडे भारीच वाटतात. मोठ्या दगड धोंड्यातून तास दीड तास सलग उतराई नंतर पायावर ताण जाणवू लागला. सुरक्षित जागा पाहून अंडी खाण्यासाठी ब्रेक घेतला. इथेही भरपूर हास्याचे फवारे, विषय सांगू शकत नाही.
a24.jpg
आणखी अर्धा तास उतरल्यावर वाट डावीकडे थोडक्यात आजोबाच्या बाजूला गच्च झाडीत शिरली काही ठिकाणी तर माणूस झाकला जाईल इतपत कारवी. आमच्या आधी कुणीतरी गेलेलं असणार कारण त्यांनी झाडी कापत वाट केलेली नाहीतर पाटेकर मामा सांगत होते तसेच वाट झोडपत तयार करत जावे लागले असते. थोडी आडवी चाल तर थोडा उतार, खरंतर उतार जास्तच मध्ये एके ठिकाणी पुन्हा डावीकडे वाट गेलेली दिसली जी वाल्मिकी आश्रमाकडे जाते. कुमशेत मधील मंडळी वाल्मिकीला दिंडी घेऊन याच वाटेने जातात. या वाटेने एकदा नक्की जाणार. जवळपास अर्धा तासानंतर ती झाडीतील वाट लहान ओढ्या जवळ बाहेर आली. समोर आधी सरळ रेषेत दिसणारी घाटघर साम्रदकडील क्रेस्ट लाईन आता बऱ्यापैकी उंच वाटतं होती म्हणजे या वाटेने घामटा जरी काढला तरी कमीत कमी वेळात भरपूर खाली आणलं. आता वाट उजवीकडे वळून उतरू लागली. समोर आले हे भले मोठे दोन प्रस्तर.
a25.jpg
क्षणभर विश्रांती आणि फोटोग्राफी झाल्यावर पुन्हा चालू पडलो. ओढ्या पलिकडे काही अंतर जाताच तीव्र उतरणीचा घसरगुंडी टप्पा. सुरुवातीस कारवीचा थोडा आधार वाटतो पण जेव्हा पूर्ण एक्सपोज ठिकाणी येतो तेव्हा आधाराला काही नाही.
33.JPG
सावकाश पावलं टाकत काठीच्या आधाराने किंवा अगदीच वाटलं तर बुड टेकवत उतरायचं. इथे थोडीफार भीती वाटायचं कारण म्हणजे डाव्या बाजूला शे दीडशे फुटांचा मोठा फॉल आहे. पण फार बाऊ करायची गरज नाही, इथेही तेच सांगेन नियमित ट्रेकरसाठी मुळीच अवघड नाही.
a27.jpg
या पॅच नंतर छोटासा ट्रेव्हर्स घेऊन वाट एका धबधब्याच्या बाजूला आली. अजूनही बारीक पाण्याची धार पाहता पावसाळ्यात तर नक्कीच बघण्या सारखं असणार. वेळ पहिली एक वाजून दहा मिनिटे अशा ठिकाणी छोटा ब्रेक तर होणारच. 'आता एकदम सोपी वाट आहे घाट संपल्यातच जमा चला जाऊ पटापट', असं मामा म्हणू लागले. कुठेही फारसं न रेंगाळता साडेतीन तासाहून अधिक उतराई झाली होती, राहिलेलं थोडं अंतर घाई गडबडीत करायची कुणाचीही ईच्छा नव्हती. उलट बाजूच्या धबधब्याची धार पाहून खाली गेल्यावर नदीत अंघोळीचा ठराव पास झाला. जंगलाचा शेवटचा टप्पा उतरल्यावर सपाट चाल, वन विभागाने ठिकठिकाणी बांध घातलेले पाणी अडवा पाणी जिरवा हे चांगलं काम.
जंगल पट्टा संपवत बाहेर आलो, आता होती नदी पात्राला समांतर चाल. करोली, सांधण, कात्राबाई, गुयरी, आजोबा यांच्या घळीतून कोकणात झेपावणारे अनेक लहान मोठे ओढे काळू नदीचाच भाग.
a28.jpg
वैभवने डुंबायला चांगली जागा दाखवली. पाटेकर मामा व देवा मामा घरी निघून गेले. आम्ही अगदी मनसोक्त कार्यक्रम करून निघालो. नदी पात्रातून समांतर चिंचवाडी पर्यंत हि तासाभरची चाल फ्रेश झाल्यामुळे तसेच सारखं मागं वळून रतनगड, कात्राबाई, गुयरी, आजोबा यांचा पॅनोरमा पाहत मुळीच कंटाळवाणी वाटली नाही.
a29.jpg
चिंचवाडीतील आखीव रेखीव घरे पाठीमागे भव्य आजोबा. देवा मामांच्या घरी पाणी घेऊन निघालो तोच पाटेकर मामा आमची वाट पाहून परत चिंचवाडीत. साडेतीनच्या सुमारास मामांच्या घरी डेहण्यात परतलो. फ्रेश झालो चिकनचे ताट तयारच. खरचं सांगतो अजुनही जीभेवर त्याची चव आहे.. आहाहा ! पोट जड झाल्यावर थोडा वेळ ताणून दिली. काय करणार परत येण्यासाठी निघावं तर लागणारच, पाच वाजता मामा मामींचा निरोप घेतला. वैभवला रविवारचा बाजार असल्याने गाडीतून डोळखांब पर्यंत सोडले, डावीकडे टोकावडे रस्ता पकडला. गाडी चालवताना नजर सारखी सह्याद्रीवर, मावळतीच्या प्रकाशात तिचं रूप न्याहाळणं खुपच सुखावणारं.
आमच्या राजेश मास्तर यांच्या शब्दात लिहायचं झालं तर..
“अजूनही मन डेहणें गावातलं पाटेकरांच घर, पाथराची घाटवाट, कुमशेतच मस्त निसर्गाच्या कुशीत वसलेले भांबळे बाबाचे घर आणि गुहिरीचे दार तिथेच रमलय.....माघारी आलाय फक्त हा नश्वर देह !”

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/12/pathra-guyari.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय फोटो आहेत हो ! तुम्हा सर्वांच्या धाडसाला सलाम. मामी व मामांचे कौतुक वाटले आणी वाईट पण वाटले. या वयात सोबत हवीच. खालुन दुसरा फोटो ( १३:४७ वेळ दाखवणारा ) सतत शिवाजी महाराजांच्या काळातली आठवण करुन देणारा वाटतो. उंच डोंगर , कडे-कपारे, दर्‍या काय निसर्ग आहे. लाजवाब फोटोग्राफी.

धागा उघघताना विचार आला होता मनात की योगेशला विपू करावी की एखखाद्या ट्रेकच्या वेळी मलाही बोलाव. धागा वाचून संपवला तोवर उर दडपले होते. हे काही आपले काम नाही ब्वॉ.
खुप सुंदर वर्णन. आणि फोटो तर निव्वळ उत्तम. खरोखर अवघड ट्रेक दिसतोय हा. सलाम आहे तुम्हाला! ब्लॉगवरचे फोटोही पहातोय.
पुढील ट्रेकसाठी शुभेच्छा!
(मला वाटते Srd यांनीच सुचवले होते. फोटोंना क्रमांक दिलात तर काही विचारता येईल. फोटो खरच खुप सुरेख आणि ट्रेकचा रोमांच दाखवणारे आलेत.)

मस्त वर्णन. तुम्ही अवघड नाही असे म्हणत आहात पण भरपूर अवघड दिसतो आहे.

ते एका फोटोत संगमनेरी घोडा काय लिहीले आहे ? (गावाचं नाव दिसल्याने आपलं विचारलं Wink )

कमाल
नेहेमीपेक्षा काकणभर जास्तच!
फिरत रहा लिहित रहा
वाचत राहू

मी एकदा साकुर्लीला गेलो होतो. तिथून काही वर जाणारी वाट आहे का रतनगडला विचारलं. "आहे पण तुम्हाला नाही जमायचं. "
मग चालत चालत रतनगडाच्या पायथ्याला जाऊन थोडा वर भरकटून तीन वाजता परत खाली आलो. एका गाववाल्याच्या झोपडीत थांबलो. तो म्हणाला थांब इथंच. रात्री बाराला जाऊ.
बरं म्हटलं.
नोव्हेंबर महिना. संध्याकाळी पाच वाजता ढग जमून कचकून पाऊस झाला.
"आता नै जाता येणार. सकाळी जा चोंढेला. तिथून वर वाट आहे घाटघरला. मग साम्रद, रतनगड."
सकाळी अंधारातच चोंढेला गेलो. तिथून वर साम्रदला जायला साडेतीन झाले. तिथे गावात राहून सकाळी कल्याण दरवाजाने रतनगड, मग मुरशेत होडीने शेंडी भंडारदरा. दुपार बाराच्या मुंबई एसटीने परत. मज्जा आली. ती आठवली. फोनबिन काही नाही.
(( तंगडतोड परवडते पण अवघड वाटांचं भ्या वाटतं.))

मामी व मामांचे कौतुक वाटले आणी वाईट पण वाटले. या वयात सोबत हवीच.>>>> खरय तुमच पण हि स्थिती बहुतेक दुर्ग्मम ठिकाणी आहेच.

योगेशला विपू करावी की एखखाद्या ट्रेकच्या वेळी मलाही बोलाव >>> हरिहर.. नियमित ट्रेकर साठी फार अवघड नाही. जाऊया एखादया ट्रेकला.

सकाळी अंधारातच चोंढेला गेलो. तिथून वर साम्रदला जायला साडेतीन झाले. तिथे गावात राहून सकाळी कल्याण दरवाजाने >>> Srd जी वाट केली ती कल्याण दरवाजा नसून त्रंब्यक दरवाजाची वाट जी साम्रदहून रतन गडावर जाते. याच वाटेत अखंड कातळात खोदलेला त्र्यंबक दरवाजा आहे. कल्याण दरवाजा पश्चिमेकडे गडावर राणीच्या हुडा पासून थोडं पुढे गेलं की एक भुयारी पाण्याचं टाकं आहे त्याच्या समोरील बाजूस बुरुजाकार तटबंदी आहे, तिथून आत गेल्यावर कमानीतून तुम्ही बाहेरील बाजूस आल्यावर वाट एकदम नाहीशी होत खाली थेट कडा दिसतो. ती होती पूर्वीची कल्याण दरवाजा ची वाट. काही मंडळी रॅपलिंग करून पुढे जात उतरतात. पण आता हा सगळा टेक्निकल भाग झाला आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर रतनगड हा सह्य शिरोधारेवरील मुख्य किल्ला. रतनवाडी, साम्रद, पुढे राजूर या भागात कोकणातील डोळखांब, साकुर्ली जाणाऱ्या वाटा आणि येथील महत्वाच्या ठाण्यांवर रतनगडाचा अंमल असायचा. किल्ला जेवढा महत्वाचा मोठा तितक्या वाटा जास्त. मग कोकणात जाणारी वाट कल्याण दरवाजा. रतन वाडीत जाणारी गणेश दरवाजा तर साम्रद जाणारी त्र्यंबक दरवाजा

तुम्ही चोंढे घाटाने वर जात घाटघर मग साम्रद तिथून त्र्यंबक दरवाजाने वर गेलात. आता जर रतनगड कोकणातून करायचा झाला तर करोली घाटाची वाट त्यात सोयीची.. जी डेहण्यातून साम्रद ला येते.

मस्त वर्णन. तुम्ही अवघड नाही असे म्हणत आहात पण भरपूर अवघड दिसतो आहे. >>> उंची आहे, दृष्टी भय ज्याला आपण हाईट फोबिया म्हणतो, तसा प्रकार आहे त्यामुळे नवख्या माणसाला अवघड वाटू शकतं.

ते एका फोटोत संगमनेरी घोडा काय लिहीले आहे ? >>> धनि.. हा नगर जिल्ह्यातील पश्चिम भाग. कुमशेत पुढे राजुर, अकोले मग संगमनेर. इथली काही मंडळी आली असतील आणि जाताना नावं लिहून गेली.. काय बोलणार...

आता जर रतनगड कोकणातून करायचा झाला तर करोली घाटाची वाट त्यात सोयीची.. जी डेहण्यातून साम्रद ला येते.
तो गाववाला याच वाटेने सोडणार असावा.

मस्त वर्णन. तुम्ही अवघड नाही असे म्हणत आहात पण भरपूर अवघड दिसतो आहे.>>+१११११

कसले उभे कडे दिसतायत अगदी सरळसोट वाटते आहे चढण फोटोत.

तुम्ही सोपे ट्रेकपण करता का जेणे करून माझ्यासारख्या सामान्यांनापण सहभागी होता येइल.

@निलाक्षी , माथेरानला वरती जाण्यासाठी तीन सोपे ट्रेक आहेत. परतण्यासाठी वाहनं( शेअर taxi ) आहेत. फार ताण पडत नाही. राजमाचीसाठी दोन.

माथेरानला वरती जाण्यासाठी तीन सोपे ट्रेक आहेत >>> अगदी बरोबर Srd .

तुम्ही सोपे ट्रेकपण करता का जेणे करून माझ्यासारख्या सामान्यांनापण सहभागी होता येइल. >>> होय निलाक्षी, सोपे निवांत ट्रेक ही करतो आम्ही.