( मोठ्या बहराची गझल. प्रत्येक मिसर्यात ४० मात्रा. वृत्त-महानाग )
उशा पायथ्याला किती संपदा पण सुखाचाच लवलेश नसतोय हल्ली
मनाच्या कपारी किती कोरड्या! मी बघाया जरा ओल फिरतोय हल्ली
किती एकटेपण मला तू दिले रे, नसे हात धरण्यास हातात देवा
कधी सांगतो गोष्ट, प्रतिसाद देण्या मला मीच हुंकार भरतोय हल्ली
कुटुंबातही मेळ उरला न आता घरी वागती सर्व परक्या प्रमाणे
बरी वाट वृध्दाश्रमाचीच वाटे, जिव्हाळा कुठेही न मिळतोय हल्ली
जरी रंग नवखे दिले कुंचल्याने जुनेर्याच भिंती कशा या घराच्या
तरी व्यर्थ लपवावया सुरकुत्या मी सदा सर्वदा यत्न करतोय हल्ली
तिचे बोलके नेत्र गुपचुप असे का? कळेना तिच्या अंतरी काय आहे
बघाया जरा भाव डोळ्यातले मी तिच्या काजळालाच पुसतोय हल्ली
दिसेनात आता विभूती कुठेही नमस्कार ज्यांना लवूनी करावा
प्रतिष्ठा किती लाचखोरांस आहे जयांना जमानाच पुजतोय हल्ली
चला व्यक्त करण्या मनाच्या चिडीला जनांदोलने पेटवू या गड्यांनो
करू निश्चयाने पदच्यूत जो जो खुलेआम देशात चरतोय हल्ली
जशी देवभक्ती करू लागलो मी कळाले मला मंदिरी लूट आहे
किती राबता चोरट्यांचा इथेही, जगाचा नियंताच निजतोय हल्ली
जरा थांब "निशिकांत" जातोस कोठे? तुला भोग आहेत भोगावयाचे
शतायुष्य आहे मला शाप पण मी, विधात्या! हसायास जगतोय हल्ली
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
छान आहे!!
छान आहे!!
आवडली.
आवडली.
शरद, सामो आभार आपले
शरद, सामो आभार आपले प्रतिसादासाठी.
उत्तम व आवडली
उत्तम व आवडली
यतीन, मनापासून आभार
यतीन, मनापासून आभार प्रतिसादासाठी.
आवडली
आवडली
तिचे बोलके नेत्र गुपचुप असे का? कळेना तिच्या अंतरी काय आहे
बघाया जरा भाव डोळ्यातले मी तिच्या काजळालाच पुसतोय हल्ली
जशी देवभक्ती करू लागलो मी कळाले मला मंदिरी लूट आहे
किती राबता चोरट्यांचा इथेही, जगाचा नियंताच निजतोय हल्ली
हे शेर विशेष आवडले