आज मलाच उशीर झाला . मी स्टेशनला आलो त्यावेळी आधीच लोकल प्लॅटफॉर्मला लागलेली होती . आज जागा मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्याने मी निवांत चालत येऊन आमच्या डब्यात शिरलो . अपेक्षेप्रमाणे जागा नव्हतीच ! शरद आणि सावंत उभे होते . मी थेट जाऊन त्यांच्या मध्ये उभा राहिलो .
" ए भाई .... मध्ये कुठे घुसतो ? " शरदने सुरू केलं .
" कुठे घुसतो म्हणजे ? माझी जागा आहे .... आणि तू कोण रे विचारणारा ? " मी आवाज चढवला .
" मी आधी आलोय इथं, काय ? "
" आधी आला तर मग काय तुझी आरती करू का ? " मी त्याला चिडवायच्या सुरात म्हणालो .
" ए .... डोक्यात जाऊ नको हा का आता ? " शरदनेही आवाजाची पातळी वाढवली .
" गेलो डोक्यात .... काय करशील रे ? " मी असं म्हणालो आणि शरदने माझ्या अंगावर धावून येण्याचं नाटक केलं . नायर अंकल त्यात उगाचच ओरडले , " मारो मत ... मारो मत " आणि आमच्या ग्रुपच्या सगळ्यांनी गोंगाट केला . शेजारच्या इतर ग्रुपमधल्या नेहमीच्या लोकांना आमची ही सवय माहीत होती . नवख्या लोकांना वाटलं की आता खरंच मारामारी होते की काय ... त्यांचे फसलेले चेहरे बघून आम्ही सगळे हसू लागलो . मी पलीकडे बघितलं तर अवंतीसुद्धा कानात घातलेले एअरफोन काढून आमच्या ग्रुपकडे आश्चर्याने बघत होती . आमची नजरानजर होताच तिने ' काय झालं ?' असं डोळ्यांनीच विचारलं . मी ' सगळं ओक्के ' अशी खूण केली .
" शरद भाय , बच्चे की जान लोगे क्या ? " जिग्नेस म्हणाला .
" मधू और बच्चा ? अबे उस्को बच्चा होने का टाईम आ गया है " सगळे हसले . बाकी आज सगळेच खुशीत दिसत होते . आणि आश्चर्य म्हणजे जिग्नेस दिलखुलासपणे हसत होता .
" अरे जिग्नेस , कल क्या हुआ , मिला क्या तेरा फोन ? " मी त्याला विचारलं .
" हां मधू भाई .... अरे लेकिन वो लडकी फुल्ल हटेली थी बाबा .... " जिग्नेस डोक्याला हात लावत म्हणाला .
" मतलब ? "
" अरे , फुल्ल पागल ! फुल्ल गॉन केस ! मेरेको बोली की तू मेरेसे टकरायाच कैसे ? "
" फिर ? " सावंतांनी विचारलं .
" मै बोला , मॅडम गलती तो आपका है । आप फोन पे बात करते करते बिना देखे जा रही थी ... और मै थोडा घाई मे था तो हो गयी टक्कर ! तो बोल रही है की तुम मेरेको सॉरी बोलो । "
" क्या लडकी है ? एक तो उसका गलती है और तुमे सॉरी बोलने को कहा ? "नायर अंकल आगीत तेल टाकू लागले .
" मैं भी वही बोला .... तो बोली सॉरी बोलते हो या पुलीस को बुलाऊ ? " जिग्नेस म्हणाला .
" ही तर हद्दच झाली . एवढ्याशा गोष्टीसाठी डायरेक्ट पोलीस ? " शरद आश्चर्याने म्हणाला.
" हां ना ..... और मेरा बॅड लक् इतना खराब की वहा पे बाजूमे सचमूच आर पी एफ वाला खडा था । " एखादी सुरस कथा सांगावी तसा जिग्नेस आम्हाला सांगू लागला .
" क्या बात कर राहा है ! फिर ? " शरद आश्चर्याने म्हणाला .
" फिर क्या ! लडकी देखके वो भी साला तुरंत आ गया । वो पागल लडकीने उसे सब बताया । उसमे मेरीही गलती कैसे थी ये सब नमक मिर्ची लगाके आर पी एफ वाले को ऊस लडकी ने पटाया । और वो पागल भी मान गया । " जिग्नेस तावातावात म्हणाला .
" बराबर है ना यार ! एक तरफ लडकी और एक तरफ तू , तो वो आर पी एफ वाला लडकी की ही सुनेगा ना . " भडकमकर म्हणाले .
" लेकिन मेरी कोई गलती थी ही नहीं ना "
" फिर भी तुने सॉरी बोला होगा ना ? " सावंतांनी विचारलं .
" क्या करता फिर ? वो पुलीस के सामने मॅटर कायकू बढानेका ना .... इसिलीये बोल दिया सॉरी " जिग्नेस मान हलवत म्हणाला .
" एक लडकी को सॉरी बोला ? वो भी तेरी गलती न होते हुये भी .... अर्रर्रर्र ... पुरा इज्जत मिट्टी में मिला दिया ! " शरद त्याच्यावर घसरला .
" और नहीं तो क्या ? खुद का नहीं लेकिन हमारी इज्जत का तो ध्यान रखता ! " सावंत पण त्याला पिडू लागले . मग जो तो जिग्नेसचं कसं चुकलं हे सांगून त्याला वैताग आणू लागला . ग्रुपच्या लोकांना बडबड करायला चांगला विषय मिळाला होता . माझं लक्ष सहज भरतकडे गेलं तर तो मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता . एवढे गमतीदार प्रसंग घडत होते तरी त्यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही हे मला जरा खटकलं . कारण मी शरदशी भांडणाचं नाटक करत असताना तो त्याच्या मदतीला आला नव्हता किंवा जिग्नेसलाही तो एका शब्दाने बोलला नाही . मी शरदला खुणावलं . त्यालाही त्याच्यात थोडंसं वेगळेपण जाणवलं .
" काय भरतराव ? आज एकदम बिझी ? " शरदने त्याच्या नेहमीच्या शैलीत त्याला विचारलं . त्यावर त्याने वर बघून नुसतं हुं केलं आणि तो पुन्हा मोबाईलमध्ये उगाचच गेम खेळत बसला.
" कायतरी झालंय नक्की . " मी शरदच्या कानात म्हणालो . त्यावर त्याने होकारार्थी मान डोलावली .
" कुर्ल्याला उतरल्यावर बोलतो त्याच्याशी " शरद हळू आवाजात म्हणाला . लोकलने घाटकोपर सोडलं आणि दोघे उठून डोअरपाशी गेले .
" भरत जरा शांत शांत वाटत होता नाही ? " सावंत म्हणाले .
" हो , तेच शरदला विचारपूस करायला सांगितलं आहे.... बघू , उद्या कळेल . " मी म्हणालो . कुर्ला आलं आणि दोघे उतरले आम्ही खिडकीतून बघितलं तर शरद भरतच्या खांद्यावर हात टाकून चालत जात असलेला आम्हाला दिसला , याचा अर्थ त्याने त्याचं काम सुरू केलं होतं . दादरला भडकमकर आणि नायर अंकल उतरले . मी भायखळ्याला उतरलो . मागून अवंती येत होती . आम्ही नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो . वेटर बन मस्का आणि चहा घेऊन आला.
" कैसे हो भैया ? सब ठीक ? " अवंतीने त्याची चौकशी केली आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले . त्याने हातानेच ठीक आहे असं सांगितलं .
" काल का नाही आलीस ? " मी चहाचा घोट घेत तिला विचारलं .
" काल work from home केलं .... " ती म्हणाली .
" तुमच्या ऑफिस ला चालतं ते ? बरं आहे यार .... आमच्याकडे बॉस ला आमचे चेहरे दिसले नाहीत तर तो अस्वस्थ होतो. जसं काही आमचा चेहरा त्या संतूर साबणवाल्या बाईसारखा लकी वगैरे आहे .... " मी म्हणालो त्यावर ती खुदकन हसली .
" तुझं ऑफिस कितीला सुटतं ? " तिने चहाचा घोट घेत विचारलं .
" सहा , कधी साडेसहा ... आमच्याकडे ऑफिस मध्ये यायचा वेळ फिक्स आहे पण जायचा नाही . "
" आमच्याकडे तसं बरं आहे . आमचा बॉस तसा चांगला आहे . " ती म्हणाली .
" सुंदर मुलींशी त्यांचे बॉस चांगलेच वागतात . " मी बोलून गेलो .
" म्हणजे ? "
" म्हणजे सुंदर मुलींचे शंभर गुन्हेही माफ असतात " मी म्हणालो .
" ओ हॅलो , म्हणजे ? काय म्हणायचंय तुला ? " ती थोडीशी चिडली .
" मी तुला सुंदर म्हणालो इतकंच ... " अचानकपणे सुचलेल्या वाक्यावर माझं मलाच भारी वाटलं . त्यावर तिने खोट्या रागाचा एक लूक दिला . तिला माझा हजरजबाबीपणा आवडला होता हे तिच्या चेहऱ्यावरच्या बदललेल्या भावांवरून माझ्या लक्षात आलं.
" शब्द फिरवण्यात पटाईत आहेस तू ! " ती मिश्किल चेहऱ्याने म्हणाली .
" धन्यवाद ... पण जे सत्य आहे ते आहे ... मी फक्त सत्य सांगितलं . " मीही त्याच सुरात म्हणालो .
" तुझ्या घरी कोणकोण असतं ? " तिने शिताफीने विषय बदलला .
" आई , बाबा , मी आणि आजोबा "
" आमच्या घरी ..." ती बोलत असतानाच मधेच मी टोकलं , " मला माहिती आहे , आई बाबा , तू , आत्तुडी आणि आज्जूडी बरोब्बर ? " मी उत्साहात म्हणालो .
" चूक ! " जेवढ्या उत्साहात मी म्हणालो होतो त्याच्यापेक्षा जास्त उत्साहात ती म्हणाली . " आत्तुडी आमच्याकडे कशाला राहील ? ती तिच्या घरी असते . "
" ओह ! चुकलंच माझं .... " मी महेश कोठारेंसारखं ' डॅम इट ' केलं .
" आणखी एक खूप महत्त्वाचा मेम्बर आहे तो म्हणजे बॉबी ! " ती म्हणाली .
" बॉबी ? कोण बॉबी ? "
" माझा लहान भाऊ ... अतरंगी आहे फारच ! "
" म्हणजे ? असं काय करतो तो ? "
" थर्ड इअर इंजिनिअरिंग मधून कॉलेज सोडून दिलंय . तसा ब्रिलियंट आहे , पण विक्षिप्त आहे . त्याच्या मनात जे काही येईल ते करतो . मग परिणामांची पर्वा करत नाही . बाबा फारच ओरडत असतो त्याला , आईने तर हात टेकलेत त्याच्यापुढे . पण मनाने तसा चांगला आहे . माझ्याशी कधी नीट बोलत नाही , पण तो माझी काळजी करतो हे त्याच्या डोळ्यांतून दिसतं मला . भविष्यात मला काही प्रॉब्लेम आला तर तोच पहिला धावून येईल . मी अनिकेतशी ब्रेक अप केलं तेव्हा घरातले सर्व जण माझ्या ह्या निर्णयाच्या विरोधात बोलत होते . पण बॉबी , फक्त एकटाच होता जो माझ्या बाजूने उभा राहिला . म्हणाला , तिला जर नाही करायचं त्या अनिकेतशी लग्न तर तुम्ही फोर्स का करताय ? आणि कायद्याने ती सज्ञान आहे . तुम्ही तिच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. तिला तिचा पार्टनर निवडायचा पूर्ण अधिकार आहे ... " ती बोलत होती . मी नुसता ऐकत होतो . तिच्या डोळ्यांच्या कडा थोड्याशा पाणावल्या . बहीण भावाचं नातं खरंच खुप विचित्र असतं . एकमेकांबद्दल आस्था वाटते पण ते दाखवत नाहीत . असं का होतं ? बहीण जो पर्यंत घरी असते तेव्हा तिच्याशी पटत नाही आणि लग्न होऊन सासरी गेली तर करमत नाही . त्यानंतर देव आनंदच्या हरे रामा हरे क्रीष्णा मधलं ते गाणं उगाचच डोक्यात दिवसभर वाजत राहिलं , फुलों का तारों का सबका केहना है । एक हजारो में , मेरी बेहना है । सारी उमर हमे संग रेहना है ।
क्रमशः ....
सही जा रेले है बावा
सही जा रेले है बावा
छान चालुये.
छान चालुये.
संतूर नाही पिअर्स.
भाय, अगली ट्रेन जल्दी आन दे .
भाय, अगली ट्रेन जल्दी आन दे .